वाजिवरे बाळा ! वेल्हाळा ! रुम्झुम् घुंगुरवाळा ! ॥धृ०॥
अस्फुट विश्वाचें । प्रेमाचें । गाणें आनंदाचें---
वदलों जें नादीं । संवादीं । तुझिया जन्माआधीं---
पहिल्या प्रीतीचे । गमतीचे । कांहींसे भीतीचे,
बाळा ! ते बोल । तूं बोल । आज मनीं जे खोल.
रात्रीच्या काळीं । जो बसली । ब्रह्मानंदीं टाळी,
मनिं तेव्हां बाणे । जें गाणें । अस्फुट मंजुळवाणें,
धीर न परि हृदया । उघडाया । उघडपणें तें गाया !
वदलों मग पाहीं । दोघेंही । लाजूनी कांहीं कांहीं !
हृदयीं खळबळलें । दरवळलें । विना ऐकिल्या कळलें !
गाणें मंजुळ तें । झुळझुळतें । तुझिया वाळ्याभंवतें !
वाळा हालूं दे । बोलूं दे । आनंदे डोलूं दे.
एकच हा चाळा । वेल्हाळा । घे रे तान्ह्या बाळा !
एकच पायाचा । वाळ्याचा । नाच गोड बाळाचा---
ऐकुनि आनंदें । त्या छंदें । घर सगळें नाचूं दे !
’गोविंदाग्रज’ ही । कवनांहीं । त्या छंदावर गाई !