मूळ ग्रंथकाराची भाषा सुधारण्याचा प्रयत्न अलीकडील छापखानेवाल्यांनी कसा केला आहे हे थोडेंसें वर दाखविलें आहेच; पण छापखाने हिंदुस्थानांत सुरू होण्यापूर्वी ने हस्तलिखित ग्रंथ तयार होत होते, ते लिहिणार्या लेखकांकडूनही भयंकर हस्तप्रमाद होत असत. हा प्रसाद आपल्या गुरुचरित्र ग्रंथाच्याच वांट्यास आला आहे असें नाहीं, तर तो दासबोध-ज्ञानेश्वरी वगैरे सर्व ग्रंथांच्या (प्राकृत व संस्कृत ग्रंथांच्याही वांट्यास आलेला आहे! कै. माडगांवकर यांनी १०|१२ जुन्या प्रति मिळवून भिन्न भिन्न पाठभेद छापलेली ज्ञानेश्वरी ज्यांनी पाहिली असेल त्यांच्या हे लक्षांत येईलच. ज्ञानेश्वरकृत अनुभवामृतावरील रा. रामचंद्र बळवंत डोंगरे यांची अमृतवाहिनी' नामक विस्तृत टीका छापलेलें पुस्तक हल्लींच माझ्या पाहाण्यांत आले ; त्याच्या प्रस्तावनेंत त्यांनीं आपला अनुभव असाच लिहिला आहे ! दासबोधाबद्दल तर मागें (पृ. २९ वर) लिहिलेंच आहे. असे हे आपले आर्यावर्तांतील ग्रंथच अशा पाठभेदांनी भूषित (दूषित) झालेले आहेत असें नाहीं, तर पाश्चात्य देशांत तयार झालेलें बायबल देखील छापण्यास घेण्यापूर्वी 'हजारों’ पाठभेदांनी गढूळ झालेलें होते. असा दाखला कै. गजानन भास्कर वैद्य यांनीं मांगें आपल्या 'हिंदू मिशनरी' मध्ये प्रसिद्ध केला होता ! छापखान्याचा जसा हल्लीं धंदा चालू आहे. तसा गंथलेखनाचा पूर्वी धंदाच होता. लेखक फक्त हस्ताक्षर वळविण्याचा प्रयत्न करीत. भाषा किंवा विद्या शिकण्याचा करीत नसत. तशा अशिक्षित लेखकांकडून कमीजास्त अनर्थाचे हस्तप्रमाद होणें साहजिक आहे. ग्रंथ छापण्यापूर्वी अनेक प्रती मिळवून, त्यांतील अनेक पाठभेद पाहून, 'मूळ ग्रंथकाराचा शब्द' शोधून काढण्याचा प्रयत्न करणें हेंच सुविद्य संशोधकाचे काम असतें. पुण्यांतील भांडारकरांची 'भारत रीसर्च इन्स्टिट्यूट' संस्था याच उद्देशानें स्थापन झालेली पुष्कळांना हीत असेल. त्या संस्थेमध्ये कितीतरी विद्वान लोक काम करीत आहेत. याचप्रमाणे 'वेदिक रीसर्च असोशिएशन' स्थापन होऊन सायनभाष्यासहित शुद्ध ऋग्वेद छापण्याचें कामही तेथे पद्धतशीर चालले आहे * तात्पर्य, आपल्या गुरुचरित्रांत आढळलेले हस्तप्रमादाचे चमत्कार मांगें दोन चार सांगितले आहेत, तथापि आणखी सांगण्याचा मोह आवरत नाहीं म्हणून सांगतों:---‘‘आपुलें वक्ष-पृष्ठदेशीं | धर्माधर्म उपजविले’’ (३४।३५) या ठिकाणीं कांहीं लेखकांनीं ‘वृक्षपृष्ठदेशीं' केलें आहे! 'पुल्कस-स्वरूप' च्या ठिकाणीं 'पुष्कळस्वरूप' केलें आहे (३४।३८); 'कामुक' च्या ठिकाणीं 'कार्मुक' (३४|३८); 'फल वरुण नेई' च्या ठिकाणीं 'फल वर्णू नये' (३७।१४३); 'शीघ्र यावें अरोगणासी' च्या ठिकाणीं ' असे गणेसी ' (३|६१) आणि हें. क. प्रतीत आहे! तें इतर प्रति पाहून सुधारावें लागले. 'अष्टसिद्धि आपुले बशी' ऐवजी 'आपुले वंशीं' (१६।३२); 'पंचगंगासंगमेंसी' ऐवजीं 'समागमेसी' (१९|६०) ‘द्वय नेदावें निष्फळ अयोग्य' ऐवजीं 'द्वय देतां निश्चळ आरोग्य' (३७।२२१) हें केवढे विरुद्ध आहे हें त्यावरील टीपें पाहावें! 'कुष्टी असेल अंगहीन । त्याणें अर्चावे गुरुचरण' ऐवजी 'आचरावें०' आहे. 'सकाळीं बारा' ऐवजी ' सकळिका बारा' ( २८|९३); 'अयाचित अन्न जेवावें' ऐवजी 'अयाचिता अन्न द्यावें' (२८।९३) इत्यादि शेंकडों !!!
सारांश, मार्गे लिहिल्याप्रमाणें ग्रंथकाराच्या भाषेंत आधुनिकांच्या दृष्टीस अनेक व्यंगें दिसली तरी, ते भक्तांचे बोबडे बोल देवास आवडले. त्या ब्रह्मांडनायकाच्या दरबारांत ते मंजूर झाले. त्यामुळे त्यासंबंधानें आपणास तकार करण्यास जागा नाहीं. या ग्रंथासंबंधाने महाराष्ट्रांतील प्रसिद्ध ग्रंथकार ह. भ. प. पांगारकर हे आपल्या 'मराठी वाङ्मयाचा इतिहास’ खंड दुसरा यांत लिहितात - "मुसलमानांची राजसत्ता हिंदु प्रजेस अत्यंत दुःसह झाली असतांना श्रीनृसिंहसरस्वतींचा अवतार झाला. श्रीपादश्रीवल्लभ व नृसिंहसरस्वती ह्या एकामागून एक प्रकट झालेल्या श्रीदत्तावतारांनी ज्या लीलांनी हिंदुप्रजेस तसल्या घोर प्रसंगांत धीर देऊन हिंदूच्या आचारधर्माचा उपदेश केला, त्या लीलाचरित्रांचे वर्णन 'गुरुचरित्र
----
* ह्या संस्थेचे सेकेटरी श्रीयुत नारायण श्रीपाद सोनटके, बी. ए. यांची थोड्या दिवसांसाठी भेट होऊन त्या संस्थेची हकीकत कळली. यांनी त्या ग्रंथाचे बारा रु. किंमतीचे दोन भाग प्रसिद्ध केले असून दुसरा भाग गतवर्षी श्रीमंत सौ. इंदिराबाईसाहेब होळकर महाराणी इंद्र यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन समारंभ होऊन प्रसिद्ध झाला (अजून तसले तीन भाग व्हावयाचे आहेत.)
----
ह्या ग्रंथांत केले असून सांप्रदायिकांना हा ग्रंथ वेदतुल्य वाटत असतो. गुरुचरित्र ग्रंथ शके १४८० च्या सुमारास म्हणजे (नृ. स. गुप्त झाल्यावर) १०० वर्षांनंतर झाला. प्रस्तुत ग्रंथांत कांहीं प्रकरणांतून ग्रंथकाराची जाज्ज्वल्य श्रद्धा व त्याचे वेदशास्त्राचें खोल ज्ञान स्पष्ट दिसते. नृसिंहसरस्वतींचा योगशास्त्रावर व कर्मकांडावर मुख्य भर होता. प्रस्तुत ग्रंथांत कर्मकांडाचे विवरण सविस्तर आले आहे. कर्मकांडाचे सर्वच नियम त्या काळीही पाळणे कठीणच होतें. आजकाल तर त्यापेक्षां कठीण. तथापि सर्व नियमांचे व आचारांचें एकीकरण यांत केलेलें आहे असा एकही ग्रंथ भाषेत नसावा हे म्हणणे अविचाराचें होईल. चो-या, खून, मारामार्या, दरोडे, परद्रव्यापहार व परकांताहरण इ० गुन्हे सहस्रशः घडत आहेत, म्हणून त्यांचे नियमन करणारे कायद्याचे 'कोड' नसावें हें म्हणणे युक्तीस धरुन होणार नाहीं ! असें नियमाचें पुस्तक पुढे असले म्हणजे देशकालवर्तमानानुसार सुज्ञ लोक तारतम्यानें ग्राह्याग्राह्य विचार ठरवितात. शिवाय अशा जातीचा एवढा एकच ग्रंथ मराठी भाषेत आहे व त्याचें श्रद्धेने व पूज्यबुद्धीने नित्यपाठ करणारे हजारों लोक असून त्यांच्या आचारविचारांवर त्याचा थोडाफार संस्कारही घडत असतो. ह्या ग्रंथांत एकही यावनी शब्द नाहीं." इत्यादि.
