गुरूचरित्र - नजरचुका व जावईशोध
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
जुन्यांत जुनी 'छापी' प्रत मला पाहाण्यास मिळाली ती सखाराम वासुदेव खांडेकर यांनी मुंबईत 'नीतिप्रकाश' छापखान्यांत शके १७९२ (इ. स. १८७०) सालीं छापलेली. (अर्थात् ७० वर्षांपूर्वी. पुढे 'छापी प्रतींची यादी' दिली आहे तींत हिचा अनुक्रमांक १ आहे) हिचें थोडेंसें वर्णन देतों. त्यावरून 'नजरचुका' व 'जांवईशोध' या संबंधाची कल्पना वाचकांना येईल. पहिल्या अध्यायांत शिवनमनाच्या ओंव्या नाहींत (ह्या 'कडगंची' प्रतीशिवाय इतर कुठल्याही जुन्या हस्तलिखित प्रतींत नाहींत.) ७९ ओंवी - " अति व्याकुळ अंतःकरणीं । निंदा स्तुति आपली वाणी । कष्टला भक्त नामकरणी । करिता होय परियेसा ॥" अशीच आहे. (ही 'नजरचूक' आहे व ती कशी सुधारली हें मागें दिले आहे.) ओंवी ८० वी “राग स्वेच्छा ओंवीबद्ध म्हणावे । आजि पाहुणे पंढरीचे रावे । वंदूं विघ्नहरा भावें । नमूं ते सुंदरा शारदेसी” अशी आहे. हा मात्र 'जांवईशोध' आहे. ह्या ओंवीवर दिलेली टीप ( पृ० १०) पाहावी. जुन्या लेखी प्रतींमधून "राग स्वेच्छा वोवीबद्ध म्हणावे ॥आजि हो पाहुणे पंढरीचे राणे" असे असून त्यापुढें " वंदूं विघ्नहरा, पार्वतीकुमरा । नमूं ते सुंदरा, शारदेसी " हा अभंगछंद चालू झाला आहे. "राग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे" ही ग्रंथकाराची वाचकांस सूचना आहे. त्यापुढील चरण 'आजि हो पाहुणे पंढरीचे राणे' हा अभंग त्या वेळीं एका विशिष्ट रागांत म्हणण्याचा प्रघात असावा असें वाटतें. हल्लींही 'धर्मात्मा' किंवा 'तुकाराम' सिनेमांतील अभंग 'अवघाचि संसार सुखाचा करीन' किंवा ' बारे पांडुरंगा केव्हां भेट देसी' हे ज्या रागांत किंवा ज्या चालीनें त्या त्या नटांनी गायिले, तोच राग किंवा तीच चाल आज लोकांच्या तोंडीं बसली आहे. ही चाल लोकप्रिय झाली आहे म्हणून भजनांत इतर अभंगही हल्लीं याच चालीवर म्हणण्याचा भजनी लोक प्रयत्न करतात हें सर्वांना माहीतच आहे. याप्रमाणें त्या वेळच्या लोकांच्या माहितींतील अभंगाचा एक चरण ग्रंथकारानें किंवा मागाहूनच्या प्रत उतरणार्या लेखकानें दिला असावा. कुरवपूर प्रतींत "राग स्वइच्छा ओवीबद्ध वर्णीतसे" असें असून
----
* एकदोन छापखानेवाल्यांनी चांगल्या शास्त्र्यांकडून तपासून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो : बाराव्या अध्यायांतील 'दर्शन होईल एकवीस वर्षांसी' हा पाठ व ३६ व्या अध्यायांतील 'वीणाविद्या' हा पाठ एक दोन छापी पुस्तकांत आढळतो. त्या शास्त्र्यांनी त्या वेळीं कांहीं जुन्या हस्तलिखित प्रति मिळवून पाहिलें असावें असेंही वाटतें; परंतु त्यांनी या विषयाकडे पुरवावें तितकें लक्ष पुरविलेलें मात्र दिसत नाहीं. दुसरें, असली अशुद्धें हीं छापखानेवाल्याच्या दृष्टीच्या किंवा बुद्धीच्या पलीकडचीं असतात असें घटकाभर गृहीत धरलें तरी, चार चरणांच्या ओंवींतील दोन दोन चरणच कंपॉझिटरच्या नजरचुकीनें गळून गेलेले न पाहातां ग्रंथ छापणें हें किती अक्षम्य आहे याचा विचार वाचकांनीच करावा ! * असे एका नामांकित छापखान्याच्या प्रतीत झाले आहे ! देव त्यांना क्षमा करो असें मी म्हणतों,
----
पुढे "वंदूं विघ्नहरा, पार्वतीकुमरा" असें आहे. 'आजि हो पाहुणे पंढरीचे राणे' हे शब्दच त्या प्रतींत नाहींत, त्या अर्थी ग्रंथकारानें फक्त 'राग स्वेच्छा ओंवीबद्ध म्हणावे' एवढेंच लिहिलें असावें व पुढील लेखकांनी 'आजि हो पाहुणे पंढरीचे राणे' हे नंतर जोडले असावें असे स्पष्ट दिसते. दड्डी प्रतींत तर या ठिकाणीं “राग स्वइच्छा ओवीबद्ध म्हणावे, आजि हो पाहुणे, पंढरीचे राणे, याप्रमाणें" असे स्पष्ट म्हटलें आहे. त्यापुढें “वंदूं विघ्नहरा पार्वतीकुमरा । नमूं ते सुंदरा शारदेसीं" असें आहे. यावरून संदेहच राहात नाहीं. परंतु वरील खांडेकर प्रतीच्या परिशोधनकर्त्या शास्त्र्याने 'राग स्वेच्छा वोवीबद्ध म्हणावे' हा ओवीचा पहिला चरण कल्पून त्यांतील शेवटचा 'वे' हा प्रास पुढील चरणाला लावून 'राणे' च्या ठिकाणीं 'रावे' केले व त्यापुढील चरण 'बंदूं विघ्नहरा भावें' असे करून ती एक ओंवीच बनवून सोडली !! हें धाडस पहिल्यांदा याच छापखानेवाल्यानें केलें असावें आणि याचीच नक्कल मागाहूनच्या छापखानेवाल्यांनीं करण्याचा प्रघात ठेवला असावा असें वाटतें. असो. पुढील चुकाही अनेक दृष्टींनीं लक्षांत घेण्यासारख्या आहेत-
या (खांडेकर) प्रतींत अ० ६ (ओं. ४२) " गणऋषेश्वरयुक्त" असेंच असून पुढे "औठ गण प्रख्यात । उच्चारीतसे लंकानाथ । मग ब्राह्मण विख्यात । नगण क्षत्री विनयेसी ॥४३॥... सगण तुरंगरूपेंसी । औठ गण परियेसी । विस्तारिता गायनेसी । लंकापति रावण ॥४५॥" असें आहे. ( जुन्या लेखी प्रतींत “आठै गण” असा पाठ आहे. 'आठै' म्हणजे 'आठही' असा अर्थ होतो. समर्थांच्या कवितेंत असे प्रयोग फार आढळतात- "अकस्मात तें राज्य सर्वै बुडालें’’..."विरक्तीवळें निंद्य सर्वै त्यजावें " इ०) हा जुना शब्दप्रयोग माहीत नसल्यामुळें 'आठै' च्या ऐवजीं 'औठ' करून सोडलें आहे! छंदःशास्त्रांतील ८ गण माहीत नसल्यामुळें ते शब्द लिहितांना भयंकर चुका झाल्या आहेत. ‘हें हस्तलिखित प्रतींच्या यादीत' अनु० २१ च्या प्रतीच्या वर्णनांत विस्ताराने दाखविलें आहे. वाचकांनीं तें मुद्दाम पाहावें.
N/A
References : N/A
Last Updated : June 20, 2023
TOP