मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
श्रीगुरुचरित्र ग्रंथप्रवेश

गुरूचरित्र - श्रीगुरुचरित्र ग्रंथप्रवेश

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


(१०) श्रीदत्तात्रेय--अवतार व श्रीदत्तउपासना या विषयावर पुष्कळ लिहावेंसें वाटते; परंतु आतां तो मोह आवरून धरून श्रीदत्ताचेच कलियुगांतील महान् प्रसिद्ध अवतार श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती--ज्यांच्या चरित्रकथांनीं प्रस्तुतचा वेदतुल्य 'श्रीगुरुचरित्र' नामक पुण्यपावन ग्रंथ निर्माण झाला--त्यांच्या-विषयीं यथामति थोडेंसें लिहिण्याचा प्रयत्न करितों. श्रीदत्तदेवांनीं आपला आद्ययुगांतील 'दिव्य' म्ह. सूक्ष्म (Subtle) विशुद्ध सत्त्वपरमाणूंचा केवळ चिन्मय देह कलियुगांतील लोकसंमदांत वर्तविणे अशक्य, कारण त्या चिन्मय दिव्य देहाचें दर्शनही प्राकृत जनांस असह्य असें जाणून, पण लोकांत उघडपणे मिळून मिसळून वागल्याशिवाय व प्रेमसेवादानग्रहणादि गोष्टी केल्याशिवाय भक्तिज्ञानोत्कर्षमूलक धर्मस्थापनादि कार्ये करतां येणें शक्य नाहीं असें मनांत आणून, जुलमी व ब्राह्मणद्वेषी म्लेंच्छराजाच्या कारकीर्दीत ‘त्राहि भगवन्' अशी स्थिति झाल्या वेळीं, मद्रास इलाख्यांत गोदावरी डिस्ट्रिक्टमधील 'पीठापुर' नांवाच्या गांवांत थोड्याशा स्थूल परमाणूंचे शरीर धारण केलें, तोच श्रीगुरुचरित्रांतील ५ व्या अध्यायांतील 'श्रीपादश्रीवल्लभ' नांवाचा श्रीदत्ताचा अवतार. वेदमूर्ति आपळराज नांवाच्या ब्राह्मणाची, केवळ अनसूयेची दुसरी प्रतिमाच अशी सुमति नांवाची साध्वी स्त्री, हिने घरांत श्राद्ध चालू असतां दारांत अत्यंत दीन अशा अतिथिवेषाने आलेल्या दत्ताला भिक्षा घातली. त्या वेळीं श्रीदत्तानें आपले निजरूप प्रकट करून आपण तुझ्या उदरीं जन्म घेतों असे आश्वासन दिलें व त्याप्रमाणें केलें. यांचें चरित्र गुरुचरित्रांत फार थोडें म्हणजे अ. ५ पासून १० अध्यायापर्यंतच वर्णिलेले आहे. यांनीं आपल्या अंध व पंगू अशा दीन बंधूंना कृपादृष्टीने डोळे व पाय देऊन केवळ हस्तस्पर्शाने वेदशास्त्रसंपन्न केलें. त्याचप्रमाणें एक ब्राह्मण विधवा स्त्री आपल्या जडमूढ पुत्रासह कृष्णेंत जीव द्यायला गेली असतां, तिनें कांठावर बसलेल्या श्रीपादमूर्तीला पाहून वंदन केलें आणि जन्मोजन्मीं असा मूढ पुत्र नसावा, आपल्यासारखा ज्ञानी व जगद्वंद्य पुत्र मला पुढच्या जन्मीं व्हावा अशी अनन्यभावें प्रार्थना केली. तिला श्रीपादवल्लभांनी शनिप्रदोषाच्या दिवशीं शंभूची पूजा करीत जा म्हणजे माझ्यासारखा पुत्र पुढच्या जन्मीं होईल असे सांगून तिच्या मूढ पुत्राच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्यायोगें तो तत्काळ ज्ञानी झाला व पुढे त्याचें लग्नकार्य होऊन तो सुखाला पोचला, अशी कथा ८ व्या अध्यायांत आहे. ९ व्या अध्यायांत एक परीट जातीचा भक्त श्रीपादांची सेवा करीत असतां त्याला त्याची वासना ओळखून, तूं पुढच्या जन्मीं म्लेच्छ कुळांत राजा होशील असा वर दिला आणि कुरवपुरांत अवतार गुप्त केला अशी कथा आहे. लोकदृष्टीनें हा अवतार गुप्त केला तरी, भक्तरक्षणार्थ त्या स्थळीं आपण गुप्तपणें प्रगटच आहों हें दाखविण्याकरितां, कुरवपूरच्या यात्रेस येणार्‍या एका परम भक्त ब्राह्मणाला वाटेंत चोरांनीं मारलें तेव्हां एकदम प्रगट होऊन त्या चोरांचा वध केला अशी कथा १० व्या अध्यायांत आहे. त्यानंतर मांगें ज्या ब्राह्मणीला शनिप्रदोषव्रत करण्यास सांगितलें होतें, ती देहवासना ठेवून मृत झाल्यानंतर वऱ्हाडांत करंजनगरांत (ज्याला हल्ली 'लाडकारंजा' म्हणतात तेथें) जन्म घेती झाली. तिचे नांव 'अंबा' असें होतें. त्याच गांवांत 'माधव' नामक एका शिवव्रती ब्राह्मणाशीं तिचा विवाह झाला व ती बलवत्तर पूर्वसंस्कारानुसार शनिप्रदोषव्रत करूं लागली. त्या व्रतपुण्येंकरून तिचें स्थूल व लिंगशरीर अत्यंत पवित्र झालें; नव्हे, भगवंतांनीं त्या व्रताच्या प्रयोगानें ते आपल्या निवासास योग्य असें पवित्र करून घेतलें आणि नंतरच 'प्राची दिशेत सूर्य प्रवेश करतो त्याप्रमाणें’ त्या पवित्र उदरांत प्रवेश केला. योग्य मासान्तीं ती भाग्यवती माता प्रसूत झाली. त्या पुत्राचे नांव 'नरहरि' ठेवलें. हेच आपले चरित्रनायक 'श्रीनृसिंहसरस्वतीस्वामी’. जन्मतांच मुखानें ॐकाराचा उच्चार. ('सोहं' मधील सकार व हकार काढून टाकल्यानंतर बाकी शिल्लक राहातें तें अक्षर म्हणजे 'ओऽम्'). जन्मलेल्या बालकास रडणें बिडणें कांहीं माहीत नाहीं, फक्त ॐ ॐ ॐ असा मंत्रोच्चार तें करीत आहे, ही वार्ता गांवांत फांकली व ह्या अद्भुत बालकास पाहाण्याकरितां गांवांतील लोकांचे थवे लोटूं लागले. व्रतबंध झाल्यानंतर एका वर्षांने नरहरि बटु काशीयात्रेस चालला, त्या वेळीं माता शोकानें अत्यंत विध्द झाली, तेव्हां आपले पूर्वीचें श्रीपादवल्लभ व त्रिमूर्ति दत्तरूप दाखवून व पूर्वजन्माची स्मृति देऊन तिचें समाधान केलें. ह्या नरहरीची, याच नरसोबाची, या नरसिंहसरस्वतीचीच कथा गु. च. च्या ११ व्या अध्यायापासून सुरू होते व ती अखेरपर्यंत चालते.
(११) जीवांचे 'कर्मदेह' व भगवंताचे 'लीलादेह' यांत अमावास्या पौर्णिमेसारखें अंतर असतें. जीवांचीं 'मलिन' कर्में आणि भगवंतांची 'दिव्य' कर्में यांतही असेंच अंतर असतें. 'जन्म कर्म च मे दिव्यं०' असें भगवान् आपल्या मुखानें गीतेंत सांगतात. आपले दिव्य जन्म व दिव्य कर्में तत्त्वत: जाणली असतां त्यायोगें जीवांचे मलिन जन्म व मलिन कर्में यांचा नाश होतो व त्यांना मरणोत्तर पुनः जन्म प्राप्त न होतां ते आपणास येऊन मिळतात, अशी त्याची फलश्रुतिही त्याच श्लोकांत सांगितली आहे. कोणी कितीही ब्रह्मज्ञानी व ब्रह्मनिष्ठ झाले तरी त्यांनासुद्धां भगवंताच्या अवतारांचें रहस्य कळणें शक्य नसतें. “मुह्यन्ते ह्यस्मदादय:’’ म्ह. आमच्यासारख्यांनासुद्धां मोह पडतो, अशी कबुली ब्रह्मदेव आपल्या मुखानें भागवतांत देतात. इंद्र व ब्रह्मदेव यांची कृष्णावताराच्या वेळीं कशी फजिती झाली हें भागवतांत प्रसिद्धच आहे. इंद्रादिक देवता अपरोक्ष ज्ञानी; पण त्यांनासुद्धां भगवंताच्या अवतारतनूचे स्वरूप ओळखतां आलें नाहीं ! (एकनाथी भागवतांत म्हटले आहे. अ. ३०)--
" सुखें होईल ब्रह्मज्ञान । परी तुझें स्वलीला देहधारण । याचें नेणती पर्यवसान । अति सज्ञान साकल्यें "
तात्पर्य, मूळ दत्तावतार कोण, त्याचेच श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती, माणिकप्रभु व अक्कलकोटचे स्वामीमहाराज इत्यादि अवतार कसे ? अवतारतनु एकच असतां एकाच वेळीं अनेक भक्तांना अनेक स्थळीं दर्शन कसें होतें व तितक्या भक्तांची सेवा ती अवतारतनु एकाच वेळीं कशी ग्रहण करिते, भक्तांवर कृपा करण्याचे तिचे काय नियम आहेत ? हें ' राजगुह्य' त्या प्रभूच्या कृपेशिवाय उलगडणे शक्य नाहीं. तसेंच श्रीमद्भागवत, हरिवंश, सप्तशती किंवा गुरुचरित्र यांत भगवंताच्या किंवा भगवतीच्या नुसत्या लीलांचे वर्णन आहे, त्यांच्या वाचनानें किंवा सप्ताहपारायणानुष्ठानानें अनिष्टनिवृत्ति व इष्टप्राप्ति कशी होते हें गुह्यही प्राकृत बुद्धीला कळणें शक्य नाहीं. बुद्धीची गति जिकडे कुंठित होते, तिकडून श्रद्धेच्या प्रांतास सुरवात होते; व 'श्रद्धावान् लभते ज्ञानम्' (न तु बुद्धिमान्) या भगवद्वचनाचा प्रत्यय आपोआप येऊं लागतो. मग 'मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात्तरिष्यसि' हा कृपाप्रसाद म्हणजे काय चीज आहे, ह्या कृपेची काय शक्ति आहे हेंही आपोआप कळू लागतें.
" प्रसादाचें म्ह. कृपेचें सामर्थ्य अद्भुत आहे. 'फलप्राप्तीचे कारण त्या त्या विषयाचा पूर्वसंस्कार नसून, सद्गुरु किंवा ईश्वर यांच्या प्रसादानेच वाटेल त्या विषयाची श्रमावांचून एकदम अचानक प्राप्ति होते.' सूतसंहितांतर्गतब्रह्मगीतेंत सांगितलें आहे कीं —
प्रसादे सति कीटो वा पतंगो वा नरोऽथवा । देवो वा दानवो वापि लभते ज्ञानमुत्तमम् ॥
प्रसादस्य स्वरूपं तु मया नारायणेन च । रुद्रेणापि सुरा वक्तुं न शक्यं कल्पकोटिभिः॥
अर्थ – ब्रह्मदेव म्हणतात, देव हो! ईशप्रसादाचें सामर्थ्य अद्भुत आहे. (प्रसाद म्ह. प्रसन्नता) प्रसादाचा महिमा शंकर, विष्णु किंवा मी यांपैकी कोणालाही वर्णन करितां येणें शक्य नाहीं. बरें, तो प्रसाद वरी अमुकच जातीच्या भक्तावर किंवा ब्राह्मणावरच होतो असाही नियम नाहीं. किडा, मुंगी, पतंग किंवा पशु-पक्षी वगैरे हीन जातींपैकी कोणीही भक्त असो, अथवा मनुष्यांपैकी ब्राह्मण, शुद्ध किंवा स्त्रियादि कोणीही असो; देव असो, दानव असो; ज्याच्यावर भगवदप्रसाद झाला, त्याला नि:संशय आत्मज्ञान होतें.’’ इ०                     - (सर्वमतखंडन-ब्रह्मविद्यारहस्य)
" न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवणसायास । प्रयत्नैवीण सौरस । सद्गुरुकृपा॥" असे श्रीसमर्थही दासबोधांत सांगतात. (५|६|३५). असा ह्या सगुणभगवंताच्या प्रसादाचा महिमा आहे.
(१२) पण कोणाचीही प्रसन्नता संपादन करावयाची असेल तर त्याचें प्रिय काय आहे हे ओळखून ते केलें पाहिजे. गुरु किंवा देव यांनी आपणावर प्रसन्न व्हावे म्हणून पुष्कळांची इच्छा असते, पण त्यांचें प्रिय कशांत आहे हें न ओळखतां आपआपल्यापरी (म्ह. आपणास प्रिय वाटेल तसा) जो यो प्रयत्न करीत असतो आणि म्हणूनच चुकतो. आपल्या धन्याच्या किंवा उपास्य देवतेच्या आवडी नावडी काय आहेत हें ओळखून त्याप्रमाणे जो वागतो, त्याच्यावर तो धनी किंवा ती देवता प्रसन्न होते. भगवंताच्या अवताराचीं तीन कार्ये दुष्टनाश, शिष्टपरिपालन व धर्मसंस्थापन--हीं गीतेंत प्रसिद्ध आहेत ; आणि अवतार घेऊन तो ज्या लीला करितो त्यांचें गायन अथवा श्रवण पठण हें त्रैलोक्यपावनकारक असून भवसागराला सेतूरूप होतें. हें चौथें कार्य भागवतांत प्रसिद्ध आहे. स्तुतिप्रियता व पक्षपातित्व हे गुण मनुष्याच्या ठिकाणीं दूषणास्पद ठरतात, पण भगवंताच्या ठिकाणी हेच भूषणास्पद होतात. भगवान् 'आत्मस्तुतिप्रिय' आहे, तसाच 'भक्तपक्षपाती' पण आहे. नव्हे, याबद्दल भगवंताला मोठा अभिमानही वाटतो. भवसागरास सेतुभूत असा श्रीमद्भागवत ग्रंथ व्यासाकडून नारदाच्या प्रेरणेनें भगवंतानें लिहविला, त्याचप्रमाणे श्रीगुरुदेवांनी श्रीगुरुचरित्रग्रंथ सरस्वती-गंगाधराकडून सिद्धाच्या प्रेरणेनें लिहविला व त्यास 'भक्तकामकल्पतरु' त्वाचा वर देऊन ठेवला. जिकडे या ग्रंथाचे विधिपुरःसर वाचन होतें, तिकडील भूतपिशाचबाधा व पाठकाची दुष्ट ग्रहबाधा नाहींशी होते हा प्रत्यय श्रीमद्वासुदेवानंद महाराजांनीं पुष्कळांना आणून दिला आहे. कुष्ठरोगासारखे महारोग गेलेले आहेत. “भुक्ति मुक्ति परमार्थ । जें जें वांछिजे मनांत । तें तें साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकतां ॥" हा प्रत्यय पुष्कळांना आलेला आहे. श्रीमद्वासुदेवानंद किंवा श्रीअण्णासाहेब पटवर्धन यांच्यासारखे पुरुष भलत्याच गोष्टीवर स्वतः विश्वास ठेवणार नाहींत व ठेवण्याबद्दल लोकांस सांगणार नाहीत. "आधीं केलें, मग सांगितले" असा या लोकांचा बाणा असतो. नुसत्या पारायणानें असें कसें घडते, असा प्रश्न श्रद्धावान् लोकांच्या मनांत उत्पन्नच होत नाहीं; पण कांहीं चिकित्सकांच्या मनांत उद्भवतो. त्याचे उत्तर मानसशास्त्राच्या दृष्टीने बिनचूक देतां येतें. आपले धर्मशास्त्र हें योगशास्त्र व मानसशास्त्र यांच्यावर आधारलेलें आहे. मानसशास्त्राचा अभ्यास आपल्याइकडे लुप्त झाला, म्हणून धर्मशास्त्रांतील सिद्धान्तावरील विश्वास उडत चालला. रामरक्षेमध्यें शरीराच्या निरनिराळ्या अवयवांचें रक्षण श्रीरामाकडून मागितलें आहे, त्यांत प्रत्येक अवयवाच्या वेळीं श्रीरामाच्या पृथक् पृथक् रूपाचें ध्यान अथवा उच्चार कां सांगितला आहे, याचा विचार कोणी लक्षांत आणीत नाहीं. 'शिरो मे राघवः पातु' कां ? 'जिव्हां विद्यानिधिः पातु' कां ? 'कंठं भरतवंदितः कां? 'भुजौ भग्नेशकार्मुकः' कां? राघव, दशरथात्मज, कौसल्येय, विश्वामित्रप्रिय, विद्यानिधि, भरतवंदित, ईशकार्मुकभंगकर्ता, सीतापति, दशमुखांतक, विभीषणश्रीद इत्यादि ही सर्व नांवे रामाचींच, पण त्या त्या अवयवाला तीं तीं गुणविशिष्ट नामेच कां योजिलीं आहेत ? यांतील हेतुहेतुमद्भाव कोणीच लक्षांत घेत नाहीं. यांत केवडें मानसशास्त्र (सायकॉलॉजी) भरलेले आहे, याचा पुसट उल्लेखही आजपर्यंत छापून प्रसिद्ध असलेल्या रामरक्षेच्या भाषांतर पुस्तकांत मला आढळला नाहीं ! शब्दशक्ति (Power of Word) म्हणून स्वतंत्र आहे आणि त्यामुळेंच अर्थावांचूनही म्हटलेली रामरक्षा, शिक्षकवच, रुद्र, सप्तशतीपाठ हीं अगदींच फुकट जात नाहींत ही गोष्ट निराळी; पण त्या शब्दशक्तीला जोडून मानसशक्तीचा प्रयोग झाला, तर तो कितीपटीनें यशस्कर होईल याचा विचार केला पाहिजे. तात्पर्य, अशा ग्रंथांचें पारायण करतांना अर्थध्यानपुरःसर केलें पाहिजे. नुसतें वाचलें किंवा ऐकलें म्हणजे पुण्य लागतें एवढीच भावना उपयोगी नाहीं. अर्थाकडे लक्ष दिल्यानें मन म्हणजे आपण अर्थमय होतो. "ज्याचे जया ध्यान । तेंचि होय त्याचें मन " हे तुकाराममहाराजांचे वचन म्हणजे मानसशास्त्राचा मोठा सिद्धान्त आहे.
" यो यच्छ्रद्ध: स एव स:’’ हें गीतेचें वचनही याच अर्थाचें द्योतक आहे.
(१३) अनेक सद्भक्तांच्या हाकेस ओ देऊन श्रीपादवल्लभ व त्यानंतर श्रीनृसिंहसरस्वतीरूपानें अवतार घेऊन म्हणजे थोड्याशा स्थूल परमाणूंचे शरीर धारण करून प्रभूनें त्याकाळीं अविंधाकडून चालू असलेली आर्यधर्मांची गळचेपी किती दूर केली ही ऐतिहासिक घटना फार थोडे लोक जाणतात ! बाकी सर्व त्यांच्या अद्भुत चमत्कारमय चरित्रलीलांतच रममाण होतात. मागाहूनच्या सुप्रसिद्ध रामदास-तुकारामादि संतांच्या महनीय कार्यांच्या क्षेत्रांत धर्म-भक्ति-ज्ञानाच्या बीजाची पेरणी मुसलमानांच्या कारकीर्दीत वरील दोन अवतारांमुळे किती अमोघ व महत्वाची झालेली होती, तसेच गेल्या शतकांत निजाम इलाख्यांत कल्याण क्षेत्रांत प्रगट झालेले तृतीय दत्तावतारी महापुरुष श्रीमाणिकप्रभु यांनीं सनातनधर्मांची केवढी बाजू सावरून धरली हें समजून घेऊन जनतेस समजावणेची कामगिरी देव-देश-भक्तांनीं केली पाहिजे. परंतु असें करीत असतां, ओवींबद्ध प्राकृत भाषेत असलेल्या अद्भुतकथापारायणाची महती मात्र डोळ्यांआड करून चालणार नाहीं. केवळ 'भाविक' बुद्धीस व 'भोळ्या' दृष्टीस त्याचे महत्त्व वाटतें त्यापेक्षां कितीतरी पट त्याची थोरवी व उपयुक्तता यौगिक आणि तात्विक (अप्राकृत) दृष्टीनें आहे. श्रीरामायण-भारत-भागवतामधील प्राचीन विभूतींच्या म्हणा, अगर श्रीपाद-नरसिंहसरस्वती-ज्ञानेश्वर-चिदंबर-माणिकप्रभु वगैरे अर्वाचीन विभूतींच्या म्हणा, दिव्य कथांच्या वाचनश्रवणाचा उपयोग कळावा तसा आमच्या विद्वान शास्त्री लोकांस कळता तर गु. च. च्या पारायणापेक्षां भ. गीता इत्यादींचे पारायण अधिक चांगलें असें ते म्हणते ना! “चरित्र पारायणकर्त्यांचा जीवात्मा त्या त्या अवताराच्या काळांत व त्या त्या पुण्यस्थळांतही नकळत जाऊं शकतो; आणि त्या काळाच्या व त्या वातावरणाच्या (Time-spirit) गुणधर्मात्मक संस्काराचा लाभ तो जोडतो. त्या त्या विभूतीच्या दिव्य पिंहाच्या तेजःप्रवाहांत या भक्ताचा जीवात्मा किंवा लिंगदेह न कळत पण खरोखरीच तेवढा वेळ अवगाहन करूं शकतो." हे आमच्या शास्त्रीपुराणिकांस कळत नाहीं. एकादी सुंदर कल्पित कादंबरी (ऐतिहासिक, सामाजिक किंवा शृंगारिक घ्या) वाचतांना आपली वृत्ति किती तदाकार-तन्मय होऊन आपण निराळ्याच वातावरणांत राहात असतों हें लक्षांत घेतले तर, भागवत-गुरुचरित्रादिग्रंथांचीं आदरयुक्त व पवित्र भावनेनें, शुचिर्भूतपर्णे, सुवासिक उदबत्त्या पेटवून, निरंजनें ठेवून, रांगोळ्या वगैरे घालून पारायणें केलीं असतां, आपल्या सर्व बुद्धिवृत्ति, नव्हे आपली जाणीव (Consciousness) कितीतरी पट अधिक पवित्र सुमंगल वातावरणांत (Spiritual Plane वर) पोचेल बरें ! थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे सगुणचरित्राची पारायणें करणें याचा अर्थ तावत्काळ आम्ही (Our Spirit) 'वस्तु'-तः म्हणजेच Spiritually ते ते अवतार होणें, तत्तत्कथा- प्रसंगरूप बनणें आहे. इतकेंच नव्हे, तर ती आमची 'जाणीव' म्हणजेच वस्तुतः 'आम्ही'--आमचा 'आत्मा' तदाकार आणि तन्मय होणें आहे. ('तदाकार' आणि 'तन्मय' या दोन संस्कृत शब्दांचा अर्थ 'मृण्मय' गणपति या शब्दाच्या अर्थाप्रमाणें मनांत आणून सूक्ष्मपणे ध्यानांत घ्यावा.) गुरुचरित्राच्या त्या त्या कथा रोज वाचून उठेपर्यंत आम्ही आपल्या विद्यमान घरच्या परिस्थितीपेक्षां कितीतरी भिन्न व सुखमय मानस वातावरणांत, त्या त्या श्रीपादश्रीवल्लभ किंवा नृसिंह- सरस्वतीस्वामीमहाराजांच्या बरोबर, त्या त्या गाणगापूर, कुरवपूर, वाढीसारख्या क्षेत्रांत त्या कथेंतील पात्रांबरोबर वावरत असतों आणि म्हणून त्या त्या कथानायकाच्या पुण्यप्रभावात्मक अदृश्य विद्युत्प्रवाहाचा जणूं अभिषेकच आमच्या लिंगदेहास न कळत करून घेतों आणि म्हणून मनांत धरलेल्या कामनासिद्धीच्या अंतःशक्ति आमच्या पिंडांत कशा न कळत जागृत होतात, आत्मविश्वास कसा वाढतो, अर्थात् अशा अनुष्ठानांनीं आपल्या लिंगदेहाचे 'स्पिरिच्युअल ऑपरेशन' च जणूं कसें होत असते, हे स्थूल दृष्टीच्या, केवळ बहिर्मुख व हीनवृत्तीच्या टीकाकारांस कळणे शक्य नाहीं. आम्ही अशा लोकांच्या बुद्धीची कींव करून त्यांचे ते आध्यात्मिक • दैन्य-दारिद्र्य घालविण्यासाठी मनःपूर्वक परमात्म्याची प्रार्थना करण्याचा नित्यनेम धरला पाहिजे. यांत माझ्या मतें मोठी पुण्याई आहे. अस्तु.
(१४) फार काय सांगावें, ज्ञानग्रंथांच्या अभ्यासापेक्षांही अशा थोर विभूतींच्या सगुण चरित्रग्रंथांच्या असकृत् पारायणांनीं साधकावर भगवत्प्रसाद की लवकर व अमोघ होतो, याबद्दल डॉ. बेझंटबाईसारख्या परद्वीपस्थ विदुषी योगिनीनं आमच्या कोणत्याही धर्मोपदेशकापेक्षां अधिक स्पष्ट आपल्या व्याख्यानांत उघड उघड सांगितलें आहे.
पुढील बहुमूल्य उतारा, त्यांतील प्रत्येक वाक्य, भगवच्चरित्र-कथा-पारायणानुष्ठानाची महती अर्वाचीन विज्ञान (सायन्स) दृष्टीनेंही किती मार्मिकपणे समजावून देत आहे ती पाहा-
"Devotion to the embodiment of Self spoken of as the 'Avatar' may be nourished and increased by reading and meditating on His Sayings (भगवद्गीता, उपनिषदें, इ०) and incidents of His life on earth (रामायण, भागवत, गुरुचरित्र इ०). It is a good plan to read over (नित्यपाठ, पारायण, सप्ताह इ०) and then vividly picture it in the mind using the imagination to produce a full and detailed picture and feeling one's self as present in it as a spectator or an actor therein.
"The Scientific use of imagination' is a great provocation of devotion and it actually brings the devotee into touch with the scene depicted, so that one day he may find himself scanning the Akashic records of the event, a very part of that living picture learning undreamed of lessons from  his presence there.
"In the hurry of modern life we are apt to forget the power of quiet thought and to grudge the time necessary for its exercise!
"Such devotion changes the devotee into the likeness of the One he loves."
(भावार्थ साधारणतः वर आलाच असल्यामुळे निराळा दिला नाहीं.) तात्पर्य, असें आहे तरी कित्येक थिऑसॉफिस्ट म्हणविणारे लोक अशा ग्रंथांच्या पारायणाकडे कानाडोळा करीत असलेले पाहून सखेदाश्चर्य वाटतें. तसेंच आपल्या सनातनी लोकांपैकींही कांहीं 'ज्ञानभुजंग' (Intellectual Giants) अशा ग्रंथांकडे तुच्छ दृष्टीनें पाहातांना दृष्टीस पडतात ! हे लोक ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मवस्तूचें शाब्दिक ज्ञान असें समजतात आणि त्याकरितां वेदान्तशास्त्राची मोठमोठीं पुस्तकें पालथी घालतात व व्याख्यानांत तें ब्रह्म करतलामलकवत् करून श्रोत्यांना चकवितात ! 'खरें ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मानंदसाक्षात्कार 'हें ते जाणत नाहींत आणि म्हणून शब्दज्ञानावरच बिचारे तृप्त राहातात ! श्रीगुरुचरित्राचे एक प्रेमळ वाचक आमच्या गोवेंप्रांतांत आहेत; त्यांचा गुरुसांप्रदाय रामदासी; पण पूर्वजन्माच्या प्रबळ संस्कारानें प्रथम त्यांनीं थोड्याशा सकाम बुद्धीनेंच गुरुचरित्राची कास धरली. पण मागाहून त्यांची कामनिक वृत्ति सुटून त्यांना गु. च. ग्रंथाचें वेडच लागून राहिलें. ते आपली सरकारी नोकरी । सांभाळून गु. च. चे सप्ताहावर सप्ताह करूं लागले. एके दिवशीं स्वप्नांत त्यांना एक तेजःपुंज संन्यासी दिसले आणि यांच्या मस्तकावर त्यांनीं हात ठेवला. त्याबरोबर नखशिखान्त रोमरोमांतून अननुभूत अशा विलक्षण आनंदाचा प्रवाह सुरू झाला व यांना समाधि लागली. जागृत झाल्यानंतर हे 'नवसंगरसायन' आठवून त्यांना जें प्रेमाचें भरतें दाटले त्याचे वर्णन करवेना. बिचार्‍यांनीं ब्रह्मज्ञानाचे म्ह. वेदान्ताचे ग्रंथ कधीं वाचले नव्हते, स्थूल सूक्ष्म-कारण-महाकारण देह, किंवा अन्नमय-प्राणमय-मनोमय-विज्ञानमय-आनंदमय कोश, तसेंच जागृति-स्वप्न-सुषुप्ति-तुर्या उन्मनी ह्या अवस्था कधीं ऐकल्या नव्हत्या; परंतु मागें सांगितल्याप्रमाणें 'भगवत्प्रसाद-सामर्थ्याने' त्यांना आनंदमय कोशापलीकडचा अखंड अविनाशी व सहज असा स्वानंद, ब्रह्मानंद, किंवा निजानंद असेंही ज्यास म्हणतात त्याचा अनुभव मिळाला. "तुका म्हणे सुख रामें दिधलें आपुलें । तया गर्भवासा येणें जाणें खुंटलें॥" यांत तु. महाराजांनी म्हटल्याप्रमाणें परमात्मा ज्याला 'आपुले सुख' म्हणजे निजसुख-निजानंद-ब्रह्मानंद देतो, त्याचाच गर्भवास चुकतो अर्थात् मुक्ति मिळते. (‘मुक्ति’ म्हणजे प्रकृतिबंधनांतून मोकळीक ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. अशी ही मुक्ति मिळविल्यानंतरच ‘तुका म्हणे गर्भवासीं । सुखें घालावे आम्हांसी’ असें म्हणण्याचें धैर्य येतें आणि वर सांगितल्याप्रमाणें ‘अतींद्रिय’ निजसुख मिळाल्यानंतरच ही मुक्ति प्राप्त होते. अर्थात्हे निजसुख, महासुख, निजानंद, ब्रह्मानंद हा श्रीहरिगुरुप्रसादानेंच प्राप्त होतो.) श्रीगुरुचरित्र ग्रंथांत संसार सोडून परमार्थ करायला सांगितलेले नाहीं, इतर वेदान्तग्रंथांप्रमाणे प्रपंच मिथ्या आहे, विषय मिथ्या आहेत, त्यांचा त्याग केल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही, अशा तऱ्हेचा अट्टाहासपूर्वक बोध केलेला नाहीं, किंवा निष्काम भजनाचे अवडंबर माजविलेलें नाहीं. तर प्रापंचिक मनोरथ पूर्ण करून घेण्याचा व पारमार्थिक ऐश्वर्य संपादन करण्याचा श्रीगुरुदेवांचा प्रसाद हाच एक सुलभ मार्ग आहे असे वारंवार सांगितले आहे.
(‘‘भुक्ति-मुक्ति परमार्थ । जें जें वांछी मनीं अर्थ ।’’…‘‘कथा ऐकतां होय जाण । ज्ञानसिद्धि तत्काळ ॥ "
असाच बोध केलेला आहे. या गोष्टीचा मांगें बहुतांनीं अनुभव घेतलेला आहे, हल्लीं बहुत लोक घेत आहेत व पुढेंही घेत राहाणार आहेत. अशा कामधेनु-कल्पतरुतुल्य ग्रंथाचें संशोधन होऊन त्यांतील अपपाठांची दुरुस्ती होणे अत्यावश्यक होतें. आमचे एक विद्वान व परम भागवतोत्तम असे शास्त्री मित्र म्हणतात, “श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाचे संशोधन होऊन त्यांतील अपपाठांची दुरुस्ती होणें अत्यावश्यक होतें. आमचे एक विद्वान व परम भागवतोत्तम असे शास्त्री मित्र म्हणतात, “श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाचे संशोधन ग्रंथकाराच्या मागून सुमारे तीनशे वर्षांनीं श्रीएकनाथमहाराजांनीं केलें, तसेंच तुमच्या अण्णांनीं हें गु. च. चें संशोधन केले आहे. " इ०. इतर अनेक थोरथोर विद्वान् व भक्तोत्तम महापुरुषांकडूनही अशींच आशीर्वादपर पत्र यासंबंधानें आलीं आहेत. ह्या निर्मत्सर थोर पुरुषांना व पूज्य संशोधकांना नम्रभावें वंदन करून आणि खालील श्लोकांनीं श्रीगुरुदेवाची प्रार्थना करून माझा हा कल्पनेबाहेर लांबलेला लेख पुरा करितों.
" तापत्रया शमविता सकलां जनांचा । तूं मायबाप अतिकोमल कीं मनाचा ॥
प्रार्थीतसों म्हणवुनी तुजलागि ताता । घेई प्रभो झडकरी अवतार आतां ॥"
" वाली न कोणि अमुचा समयीं अशा या । तूझ्याविर्णेहि दुसरा जगदेकराया ॥
प्रार्थीतसों म्हणवुनी तुजलागिं ताता । घेई प्रभो झडकरी अवतार आतां॥"
त्रैलोक्यमंगल विभो नच अंत पाहीं । झाल्या भयाण तुजवीण दिशा दहाही ॥
पार्थीतसों म्हणवुनी तुजलागिं ताता । घेई प्रभो झडकरी अवतार आतां ॥घेई प्रभो०॥"
श्रीदुर्गादत्तमंदिर, माशेल (गोवा)
श्रीअनंतचतुर्दशी, शक १८६१
इसवी सन १९३९
दिगंबरदास कामत चंदगडकर

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP