मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
क्षणभर वेडया प्रेमा थांब ...

राम गणेश गडकरी - क्षणभर वेडया प्रेमा थांब ...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


क्षणभर वेडया प्रेमा थांब !

अधिर मनासह जासी कोठें ?

चुकशिल---संकटिं पडशिल वाटे,

जग हें सारें बा रे खोटें !

हृदया सोडुनि; गडया म्हणोनी, जाइं न कोठें लांब !

क्षणीं पांढरा, क्षणींच काळा

रंग आवडे असा जगाला,

ठाव तयाचा कुणा न कळला !

खुळ्या तुलाची, अशा जगाची, कळेल का कृति सांग ?

जग सगळें हें देखाव्याचें !

गुलाम केवळ रे स्वार्थाचें !

स्मशान कीं हें शुद्धत्वाचें !

शुद्ध भाबडें, सरळ रोकडें, अशांत करिशिल काय ?

प्रेमा येथें शपथ लागते !

प्रासावांचुनि कविता अडते !

कर्त्यावांचुनि कार्यहि घडतें !

देव बिचारा, तया न थारा, तुझी कथा मग काय ?

तुझ्यासारखा तुला सोबती--

मिळेल का या अफाट जगतीं ?

--संकुचितहि हें अफाट जरि अति---

आणी न मना, अशी कल्पना, अगदीं भोळा सांब !

कोणी तुजला मानिल खोटें,

तिरस्कारहि दिसेल कोठें,

अपमानाचेंही भय मोठें,

बाग जगाची, ही न फुलांची, कांटे जागोजाग !

टाकिल कुणि तुज धिक्कारानें,

रडविल किंवा उपहासानें,

फसविल नकली कीं मालानें,

कोणी भटकत, उगाच रखडत, फिरविल मागोमाग !

म्हणुनि लाडक्या ! कुठें न जाई,

या हृदयांतचि लपुनी राही,

योग्य मित्र नच सुख तरि नाहीं !

कुसंगतीहुनि, वेडया ! मानीं, फार बरा एकान्त !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP