याप्रमाणे अगदी अडल्या वेळेला प्रभूचें असें अकल्पित साहाय्य कसे मिळते याचा विचार केला असतां मति कुंठित होऊन जाते. ४१ व्या अध्यायांतील सायंदेवानें केलेल्या कानडी पदांचीही दुरुस्ती १८ वर्षांपूर्वी गाणगापुरास गेल्यावेळीं मी तिकडील प्रतींवरून करून आणलेली होती. तथापि या पदांवर या वेळीं कोणातरी कर्नाटक-भाषाप्रवीण पुरुषाची एकदां नजर पडावी व त्यांचा मराठी अर्थ टीपेंत लिहिला जावा अशी प्रबळ इच्छा उत्पन्न झाली. त्या वेळीं अशी घटना घडून आली कीं, ज्यांच्यामुळे पहिल्यांदा मी श्रीक्षेत्र गाणगापुरास पोचलों होतों असें मांगें लिहिलें आहे (पृ. ३०) ते महापुरुष (ब्रह्मीभूत) श्रीमद् ब्रह्मानंद सरस्वती स्वामी शके १८६० च्या वैशाखांत, श्रीमंत सौ. देवी इंदिराबाईसाहेब होळकर, महाराणी इंदूर, यांच्या विनंतीवरून माणगांवास जाण्याकरितां बेळगांवास आले होते. माणगांव (सं. सावंतवाडी) ही श्रीस्वामी महाराजांची जन्मभूमि. त्या ठिकाणीं गुरुभक्तीनें प्रेरित होऊन महाराणीसाहेबांनी एक सुंदर दगडी देवालय बांधून त्यांत वैशाख शु. १३, गुरुवार (स. १८६० रोजीं श्रीदत्त, श्रीसरस्वती, श्रीशंकराचार्य व सद्गुरु श्रीवासुदेवानंद-सरस्वती यांच्या मूर्तीची प्रतिष्ठा वरील स्वामीमहाराजांच्या अध्यक्षतेखालीं मोठ्या समारंभानें केली. त्या वेळीं मलाही तेथें जाण्याचें व तो मंगल समारंभ पाहाण्याचें भाग्य लाभले होतें. परत येतांना स्वामीमहाराज बेळगांवास आमचे मित्र श्रीयुत बाळकृष्ण महादेव पाटणेकर यांच्याच घरी उतरले व त्यांनी कै. मुदकट्टी मामलेदार यांनीं केलेल्या कानडी गुरुचरित्राची प्रत काशीस नेण्यासाठीं म्हणून आणविली. पण प्रवासांत आपणांस आणखी कुठें कुठें जावयाचे आहे, करितां ही तुमच्याकडेच ठेवा व मागाहून आपलें पत्र आल्यानंतर ती काशीस पाठवा असें सांगून ते निघून गेले. मी त्या वेळीं पाटणेकर यांच्या घरीं गु. च. संशोधनसेवा करीत राहिलेलों होतो. (या सेवेप्रमाणेच, त्या घरी 'रामकृष्णहरि मंत्राचें शतकोटि अनुष्ठान सामुदायिकरीत्या आज ३|४ वर्षांपासून चालले आहे. त्यांतही प्रामुख्याने भाग घेण्याचे भाग्य मला लाभले होते.) त्या अवर्धीत आमचे मित्र ह. भ. प. राघवदास रामनामे हे मी इकडे आहे अशी बातमी समजल्यामुळें मला भेटण्याकरितां म्हणून मुद्दाम आले. त्यांची मातृभाषा कानडी असून ते कानडी व मराठी भाषेचेही उत्तम कवि आहेत. हे दोन्ही भाषेत उत्तम कीर्तन करितात. त्यांना आमचें चाललेलें गुरुचरित्र-संशोधनकार्य दाखविलें व त्यांच्या हातांत वरील कानडी गुरुचरित्र पुस्तक देऊन त्यांतील ४२ व्या अध्यायांतील कानडी पदांचा अर्थ सांगण्यास सांगितले. त्यांनी तो पदपदशः उत्तम रीतीने व सहज लीलेने सांगून सोडला व मीं तो लिहून घेतला. पदपदार्थाचे त्यांनी विवरण केले, तें तसेंच टीपेंत दिल्यास वाचकांस वाचतांना क्लिष्ट वाटण्याचा संभव, म्हणून त्याचा सरळ वाक्यार्थ लिहून घेऊन तोच टीपेंत दिला आहे. त्यानंतर हल्लीं एका मित्राच्या सूचनेवरून त्या कानडी पदांचें रूपांतरही त्यांजकडून करून मागविलें. तेंही त्यांनीं समवृत्तांत ताबडतोब करून पाठविले, ते पुढें दिलें आहे. तात्पर्य, सांगण्याचें कारण एवढेंच कीं, तें कानडी गुरुचरित्र आमच्याकडे येऊन पडतें म्हणजे काय त्याच वेळीं श्रीरामनामे हे मी न बोलावितां माझेकडे येतात म्हणजे काय ? तर हे दुसरें कांहीं नसून ही सर्व श्रीगुरूंची अघटित लीला आहे असें मी समजतों व रामनाम्यांच्या आभारापेक्षां श्रीगुरुकृपा-मातेचेच मी आभार मानतो. हा 'आभार' शब्द देखील त्या माउलीला भाराचा वाटेल म्हणून तिच्या चरणीं साधुनयनाने वंदन करून, पुढें लिहिण्यास कांहीं सुचत नाहीं व दिसत नाहीं, तथापि अपूर्व पूर्वऋणानुबंधी थोर मनाचे व जिव्हाळ्याचे आप्त-ज्यांच्या येथें मी सुमारे १५ महिने अगदीं निजगृहाप्रमाणे राहून हें काम केलें-त्या माझ्या 'नामचिंतामणि प्रकाशक श्रीरमावल्लभ रंगनाथ दत्तात्रेय रेगे यांचे मात्र आभार मानावे तितके थोडे वाटतात. तसेच, ह्या परमपवित्र ग्रंथराजाचे थोर खर्चाचे मुद्रणकार्य निर्मळ व निर्लोभ प्रेमाने पण अज्ञात राहून करून देणार्या सजन मित्राचें त्यांना वाईट वाटेल म्हणून आभार न मानतां, त्यांचें वंशपरंपरा सर्वप्रकारें कल्याण करण्याबद्दल प्रभूंच्या चरणीं अनन्यभावे प्रार्थना करून विराम पावतों ॐतत्सत्---श्रीगुरुदेवदत्त.
श्रीगुरुचरणरजांकित बालक
रामचंद्र कृष्ण कामत, चंदगडकर
श्रीदुर्गादत्तमंदिर, माशैल-गोवा,
ह. मु. मुंबई, श्रीसमर्थ सदन,
श्रीगुरुप्रतिपदा शके १८६१