(१) आपल्या उपास्य देवतेच्या जितक्या जास्त जास्त कथा व गुणानुवाद भक्तांना माहीत असतील, तितकी तितकी ती उपासना वाढून त्या प्रेमवृत्तीचे वैभव वृद्धि पावत असतें. श्रीदत्ताचा मूळचा 'अविनाश-अविअनसूयापुत्र-अवतार' आम्ही मागच्या लेखांत (पृ. १६ वर) सांगितलाच आहे. त्याचे कलियुगांतील श्रीपादवल्लभ व नरसिंहसरस्वती हे दोन अवतार ह्यांच्या कथा प्रस्तुत श्रीगुरुचरित्रांतून वर्णिल्याच आहेत. पण अगदीं अर्वाचीन अशा दुसर्या दोन पूर्ण दत्तावतारी विभूति (कित्येक समजतात तसे ते केवळ संत, सत्पुरुष किंवा योगी नव्हते) व त्यांच्या पुण्यपावन रसाळ कथाही श्रीगुरुचरित्रभक्तांनी समजून घेतल्या पाहिजेत. श्रीविष्णूच्या पुराणप्रसिद्ध दशावतारांमध्ये कृष्णावतार जसा अधिक मोहक व लाडका वाटत असतो, तसा चारी दत्तअवतारांमध्ये सुमारे ७५ वर्षांपूर्वी निजाम इलाख्यांत कल्याणी क्षेत्रीं श्रीमनोहर नाईक व साध्वी बयाबाई यांच्या उदरीं प्रगट झालेला श्रीमाणिकप्रभु अवतार होय. त्यानें धर्मोद्धार बावतीप्रमाणे ऐतिहासिक दृष्टयाही मोगलाईत मोठीच क्रांति घडवून आणली. त्यांच्या जुन्या लहान चरित्राची दुसरी (गद्य) आवृत्ति प्रभूच्या सुंदर छायाचित्रासह हल्लीं माणिकनगर येथें प्रसिद्ध केली आहे. ती गुरुचरित्रवाचकांनीं जरूर वाचून पाहावी व तेथील आनंदसोहळा समक्ष पाहून येण्याची संधि साधावी, अशी आम्ही अत्यंत प्रेमानें व आग्रहानें शिफारस करितो. (ही पुस्तकें मिळण्याचा पत्ता श्री. आप्पासाहेब देशपांडे, बी. ए., एलएल बी., सेक्रेटरी श्रीमाणिकप्रभु संस्थान, मु. माणिकनगर, पोस्ट होमिनाबाद, निजाम इलाखा ; किंवा मुंबई- गिरगांव, काकडवाडी, माणिकभवन, डाकूरनाथ नाईक.)
(२) दुसरी अर्वाचीन दत्तावतारी प्रसिद्ध विभूति म्हणजे श्रीसमर्थ अक्कलकोटस्वामी महाराज हे होत. अगदी खरेखुरे सांप्रदायिक रहस्य श्रीगुरुचरित्र-भक्तांच्या कानांत सांगावयाचे म्हणजे ५१ व्या अध्यायांत श्रीनरसिंहसरस्वती हे कर्दळीवनांत श्रीशैलपर्वतावर गेले असे जे वर्णन आहे, तेच तेथून हिमालयावर जाऊन तिकडून सुमारें ३०० वर्षांनी खाली उतरून (अगदीं त्याच देहाने) मंगळवेढे, मुंबई, वाळकेश्वर व सोलापूर येथे (लीलाचमत्कार न दाखवितां) कांहीं वर्षें राहून, शेवटी सुमारे २०|२५ वर्षें प्रगटपणे लोकोद्धार करीत अक्कलकोटांत राहिले (त्यांचे गद्य व ओवीबद्ध चरित्र श्री. यशवंत कंदाडे, क्षत्रियनिवास, चर्नीरोड, मुंबई अथवा तुकाराम पुंडलीक शेट्ये, माधवबाग, मुंबई यांच्याकडे मिळेल.) असो.
(३) श्रीमाणिकप्रभु व श्रीअक्कलकोटस्वामी यांच्या सांप्रदायांत परस्पर विभूतींसंबंधाने घोटाळ्याच्या समजुती आहेत. श्रीमाणिकप्रभूच्या कृपेनें अक्कलकोटस्वामी उदयास आले असें मा. प्रभु सांप्रदायिक लोक समजतात व अक्कलकोटस्वामींच्या कृपेनें माणिकप्रभु एवढ्या पदास चढले असें अ. स्वामी सांप्रदायांतील लोक मानितात. ह्या दोन्ही समजुती चुकीच्या आहेत. ह्या दोन्हीही महाविभूति स्वतंत्र अभिन्नस्वरूप पण भिन्न चर्या धारण करणारे पूर्ण दत्तावतार होत. श्रीमाणिकप्रभूची गादी हल्लीं श्रीमार्तंडप्रभूचे थोर अधिकारी भाचे-श्रीशंकरमाणिकमहाराजांनी चालविली आहे. तशीच अक्कलकोटस्वामींची उपासनाही अनेक ठिकाणी चालू आहे.
(४) याचप्रमाणे श्रीदत्ताच्या या चार अवतारांपैकी कोणाही विभूतीच्या कृपेनें पूर्ण सिद्ध झालेले सत्पुरुष योगीश्वर जगदुद्धारक श्रीवासुदेवानंद सरस्वती श्रीब्रह्मानंद सरस्वती, श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर, श्रीनारायणमहाराज केडगांवकर, श्रीदेवमामलेदार श्रीसाईमहाराज शिर्डीकर, वगैरे या प्रत्येक महात्म्यांचे सांप्रदायिक आपल्या गुरुदेवाला श्रीदत्तावतार समजतात. कोल्हापुरांत कुंभारगल्लीत श्रीकृष्णस्वामी नांवाचे दत्तावतारी होऊन गेले. या सर्वांची माहिती रसिक दत्तभक्तांनी अवश्य करून घ्यावी.