मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
अध्याय ३७ मधील एक अत्यंत महत्त्वाचे गूढ तत्त्व

गुरूचरित्र - अध्याय ३७ मधील एक अत्यंत महत्त्वाचे गूढ तत्त्व

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


३६ व्या अध्यायांत त्या ब्राह्मणानें केलेल्या 'कवण्या घरीं जेवूं नये' या प्रश्र्नाचें सविस्तर उत्तर श्रीगुरूंनीं दिलें. त्यानंतर त्यानें ब्राह्मणाचे आचारधर्म कसे असावेत असा प्रश्न केला. त्यावर श्रीगुरूंनी त्याला, पूर्वी नैमिषारण्यांतील ऋषींना पराशरऋषीनें सांगितलेला आचारधर्म विस्तारपूर्वक सांगितला. पहाटे ब्राह्ममुहूर्ती उठल्यापासून प्रातः स्मरण, शौचविधि व दंतधावनविधि, स्नानविधीचे व आचमनविधीचे प्रकार, तसेंच आसनादि विधि सांगून संध्येचा विधि फारच विस्ताराने सांगितला. त्यांत गायत्रीजपाचा विधि तर पुरश्चरणास योग्य असा सुंदर रीतीनें सांगितला आहे. त्यानंतर देव-ऋषि-पितृतर्पणादि सांगून, ३७ व्या अध्यायांत देवपूजेचा विधि उत्तम रीतीनें सांगितला आहे. त्यानंतर वैश्वदेव व बलिहरणविधि सांगून भोजनाचा विधि संध्याविधीप्रमाणेच विस्तृत सांगितला आहे. चित्रामध्यें रेषांशिवाय, नृत्यामध्ये हातपाय हालविण्याशिवाय व गायनामध्ये ध्वनीशिवाय दुसरें काय असते ? पण नुसत्या रेषा ओढण्यानें चित्र होत नाहीं, नुसत्या हातपाय हलविण्यानें नृत्य दोष नाहीं. तसेंच नुसत्या ध्वनि काढण्यानें गायन होत नाहीं. त्याच रेषा ओढण्याला, हातपाय हालविण्याला व ध्वनि काढण्याला एक प्रकारचा विधि लावून दिला की त्याला सुंदर कलेचे स्वरूप' प्राप्त होतें. लाकूडफोड्या किंवा घागरओढ्या यांना शारीर व्यायाम काय थोडा घडतो ? परंतु तेवढ्या व्यायामानें ते स्यांडों, प्रो. राममूर्ति किंवा प्रो. माणिकराव होऊं शकत नाहींत, विशिष्ट विधीनें ते व्यायाम केले तरच तसे सामर्थ्यं येतें. हे विधि विशिष्ट बुद्धीच्या पुरुषांनीं शोधून काढले आहेत. स्नानभोजनादि शारीर कर्में प्रत्येक मनुष्याला करावींच लागतात. या कर्मालाच विशिष्ट विधि लावले कीं त्यांत निराळी शक्ति उत्पन्न होते. 'आहार, निद्रा, व मैथुन' हीं पशुपक्ष्यांना व मनुष्यांना सारखींच आहेत. परंतु वर उल्लेखिल्याप्रमाणें ह्या सामान्य व स्वाभाविक कर्मांनाच विशिष्ट विधींत बसविलें कीं त्यांना निराळेंच स्वरूप प्राप्त होतें. आपल्या प्रत्येक स्वाभाविक कर्माला अतींदियद्रष्ट्या ऋषींनीं असे कांहीं विधि लावून दिले आहेत कीं, त्याप्रमाणे आचरण केलें असतां इहलोकच्या भोगांत व्यत्यय न येता परलोकचे भोगही मिळावे. भोजन म्हणजे नुसतें 'उदरभरण' नव्हे. विध्युक्त केलें असतां तेंच 'यज्ञकर्म' होतें. ('उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हा श्र्लोक सर्वश्रुत आहेच.) स्त्रीसंगाची गोष्ट