मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
सहाव्या अध्यायातील रावणाचे गायन

गुरूचरित्र - सहाव्या अध्यायातील रावणाचे गायन

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


मागें संशोधनाचा इतिहास सांगतांना, त्याचा आरंभ कसा झाला, कुठें झाला, कुठल्या ग्रंथाचे व कुटल्या व्यक्तीचे साह्य कोणत्या कामांत झालें हें सांगितले. त्यांत म. धुपकरशास्त्री यांच्या साहाय्याचा प्रामुख्येंकरून उलेख आला आहे. तसाच, दुसर्‍या एका थोर व्यक्तीचा उल्लेख केल्यावांचून ही प्रस्तावना संपवितां येत नाहीं. त्याचें कारण असें कीं, वेदऋचांच्या त्या दोनतीन अध्यायांचें संशोधन जसें माझ्या शक्तीबाहेरचे होते, तसेंच सहाव्या अध्यायांतील रावणकृत गायनासंबंधींच्या ओव्यांचे संशोधनही माझ्या शक्तीबाहेरचें होतें. वेदऋचांच्या मुद्रणांत जसा संशय मला येत होता, तसाच या ६ व्या अध्यायांतील रागरागिणींच्या नांवांतही येत होता. म्हणून मी तेवढ्या ओंव्या (४२ ते ७८) निरनिराळ्या कागदावर उतरून काढून (कार्बनपेपरच्या साह्यानें त्याच्या ३।४ प्रति करून) योग्य मित्रांच्या साह्यानें प्रख्यात गानप्रवीण गवय्यांकडे पाठवून दिल्या. महाराष्ट्रांतील प्रसिद्ध गानप्रवीण अशा एका नटाचीही बेळगांवांत त्यांची कंपनी आल्या वेळीं खुद्द भेट घेऊन त्यांना गु. च. संशोधनाचा इतिहास सांगितला व ह्या ओंव्या शुद्ध करून देण्याचा अधिकार आपला आहे अशी विनंति केली. त्यांनी या (गु. च. संशोधन) कार्याची तारीफ करून विचार करण्याकरितां म्हणून कागद प्रेमानें ठेवून घेतला व चार दिवसांनी भेटण्यास या असे सांगितले. त्याप्रमाणे गेलों. तों त्यांनी मोठ्या विनयानें सांगितले, की आपण 'गायनकला' जाणतों 'गायनशास्त्र' जाणत नाहीं, तुम्ही अमुकाकडे चला म्हणजे तुमचें काम होईल. इत्यादि. ह्या सूचनेबद्दल मी त्यांचे आभारच मानले व त्याप्रमाणें प्रयत्न केला पण यश आलें नाहीं. आणखी एकदोघांकडे दिलेले कागद-' यांत फारसें कांहीं अशुद्ध दिसत नाहीं' असे म्हणून परत आले ! त्यायोगें मी निराश होत चाललों. इतर सर्व अध्यायांचे संशोधन होऊन मुंबईस ग्रंथ छापण्यासही सुरवात झाली. चार अध्याय छापून पुरे झाले. पांचव्याचे 'कंपोज' सुरू झालें. सहावा अध्याय पुढच्या आठवड्यांत दिलाच पाहिजे होता अशी वेळ आली. पण ६ व्या अध्यायावर योग्य अशा तज्ज्ञाची नजर फिरली नाहीं म्हणून मनाला फार जाचूं लागलें. एक रात्र तर बेचैन गेली. ह्या माझ्या तळमळीची देवाला काळजी पडली व दुसर्‍या दिवशीं मी चालू काम करण्यासाठी चाललों असतां, ज्यांना आधुनिक तुकाराम व तुळसीदास म्हणतात त्यांची, म्ह. कै. विष्णुपंत पागनीस यांची, रस्त्यावर अकस्मात भेट झाली व मनाला संतोष वाटला. त्यांच्याबरोबर बोलत बोलत त्यांच्या घरी गेलों व वरील सर्व हकीकत सांगून खिशांत असलेला त्या ओव्यांचा तो कागद त्यांच्या हातीं दिला. त्यांनीं तो ठेवून घेऊन दोन दिवसांनी येऊन भेटण्यास सांगितले, त्याप्रमाणे जाऊन भेटलों, तेव्हां त्या ओव्यांना अनुसरून त्यांनीं गायनशास्त्रावर बरेंच भाषण केले व सांगितले की-"या ओव्यांचें जर शास्त्रोक्त संशोधन पाहिजे असेल, तर श्रीयुत भालचंद्र सीताराम सुकथनकर, एम्. ए., एलएल. बी., सॉलिसिटर हे वाळकेश्वरीं राहातात त्यांना जाऊन भेटा, म्हणजे तुमचें काम बरोबर होईल; त्यांचे मित्र कै. पं. विष्णु