गुरूचरित्र - गायनी विद्या
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
संगीत गायनी विद्या । सर्व सद्या मनोरथा ॥ विदेश पाहतां नाहीं । धन्य ते गायनी कळा ॥१॥
आवडी सकळां लोकां । प्रीतीनें भजती जनीं ॥ इच्छिलें पुरविती सर्वे । धन्य ते गायनी कळा ॥२॥
वेधिलीं सर्वही चित्तें । बोधिलीं लोक भाविकें । अद्भुत गुण देवाचे । धन्य ते गायनी कळा ॥३॥
येकाकी महंती येते । उदंड कीर्ति वाढते ॥ विख्यात सकळ लोकीं। धन्य ते गायनी कळा ॥४॥
राहती लोक ते राजी । आवडी उपजे मनीं ॥ वर्णितां कीर्ति देवाची। धन्य ते गायनी कळा ॥५॥
दुसरी भक्ति देवाची । जगोद्धारचि होइजे ॥ घमंड गाजते मोठें । धन्य ते गायनी कळा ॥६॥
बारीक उठती कीळा । नाना तंत परोपरीं ॥ ऐकतां गुदगुल्या होती । धन्य ते गायनी कळा ॥७॥
बाळके श्वापदें पक्षी । लोटती वेधती मनीं । चित्त निश्चित होताहे । धन्य ते गायनी कळा ॥८॥
संगीत मूर्छना ताळें । मुर्कुंडी होतसे बळें ॥ विताळ पाहतां नाहीं । धन्य ते गायनी कळा ॥९॥
प्रबंधें कीर्ति देवाची । जाड दृष्टांत नेटके ॥ रसाळ गौल्यता मोठी । धन्य ते गायनी कळा ॥१०॥
नाना प्रकारचीं मानें। कीर्ती प्रताप होतसे ॥ अतूळ तूळणा नाहीं । धन्य ते गायनी कळा ॥११॥
भक्तीची आवडी मोठी । करुणाकीर्तनें बरीं । भक्तांची आवडी भक्तां । धन्य ते गायनी कळा ॥१२॥
याप्रमाणें गायनाचा महिमा आहे. तथापि हें गायन करितांना नुसत्या सुराकडे व तालादिकाकडेच लक्ष न देतां आपण तोंडाने गातों त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन तो भाव मनांत उत्पन्न करण्याचा प्रयत्न करावा. नसल्यास श्रीतुकारामांनी म्हटल्याप्रमाणें--
“हांका मारी ज्याच्या नांवें । त्याचें गांवचि नाहीं ठावें ॥
काय गातों हें कळेना । राग आळवितों नाना ॥"
ह्या दोषास पात्र व्हावें लागेल, श्रीसमर्थांनींही म्हटलें आहे---
“सांडूनि देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावे मग्न । तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें । एक मन गुंतले स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरि । बळेंच धरूनियां चोरीं । शिश्रूषा घेतली ॥ करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरूनियां मन । स्वरामागें नेलें !"
असें न होण्याबद्दलची खबरदारी घ्यावी. भावयुक्त भजनच देवाला प्रिय आहे. हे लक्षांत घेऊन शब्दार्थध्यानपुरःसर प्रेमानें भजन करण्याचा अभ्यास करावा म्हणजे भगवंताची प्रसनता लवकर होईल. गायन हें याला फार साहाय्यक होते. असो. (श्रीमंत आबासाहेब मुजुमदार यांनी हा सुंदर लेख लिहून पाठविल्याबद्दल फार आभार आहेत.)
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2023
TOP