अशा ह्या सर्वमान्य ग्रंथाची सेवा श्रीगुरुदेवांनीं मजकडून करविली याबद्दल त्यांचे उपकार मानावे तेवढे थोडेच वाटतात. त्याचप्रमाणें ज्या ज्या व्यक्तींकडून मला या कार्यात अनेक प्रकारचे साहाय्य मिळाले त्यांचेही उपकार मानणें अवश्य आहे. ज्यांनी मला आपल्या घरचे जुने हस्तलिखित ग्रंथ प्रत्यंतरे पाहाण्यासाठीं म्हणून दिले व देवविले, त्याचा नामनिर्देश 'जुन्या हस्तलिखित प्रतींची यादी' पुढे दिली आहे तींत कृतज्ञतापुरःसर केलेला असून अखेरीस सर्वांचे आभार मानिले आहेत. आतां ग्रंथ मिळाले तरी संशोधनाच्या वेळीं आपला अमूल्य वेळ खर्च करून मजजवळ बसून निरनिराळ्या पोथीमधून प्रत्येक ओवी वाचून सांगण्याचे काम कोणी तरी केले पाहिजे होतें, ते ज्यांनी प्रेमानें व निष्काम बुद्धीनें केले त्यांचा नामनिर्देश करणें अवश्य आहे. त्यांत माझ्या स्मरणांत आज पुढील व्यक्ति आहेत–--श्रीयुत नाथ सेवेकरी, शेषो श्रीपाद कुलकर्णी ऊर्फ बाबासाहेब दड्डीकर, केशव हरि जोशी, नारायण दामोदर जोशी, अनंत दत्तात्रेय विंझणेकर, बाळकृष्ण महादेव पाटणेकर, गणपतराव देऊळकर, गुरुनाथ बाळाजी बेकनाळकर, नागोजी पुरुषोत्तम नाईक पलंग, भालचंद्र विष्णु खोलकर, गजानन कृष्ण सांतोसकर, चि. विठ्ठल कृष्ण कामत ऊर्फ दिगंबरदास व त्यांचा मुलगा चि. राधाकृष्ण ऊर्फ योगानंद (यांच्यांतही रा. पलंग, देऊळकर व योगानंद यांचे साह्य अधिक झाले. आहे ); श्री. रंगनाथ दत्तात्रेय रेगे, दत्ताराम ऊर्फ वसंतराव राजाराम कोटनीस, अनंत वासुदेव मराठे, दत्ताराम कृष्णाजी अकेरकर, नारायण कृष्णराव खांडाळेकर वगैरे (यांचे साह्य पोथी छापण्यास सुरू झाल्यानंतर मुद्रितें म्ह. प्रुफें वाचण्यास झाले आहे त्यांत रा. अकेरकर यांचे अधिक झाले आहे.) हे सर्व श्रीगुरुदेवांचे प्रतिनिधिच असें मी समजतों व त्यांचे आभार मानून त्यांच्या निःश्रेयसान्त-अभ्युदयाबद्दल श्रीचरणीं मनोभावें प्रार्थना करितों.
या कार्यास सुरवात करून अठरा वर्षे झाली. इतक्या अवधींत निरनिराळ्या गांवीं जाणें व राहाणें घडले. आरंभ गाणगापुरांत, नंतर थोडे दिवस औदुंबरांत, त्यानंतर पुष्कळ दिवस माशेल (गोवा) येथे श्रीदुर्गादत्तमंदिरांत, नंतर थोडे दिवस शहापुरांत रा. दामोदर व केशव हरि जोशी यांचे घरांत, त्यानंतर बेळगांवांत श्रीचिदंबर देवालयांत (वै. दत्तात्रेय महादेव पाटणेकर यांच्या साह्यानें ), त्यानंतर पुनः माशेलांत, त्यानंतर पुनः बेळगांवांत (शके १८६० मध्ये) ह. भ. प. बाळकृष्ण महादेव पाटणेकर यांच्या शतकोटिजपयज्ञ-भुवनांत', त्यानंतर अखेरीस पुनः माशेलांत श्रीदुर्गादत्तमंदिरांत-म्हणजे जेथें दिगंबरदास यांजकडून श्रीगुरुदेवांनी अवतार-आविर्भावार्थ १०-१२ सहस्रभोजनें, सहस्र श्रीगुरुचरित्रसप्ताह व श्रीमाणिकप्रभुचरित्र पारायणें, नवचंडीपाठ, सामुदायिक अवतारप्रार्थना इ. प्रचण्ड अनुष्ठानें करविलीं, त्या पवित्र स्थानांवर या कार्याची पूर्तता झाली. याप्रमाणें या संशोधनकार्यांचीं स्थलांतरे झालीं आहेत. तेव्हां त्या त्या स्थानदेवतेचेही आभार मानणें अवश्य आहे. पण असें करितांना वर सांगितलेल्या अठरा वर्षांच्या अवधींत आणखी कित्येकांनी तसें साह्य केलें असेल, तथापि स्मरणशक्तीच्या अशक्ततेमुळे त्यांचीं नांवें विसरून राहाण्याचाही संभव आहे. तरी त्यांची ती निष्काम सेवा श्रीचरणीं निःसंशय रुजू आहे असे मानून ते मला क्षमा करतील अशी आशा आहे. वर निर्देशिलेले सज्जन लोकही माझ्या आभारप्रदर्शनाची अपेक्षा करणारे आहेत असें मी मानीत नाहीं, उलट मी असें केल्याबद्दल ते रागावतीलही. पण माझ्या समाधानासाठी मीं हें केलें आहे असें समजून त्यांनी मला क्षमा करावी अशी विनंति करितों. असो.