नारायण भातखंडे, बी. ए., एलएल. बी., यांनीं गायनशास्त्रावर आज ३०० वर्षें कोणी परिश्रम अथवा शोध केले नाहींत तेवढे करून ग्रंथ निर्माण केले आहेत. त्यांच्याबरोबर सुकथनकर सॉलिसिटर यांनींही सहकार्य करून त्यांची लहान मोठीं पुस्तकें, पांचपांचशे पानांपर्यंतचीं, 'हिंदुस्थानी संगीत पद्धति' नांवाचीं छापून प्रसिद्ध केली आहेत," इत्यादि सांगून त्यांचीं पुस्तकेंही त्यांनीं आणून दाखविलीं तीं पाहून मनांत आशेचा किरण उत्पन्न झाला. आमचे मित्र श्रीयुत रंगनाथ दत्तात्रेय रेगे यांना घेऊन वाळकेश्वरीं जाऊन सॉलिसिटर साहेबांची भेट घेतली. जातांना 'श्रीगुरुचरित्रांतर्गत गुरुगीता' पुस्तक बरोबर नेलें होतें तें देऊन गु. च. संशोधनाचा व ६ व्या अध्यायांतील या ओव्यांचाही इतिहास सांगून त्या ओव्यांचा कागद त्यांच्या स्वाधीन केला. आमचें भाषण त्यांनी शांतपणें ऐकून घेऊन आम्हांला प्रेमानें आश्वासन दिले. त्यांच्या घरच्या ऑफीसच्या टेबलावर श्रीदत्ताचा फोटो व गजाननाची मूर्ति वगैरे पाहून मी योग्य ठिकाणीं पोचलों असे मला वाटले व पागनीसांच्या भेटींत उत्पन्न झालेला आशेचा किरण फांकून त्याचा प्रकाश कार्यसिद्धीच्या क्षितिजावर पडला. श्री. सुकथनकर यांनी पुढच्या रविवारीं येऊन भेटण्यास सांगितलें. त्याप्रमाणे मी गेलों, तों त्यांनी आपल्याकडील गायनशास्त्राच्या ग्रंथांच्या आधारें एक कागद तयार करून ठेवलेला होता, तो दाखवून या ओव्यांतील राग-रागिणींच्या नांवाचे शुद्धीकरण कसें केलेलें आहे तें सांगितलें. तें पाहून व त्यांचें तद्विषयक भाषण ऐकून मला श्री. धुपकरशास्त्र्यांनीं सव्विसादि अध्यायांवर केलेल्या भयंकर परिश्रमाची आठवण झाली. आज कित्येक वर्षांत न झालेलें काम एका आठवड्यांत झाले, म्हणून अंतःकरणास समाधान वाटलें व श्री. सुकथनकर यांचे मी आभार मानले. शब्दांचे आभार किती झाले तरी औपचारिकच होत. पण या निमित्तानें त्या थोर पुरुषाची भेट होऊन त्यांच्या अंतरांतले भक्तीच्या जिव्हाळ्याचें स्वरूप कळून आलें म्हणून मनाला अधिक आनंद वाटला. त्यांनीं लोकमान्यांच्या गीतारहस्याचे इंग्रजीत भाषांतर केलेलें पुस्तक पाहून तर तो आनंद दुणावला. त्यापेक्षां त्यांनीं गुरुचरित्रांतील कांहीं वेंचक स्थळांतील प्रश्न केले ते ऐकून त्यांचा गुरुचरित्राचाही व्यासंग असलेला दिसला व श्रीगुरुदेवांच्या लीलेचा मोठा चमत्कार वाटला. गुरुचरित्रसंशोधनाची सेवा जशी मजकरितां राखून ठेवलेली होती, तशी या ६ व्या अध्यायांतील ही सेवा यांच्या- करितां राखून ठेवलेली होती व त्यांची त्यांनीं ती करून घेतली असे मला वाटलें. आतां या ओव्यांचे आपण केलेलें शुद्धीकरण अगदीं निर्दोष झाले आहे अस जरी ते मानीत नाहींत कारण आज उपलब्ध असलेल्या गायनशास्त्रावरील संगीतरत्नाकरादि ग्रंथांच्या परिभाषेला व सरस्वती गंगाधराच्या परिभाषेला पुष्कळ ठिकाणीं जुळत नाहीं, तेव्हां गु. च. ग्रंथ लिहितांना त्या वेळीं दुसरा कोणता तरी ग्रंथ त्याच्या डोळ्यांपुढें असला पाहिजे असे ते म्हणतात- तथापि यापूर्वी छापलेल्या प्रतीपेक्षां यांत पुष्कळ अधिक शुद्धता आली आहे असे अगदीं धैर्याने म्हणतां येईल. यानंतर याबद्दल दुसर्‍या कोणा तज्ज्ञांनीं साधार दुरुस्ती सुचविल्यास त्याचा स्वीकार करण्यास आम्ही आनंदाने तयार आहोंच.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP