(लेखक-श्रीमंत सरदार गंगाधरराव नारायणराव ऊर्फ आबासाहेब मुजुमदार, सी. आय्. ई. पुणें.)
आणिक सांगेन एक खूण । गायनीं करावें माझें स्मरण । त्याचे घरी मी असें जाण । गायनीं प्रीति बहु मज ॥४०॥
नित्य जे जन गायन करिती । त्यावरी माझी अति प्रीती । त्यांचे घरीं अखंडिती । आपण असें अवधारा ॥४१॥
-- श्रीगुरुचरित्र अध्याय २१
मनुष्य जन्मास आल्यानंतर त्यास समजूं लागल्यावर ज्या कृत्यापासून अथवा वस्तूपासून सुख अथवा आनंद आपणांस मिळेल ते कृत्य करण्याची व ती वस्तु मिळविण्याची तो सतत खटपट करतो. हें सुख किंवा आनंद अखंड आहे किंवा नाहीं हा विचार तो प्रथम करीत नाहीं. व्यवहारांतील कोणतेंही सुख पाहिलें तर तें चिरकाल टिकणारें आहे असें आढळून येत नाहीं. चिरकालीन व अखंड सुख हें फक्त ब्रह्मानंदात आहे, असे अनुभवांतीं साधु-संत-सत्पुरुषांनी सांगितलेलें आहे. ईश्वराची एकनिष्ठपणे अखंड भक्ति व उपासना केली असतां हें सुख मिळते हें खरें, परंतु ती करण्यांत अत्यंत परिश्रम व खटाटोप करावे लागतात. नादब्रह्माची उपासना फार सुगम असून ती केली असतां तें सुख अथवा तो ब्रह्मानंद सहज प्राप्त होतो. ब्रह्मानंद हा अखंड आहे हें सांगणे नकोच. जप, तप, कर्मानुष्ठानें, योग, याग, इत्यादि साधनांपेक्षां नादोपासना फारच सोपी व श्रेष्ठ आहे. नादोपासना म्हणजे गीतोपासना व गीतोपासना म्हणजे संगीतोपासना होय. याबद्दल खाली संगीत ग्रंथांतील उतारे व त्यांचे अर्थ देऊन विस्तार केलेला आहे. श्रीसमर्थ रामदासस्वामी हे फार मोठे संगीतज्ञ होते. त्यांनीही 'गायनी विद्या’ संबंधी फार चांगलें लिहिलेलें आहे; तोही उतारा पुढें दिला आहे. इतरही अनेक साधुसंतांनी गायनाच्या महत्त्वाचें वर्णन केलेले आहे. याच ओघास अनुसरून श्रीनृसिंहसरस्वती-स्वामीमहाराजांनी वर उद्धृत केलेल्या ओव्यांमध्ये---"गायनावर माझी फार प्रीति आहे, गायनामध्ये जो माझें स्मरण करितो त्याच्या घरी मीं असतो असे समजावें; नित्य जे लोक गायन करितात त्यांवर माझें फार प्रेम असतें व त्यांच्या घरीं मी अखंड असतो असे निश्वयाने समजा” असे सांगून भक्तीची ती एक खूण व मार्ग दाखविला आहे. श्रीदत्तभक्तांनीं व इतरांनींही याचा अनुभव घेण्यासारखा आहे.
चैतन्यं सर्वभूतानां विवृतं जगदात्मना । नादब्रह्म तदानन्दमद्वितीयमुपास्महे ॥१॥
सर्व प्राण्यांमध्ये जे चैतन्य आहे व जें जगद्रूपानें पसरलेले आहे, जे आनंदमय व अद्वितीय आहे, अशा प्रसिद्ध नाद-ब्रह्माची आम्ही उपासना करितों.
नादोपासनया देव ब्रह्मविष्णुमहेश्वराः । भवन्त्युपासिता नूनं यस्मादेते तदात्मकाः ॥२॥
नादाची उपासना केली असतां ब्रह्मा, विष्णु व महेश यांची उपासना आपोआप होते. कारण ते देव नादमय आहेत.
आत्मा विवक्षोमाणोऽयं मनः प्रेरयते मनः । देहस्थं वह्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ॥३॥
ब्रह्मग्रन्थिस्थितः सोऽथ क्रमादूर्ध्वपथे चरन् । नाभिहृत्कण्ठमूर्धास्येष्वाविर्भावयति ध्वनिम् ॥४॥
आत्मा बोलण्याच्या इच्छेनें मनाला प्रेरणा करितो. मन हें शरीरांतील अग्नीला धक्का देतें व वायु अग्नीला उद्दीप्त करितो आणि नंतर ब्रह्मग्रंथीमध्ये असणारा तो वायु वर उंच नाभि, हृदय, कंठ, मस्तक व मुख या स्थानांतून चढून जाऊन ध्वनि उत्पन्न करतो.
नादोऽतिसूक्ष्मः सूक्ष्मश्च पुष्टोऽपुष्टथ कृत्रिमः । इति पञ्चभिधां धत्ते पञ्चस्थानस्थितःक्रमात् ॥५॥ (सं. र. अ. १)
अतिसूक्ष्म, सूक्ष्म, पुष्ट, अपुष्ट व कृत्रिम अशीं पांच नांवे क्रमाने वरील पांच स्थानांत असलेला वायु धारण करितो.
नकारं प्राणनामानं दकारमनलं विदुः । जातः प्राणाग्निसंयोगात्तेन 'नादो 'ऽभिधीयते ॥६॥
न' कारास प्राण व 'द' कारास अनि म्हणतात. प्राण व अग्नि या दोहोंच्या संयोगानें जो उत्पन्न होतो त्यास 'नाद' म्हणतात.
नादेन व्यज्यते वर्णः पदं वर्णात् पदाद्वचः । वचसो व्यवहारोऽयं नादाधीनमतो जगत् ॥१४॥ (सं. द. १)
नादामुळे वर्णोच्चार (अक्षरोच्चार) होतो. वर्णापासून पदसिद्धि (शब्दसिद्धि) व पदापासून भाषा होते. भाषा झाल्यामुळें जगाचे सर्व व्यवहार चालू शकतात आणि म्हणूनच हे सर्व जग नादाधीन आहे.
गीतं नादात्मकं वाद्यं नादव्यक्त्या प्रशस्यते । तद्द्वयानुगं नृत्यं नादाधीनमतस्त्रयम् ॥१३॥ (सं. दं. १)
सर्व गीत (गायन-गाणें) नादात्मक आहे. नाद उत्पन्न करूं शकतात म्हणून वाद्य प्रशस्त मानले जातें. गीत व वाद्य यांच्या आधारावरच नृत्य होते. म्हणूनच गीत, वाद्य व नृत्य हीं तीनही नादावर अवलंबून आहेत.
आइतोऽनाहतश्र्चेति द्विधा नादो निगद्यते । सोऽयं प्रकाशते पिण्डे तस्मात् पिण्डोऽभिधीयते ॥१५॥
नादाचे दोन प्रकार मानले जातात. 'आहत' व 'अनाहृत' ते देहामधून प्रकट होतात म्हणून त्यास 'पिंड' असे म्हणतात.
तत्रानाहतनादं तु मुनयः समुपासते । गुरूपदिष्टमार्गेण मुक्तिदं न तु रञ्जकम् ॥१६॥ (सं. द. १)
मुनिजन अनाहत नादाची उपासना करतात. (त्यालाच 'प्रणव' म्हणतात) हा नाद मुक्तिदायक आहे, परंतु रंजक नाहीं.
स नादस्त्वाहतो लोके रञ्जको भवभञ्जकः । (१७ सं. द. १)
आहत नाद श्रुत्यादि प्रकारांनी (स्वर, ग्राम, मूर्च्छना इत्यादिकांनीं) व्यवहारांत मनोरंजक होऊन भवभंजकही होतो.
वर्णाद्यलंकृता गानक्रिया पदलयान्विता । गीतिरित्युच्यते सा च बुधैरुक्ता चतुर्विधा ॥१५॥ (सं. र. अ. १ प्र. ८)
वर्णोनी व अलंकारादिकांनी भूषित व पदांनीं व लयाने युक्त अशा गानक्रियेला गीति (गायन-गाणें) म्हणतात. ही गीती चार प्रकारची आहे असे पंडित म्हणतात.
----
एकावर दुसर्या पदार्थांचा आघात होऊन होणारा नाद हा 'आहत' नाद व तसा आघात न होतां होणारा नाद 'अनाहत’ नाद म्हटला जातो. हा नादः मनुष्यशरीरांत आपोआप चाललेला असतो. कानांत बोटे घालून लक्ष देऊन ऐकले असतां हा डोक्यांत चाललेला ऐकूं येतो. हा नाद वेणू, शंख, घंटा इत्यादि १० प्रकारचा असतो व तो योगाभ्यासांतील 'षण्मुखी' मुद्रा वगैरे साधनाने ऐकूं येतो असें तज्ज्ञ सांगतात. हाच पिंडांतील कृष्णाचा 'मुरलीनाद' असून यासच 'गोपी' म्ह. इंद्रियवृत्ति लुब्ध होतात. व ‘रासक्रीडेचा’ आनंद म्हणजे समाधिसुख भोगतात असें तज्ज्ञ पुरुष म्हणतात.---(संपादक)
----
गीतेन प्रीयते देवः सर्वज्ञः पार्वतीपतिः । गोपीपतिरनन्तोऽपि वंशध्वनिवशंगतः ॥२६॥ (सं. र. अ. १ प्र. ८)
सामगीतिरतो ब्रह्मा वीणासक्ता सरस्वती । किमन्ये यक्षगन्धर्वदेवदानवमानवाः ॥२७॥ (सं. र. अ. १ प्र. ८)
अज्ञातविषयास्वादो बालः पर्यङिगकागतः । रुदन् गीतामृतं पीत्वा हर्षोत्कर्षं प्रपद्यते ॥२८॥ (सं. र. अ. १ प्र. ८)
वनेचरस्तृणाहारश्चित्रं मृगशिशुः पशुः । लुब्धो लुब्धकसंगीते गीते त्यजति जीवितम् ॥२९॥ (सं. र. अ. १ प्र. ८)
तस्य गीतस्य माहात्म्यं के प्रशंसितुमीप्यते । धर्मार्थकाममोक्षाणामिदमेवैकसाधनम् ॥३०॥ (सं. र. अ. १ प्र. ८)
हें गीत (गायन-गाणे) पितामहाने म्ह. ब्रह्मदेवानें सामवेदापासून संग्रहित केलेलें आहे. सर्वज्ञ ईश्वर म्ह, पार्वतीपति-महादेव गायनानें संतुष्ट होतो. गोपीरमण अनंत म्हणजे श्रीकृष्ण हा तर मुरलीध्वनींत गुंगून गेलेला असतो. ब्रह्मा सामवेद गायनांत रत असतो. सरस्वतीही वीणेच्या ठिकाणीं आसक्त असते. (असें जर आहे तर मग) यांशिवाय इतर जे यक्ष, गंधर्व, देव, दानव व मनुष्य यांच्याबद्दल काय सांगावें ? विषयाचा आस्वाद नसलेल्या व पाळण्यांत रडत असलेल्या बालकाससुद्धां गीतरूपी अमृतपानानें आनंद होतो. ज्याचा तृण हाच आहार आहे असा हरिणबालकसुद्धां पारध्याच्या संगीताला भुलून आपल्या जीवितालाही मुकतो. अशा त्या गायनाची महती कोण वर्णू शकेल ? धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चारही पुरुषार्थं मिळविण्यास हें एकच सुलभ साधन आहे.
नादाब्धेस्तु परं पारं न जानाति सरस्वती । अद्यापि मज्जनभयात्तुम्बं वहति वक्षसि ॥३२॥ (सं. द. अ. १)
नादरूपी समुद्राचा पैलपार सरस्वतीसुद्धां जाणत नाही-म्हणून बुडून जाण्याच्या भीतीनें अजून ती आपल्या वक्षःस्थळावर भोपळा धारण करते.
वीणावादनतत्त्वज्ञ: श्रुतिजातिविशारदः । तालज्ञश्चाप्रयासेन मोक्षमार्ग निगच्छति ॥३३॥ - (याज्ञवल्क्य स्मृति)
वीणा वाजविण्याचे तत्त्व जाणणारा, श्रुतिजाति इत्यादिकामध्यें प्रवीण व तालज्ञ असा मनुष्य अप्रयासानें मोक्षमार्गास जातो.
यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती । तथा नयति कैलासं न गंगा न सरस्वती ॥१॥
गान - सरस्वती ही जशी कैलासास नेते (कैलासपद प्राप्त करून देते), त्याप्रमाणें गंगा अथवा सरस्वतीही कैलासास नेऊं शकत नाहीं.
नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये न वा । मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥१॥
मी वैकुंठांत अथवा योग्यांच्या हृदयांतही राहात नाहीं. माझे भक्त जेयें गायन करतात तेथें मी असतों. (असें भगवान म्हणतात).