पण तशीच. नामशास्त्र व कामशास्त्र म्हटलें कीं वेदान्ती लोक नाकें मुरडतात. पण वैष्णवी ऋग्वेदी ब्रह्मकर्मात स्त्रीसंगविधीला किंवा विध्युक्त स्त्रीसंगाला ‘वामदेवयज्ञ’ म्हटलेलं आढळते. तात्पर्य, या गोष्टींचा विचार करावा तेवढा थोडाच आहे. या (३७ व्या) अध्यायांत दोन प्रहरचा भोजनविधि सांगितल्यानंतर तांबूलभक्षण विधि वगैरे सांगून सायंकाळच्या वेळची सायंसंध्या, सायंभोजन व त्यानंतरचा शयनविधि सांगितला आहे. या शयनविधीमध्ये खट्वा म्हणजे निजण्याची खाट कोणत्या लाकडाची असावी, कोण वारीं ती विणावी वगैरे सांगितल्यानंतर, निजण्याच्या स्थळाचा विचार सांगितला आहे. ओघानुसार गृहस्थाश्रमीयांचा स्त्रीसमागमाचा प्रसंग सांगावा लागला. त्याप्रसंगीं पराशरानें स्त्री रजस्वला झाल्यानंतर सम व विषम दिवशीं संग करण्याचे श्री फल सांगितलें असून वर्ज्यावर्ज्य नक्षत्रेंही सांगितलीं आहेत. त्यांतील एका गूढ ओंवीचा प्रकाश मला कोल्हापुरास झाला. ती गोष्ट अत्यंत महत्त्वाची वाटल्यामुळे वाचकांना सांगितल्याशिवाय राहवत नाहीं. गेल्या वर्षी (शक १८६०) श्रावणमासांत कांहीं कामानिमित्त मी कोल्हापुरास गेलों होतों. तेथें कुरुंदवाडचे प्रसिद्ध ज्योतिषी श्री. विष्णु लक्ष्मण साने हे आले होते. त्यांना माझ्या एका मित्रानें माझी ओळख करून देतांना मी लिहिलेल्या नामजपाच्या पुस्तकांचा, श्रीगुरुचरित्रांतर्गंत गुरुगीतेचा व त्या वेळीं चालू असलेल्या गुरुचरित्रसंशोधनाचा उल्लेख केला. तो ऐकून श्री. साने यांना फार आनंद वाटला. ते सामुद्रिक ज्योतिषही चांगले जाणणारे असल्यामुळें त्यांनीं माझ्या दोन्ही हातांचे ठसेही आपल्या चोपडीवर घेतले व या हातून उत्तमोत्तम ग्रंथ निर्माण होतील, त्याची दर्शक अमुक रेषा आहे वगैरे वगैरे बोलले. ओघानुसार गुरुचरित्रावर बोलतांना ते म्हणाले, “गुरुचरित्र म्हणजे सामान्य ग्रंथ समजूं नका. लोक नुसत्या श्रद्धेनें त्याचे पारायण करीत असतात, पण त्यांतील तत्त्वांकडे लक्ष देत नाहींत. ३७ व्या अध्यायांत ब्राह्मणाचे नित्यकर्म सांगून झाल्यानंतर स्त्रीसंगविधि सांगतांना, “मूळ-मघा-रेवतीसी । संग न करावा परियेसीं । कोप नसावा उभयतांसीं । संतोषरूपें असावें॥"---(ओं. २५६, पृ. ४७२) असें जें श्रीगुरूंनी सांगितलें आहे त्यांत केवढा तरी अर्थ भरला आहे. 'नक्षत्रगण्डान्त' चुकविण्याकरितां संभोगकालीं ह्रीं तीन नक्षत्रें चुकविलीं पाहिजेत. मूळ चुकविण्याकरितां मघा वर्ज्य, आश्लेषा चुकविण्याकरितां रेवती वर्ज्य व अश्विनी चुकविण्याकरितां मूळ वर्ज्य, केलें पाहिजे. कारण गर्भाच्या आधान-नक्षत्रापासून १० व्या नक्षत्रावर मुलाचा जन्म होतो. हा शास्त्रनियम नव्हे, तर सृष्टिनियम आहे. मूळ किंवा आश्लेषासारखे वाईट नक्षत्र मुलाच्या जन्मास लागलें म्हणजे त्याची शांति करावयास पाहिजे व ती करितात, त्यापेक्षां मुळांतच चुकीची दुरुस्ती केल्यास (Prevention is better than cure) जिवाच्या सात जन्मांची सुधारणा करण्याचें श्रेय एकाच जन्मांत एका पुरुषाला एकाच संभोगांत मिळवितां येणार नाहीं काय ? अशाच तीन्ही नक्षत्रांचे अशुभ फल आपणच आपल्या कुळामध्ये पेरून देवाजवळ शुभ फलाची इच्छा केली, तर नाचणे पेरून गहूं मागण्याइतका मूर्खपणा पदरांत घेण्यासारखा आहे. शस्त्राने एका मनुष्याचा एका जन्माचा खून होतो, पण शास्त्रानें-शास्त्रविरुद्ध आचरणानें-एका मनुष्याचा सात जन्मांचा खून होतो. पण जो जो सुधारणा, तों तों आपली अधोगति !” इत्यादि इत्यादि हें त्यांचे भाषण ऐकून मला फार आनंद व आज वाटलें. मी त्यांचे आभार मानले. आवर्य इतक्याचकरितां वाटलें कीं, हास-भास-कल्पना नसतांना, कोणी त्यांना बोलावलें नसतांना व मी कसलाच प्रश्नही केला नसतांना केवळ स्वयंस्फूर्तीनें त्यांनीं जें भाषण केलें ते मला तरी अभुतपूर्व होतें. त्यांच्या त्या भाषणानें गु. च. मधील त्या ओंवीवर माझ्या मनांत उत्तम प्रकाश पडला व तो गु. च. वाचकांना देण्याकरितांच श्रीगुरुदेवांनीं हा आकस्मिक योग घडवून आणला असावा असें वाटून, त्या प्रभूचेही अत्यंत आभार वाटले. माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नसल्यामुळे (पण साने यांच्यासंबंधींच्या अविश्वासामुळे नव्हे, तर अधिक कांहीं कळावे म्हणून) मुंबईचे प्रसिद्ध ज्योतिषी वे. शा. सं. शंकर विश्वनाथ कावेशास्त्री व कृष्णाजी विठ्ठल सोमणशास्त्री या तज्ज्ञ विद्वानांकडे याबद्दल चौकशी केली. यांनींही तीन जन्मतारांना येणारे 'गंडान्तर चुकविण्याकरितां तीन आधानतारा चुकविणें योग्य आहे, थोडीशी दक्षता ठेवली तर ह्या तीन चुकवितां येतात, हा ज्योतिषशास्त्रांतील एक मोठाच शोध आहे इत्यादि पुष्कळ माहिती सांगितली. म. धुपकरशास्त्री यांनींही असेंच सांगितलें, याबद्दल या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. पण या लोकांनी सांगितलेली विशेष माहिती विस्तारभयास्तव देतां येत नाहीं म्हणून वाईट वाटतें. सारांश, आपले धर्मशास्त्र हे वैद्यशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांस धरून आहे व हीं तीन्हीं शास्त्रें मनुष्य-जीवाच्या इहपर कल्याणाकरितांच निर्माण झालेलीं आहेत. परंतु अदूरदृष्टि लोक शास्त्रनियम म्हणजे हे सृष्टिदेवतेचे कायदे न पाहातां इंद्रियांचे गुलाम बनून पशूप्रमाणें सर्व व्यवहार करूं लागले व त्यामुळेंच अभागी प्रजा व दुःखदारिद्र्य समाजांत व राष्ट्रांत फैलावले असे म्हणणें वावगे होणार नाहीं. अशा अधिकउण्या शब्दांबद्दल प्रभु परमात्मा व सजन वाचक मला क्षमा करतील अशी मी आशा करितों.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP