मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
घुमे नाद तो सुंदरींच्या क...

राम गणेश गडकरी - घुमे नाद तो सुंदरींच्या क...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


घुमे नाद तो सुंदरींच्या करीं
मनीं अंतरीं ही विराल्या परी ॥
तशा हृदयिंच्या सर्व तारां त्वरें ।
म्हणूं लागल्यी गान एकस्वरें ॥१॥

चढे दिव्य ह्रद‌गान तें सारखें ।
करी बाह्य विश्वास तें पारखें ॥
क्षणार्धांत चिद्‌वृत्ति ही रंगली ।
स्वगीतांतची बालिका गुंगली ॥२॥

अशा दिव्य त्या चित्तगीतापुढें ।
असे कायसें विश्व हें बापुडें ।
घुमे आंतल्या आंत गाणें असें ।
कळे तें जयाचं तयाला कसें ? ॥३॥

म्हणोनी करीं शांत झाली गती ।
विचारांतरीं लीन वीणावती ॥
तिनें उधळितां नादरत्नाकरा ।
मनोवृत्ति सार्‍याहि आल्या भरा ॥४॥

मनांतील तारा निजार्थध्वनि ।
खडा ठेविती गूढता टाकुनी ॥
मुक्या प्रीतिचे भावही बोलती ।
मनोवृत्ति त्यां ऐकुनी डोलती ॥५॥

मिटी नेत्र बाला पहाया मना ।
तशी गुंगली सर्वही चेतना ॥
मुकें गान अंतरीं पाझरे ।
विरे देहिंचा देहभाव त्वरें ॥६॥

जरासा तसा हात राही पहा ।
करी यौवनश्री असा खेळ हा ॥
खुळे भाव सारा झुले जीवही ।
क्षणार्धांत झाली समाधिस्थ ही ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP