मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
हस्तलिखितांची यादी

गुरूचरित्र - हस्तलिखितांची यादी

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


१. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील श्रीच्या मठांत पाहाण्यास मिळालेली पहिली पोथी--- कडगंची येथील सायंदेवाच्या घरच्या पोथीवरून ही नक्कल उतरली आहे असें म्हणतात. पोथीच्या अखेरीस लेखकानें आपले नांव वगैरे पुढें लिहिल्याप्रमाणें दिलें आहे---"लागू कुलोत्पन्न रघुनाथ सूनुना भास्करेण इदं पुस्तकं लिखितम्  ॥आश्विन शुद्ध पंचमी मंगळवार शके १८३१ तद्दिने समाप्तम् ॥" यानंतर "अबद्धो वा सुबद्धो वा०" हें बहुतेक लेखक लिहीत असतात ते दोन श्लोक अशुद्ध लिहिलेले आहेत. त्यापुढें-—“हें पुस्तक श्रीदत्ताचे मठांत लागू यांनी अर्पण केलें आहे. यावर देवाचे हक्क आहे कोणी पुजारी यांनीं आपले घरास घेऊन जाऊं नये." हे वाक्य निराळ्या लेखकाच्या हातचें आहे.

२. दुसरी कडगंची प्रत---वरील प्रतीशिवाय आणखी एक सुंदर अक्षरानें लिहिलेली पोथी श्रीयुत नाथ सेवेकरी यांच्या साहाय्यानें पाहाण्यास मिळाली. (याच प्रतीमधून गुरुगीतेचा अध्याय उतरून काढून तो 'श्रीगुरुचरित्रांतर्गत गुरुगीता' या नांवानें छापून प्रसिद्ध केला आहे. याबद्दलचा समग्र इतिहास त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दिला असून यांतही मागें दिलेला आहेच.)

३. तिसरी 'कडगंची' प्रत म्हणजे आमचे मित्र श्रीयुत विठ्ठलराव नागरकट्टी, श्रीदत्तमंदिर, मु० मल्लापूर (कुमटा नजीक) यांजकडील होय. ही प्रत त्यांच परमदत्तभक्त तीर्थरूप शांताप्पा नागरकट्टी यांनीं गाणगापूरहून मुद्दाम लिहून आणविलेली होती. (लेखकास तेथें पंधरा रुपये आगाऊ दिले व लेखन संपल्यानंतर त्यानें सदरहू प्रत ३५ रु. ची व्ही. पी. करून पाठविली.) या प्रतीच्या अखेरीस---"इति श्रीमन्महागुरुचरित्र कामधेनु रसाळकथायां सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुचरित्र मठांत सदाप्रेमी असोनि श्रीपर्वतगमन पाताळगंगातीरी निजानंदगमनं नाम एकपंचाशत्तमोध्यायः  ॥५१॥ अबद्धो वा सुबद्धो वा मम दोषो न विद्यते । यादृश्यं पुस्तकं दृष्ट्‌वा तादृश्यं लिखितें मम  ॥श्रीराम ॥ श्रीराम ॥ श्रीराम ॥ ओव्या ८३ ॥अथ श्रीगुरुसंनिध गाणगापुरमठस्थानीं लिखितं नमः ॥ नाम गोविंद गणेश देवकुळे राहाणारा श्रीक्षेत्रवाई || श्रीगुरुनाथार्पणमस्तु  ॥श्रीरस्तु तथास्तु शके १८३५ वैशाख शुद्ध ४ रोज शनिवार ॥ राम राम राम० ॥श्रीदत्तप्रसन्न ॥" असें आहे. श्रीयुत गोपाळराव व पद्मनाभराव उभयकर यांच्याबरोवर त्यांच्या 'आवडी' मठांत (श. १८५९) श्रीरमावल्लभदाससांप्रदायिक श्रीकृष्णजयंतीव्रतोत्सवास गेल्यावेळी, श्री. नागरकट्टी यांच्याकडील वरील पोथीवरून मजकडील मोठ्या अक्षराच्या छापी पोथीवर थोडेसे अध्याय त्यांच्या साहाय्याने मी स्वतः दुरुस्त करून घेतले होते व कांहीं अध्याय विठ्ठलराव यांनीं अत्यंत काळजीपूर्वक मागाहून दुरुस्त करून पाठविले. (त्यापूर्वी दोन वर्षे त्यांचे चुलते श्रीपंतभक्त कै. दत्तोपंत नागरकट्टी, बी. ए. यांनीही आपल्या बंधूंच्या त्या पोथीवरून आमचेकडील छापी प्रत दुरुस्त करून पाठविण्याचे श्रम घेतले होते.) रा. विठ्ठलरावांचें रोजचें पारायण वडिलांच्या वेळेपासून याच पोथीवरून चालत असल्यामुळें ती प्रत तेथून हालवितां येत नव्हती. म्हणून वरील व्यवस्था करावी लागली. संशोधनाच्या वेळीं याच प्रतीचा उपयोग मी जास्त करीत होतों. त्यानंतर यदृच्छेने धुळ्याहून रा. क्षीरे यांची प्रत आली. तिचाही उपयोग झालाच. (ही हकीगत पुढें दिली आहे.)
४. चौथी कडगंची प्रत---श्रीयुत कृष्णाजी विनायक क्षीरे, रेकार्डकीपर, डिस्ट्रिक्ट व सेशन्सकोर्ट, धुळे यांनीं आपल्या वडिलांच्या हातची म्हणून प्रेमाने पाहाण्यास पाठविली. त्यांच्या वडिलांनीं गाणगापुरास राहून स्वहस्ताने ती लिहून काढली होती- “प्रथम तेथील पुजार्‍यांनी ती प्रत देण्यास हरकत घेतली, पण रात्रा श्रीचा दृष्टान्त झाल्यामुळे यांना ती प्रत उतरून काढण्यास देण्यांत आली. वडील इंग्रजी शिकलेले, पण श्रीदत्ताचे निष्ठावंत भक्त होते, यांच्याजवळ २१ श्लोकांचें एक स्तोत्र अगर 'मालामंत्रा' प्रमाणे एक मंत्र होता, त्यासंबंधीं ते असें म्हणत असत की, तो मंत्र २१ वेळां, २१-दिवस, २१ तुपाचे दिवे लावून औदुंबर वृक्षाखालीं बसून पठण केला असतां साक्षात् दत्तदर्शन होतें. परंतु त्या स्तोत्राचा पत्ताच लागत नाहीं." इत्यादि हकीकत त्यांनी मोठ्या प्रेमानें पत्रांत लिहिली आहे. आमची गु. च. गुरुगीता छापलेली त्यांनी पाहिली व ती आपल्या वडिलांच्या पोथीतील गुरुगीतेशी ताडून पाहिल्यानंतर तींत असलेले पाठभेद व न्यास-मानसपूजादिकांचा विशेष भाग मला मुद्दाम लिहून कळविला. तसेंच, या पोथींत सप्ताहपारायणाचा क्रम ७|१८|२८|३४|३७|४३|५१ असा दिला असून, अध्याय १ ते २४ ज्ञानकाण्ड, अ. २५ ते ३७ कर्मकाण्ड व अध्याय ३८ ते ५१ भक्तियोगें, अशी विभागणी केलेली आहे, असेंही त्यांनी पत्रांतून कळविले. हें वाचून ती पोथीच पाहाण्यास पाठविण्याबद्दल मी त्यांना विनंति केली व त्यांनीं प्रेमानें तो तत्काळ पाठवून दिली. (सदरहु पोथीचा लेखनशक १८३१ आहे. लागू यांच्या पोथीचा लेखनशकही हाच आहे. कुमटा-मल्लापूर येथील श्रीयुत नागरकट्टी यांच्याकडील 'कडगंची' प्रतीचा लेखनशक १८३५ आहे. पुढील पुरंदरे वैद्य यांच्याकडील 'कडगंची' प्रतीचा लेखनशक १७६९ आहे. पण ह्या सर्व पुस्तकांवरून मूळ पोथीचा लेखनशक समजून येण्यास मार्ग नाहीं. तितकी काळजी लेखकांनी घेतली नाहीं याबद्दल वाईट वाटतें.)

५. पांचवी 'कडगंची' प्रत----श्री. यशवंत रघुनाथ ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे (पुणतांबेकर) वैद्य व पेन्शनर इन्कमटॅक्स ऑफिसर, राधवाश्रम, माधवबाग, मुंबई यांची. यांना ही प्रत श्रीटेंब्येस्वामीमहाराजांनीं देवविली. स्वामीमहाराज गाणगापुरास असतां पुरंदरे तेथें गेलेले होते. यांचेवर स्वामींचे फार प्रेम असे. हे गाणगापुरास लहानपणापासून जात व तिकडे गेल्यानंतर पुजा-यांच्या घरीं न उतरतां स्वामीमहाराजांच्या बहिणींच्या बिऱ्हाडीं उतरत. महाराजांनी यांना कृपापुर:सर एक उजवा शंखही दिलेला आहे. पण त्या वेळीं आपण स्वामीमहाराजांची योग्यता जाणली नाहीं असे हे आतां अनुतापाने सांगतात. ज्या ब्राह्मणास महाराजांनी ही पोथी देण्यास सांगितलें होतें, त्याने ११ वर्षेपर्यंत ती दिली नाहीं ! त्यानंतर स्वप्नांत कडक आज्ञा झाल्यावर आणून दिली म्हणे. सर्वं संशोधनकार्य आटपून ग्रंथ छापण्याकरितां मी मुंबईस आल्यानंतर पुरंदरे यांनी माझी मुद्दाम भेट घेऊन वरील हकीकत मला सांगितली व आपल्याकडील ती पोथी हवी तर बेऊन चला म्हणाले. इतर पोथ्यांवरून आमचें कार्य झालेलें होते, त्यामुळें आतां दुसर्‍या पोथीची गरज वाटत नव्हती. पण इतक्या प्रेमानें ते मुद्दाम सांगत असल्यामुळे यांत कांहीतरी ईश्वरी संकेत असावा असें वाटून त्यांच्या घरी जाऊन ती पोथी मीं आणली. तो माझ्या कल्पनेप्रमाणें या पोथीचा मला खरोखरीच उपयोग झाला. आळसाने उपेक्षिलेल्या कांहीं संशयित स्थळांवर हिच्यांतील पाठांनी चांगला प्रकाश पाडला व प्रभूचे मोठे उपकार वाटले. या पोथीच्या अखेरीस “श्रीमन्महागुरुचरित्र कामधेनु रसाळकथायां सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुपर्वतगमने प्रसादप्राप्तिर्नाम एकपंचाशतकोध्यायः  ॥५१  ॥ॐ अनंतकोटिह्मांडनायक राजाधिराज त्रिभुवनराज कपटनाटक सूत्राधार— श्रीदत्तात्रेय अवतार---श्रीपादश्रीवल्लभ श्रीनरसिंहसरस्वतीस्वामी महाराजकी  ॥ॐ नारायणाय ॐ  ॥शके १७६९ माघ शुद्ध गुरौ इदं पुस्तकं हिमाकरभट्टसुत बाळंभट्ट पुजारी, श्रीक्षेत्रगाणगापुर." असे आहे.

६. गाणगापूरची 'वाडी' प्रत---गाणगापुरास प्रथम (शके १८४२ सालीं) गेल्यावेळीं दोन कडगंची प्रति पाहिल्यानंतर दुसर्‍या कांहीं जुन्या पोथ्या मिळतील तर पाहाव्या अशी इच्छा उत्पन्न होऊन श्री. नाथ सेवेकरी यांच्या साहाय्यानें दुसरी एक जुनी पोथी मिळविली व त्या पोथीवरून देवस्थानांत बसून मी
----
१ आम्हांस मिळालेल्या इतर कडगंची' प्रतीत हा भाग मिळत नाहीं पण उपयुक्त वाटल्यामुळें आम्ही तो मुद्दाम टीपेंत दिला आहे.
श्रीटेंब्येमहाराजांच्या संस्कृत समश्टोकीत याला 'भक्तिकाण्ड' असे नांव आहे व त्यांच्या घरच्या लेखी पोथींत सप्ताहाचा अध्यायानुक्रम असाच असल्याबद्दल दुसरीकडे दिलेच आहे.
----
पद्धतशीर सप्ताहही सुरू केला. ('कडगंची' प्रतींत शिवनमनाच्या ओंव्या असून गुरुगीतेचा अध्याय आहे. हा त्या प्रतींतील तेथें विशेष समजला जातो. आणि इतर जुन्या प्रतींत ह्या गोष्टी नाहींत ; बहुतेक प्रचलित छापी पुस्तकांप्रमाणेंच त्या आहेत. म्हणून हे दोन फरक बोलून दर्शवितांना ही 'कडगंची प्रत' आणि ही 'वाडीप्रत' अशी शब्दयोजना तेथे करीत असतात. इतर दत्तक्षेत्रांमध्ये हा भेदच माहीत नाहीं.) वरील जुन्या पोथीवरून सप्ताह वाचीत असतां मी कागद व पेन्सिल जवळ ठेवीत अस. छापी पोथींतील पाठ तोंडांत बसले होते, त्याहून निराळा पाठ आढळला कीं लगेच तो अध्याय व ती ओंवी यांचे आकडे मी कागदावर टिपून ठेवावयाचे आणि सप्ताहवाचन संपल्यानंतर फुरसतीने ते नवीन पाठ छापी पोथीवर उतरून काढावयाचे असा क्रम चालविला होता. पण सहाव्या दिवशीं ४१ वा अध्याय संपून ४२ वा अध्याय जेव्हां उघडला व 'श्रीगणेशायनमः' म्हणून पुढें वाचण्यास आरंभ केला तेव्हां काय सांगावें ? नदीच्या ओघांत सरळ एका वेगानें चाललेली नाव एकदम खडकावर आपटावी, तशी माझी स्थिति झाली ! मागील (४१ व्या) अध्यायांत काशीयात्रेचे वर्णन अपूर्ण राहिलेले आहे, तें या ४२ व्या अध्यायांत पुढील यात्रेस सुरुवात करून पूर्ण करावयाचे हे अगदीं ओघास धरून आहे. (अलीकडील छापी पोथ्यांत तसे केलेलें आहे) पण या प्रतींत तसें न करितां---
"नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणा । विनवीतसे करा जोडोनि जाणा । भक्तिभावेंकरोनिया ॥१॥
मागें कथानक निरोपिलें । सायंदेव म्हणजे शिष्य भले । श्रीगुरूंनीं त्यातें निरोपिलें । कलत्र पुत्र आणि म्हणत ॥२॥
(असें मागच्या अध्यायांत कुठे सांगितले आहे ?) पुढें तया काय झालें । विस्तारोनि सांग वहिले ॥०॥
अशा ९ ओंव्या असून त्या ओव्यांमध्ये सायंदेव श्रीगुरूंच्या निरोपाने घरीं गेला व आपल्या स्त्रीपुत्रांना घेऊन श्रीगुरुसन्निधानीं आला आणि हात जोडून स्तुति करूं लागला, असें सिद्धांनी सांगितले व स्तुतींतील आदौब्रह्म त्वमेक सर्वजगती वेदात्ममूर्तिःपरं० ॥" हा संस्कृत श्लोक एकच देऊन (या श्र्लोकापुढें “१०" असा आंकडा आहे.) त्याच्या पुढें
“ऐशी स्तुति करोनि । लागता झाला श्रीगुरुचरणीं । राहिली कथा ही ऐकावी मनीं । म्हणोनि विनवी वारंवार  ॥११॥
श्रीगुरु म्हणती तये वेळां । सावध होय ऐक बाळा । प्रसन्न होऊनि स्वामी भोळा । यात्रा सोहाळा दावीतसे  ॥१२॥"
अशा ओंव्या आहेत ! ह्या १२ ओव्यांनंतर मग "संकल्प करोनिया मनीं । जावें स्वर्गद्वार भुवनीं० " ह्या ओवीस म्हणजे पुढील काशीयात्रेस सुरुवात झाली ! केवढा हा घोटाळा ! केवढी ही 'हिमालयन्' चूक लेखकानें केली आहे पाहा ! रात्रीच्या वेळीं सायंदेवास हें काशीयात्रेचें ‘विधान' अथवा आख्यान सांगण्यास सुरवात करून श्रीगुरूंनीं आपल्या योगमायेनें ती यात्राही (पहाटेपूर्वी) त्याच्याकडून करविली आणि ईश्वरपार्वती-संवादात्मक त्वष्टाब्रह्मपुत्राची गुरुभक्तिमाहात्म्यदर्शक कथा श्रीगुरूंनीं संपविली. ती ऐकून, नव्हे संजय-कुरुक्षेत्रयुद्धाप्रमार्णे काशीयात्रेचें दृश्य प्रत्यक्ष पाहून सायंदेवाचें अंतःकरण गुरुभक्तिप्रेमानें उचंबळून आलें व त्यानें “आदौ ब्रह्मा त्वमेव सर्व जगतां० ॥" अशा संस्कृत श्र्लोकाष्टकानें श्रीगुरूची स्तुति करून गुरुसेवेला निरंतर राहण्याची इच्छा दर्शविली. तेव्हां श्रीगुरूंनीं त्यास म्हटलें -
"जरी राहसी आम्हांपाशीं । नको वंदूं म्लेंच्छासी । आणोनियां स्त्रीपुत्रांसी । भेटी करवीं० ॥"
इत्यादि. ही गोष्ट त्या रात्रीं श्रीगुरु संगमावर असतांना घडली. त्यानंतर सायंदेवाला घरी जाण्यास निरोप देऊन श्रीगुरु सकाळीं स्नान वगैरे करून मठास आलें व सायंदेवानें घरीं जाऊन आपल्या बायकामुलांना गाणगापुरास श्रीगुरुदर्शनास आणले. त्या वेळीं त्यानें कानडी भाषेच्या पदांनीं स्तुति केली. असा कथाभाग सरळ दिसतो. तेव्हां हें अनुसंधान न ठेवतां, काशीयात्रेचें वर्णन अपुरेंच ठेवून ४२ व्या अध्यायाच्या आरंभाला सायंदेवाला घरीं पाठवून, बायकामुलांस आणवून, त्याजकडून 'आदौ ब्रह्म त्वमेक०" या अष्‍टकांतील एकच श्लोक त्याच्या मुखानें वदवून पुनः श्रीगुरूंच्या मुखानें काशीयात्रेचें शिल्लक राहिलेलें वर्णन करावयाचें म्हणजे हा केवढा पिशेषणाचा प्रमाद होय हें साधारण वाचकांच्यासुद्धां लक्षांत येईल आणि काशीयात्रेचें संपूर्ण वर्णन कडगंची प्रतींत एका एकेचाळिसाव्या अध्यायांतच असलेलें किती युक्त आहे हें समजेल. आतां कोणी म्हणतील-एकच विषय एकाच अध्यायांत पुरे करण्याचें धोरण गुरुचरित्रकारानें कोठें ठेवले आहे? ३६ व्या अध्यायांत सुरू केलेला ब्रह्मकर्माचा विषय ३७ व्या अध्यायांत पुरा केलेला आहे. इत्यादि. याबद्दल आमचा तरी कुठें वाद आहे ? परंतु, ४२ वा अध्याय सुरू करतांना या प्रतींत वर लिहिल्याप्रमाणें जो घोटाळा झालेला आहे, त्याबद्दल कोणाचें दुमत होईल असें मला तर वाटत नाहीं !

७. औदुंबर प्रत---गाणगापुरास सुमारें दोन महिने राहून उपलब्ध जुन्या पोथ्यांतील पाठ छापी पुस्तकांत उतरून घेऊन औदुंबरास आलों. (त्या वेळीं आमचे बंधु दिगंबरदास यांचे तेथें अवतारप्रीत्यर्थं उग्र अनुष्ठान चाललें होतें.) फुरसतीच्या वेळी जुन्या हस्तलिखित पोथ्या मिळवून त्या आपल्या पोथीशीं ताडून पाहाण्याचा उद्योग तेथें चालविला. गाणगापुरास मिळविलेले शोध, रसिक असा गुरुचरित्रवाचक भेटेल त्यास मी प्रेमाने दाखवूं लागलों, औदुंबरचे त्या वेळचे (शक १८४२) दोन वृद्ध अर्चक व तेथील ब्राह्मण सेवेकरी यांना ते पाहून फार संतोष झाला व त्यांनीं धन्यवाद दिले. एका सुशिक्षित गृहस्थानें या संशोधनाच्या प्रयत्नावर आक्षेप घेतले त्यांचें समाधान कसें केलें व त्यानेही मग धन्यवाद कसे दिले हें वर्णन मागें सविस्तर दिलेंच आहे. याप्रमाणें औदुंबरास सुमारें एक महिनाच राहाणें झालें. तिकडील जुन्या पोथ्या पाहात असतां बेळगांवचे श्रीचिदंबरभक्त वै. दत्तात्रेय महादेव पाटणेकर या तरुणानें फार मदत केली. त्याचे एक तरुण विद्वान् मित्र रा. रामराव गाडगीळ हे त्यांना भेटण्यास तेथें आले होते. त्यांनी आमचा हा उद्योग पाहून औदुंबराहून नरसोबावाडीस चालत जाऊन तिकडून एक जुनी हस्तलिखित प्रत संपादन करून आणून दिली. पण ती लवकर परत करावयाची असल्यामुळें मुख्य स्थळांतले पाठ उतरून घेऊन ती परत केली.

८. कुरवपूर प्रत-शक १७२३––औदुंबरचें अनुष्ठान संपवून कांहीं दिवसांनी आमचे बंधु कुरवपुरक्षेत्रास गेले. तिकडे अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी तेथील अर्चकाला गु. च. ची हस्तलिखित प्रत संग्रहांत आहे काय म्हणून विचारलें, त्यानें होय म्हणून सांगितलें व प्रत दाखविली. तेव्हां दिगंबरदासांनीं म्हटलें "छापी गुरुचरित्र प्रतींत पुष्कळ चुका असलेल्या आढळतात, तेव्हां जुन्या हस्तलिखित प्रति मिळवून त्यांवरून त्या चुका शुद्ध करण्याचा प्रयत्न आमच्या बंधूंनीं चालविला आहे, त्यांस आपली ही पोथी २|४ महिन्यांकरितां मिळेल काय ? त्याबद्दल हवीतर माझ्याकडील छापी प्रत तुमच्याकडे ठेवतों व १० रु. अनामत (डिपॉजिट) ही ठेवितों आणि छापून झाल्यानंतर छापी प्रतही आपल्यास बक्षीस पाठवितों. " इत्यादि. हें ऐकून त्या गृहस्थानें मोठ्या उर्मटपणानें सांगितलें कीं, "तुम्हांस पाहिजे असेल तर इकडच्या इकडेच पाहा, ही पोथी आमच्या घराच्या किंवा देवस्थानाच्या बाहेर देतां येत नाहीं." इ०. हें ऐकून व त्याचा स्वर आणि मुद्रा पाहून दिगंबरदास निराश झाले व 'देवाची मर्जी' असें म्हणून तो नादच त्यांनीं सोडला. दुसर्‍या दिवशीं सकाळीं स्नान करून आपलें आह्निक आटपून आपल्याकडील छापी पुस्तकावरून त्यांनी सप्ताह वाचण्यास सुरवात केली. तों थोड्याच वेळांच त्या पुजार्‍याने कालची ती आपल्या घरची जुनी पोथी आणून 'ही घ्या बाबा' असें म्हणून यांच्यापुढे ठेवली. तेव्हां दिगंबर-दासांनी डोकें वर करून पाहिलें व ही घ्या' म्हणजे काय असें विचारलें. पुजार्‍याने म्हटलें---
"रात्रीं मला तुम्हांस देण्याबद्दल स्वप्नांत आज्ञा झाली, आतां ती ठेवून घेतां येत नाहीं." हे त्याचे शब्द ऐकून दिगंबरदासांचे डोळे प्रेमाक्षूंनीं भरून आले व पोथी मस्तकावर धारण करून सद्गदित कंठानें ते म्हणाले---"श्रीगुरुदेवा ! आमची ही सेवा तुम्हांला आवडली व ती तुम्हीच कृपेनें पूर्ण करून घेणार आहां, याची खूण तुम्हीं ह्या गोष्टीनें दिलीत. तथास्तु' म्हणून आम्हीं आतां निर्धास्त राहणेस हरकत नाहीं. तुमची लीला व शक्ति अगाध आहे. त्या शक्तिसामर्थ्याचा जयजयकार असो." इत्यादि. या पोथीच्या अखेरच्या म्ह. ५१ व्या अध्यायाच्या शेवटीं पुढील मजकूर आहे---
"इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरू सित्धनामधारकसंवादे श्रीगुरुमूर्ति अदृश्यंनाम एकपंचादशोध्यायः ॥५१॥ ग्रंथसंख्या ॥७१७५॥
श्रीपादश्रीवल्लभार्पणमस्तु ॥श्रीराम ॥श्रीकृष्ण ॥
शके १७२३ वर्षें दुर्मतिनाम संवत्सरे दक्षिणायने शर्द्दतौ कार्तीकमासे कृष्णपक्षे चतुर्थ्यां तिथौ भौम्यवासरे पुनर्वसुनक्षत्रे प्रथमप्रहराष्ट्रघटि कर्दळीग्रामे समाप्तं ॥
इदं पुस्तकं मेघःशामसुत महादेवेन लिखितं स्वार्थपरमार्थच ॥श्री ॥’’
इ० (ही पोथी आज आमच्या घरीं आहे. हिचें अक्षर सुंदर असून ओंवीच्या प्रत्येक चरणापुढें तांबड्या शाईच्या चरणरेघा आहेत. परंतु ४२ व्या अध्यायाचा आरंभ वर लिहिलेल्या गाणगापुर प्रतीप्रमाणेंच आहे !)

९. केंगेरी प्रत---शक १६९१---ही प्रत परमपूज्य श्रीमत्पांडुरंगमहाराज दीक्षित (महान्‌ अवतारी श्रीचिदंबरप्रभु यांचे पणतू व त्या प्रभूचाच दुसरा अवतार म्हणून प्रसिद्ध असलेले), राहाणार मुरगोड नजिक केंगेरी, यांनी आमचें चालू असलेलें संशोधनकार्य नजरेंने पाहून परमकृपेनें आशीर्वादासहित आपल्या देवस्थानांतून मुद्दाम काढून पाहाण्यास दिली. (अकालीं समाधिस्थ झाल्यामुळें हे कार्य अशा स्वरूपांत पूर्णतेस गेलेलें त्यांच्या दृष्टीस पडलें नाही. याबद्दल फार वाईट वाटते !)

१०. श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांच्या घरची प्रत---लेखन शक १७२२–––ही श्रीपंताचे विद्वान बंधु कै० नरसिंह रामचंद्र कुलकर्णी बाळेकुंद्रीकर, बी. ए., एलएल. बी. यांनी आमचें हे संशोधनकार्य पाहून व त्याचें महत्त्व लक्षांत घेऊन अत्यंत प्रेमानें पाहाण्यास दिली. (हेही अकालीं निधन पावल्यामुळें हें कार्य तडीस गेलेलें त्यांच्या दृष्टीस पडलें नाहीं, याबद्दल फार वाईट वाटतें !)

११. कुंदगोळ प्रत---१७८५---वरील श्रीमत्पांडुरंगमहाराज दीक्षित यांचा मुक्काम हुबळी नजीक कुंदगोळ येथे पाळंदे ऊर्फ फडनीस यांच्या घरीं असतांना त्यांच्या सेवेत कांही दिवस माझें तेथे राहाणें घडलें होतें. त्या वेळीं ही पोथी माझ्या पाहाण्यांत आली होती. हिच्यांतील पुष्कळ पाठ मी त्या वेळीं माझ्या छापी पुस्तकांत उतरूनही घेतले होते. पण मागाहून ज्या वेळीं संशोधनकार्यास पद्धतशीर रीतीनें सुरवात झाली, त्या वेळीं ही अगदी जवळ असावी असे वाटलें व वीनवाद्यकुशल रा. कृष्णराव पाळंदे (फडणीस) यांजकडे मागणी केली व त्यांनीं ती प्रेमानें मान्य करून देव्हार्‍यांत नित्यपूजेंत असलेली पोथी इतर वर्गाच्या संमतीने काढून आमच्या स्वाधीन केली.

१२. आंबेवाडी प्रत---शक १७१७---रा. कल्याण श्रीराम आंबेवाडी, राहाणार सुळगें (बेळगांव नजीक) यांनी आमचें चालू असलेलें संशोधनकार्य पाहून आपण होऊन प्रेमानें पाहाण्यास दिली.

१३. परोळकर प्रत---शक १७३६---या पुस्तकाच्या शेवटीं हे पुस्तक बळवंतराव परोळकर यांचें आहे असें आहे. ही कोणी एकानें आणून दिली, त्याचें नांव लक्षांत नाहीं याबद्दल वाईट वाटतें.

१४. विंझणेकर प्रत---आमचे शहापूरचे मित्र रा. नारायण दामोदर जोशी, बी. ए., एलएल. बी., यांनी आपले मामा रा. गोविंदराव रामचंद्र विंझणेकर इनामदार, मु. विंझणे (जि. बेळगांव) यांच्या घरची प्रत मुद्दाम आणून दिली.
(या पोथीवर लेखन शक नाहीं; पण कागद व अक्षर पाहातां ती शंभर-सवाशें वर्षापूर्वीची असावी असें वाटतें.)

१५. खांडोळें प्रत—शक १७७४ ही वे. शा. सं. सखाराम व वसंत नारायण भट्ट सुखटणकर, राहाणार माशैल नजीक खांडोळें (श्रीगणपति देवस्थान) यांजकडून मिळाली.
१६. पेडणे प्रत- शक १७८० - ही वे. शा. सं. रामचंद्र जनार्दन भट्ट मिरवणकर (पं. अनंतशास्त्री धुपकर यांचे मामा) राहाणार पेडणे, (ह. मु. मोर्चे दिवचोली नजीक) यांजकडून मिळाली.

१७. चिकोडी प्रत—शक १६९६---ही आमचे मित्र डॉ. गोविंदराव केशवराव देशपांडे, एम्. डी. (बर्लिन) राहाणार कोल्हापुर (राजारामपुरी) यांच्या शिफारशीनें वे. शा. सं. आप्पाशास्त्री कल्लोळकर यांनीं मला अत्यंत प्रेमानें चिकोडीस नेऊन तेथील श्रीविठ्ठलमंदिरांत असलेली प्रत दाखविली. या प्रतीच्या अखेरीस---
"शके १६९६ जयनाम संवत्सरे वैशाख कृ. १४ सौम्यवासरे प्रातःकाळे प्रथम प्रहरे तद्दिनीं समाप्त श्री सिद्धाश्रमसन्निध । श्रीलक्ष्मीनारायणार्पणमस्तु ॥  ग्रंथसंख्या ७१९५
हस्ताक्षर सांतो साबाजी " असें आहे. हींत पहिल्या अध्यायांत ७९ ओवीनंतर "राग स्वइच्छा वोवीबद्ध म्हणावे चाली आजी हो पाहुणा दि पंढरीचरण" (पंढरीचा राणा) असें असून, पुढें “वंदूं विघ्नहरा पार्वतीकुमरा ॥ नमू ते सुंदरा शारदेसी" असे सरळ आहे. ६ व्या अध्यायांत---“गाणारस्वरयुक्त । गायन करी लंकानाथ" (४२) असें आहे. १२ व्या अध्यायांत " पुनर्दर्शन तुम्हांसी, होईल ऐके वर्षांसी" असें आहे. बेचाळिसाव्या अध्यायाचा आरंभ मागील गाणगापुर-कुरवपुर प्रतीप्रमार्णेच आहे ! चिकोडीस दुसरी एक प्रत पाहाण्यास मिळाली, तिचा शक १७८३ असून हिचे पाठ बहुतेक वरील पोथीप्रमाणेच आहेत. या पोथीच्या शेवटीं गु. च सप्ताह करणेची पद्धति म्हणून मात्र पुढे लिहिल्याप्रमाणे दिली आहे "प्रथम दिवशीं अध्याय ७, द्वि. १७, तृ. २८, च. ३४, पं. ३७, सहावे दिवशीं ४२, सातवे ५१ याप्रमाणें वाचावें " इत्यादि.

१८. दड्डीत - शक १७८२---ही रा. शंकर अण्णाजी नाईक, राहाणार दड्डी, (जि. बेळगांव) यांनी श्री. पांडुरंग ज्ञानदेव शास्त्री (कामत) एकसंबेकर, मु. संकेश्वर यांचे येथून मुद्दाम प्रयासानें आणून पाठविली. या ग्रंथाचे अखेरीस पुढें लिहिल्याप्रमाणें मजकूर आहे---
"इति श्रीगुरुचरित्र कथाकल्पतरु सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरुनिजधामगमनो नाम एकपंचाशत्तमोध्यायः ॥५१॥
गतवोवी ( म्ह. मागील अध्यायापर्यंतची ओवीसंख्या) ७०५०, प्रसंग वोवी (म्ह. या ५१ व्या अध्यायाची ओवीसंख्या) ७६ यकुन वोवी ७१२६ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
अथ लिखित समाप्त शक संवत्सरादि लिख्यते ॥
स्वस्ति श्रीमंनृपशालिवाहन शके १७८२ रौद्रनाम संवत्सरे दक्षिणायने शरद्दतौ आश्विनमासे शुक्लपक्षे विजयदशम्यां भौमवासरे अस्मिनशुभदिने धोंडो आत्मज नारायण वाडेकरोपनामकेन लिखित समाप्तकृतं  ॥यादृशी पुस्तकं दृष्टवा० ॥१॥
॥भग्नपृष्टिकटिग्रीव० ॥२॥ तैलाद्रक्षे जलाद्रक्षे ० ॥३॥
इदं पुस्तकं अंताजी धोंडो नायीक वाडेकर वास्तव्य दड्डी याचे आहे ॥
हाल प्रस्तुत सप्ता चालिला आहे. या सारिखे या वंशीं कोण उपजेल त्याणें नेहमी सप्ता चालवावा. म्हणजे तेणेंकडुन श्रीसद्गुरुनाथकृपा होऊन कल्याण होईल हे खचित जाणुन लेखकी प्रार्थना लिहिली आहे. तरी सप्ता सदोदित चालवावा. ॥ याजवरील चित्र अनुसंधानाप्रमाणे रामचंद्र येशवंत नाईक कडलगेकर यागे काढली आहेत. हे सर्व श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पण मस्तु ॥श्रीरस्तु ॥ श्रीसद्गुरु विजयते ॥" इ० लेखक नारायण धोंडो नाईक वाडेकर यांचे वडील बंधु अनंत धोंडो नाईक वाडेकर हे परखांतील औदुंबरवृक्षाखालीं एका पायावर उभे राहून या गु. च. पोथीवरून सतत पारायण करीत असत अशी माहिती रा. शंकरराव नाईक यांनी पत्रांत लिहिली आहे. या पोथीचे कागद व अक्षर फारच चांगले आहे. या ग्रंथांत पहिल्या अध्यायांत "अति व्याकुळ अंतःकरणी । कष्टला भक्त नामकरणी । निंदास्तुति आपुले वाणी । करिता होय परियेसा ॥७९॥
" या ओवीनंतर 'राग स्वइच्छा ओवीबंध म्हणावे, आजि हो पाहुणे पंढरीचे राणे ॥याप्रमाणें॥" (एवढी अक्षरें तांबड्या शाईनें लिहिलेली असून त्यापुढें)
"वंदूं विघ्नहरा ॥ पार्वतीकुमरा ॥ नमूं ते सुंदरा ॥ शारदेसी ॥"
असे सरळ आहे. सहाव्या अध्यायांत “गणरसस्वरयुक्त" (४२), "सहा कोटि आयुष्य मज" (ओं. ८५ मधील रावणाचे आयुष्य) इत्यादि पुष्कळ चांगले पाठ मिळाले. पण पहिल्या अध्यायांत शिवनमनाच्या ओंव्या नसून ४२ व्या अध्यायाचा आरंभ मागील गाणगापुर-कुरवपुर प्रतीप्रमाणेंच आहे! अशा उणीवा आहेतच; तथापि अ. २६ व ३६ इतर लेखी पोथ्यांपेक्षां बरेच शुद्ध असलेले दिसतात. ही पोथी बरीच उशीरा म्हणजे मुंबईत ग्रंथ छापीत असतांना आली; पण कित्येक पूर्वसंशोधित पाठ निश्चित करणेस बरीच उपयोगी पडली.

१९. श्रीटेंभेस्वामी प्रत— ही स्वामीमहाराजांच्या आजोबांची प्रत म्हणतात. ही मला माणगांवास स्वामीमहाराजांच्या देवालयांत पाहाण्यास मिळाली. हिच्या अखेरीस "इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतरु सित्धनामधारकसंवादे श्रीगुरुनिजानंदगतो नामैकपंचाशदध्यायः समाप्तः ॥अध्याय ५१ ॥ग्रंथसंख्या ७२७०  ॥ श्रीदत्तात्रेयश्रीपादवल्लभश्रीनृसिंहदेवतार्पणमस्तु ॥ शके १७८२ रौद्रनामसंवत्सरे श्रावण कृष्ण सप्तम्यां सौम्यवासरे इदं पुस्तकं टेंब्योपाह्रय लक्ष्मणात्मज हरिभट्टेन लिखितं समाप्तं  ॥ अर्जितं भूरिकष्टेन पुस्तकं लिखितं मया ॥ हर्तुमिच्छति यः पापी तस्य वंशक्षयो भवेत् ॥ तैलाद्रक्षे जलाद्रक्षे रक्षे छिथिलबंधनात् । मूर्खहस्ते न दातव्यमेवं रक्षति पुस्तकं । पुस्तकलेखनखेदं वेत्ता विद्वज्जनः परो नान्यः । सागरलंघनखेदं हनुमानेकः परो नान्यः  ॥श्री  ॥" (यापुढें श्रीगुरुचरित्र पारायण सात दिवसांत व तीन दिवसांत करणेचा अध्यायक्रम दिला आहे तो निराळ्या ठिकाणी दिला आहे म्हणून येथें त्याचा पुनरुच्चार केला नाहीं.) या पुस्तकांत १२ व्या अध्यायांत पुनर्दर्शन तुम्हांसी । होईल वर्ष तीसासी । आतां जाऊं बदरीवनासी । म्हणोनि निघती तये वेळीं ॥५८॥"
असा पाठ आहे. यास अनुसरूनच स्वामी-महाराजांनी आपल्या संस्कृत समश्लोकीमध्ये "त्रिंशताब्दैः पुनर्मातर्दर्शनं मे भविष्यति । बदरीकाननं यास्य इत्युक्त्वा गंतुमुद्यतः ॥" (टीका) "त्रिशद्वषै: पुनदर्शनं भविष्यति बदरीवनं यास्ये इत्युक्त्वा प्रतस्थे" असें म्हटलें आहे. कडगंची प्रतीशिवाय पुनदर्शनाचा ३० वर्षांचा कालावधि इतर लेखी पुस्तकांत सांपडत नाहीं, तो वरील पोथीत मिळाला ही संतोषाची गोष्ट वाटली. (ही प्रत स्वामीमहाराजांच्या मंदिराचे भाग्यवान् अर्चक वे उकीडवे-भटजी यांनी पाहाण्यास दिली याबद्दल त्यांचे आभार आहेत.)

२०. साधले शास्त्री प्रत---ही माणगांवचे वे. शा. सं. गजानन शंभु शास्त्री साधले (उपनिषद्वाक्यमहाकोश-कर्ते) ह. मु. मुंबई, (गुजरात प्रिंटिंग प्रेस) यांनी आपल्या घरची मुद्दाम आणून दिली. या ग्रंथाच्या अखेरीस "इति श्रीगुरुचरित्रे नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारकसंवादे श्रीगुरोदर्शनं नाम एकपंचाशत्तमोध्यायः ॥५१॥(ओवीसंख्या ९६)
एवं गुरुचरित्र ग्रंथसंख्या ७१९५, शके १७८८ क्षयनाम संवत्सर पौषशुद्ध एकादश्यां सौम्यवासरे इदं पुस्तकं समाप्त. भाटवडेकरोपनाम्ना भिकंभट्टेन लिखितं श्रीपादश्रीवल्लभश्रीनरसिंहसरस्वती देवतार्पणमस्तु श्रीआदिगुरवे नमोस्तु दासस्य ॥छ ॥" असें आहे. (या अध्यायांतील ७० वी ओंवी — "म्हणोनि सरस्वतीगंगाधर । श्रोतियांसी करी नमस्कार । कथा ऐका मनोहर । सकळाभीष्ट लाधे तुम्हां ॥" यानंतरच्या २६ ओव्या फलश्रुति वगैरेच्या कृत्रिम दिसतात, कारण त्या इतर कुठल्याही जुन्या पोथींत नाहींत !) ही पोथी आमचा ग्रंथ छापून संपता संपतां हातीं आल्यामुळें संशोधनाच्या कार्यात उपयोगी पडली नाहीं. तथापि शेवटच्या थोड्याशा ओंव्या, त्यांतील कांहीं विचार उपयुक्त वाटल्यामुळे बारीक अक्षरांत अखेरीस जोडल्या आहेत.

२१. गाणगापूरची आणखी एक लेखी प्रत - इंदूरच्या 'गुरुसेवापरायणी' महाराणी श्रीमंत सौ. इंदिराबाईसाहेब होळकर यांनी मागें लिहिल्याप्रमाणे : रा माणगांवास आपल्या गुरुदेवांच्या जन्मस्थानीं बांधलेल्या देवालयांत गाणगापुरची एक प्राचीन हस्तलिखित प्रत आणवून ठेवली आहे. तीही पाहाण्यास मिळाली. तिच्यांतील विशिष्ट भाग माझ्या पद्धतीप्रमाणें टिपूनही घेतले. त्यांतले मासल्याकरितां थोडेसे पुढें देतों (कारण एका दृष्टीने ते विद्वज्जनकुतूहलाला कारण होण्याचा संभव आहे.) या प्रतींत पहिल्या अध्यायांत ३१ व्या ओंवीनंतर, इतर प्रतीप्रमाणेंच शिवनमनाच्या ओंव्या नाहींत. "आणि व्याकुळ अंतःकरणीं, कष्टला भक्त नामकरणी, निंदास्तुति आपुले वाणी, करिता होय परियेसा" ही ओंवी ७८ वी असून, त्या पुढील ओव्या पुढे लिहिल्याप्रमाणे आहेत :-
'गुरु त्रैमूर्ति म्हणवीत, सांगती दृष्टांत बहुत, कलियुगांत ख्यातिवंत, नरसिंह्य सरस्वती ७९ कृपासिंधु भक्ता, वेद होय चाखाणिता, त्रिमूर्ति गुरुनाथा, भक्तालागी रक्षिसी ८० त्रिमूर्तीचा गुण, तूं एक निधान, भक्तासी रक्षण, दयानिधि तुं ८१ " इत्यादि. (पहिल्या अध्यायाच्या ओव्या १४३ आहेत.) अध्याय २ ची पहिली ओंवी- “ऐसे श्रीगुरु चरण ध्यात, जो तो (?!) शिष्य नामांकित, अत्यंत श्रमला बहुत, राहिला एक वृक्षातळी" अशी आहे. बाकीच्या प्रतींमधील “त्रैमूर्तिराजा गुरु तूंचि माझा ० " हा श्लोक नाहीं ! अध्याय ६ मधील ४१ वी ओवी व त्यापुढील ओव्या अशा आहेत- “वेदशास्त्र एकवटूनि, वर्णक्रमादि विस्तारुनि, सामवेद अति गायनी, समस्त राग गातसे ४१ तीन ग्राम संप्तस्वरसंयुक्त, गायन करी लंकानाथ, त्याचें नाम विख्यात, नगुण क्षेत्री विनयेसी ४२ सांगेन ऐक एकचित्त, आठवण. प्रख्यात, उच्चारीतसे लंकानाथ, नगुण क्षेत्री विनयेसी ४३ भंगुण वेश्य ध्यानेसी, यंगुण शूद्र विहिवर्मेसी, जंगुण दैत्य परियेसी, रगण प्रत्यक्ष भूतगण ४४ संगुण तरंगरूपेसी, आठहि गुण परियेसी, विस्तार असे गायनासी, लंकापति अस गातसे ४५" इत्यादि. शेवटच्या अध्यायाच्या अखेरीचा मजकूर---
"सरस्वती गंगाधरु, श्रोतया करी नमस्कार, कथा ऐका मनोहरु, सकळाभीष्ट लाधे तुम्हां १७ इतिश्रीमन्महागुरुचरित्र कथायां श्रीसिद्धनामधारकसंवादे कथाकल्पतरयोगोन्नाम येकाव्होनोध्यायः ॥५१॥ श्रीगुरुनाथार्पणमस्तु ॥
श्रीविष्णुर्विष्णु श्रीमद्भगवते महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमाने शोभकृत्नाम संवत्सरे दक्षिणायने सरद्रतौ आश्विनेमासे शुक्लपक्षे आद्या इंदौ दशमिय अद्यवासरे इंदुवासरे उत्तराशादनक्षत्रे प्रथमप्रहरे एवंगुणविशेषण विशिष्टायां प्रभतिथौ अस्माकं लेखकपाठक सहकुटुंबानां क्षमस्थैर्य आयुरारोग्य अश्वर्याभिवृद्धयर्थं पठेत् शके १७६५ सन १२५३ फसली. हें पुस्तक अनंत लिंगो कमष्टाण हस्ताक्षर अनंत भग्नपृष्टकटिग्रीवं प्रवद्विष्टिरधोमुखं । कष्टेन लिखित ग्रंथ यत्नेन परिपालयेत्  ॥हें चरित्र श्रीसद्गुरुनाथाचे सामथ्येंन लेखन जाले असे. " इ०. या पोथींतील अशुद्धे पाहिलीं म्हणजे हसूंच येते. देवाला देखील हे शब्दप्रयोग ऐकून हसूं येईल असें मला वाटतें. 'हा थोरला देव' भावाचा भोक्ता असल्यामुळें 'ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा' या वचनाप्रमाणें त्याचें लक्ष वाचकाच्या ओठांतील शब्दांकडे न जातां पोटांतील भावाकडेच जाऊन त्याजवर कृपा करील ही गोष्ट निराळी. परंतु अशिक्षित वैद्यांकडून आर्तांचे प्राण घेण्याचे प्रमाद घडतात, तसे अशिक्षित लेखकांकडून अर्थाचे प्राण घेण्याचे प्रमाद कसे घडतात याचा नमुना अशा जुन्या ग्रंथांतून पाहाण्यास मिळतो !!! देव सर्वांच्या अपराधांची क्षमा करो असें मी मागतों.

२२. असनोडें प्रत---आमचे मातुल (मातुःश्रीचे चुलत बंधु) वै. विष्णु अनंत कामत बांदिवडेकर, रा. असनोडें, प्रांत गोमांतक (हेंच आमचें जन्मस्थान.) यांची ही हस्तलिखित प्रत होय. [आमचे विष्णुमामा महान् दत्तभक्त असून उत्तम वैद्य होते. ते दरवर्षी गुरुद्वादशीला गोव्याहून नरसोबावाडीस पायीं
----
१ इतर पोथ्यांतून असलेली 'रागस्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे' ही सूचना या लेखकानें काढून टाकून, त्या सूचनेप्रमाणें ह्या ओव्यांचा अभंग छंद मोडून ओंवीछंदच बनवून सोडलेला दिसतो ! (ओवींत चरणरेघा नाहींत. स्वल्पविराम आम्ही दिले आहेत.)
२ 'गण-रस-स्वरयुक्त' असें इतर सर्व लेखीं प्रतींत आहे. या ऐवजीं या प्रतींत असलेला वरील पाठ कुठल्याच जुन्या नव्या प्रतींत मिळत नाही. तें कांही असलें तरी 'तीन ग्राम सप्तस्वर' या शब्दांना कांहीं तरी अर्थ आहे; परंतु पुढील आठ 'गण' लिहितांना-न-गण, भ-गण, य-गण इत्यादींच्या ऐवजी नगुण, भंगुण, येगुण इत्यादि किती अशुद्ध लिहिले आहेत ते पाहा! (वरील सर्व मजकूर आम्ही त्या पोथीमधून अगदी लक्ष्यपूर्वक लिहून घेतला होता व छापतांनाही प्रुफे नीट पाहूनच छापली आहेत. इतर मागच्या व पुढच्या प्रतीच्या वर्णनाचा मजकूरही तसाच समजावा, कळावें) ही पोथी राणीसाहेबांनीं मागितली एक व दिली दुसरीच असे ऐकतों! (५० रु. घेऊन !!)
----
चालत जात. आपली पोथी लांबट लाकडी पेटींत घालून खांद्यांवर घेऊन ते वाडीची वारी करीत असत. त्या वेळीं आगगाडी नव्हती. पाय चाळून ते बेळगांव शहापूर येथें आमच्या घरीं येत व एक दिवस राहून पुढें पायींच नरसोबावाडीस जात. म्हातारपणांत अगदीं थकेपर्यंत त्यांनीं ही बाडीची वारी चालविली. त्यांची आमचे बंधु दिगंबरदास यांजवर अत्यंत ममता होती. अंतकाळीं आपली ही पोथी त्यांच्याकडेच पाठवावी अशी आज्ञा केल्याप्रमाणें त्यांचे पश्चात् त्यांचे धाकटे बंधु वै. नरसिंह अनंत कामत यांनीं ही आमच्या घरीं आणून दिली.] या प्रतीचाही उपयोग अडलेला पाठभेद पाहाण्यास मी करीत असें. गायत्रीच्या २४ मुद्रांची नांवें ओवीबद्ध असलेलीं मी प्रथम याच पोथींत पाहिलीं होतीं. मागाहून तीं कडगंची व इतर प्रतींत तशींच सांपडली. हल्ली (गोवा-माशेल येथें) ही पोथी आमच्या घरीं देवपूजेंत असते.
२३. बैलहोंगल प्रत - श्री. गुरुनाथ बाळाजी बेकनाळकर, रा. बैलहोंगल यांनीं पाहाण्यास दिलेली. या प्रतीमधील शेवटचा विशेष—“इति श्रीगुरुचरित्र कथाकल्पतरु सिद्धनामधारकसंवादे गुरुचरित्रकथन श्रीस्वामीगिरियात्राभिगमन। निजानंदयोगोन्नामे क० ॥५१॥
न पाडितां हस्तदोष ॥ न आणितां मनीं क्लेश ॥सिद्धीस नेईल ग्रंथ ॥ जय जय सद्गुरुसमर्थ ॥एकूण ग्रंथसंख्या ७१२३ आणि ४० वे अध्यायांतील अष्टक ८ लोक व बेचाळीस प्रसंगांतील श्लोक ३६ एकूण ४४ वट ७१६७ सातहजार एकशे सदसष्टी ॥श्रीगुरुनाथार्पणमस्तु ॥…शके १७८२ रौद्विनामसंवत्सरे ॥ लेखक काळदेवात्मज भगवंतसुत बाळकृष्णेनुलिखिता ॥ उपनाम बेकनाळकर मो०। ॥अन्निगोत्रोत्पन्नः मु. होंगल  ॥ता. संपगांव  ॥(जि. बेळगांव)," इत्यादि.

२४. रामनामे प्रत---चिंतामण आप्पाराव रामनामे (ऊर्फ) राघवदास, 'उभयभाषाकीर्तनविशारद' इन्स्पेक्टर दि बेळगांव डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोआपरेटिव्ह बैंक, यांच्या घरची. शके १७८२ (यांनींच आमच्या गु. च. च्या ४१ व्या अध्यायांतील सायंदेवाच्या कानडी पदांचा शब्दशः अर्थ सांगून भाषांतर करून दिलें व पदांच्या अर्थाचीं मराठी समवृत्तांत पदेंही करून पाठविलीं तीं निराळीं पुढे छापली आहेत.)
वरील पुस्तकें ज्यांनीं कृपा करून दिलीं व देवविलीं त्या सर्वांचा मी अत्यंत अत्यंत आभारी आहे.
----
टीपांमधील पाठभेदांच्या पुढें नामनिर्देशक अक्षरें घातलीं आहेत त्यांचा खुलासा
क म्ह. 'कडगंची' प्रत, धु-धुळें प्रत, पु-पुरंदरे प्रत, कु-कुरवरपुर, गा-गाणगापुर, वा-वाडी, औ-औदुंबर, कें-केंगेरी, पं-श्रीपंतमहाराज, कुं-कुंदगोळ, आं-आंबेवाडी, प-परोळकर, वि-विंझणेकर, स-खांडोळें, पे-पेडणें, चि-चिकोडी, द-दड्डी, टें-श्रीभेस्वामी, सा-साधलेशास्त्री, वि-असनोडें, (विष्णुमामा प्रत), सम-श्रीटेंभेस्वामीकृत समश्लोकी टीका.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP