"हनुमानेव विजानाति श्रमं सागरलंघने । तथैव ग्रंथकर्तेव ग्रंथकर्तुः परिश्रमम् ॥'
- (रामचंद्र-मनुस्मृति टीका)
संशोधन आणि श्रीगुरुचरित्राचे, हे ऐकल्याबरोबर भाविकांप्रमाणे कित्येक विद्वानांच्याही पोटांत धडकी भरते. त्यांना हें 'अब्रह्मण्य' वाटतें. असें वाटणें हें श्रद्धामूलक असल्यामुळे वाईट नाहीं, तथापि तें अज्ञानमूलक असणें वाईट आहे. धुळ्याचे महान् प्रसिद्ध समर्थभक्त म. शंकर श्रीकृष्ण देव, बी. ए., एलएल. बी., यांनीं सुमारे ३५ वर्षांपूर्वी दासबोधाची संशोधित आवृत्ति काढली. त्याच्या पूर्वी सर्व लोक इतरत्र छापलेले दासबोध वाचीतच होते. देवांच्या या पहिल्या आवृत्तीवर वै. प्रो. विष्णु गोविंद विजापूरकर, एम्. ए., या विद्वान् व सज्जन गृहस्थांनीं त्या वेळीं निघणार्या आपल्या 'ग्रंथमाला' मासिकांत अभिप्राय दिला होता. त्यांत त्यांनी लिहिले होतें कीं, आपल्याकडे एक नामांकित छापखान्याची दासबोधाची प्रत होती, ती उगीच निरुपयोगी करून कां टाका म्हणून देवांच्या या दासबोधावरून तपासली, तों सर्व प्रत तांबडी लाल होऊन गेली! इत्यादि. त्यानंतर कांहीं दिवसांनीं मी कोल्हापुरास गेल्या वेळीं समक्ष भेटींत त्यांना विचारलें कीं आपण अभिप्राय दिला तो वाचला; पण कुतूहलार्थं विचारितों कीं त्यांत अजमासें किती चुका होत्या ? तेव्हां ते म्हणाले, "काय सांगावें, आपणही कुतूहलार्थच मोजल्या, त्या तीन हजार भरल्या ! यापूर्वी वाचक दासबोध वाचीतच होते, पण जिकडे समजत नाहीं तिकडे आपले अज्ञान मानून पुढे वाचू लागावयाचे; समर्थ कुठे लिहायला चुकतील ? आणि अमुक छापखान्याची प्रत कुठे अशुद्ध असूं शकेल ? असेंच प्रत्येकाला वाटावयाचे. पण देवांची ही प्रत पाहून दासबोधावर चांगला प्रकाश पडला." इ. नानासाहेब देव मोठे भाग्यवान् म्हणून त्यांना श्रीकल्याणस्वामींच्या हातची दासबोधाची प्रत मिळाली व तीवरून दासबोध शुद्ध करून छापणें त्यांना सोपें गेलें. पण तसे भाग्य माझं नसल्यामुळे मला श्रीसरस्वती-गंगाधराच्या हातची गुरुचरित्राची अस्सल प्रत मिळाली नाहीं. त्यामुळे यदृच्छेनें मिळतील त्या प्रतींवरून शुद्धीकरणाचा प्रयत्न करावा लागला.
प्राचीन प्रासादिक ग्रंथाचे संशोधन म्हणजे 'मूळ ग्रंथकाराचा शब्द' कोणता व मागाहूनच्या लेखकांचा 'हस्तप्रमाद' कोणता हें शोधून काढणें होय. ग्रंथांतील मूळ शब्द काढून तेथें आपल्या कल्पनेचा शब्द घालणेस, उदाहरणार्थ- 'अग्निमीळे पुरोहितं' च्या ठिकाणीं 'वन्हिमीळे पुरोहितं' करणेस कोणासही अधिकार नाहीं. बाकी अग्नि व वन्हि या शब्दांचा अर्थ एकच आहे. छंदःशास्त्राच्या दृष्टीनें त्याच्या मात्राही चुकत नाहींत ; पण तसे करतां येत नाहीं. कित्येक वेळां लेखकांच्या नजरचुकीनें हस्तप्रमाद होतो, तर कित्येक वेळां दुर्लक्षानें अक्षरांची व शब्दांची गळतीही होते. हस्तप्रमाद एकाद्या वेळीं बुद्धिकौशल्यानें दुरुस्त करतां येईल, पण गलतीची भरती स्वबुद्धीनें करतां येणे शक्य नाहीं. प्रामाणिक संशोधकाला उभयपक्षींही प्रत्यंतरें पाहाण्यासाठीं निरनिराळ्या जुन्या प्रति मिळतील. तितक्या मिळविणेंच अवश्य आहे. तशा प्रति मिळाल्यानंतरसुद्धां प्रतींच्या अर्वाचीन प्राचीनत्वाचा विचार करावा लागतो. पण येथेंही सर्वस्वीं 'जुनें तितकें सोनें ' म्हणतां येत नाहीं. 'जुन्या हस्तलिखित प्रतींची यादी' पुढें दिलेली आहे. तींतील अनुक्रमांक २१ ची पोथी शक १७६५ ची आहे, तिच्यांतील अध्याय ६ मधील कांहीं ओव्या तेथे दिल्या आहेत त्या पाहाव्या. नगण, भगण, यगणच्या ऐवजीं त्या प्रतींत नगुण, भंगुण, यंगुण असे शब्द आहेत ! आणि त्यानंतरच्या म्हणजे शक १७८२-८५-८८ च्या प्रतींत नगण, भगण, यगण असे आहे. दुसरें, केवळ स्थानमाहात्म्यावरूनही पुस्तकावर अधिक प्रामाण्यबुद्धि ठेवणे चुकीचें होते असा अनुभव आला आहे. उदाहरणार्थ- अनुक्रमांक ८ ची कुरवपूरची प्रत, जी आमच्या बंधूला तिकडील पुजार्याने स्वप्नांत आज्ञा झाल्यावरून आपण होऊन काढून दिली (ती मनोरंजक हकीकत त्या ठिकाणीं दिली आहे ती वाचावी). त्या प्रतींत अध्याय १४, ओं. १० "धरिलें रूप तूं मानसीं" असें आहे. येथें 'मानसी'च्या ठिकाणीं 'मानुषी' असें पाहिजे. इतर सामान्य गांवच्या प्रतींत 'मानुषी' असेंच आहे. श्रीटेंबेस्वामींनीं आपल्या संस्कृत समश्लोकींत 'मानुषं रूपमात्थाय' असेंच केलें आहे. त्यापुढील १३ व्या ओंवींत "सेवा करितो द्वार यौवनी " असें आहे. येथें 'यौवनी' च्या ठिकाणीं ' यवनीं' असें पाहिजे. इतर सर्व प्रतींत ' यवनी' असेंच आहे. 'द्वार यवनीं' याचा अर्थ 'यवनद्वारीं' असा आहे. अध्याय १६, ओंवी १६६, हींत 'शिष्य म्हणजे नामधारकासी' असे आहे. येथें 'शिष्य' हा शब्द अगदीं नजरचुकीनें पडला आहे, 'सिद्ध म्हणे नामधारकासी' असें पाहिजे, हें इतर पोथ्या पाहिल्यावांचूनही साधारण वाचकाला सुद्धां कळून येईल. तात्पर्य, कुरवपूर हें महाक्षेत्र म्हणून त्या प्रतीवर अधिक प्रामाण्यबुद्धि ठेवतां येत नाहीं. या हस्तप्रमादांचा व गळतीचा विचार थोड्याशा अधिक विस्ताराने पुढे करावा असा विचार आहे. कारण तो रसिक आणि विद्वान् वाचकांना कौतुकास्पद व बोधास्पदही वाटेल. त्यापूर्वी संशोधनाची चोदना कुठे व कशी झाली हे सांगावें म्हणतों.
परमपूज्य प० हं० परिव्राजकाचार्यवर्य श्रीब्रह्मानंदसरस्वतीस्वामी ऊर्फ 'लीलादत्त' (हा किताब त्यांना परमपूज्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती ऊर्फ टेंभेस्वामीमहाराज यांनीं प्रेमाने दिलेला प्रसिद्ध आहे) यांच्याबरोबर शके १८४२ सालीं माझें श्रीक्षेत्र गाणगापूर येथें जाणें झालें. तेथे गेल्यानंतर मीं तेथील एका पुजार्याच्या घरच्या पुरातन हस्तलिखित प्रतीवरून गुरुचरित्रसप्ताह वाचला. (ह्या प्रतीचें वर्णन मीं पुढे 'जुन्या हस्तलिखित प्रतींच्या यादी' मध्ये दिलें आहे तें वाचकांनीं लक्षपूर्वक वाचून पाहावें. अनु. ६). माझ्याकडे माझें रोजचे वाचनाचे गुरुचरित्राचे छापी पुस्तक होतेंच. त्यांत अशुद्धाची शंका आलेल्या स्थळांवर मी खुणा करून पृष्ठाच्या दोन्ही बाजूंच्या कोर्या भागावर (?) अशीं प्रश्नचिन्हें करून ठेवलेलीं होतीं, त्यांतील पुष्कळ शंकांचीं समाधानें मला या लेखी प्रतींत मिळाली व मोठा आनंद झाला. पण अजून तीं स्थळें पुष्कळच शिल्लक राहिलेलीं होतीं, म्हणून जुनीं लेखी पुस्तकें मिळविण्याचा मी प्रयत्न करीतच राहिलों. भाग्योदयानें तेथें राहात असलेले 'नाथ सेवेकरी' नांवाच्या एका भक्तवराची गांठ पडून त्यांजकडून गुरुचरित्राची 'कडगंची प्रत' म्हणून तेथे प्रसिद्ध असलेली एक लेखी पोथी मला पाहाण्यास मिळाली. त्यांतही आश्चर्यकारक असे अनेक शोध सापडले. याप्रमाणे गुरुचरित्रग्रंथाच्या संशोधनकार्यांस गाणगापुरांत सुरवात झाली. छापखान्यांत २५ वर्षे नोकरी केल्याचा उपयोग या वेळीं खराखुरा झाला असें वाटलें; नव्हे, श्रीगुरुदेवांनीं मला इतर नोकर्यांतून काढून छापखान्यांत नोकरीस ठेविलें, त्याचा आंतरिक हेतु श्रीगुरुचरित्रसंशोधनसेवा मजकडून व्हावी असाच होता, असें वाटून मनाला मोठी धन्यता वाटली.
मोठ्या प्रयासानेही जीं कार्ये होत नाहींत, जो लाभ घडत नाहीं, तो श्रीहरिगुरुदेवांच्या कृपेनें केव्हां केव्हां सहज घडतो व तो अकल्पित म्हणजे कल्पनेच्या बाहेरचा असल्यामुळे त्या दयामय प्रभूचे मोठे उपकार वाटतात. 'कडगंची' गुरुचरित्राच्या हस्तलिखित प्रतीवरून जेव्हां मी माझ्या जवळच्या छापील प्रतीमधील शंकास्थळे शोधून पाहूं लागलों, तेव्हां ह्या प्रतींत एक अदृष्टपूर्व अध्याय सापडला. तो श्रीगुरुगीतेचा अध्याय होय. (यांत अध्यायारंभीं सरस्वतीगंगाधराच्या प्राकृत ओव्या १३ असून पुढे एकंदर संस्कृत गुरुगीता १७५ लोकांची जशास तशी आहे. ती संपूर्ण झाल्यानंतर उपसंहारादाखल म्हणून २१ ओंब्या पुनः लिहिल्या आहेत. याप्रमाणे एकंदर ओंव्या ३४ आहेत.) सर्व जुन्या उपलब्ध हस्तलिखित गु. च. प्रतींचे अध्याय ५१ आहेत. त्याप्रमाणे या 'कडगंची' प्रतीचे अध्यायही एकावनच दिसले तेव्हां हें असे कसें म्हणून शोधून पाहातां श्रीगुरु नरसिंहसरस्वतीस्वामींनीं सायंदेवास गुरुभक्तीचें माहात्म्य सांगतांना जें काशीयात्रावर्णन सांगितलें, ते प्रचारांत असलेल्या गुरुचरित्रामध्ये ४१ व ४२ या दोन अध्यायांमध्यें विभागलें असून, ह्या 'कडगंची' प्रतींत ते एकाच अध्यायांत आहे आणि प्रस्तुतचा गुरुगीतेचा अध्याय मात्र अधिक असून त्याचा क्रमांक ४९ आहे (मिळून अध्याय ५१ च), असें आढळून आलें व हा एक अलभ्य लाभ झाला असें वाटून चित्त सानंदविस्मयापन्न झालें. तत्काळ तो अध्याय मीं जशाचा तसा लिहून काढला व नाथ सेवेकरी यांच्या साह्यानें मूळाबरहुकूम तपासूनही घेतला.*
तो सर्व ग्रंथच लिहून काढण्याची इच्छा झाली, पण तशी त्या वेळीं सवड नव्हती. ती प्रत विकत किंवा कांहीं दिवस तेथून बाहेर नेण्यास मिळेल काय म्हणून चौकशी केली ; तों त्या प्रतीचा मालक तिची किंमत १०० रु. सांगू लागला व बाहेरगांवीं मुळींच देतां येणार नाहीं म्हणाला ! शंभर रुपये देऊन विकत घेण्याची त्या वेळीं सवड नव्हती व तशी गरजही भासली नाहीं. कारण त्या प्रतींतील वैशिष्ट्य म्हणजे वरील गुरुगीता-अध्याय, आणि तो तर श्रीगुरुकृपेनें हस्तगत झाला ; शिवाय माझ्या छापी प्रतींतील एकंदर शंकास्थळे त्या प्रतीमधून पाहून टांचून घेतलीं. एवढे करून मग ती प्रत आभारपूर्वक परत केली. ह्या 'कडगंची' प्रतीच्या मूळाचा नंतर शोध करूं लागलों. तों असें कळलें कीं " कडगंची हें सायंदेवाचे गांव; तें निजाम इलाख्यांतील गुलबुर्गा तालुक्यांत आहे. ह्या गांवास पूर्वी 'कांची' असें म्हणत. (हें गुरुचरित्रांत सांगितलें आहेच.) सायंदेवाच्या वंशजांचीं तेथें ४ घरे आहेत. यापैकी खुद्द वंशज हल्लीं (शके १८४२) गंगाधर नांवाचा असून त्याचे वय २५ आहे. लग्न झाले होतें पण बायको वारली. तो वेडसर आहे. असें वेडसर असणें ही त्यांच्या घराण्याची वहिवाटच आहे ! गंगाधर हल्लीं कोठें पळून गेला आहे. त्याचा एक चुलता कृष्णाप्पा नांवाचा आहे. तोही वेडाच आहे. बाकीचे भाऊबंद कुलकर्णिकी करून यास हिस्सा देतात. हल्लीं हा हिस्साही मिळत नाहीं, म्हणून गंगाधरानें फिर्याद केली आहे. भाऊबंदकीच्या तंट्यांत मांगें कधीं तरी जप्ती आली तेव्हां मूळ ग्रंथकार सरस्वतीगंगाधर याच्या खुद्द हातची गुरुचरित्राची श्री प्रत दुसर्या कोणाच्या हातास लागू नये म्हणून भिंतींत पुरून टाकली." ही हकीकत ४४ वर्षाखाली एका ८० वर्षांच्या म्हातान्याकडून समजली, असे मला एका गृहस्थानें सांगितलें. § यासंबंधाची जास्त माहिती गोळा करण्याकरितां कडगंची गांवांत जाऊन येण्यास त्या वेळीं मला द्रव्याची व वेळेचीही सवड नव्हती, याबद्दल फार वाईट वाटतें. पण जाऊन तरी काय उपयोग होता ? कारण सरस्वतीगंगाधराच्या हातची अस्सल प्रत, जशी श्रीसमर्थशिष्य कल्याणाच्या हातची दासबोधाची प्रत म. शंकर श्रीकृष्ण देव यांना मिळाली, तशी मला किंवा कोणालाही तेथे मिळणे शक्य नव्हतें. त्यामुळे आतां मिळालेल्या नकलेवरच तृप्त राहणे अपरिहार्य होतें.
----
* ह्या अध्यायांतील सरस्वती-गंगाधराच्या प्राकृत ओव्यांस तर हात लावण्याचा कोणाला अधिकार नाहीं, पण त्यांतील संस्कृत श्लोकांत भयंकर अशुद्धें होतीं तीं शुद्ध करण्यास हरकत नाहीं म्हणून अत्यंत परिश्रमानें निरनिराळ्या ठिकाणच्या सहा छापी प्रति व म. धुपकरशास्त्री यांच्या घरची एक लेखी प्रत यांच्या आधारें ते श्लोक शुद्ध केले व 'गुरुचरित्रांतर्गत गुरुगीता' ह्या नांवानें तें पुस्तक छापून प्रसिद्ध केलें. या पुस्तकास गुरुगीतेवरील रंगनाथस्वामी निगडीकर यांची प्राकृत टीका जोडली असून, त्यापुढे 'श्रीगुरुचरित्र सारामृत' नांवाचें गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायाचा सारांश एकेका श्लोकांत असलेले सुंदर श्लोकबद्ध प्रकरण जोडले आहे. त्यानंतर छापी 'श्रीगुरुचरित्रांतील ढोबळ ढोबळ चुकांचं शुद्धिपत्र' (आठ पृष्ठांचें) संशोधनाची आवश्यकता किती आहे याची थोडीशी कल्पना यावी म्हणून जोडले असून शेवटीं 'श्रीएकनाथमहाराजकृत सद्गुरुमहिमा - अभंग' (१०१ कडव्यांचा) दिलेला आहे. यांत परमार्थाचें साधनचतुष्टय, विक्षेप व आवरणाचे स्वरूप, तसेच हे साक्षात्कार प्रतिबंधक दोष कसे निवारण करावे, बहिरंग व अंतरंग साधनें कोणतीं इत्यादि थोडक्यांत फार चांगल्या रीतीनें सांगितलें आहे. प्रस्तावनेत गुरुगीता ही सप्तशती ग्रंथाप्रमाणेंच मंत्रमय कशी आहे याबद्दलचें सुविस्तृत वर्णन आहे. धर्मश्रद्धाळु प्रत्येक गृहस्थानें व संशोधनाचे स्वरूप जाणण्याची इच्छा असणार्या प्रत्येक साहित्यिकानेंही घेण्यासारखी आहे. आवृत्ति दुसरी, किं. १ रुपया.
याचे नांव - 'गंगाधर दामोदर काळे, वय ७० वर्षे, गुलबर्ग्यास नगदी कारकून' असें त्या वेळच्या कच्च्या टिपणांत आहे.
