कोठें असे सकलपंडितमुख्य भोज ?
कोठें शिकंदर जगद्विजयी सुराज ?
कोठें स्वधर्मपरिपालक श्रीशिवाजी ?
कोठें तदीय यशवर्धक वीर बाजी ? ॥१॥
ते राजकारणपटूत्तम धीट नाना
कोठें न कां दिसति ओढित कोण त्यांना ?
लोकैकवीर रणधीर मुरारबाजी
कोठें लपोनि बसले कळतें न आजी ॥२॥
कोठें असे मयसभा स्पृहणीयशोभा ?
निस्तेज कां मज कथीं पृथुची यशोभा ?
धारा कुठें सकळ लोक ललामभूता ?
तें हस्तिनापुर कुठें हरि ज्यास त्राता ? ॥३॥
गेले कुठें सुकवि जे प्रिय शारदेसी ?
नेलें कोणीं अखिल भारतसंपदेसी ?
गेलें कुठें बहुल वैभव पेशव्यांचें ?
व्यापार-कौशल कुठें लपलें चिनाचें ? ॥४॥
कां मृण्मया बनलि रोमकराजधानी ?
कां ग्रीकराष्ट्रमहतीहि न येत कानीं ?
केलें कुणी परमदीन दमास्कसातें ?
नेलें कुणी मिसरच्या सुयशोधनातें ? ॥५॥
वाजीगजादि नवरत्नसुजातकोष,
प्राचीन वैभव नितान्त तसें अशेष;
स्तंभादि वीरजयसूचक वस्तुजात
केलें कुणी सकल हें स्मृतिमात्र ज्ञात ? ॥६॥
स्थित्यंतरा करित कोण असा विदेही ?
कीं नामरुप गुणवर्णन त्यास नाहीं ?
छे; सर्व हें वितथ; नाम तयास आहे--
तो ’काळ’ जो करितसे स्थितिभेद बा हे ॥७॥