संध्यापट गगनीं पसरी ।
तारांची राणी हंसरी ॥
कधीं गालिचा अरुणाचा ।
करि तो तेजस्वी नाचा ॥
शुक्रतारका अशी नभा ।
नवी नवी देई शोभा ॥
तारा गगनीं
परि भूवरुनी;
बघताम नयनीं
जी संचरते हृदयीं, ती ।
दिव्य प्रेमाची जाति ॥धृ०॥१॥
न मिळे अवसर अभिलाषा ।
’दे घे’ ची नाहीं भाषा ॥
भाव आमचा थरारला ।
तरि दादहि त्याची न तिला ॥
एकाद्या किरणापुरता ।
प्रेमबंध होतो पुरता ॥
जिच्या जिवाला
तिळ मोबदला
नकोच कसला;
निराश जन्मापासुनि ती
दिव्य प्रेमाची जाति ॥२॥
प्राण चंद्र ज्या कुमुदांना ।
काय जाणतो तो त्यांना ?
फुलें हंसति पाहुनि रविला ।
कळे न परि त्याचें त्याला ॥
चंद्रकांत मणि पाझरती ।
चंद्र फिरे वरच्यावरतीं ॥
कवि कोठेंतरि,
तत्कवितापरि
फिरे दिगंतारें,
रसिकमनें मग कविवरतीं ।