----
सरस्वतीगंगाधराची पूर्वपरंपरा, गुरुचरित्राचें स्वरूप व महिमा आणि संशोधनाची साधनसामग्री:-
गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायांत ग्रंथकाराने श्रीगणेश सरस्वती, त्रिमूर्ति, त्याचप्रमाणे इतर देवदेवता- गंधर्व-यक्ष किन्नरादिकांस वंदन करून, पराशर व्यास-वाल्मीकादि 'कविकुळांस' वंदन केल्यानंतर 'मग ध्यायिले पूर्वज मनीं' असे म्हणून आपल्या पूर्वजांना वंदन केलें आहे. त्यांत पहिलेच नांव सायंदेवाचे आहे. “आपस्तंव शाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि । साखरे नाम ख्यातीसी । सायंदेवापासाव ॥त्यापासून नागनाथ । देवराव तयाचा सुत । सदा श्रीगुरुचरण ध्यात | गंगाधर जनक माझा ॥" अर्थात् ज्ञात मूळपुरुष सायंदेव (ज्याची कथा गु. च. अ. १३।१४ व ४१ मध्ये आली आहे), त्याचा पुत्र नागनाथ, नागनाथाचा देवराव व देवरावाचा गंगाघर; तोच आपला बाप असें ग्रंथकाराने स्वमुखानें सांगितले आहे. अर्थात् सायंदेवापासून सरस्वती हा ५ वा पुरुष होय. (सरस्वती, भवानी अशीं स्त्रीलिंगी नांव मुलांस व दत्ती असें नांव मुलींस देण्याची महाराष्ट्रांत क्वचित् ठिकाणीं वहिवाट आहे. भवानराव, भवानीशास्त्री अशीं नांवें प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणें आमच्या गुरुचरित्र ग्रंथकाराचे नांव 'सरस्वती' होतें. भवानीशंकर, गौरीशंकर अशा जोड नांवांप्रमाणें 'सरस्वतीगंगाधर' हें नांव नसून गंगाधर हें त्याच्या पित्याचे नांव होते हें वर दिलेल्या ओंवीवरून स्पष्ट दिसतें.) ४१ व्या अध्यायांत नामधारकानें ('नामधारक, नामकरणी' याचा अर्थ--श्रीगुरूंचें नांव नृसिंह-सरस्वती पैकी अर्धे नांव 'सरस्वती' हें नांव धारण करणारा, असेही असण्याचा संभव आहे.) सिद्धास प्रश्न केला आहे कीं
"आमुच्या पूर्वजें कवणे रीतीं । सेवा केली श्रीगुरुची ॥४॥ याचे उत्तर सिद्धानें दिले आहे कीं " पूर्वी (अ. १३ व १४ मध्ये) कथानक सांगितलें ।
जे कां श्रीगुरुसी भेटले । बोसर ग्रामीं होते भले । पूर्वज तुमचे परियेसा ॥७॥
तयाचें नाम सायंदेव । केली पूजा भक्तिभावें । त्यावरी प्रीति अति स्नेह । आमुचे श्रीगुरुमूर्तीचा ॥८॥
इ०. यावरून 'सिद्ध-नामधारक-संवाद-' रूप गुरुचरित्रग्रंथाचा कर्ता जो 'सरस्वतीगंगाधर' तोच हा सिद्धाचा शिष्य 'नामधारक' होय हें सहज सिद्ध होतें. याची मातृभाषा कानडी असून मराठी नव्हती, असें "नकळे ग्रंथप्रकार । नेणें शास्त्राचा विचार । भाषा न ये महाराष्ट्र । म्हणोनि विनवी तुम्हांसी ॥" (अ. १, ओं. ३८) यावरून व पुढे ११ व्या अध्यायाच्या शेवटच्या ओंवींत - "पुढे वर्तलें अपूर्व ऐका । सिद्ध सांगे नामधारका । महाराष्ट्रभाषा करूनि टीका । सांगे सरस्वतीगंगाधर ॥"
तसेंच- "पुढील कथा पावन । सांगे सिद्ध विस्तारोन । महाराष्ट्रभाषेंकरून । सांगे सरस्वती गुरुदास ॥' (अ. २८/१९४ ) असें जें म्हटलें आहे त्यावरून सहज सिद्ध होते. ग्रंथकाराची मातृभाषा मराठी नसल्यामुळे भाषेच्या दृष्टीनें ग्रंथाकडे पाहूं गेल्यास वैगुण्यच दिसेल. याची जाणीव ग्रंथकारास होती, म्हणूनच त्यानें “ग्रंथ कराल उदास । वांकुडा कृष्ण दिसे ऊंस । अमृत निघे त्याचा रस । दृष्टि द्यावी तयावरी ॥" (अ. १।६६) असा मोठा मार्मिक दृष्टान्त देऊन वाचकांस विनंती केली आहे. दुसरे असें की सरस्वती-गंगाधरानें जें हें गुरुचरित्र मराठींत लिहिलें, त्यास मूळ आधार सिद्धाकडील गुरुचरित्र पुस्तकाचा होता. नामधारकानें प्रश्न केल्यानंतर त्यास सिद्धांनीं आपणाकडील गुरुचरित्र पुस्तक दाखवून मग त्याचा महिमा सांगितला आहे. सिद्ध (तिसर्या अध्यायांत) म्हणतात-
" श्रीगुरुचरित्रमहिमान । तेंचि आम्हां अमृतपान । सदा सेवितों याचि गुणें । म्हणोनि पुस्तक दाखविलें ॥८॥
मुक्ति मुक्ति-परमार्थ । जें जें वांछी मनीं आर्त । त्वरित होय साध्यन्त । गुरुचरित्र ऐकतां ॥९॥
धनार्थ्यांसी अक्षय धन । पुत्रपौत्रादि गोधनें । कथा ऐकतां होय जाण । ज्ञानसिद्धि तात्काळी ॥१०॥
जे भक्तीनें सप्तक एक । पटती ऐकती मनुष्य टोक । काम्य होय तात्कालिक । निपुत्रिकां पुत्र होती ॥११॥
ग्रहरोगादि पीडन । न होती व्याधि कधीं जाण । जरी मनुष्या असे बंधन | त्वरित सुटे ऐकतां ॥१२॥" इ. इ.
यामध्ये ही एक गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे कीं, सिद्धाकडील मूळ पुस्तक कोणत्याही भाषेंतील असले तरी, सरस्वतीगंगाधरानें जें हें 'गुरुचरित्र' पुस्तक : लिहिले ते स्वतःच्या कल्पनेनें नसून श्रीगुरुदेवाच्या आज्ञेनें लिहिले आहे. ( पहिल्या अध्यायांत याविषयीं ग्रंथकार लिहितो )--
पूर्वापार आमुचे वंशीं । गुरु प्रसन्न अहर्निशीं । निरोप देती मातें परियेसीं । 'चरित्र आपुलें विस्तारी' ॥५२॥
म्हणे 'ग्रंथ कथन करी । अमृतघट स्वीकारीं । तुझे वंशपारंपरीं। लाघती चारी पुरुषार्थ' ॥५३॥
श्रीगुरुवाक्य मज कामधेनु । मनीं नाहीं अनुमानु । श्रेयवृद्धि पावविणार आपणु । श्रीनृसिंहसरस्वती ॥५४॥
... आज्ञा असे श्रीगुरूची । म्हणोनि वाचें बोलतसें ॥५६॥
" श्रीगुरुवाक्य मज कामधेनु । मनीं नाहीं अनमानु । श्रेयवृद्धि पावविणार आपणु । श्रीनृसिंहसरस्वती ॥५४॥
… आज्ञा असे श्रीगुरूची । म्हणोनि वाचें बोलतसें ॥५६॥’’
असे सांगून त्याची फलश्रुतिही पुढे लिहिल्याप्रमाणें सांगितली आहे—
“ज्यास पुत्रपौत्रीं चाड । त्यासी हे कथा असे गोड । लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनीं परियेसा ॥५७॥
ऐशी कथा जयाचे घरीं । वाचिती नित्य मनोहरी । श्रियायुक्त निरंतरीं । नांदती कलत्रपुत्रयुक्त ॥५८॥
रोगराई तथा भुवनीं । नव्हती गुरुकृपेंकरोनि । निःसंदेह सात दिनीं । ऐकतां बंधन तुटे जाणा ॥५९॥"
हा आपला स्वानुभव आहे असेंही त्याने "आम्हां साक्षी ऐसें घडलें । म्हणोनि विनवीतसें बळें । दि : श्रीगुरुस्मरण असे भलें । अनुभवा हो सकळिक॥" या ओंवींत सांगितलें आहे. याप्रमाणे या ग्रंथाचा हा अनुभव आज कित्येक शतकें श्रद्धाळू लोक घेत आहेत. तेव्हां याबद्दल विशेष सांगणेचें कारण नाहीं.