संशोधित गुरुचरित्राच्या चतुर्थावृत्तीची प्रस्तावना
‘‘समळ ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण । गुण सांगतां अवगुण । पाहे तो एक पढतमूर्ख॥
अक्षरें गाळून वाची । कां ते घाली पदरिंची । निगा न करी पुस्तकाची । तो एक मूर्ख॥’ - श्रीदासबोध
श्रीगुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवीशक्तीने भारलेला सिद्धमंत्ररुप व महाप्रासादिक आणि वरदग्रंथ आहे. छापखाने नव्हते त्या वेळीं भाविक व अशिक्षित लोकांनी लिहितांना म्हणजे उतरून काढतांना त्यांत चुका केल्या ! त्यानंतर छापखान्यांत छापतांनाही अनेक चुका झाल्या ! ह्या चुका म्हणजे मुद्राराक्षस (Printer's Devils) इतर देशांपेक्षा भारतांतच अधिक धुडगूस घालताहेत ! ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, एकनाथी भागवत व दासबोध, इत्यादि ग्रंथांतही अशाच चुका झाल्या आहेत. विद्वान् लोकांनीं या ग्रंथांच्या अनेक प्राचीन हस्तलिखित प्रति मिळवून त्यांचें संशोधन केलें आहे व अद्यापि करीत आहेत. गुरुचरित्रसंशोधनाचा प्रयत्नही यापूर्वी महर्षि अण्णासाहेब पटवर्धनांसारख्या थोर थोर विभूतींनी केला, पण त्यांना तो सोडून द्यावा लागला ! अनेक अडथळे दृश्य व अदृश्य सृष्टींतून येऊं लागले म्हणे !
परमपूज्य श्रीमढ्टासुदेवानंद सरस्वतीस्वामींचे कंठमणि असे श्रीमद्ब्रह्मानंद सरस्वतीस्वामी ऊर्फ ‘लीलादत्त’ यांच्याबरोबर मी शके १८४२ सालीं गाणगापुरास गेलों. तेथें मला संशोधनाची प्रबळ प्रेरणा मिळाली व कामास सुरुवात झाली ; पण देहस्वभावानुसार पुष्कळ दिवस आळसांत गेले. चुका दाखवून उगाच लोकांचा बुद्धिभेद कां करितां, असें कांहीं मित्रांनीं सांगितलें, त्याचाही थोडासा मनावर परिणाम झाला व संशोधनाचें काम बंद केलें. परंतु अंतर्यामी तें बंद ठेवूं देईना. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ या वचनाप्रमाणें दृश्य व अदृश्य सृष्टींतून अकल्पित म्हणजे कल्पनातीत साह्य मिळून काम पुरें झालें व ग्रंथ छापून निघाला. ही श्रीगुरुदेवाचीच कृपा होय. पोथीरुपाच्या तीन आवृत्ति व बुकसाईज एक आवृत्ति मिळून आजपर्यंत सुमारें १२ हजार प्रति खपल्या !
महर्षि अण्णासाहेब पटवर्धन व श्रीटेंबेस्वामीमहाराज या महापुरुषांकडून जें काम झालें नाहीं तें मजकडून झालें, म्हणून मी त्यांच्यापेक्षां मोठा झालों नाहीं. जरासंधानें कंसवधानंतर मथुरेवर १७ वेळां स्वारी केली, श्रीकृष्णानें त्याचा तितक्याही वेळां पराभव केला, पण कृष्ण त्याला मारूं शकला नाहीं. भीमानें त्यास मारलें, म्हणून भीम कृष्णापेक्षां मोठा उरत नाहीं. जरासंधाचा मृत्यु हा सृष्टिचक्राच्या गतींत भीमाचा वांटा होता. नरकासुराचा वध हा सत्यभामेचा वांटा होता, म्हणून ती कृष्णापेक्षां मोठी ठरत नाहीं. एकनाथी भागवताचें संशोधनहीं तसेंच प्रभूनें मजकडून करून घेतलें. विद्वद्वर्य पांगारकर, पं. पणशीकर, पं. बापटशास्त्री वगैरेंना जे शोध लागले नाहींत ते मला लागले, म्हणून मी त्यांच्यापेक्षां विद्वान् ठरत नाहीं. विद्वत्तेच्या दृष्टीनें पाहातां त्यांच्या पासंगासहीं मी पुरणार नाहीं. पण ‘नियती’ च्या नियमानुसार हा माझा वांटा होता, हें माझें ‘मिशन’ होतें, म्हणूनच तें मजकडून यशस्वी झालें. नव्हें, प्रभूनें तें मजकडून करवून घेतलें. तें कसें करून घेतलें याबद्दल मागील आवृत्तीच्या प्रस्तावनेत मीं सविस्तर लिहिले आहे. तात्पर्य, हें काम ‘मीं केलें’ असें मला औपचारिक दृष्ट्याहि म्हणतां येणार नाहीं.
मागील प्रस्तावनेंत नसलेला गुरुचरित्राचा एक अनुभव सांगतों, म्हणजे वाचकांच्या हें लक्षांत येईल. संशोधित पहिली आवृत्ति छापली व दोन वर्षांत ती खपून गेली. दुसरी आवृत्ति छापण्यास आरंभ झाला, तेव्हां माझ्या एका भाचीच्या ट्यूमरच्या ऑपरेशनसाठी मी मिरजेस गेलों होतों. तिकडे सुमारें दीड महिना राहावें लागलें.
अशा त्या गुरूदेवाच्या चरणीं शतशः प्रणाम करून व वाचकांना पुढे दिलेली प्रस्तावना लक्षपूर्व वाचून पाहण्याविषयीं विनंती करून, तसेंच लेखक, वाचक, मुद्रक व प्रकाशक यांना आयुरारोग्य देऊन त्यांचा निःश्रेयसान्त अभ्युदय करण्याबद्दल प्रभुचरणी प्रार्थना करून विराम पावतो.
ॐ तत्सत् ।
श्रीदुर्गादत्तमंदिर, माशेल-गोवा,
रविवार, आषाढ शुक्ल ११, शके १९८७६
श्रीगुरूचरणरजांकित नम्र बालक--
रामचंद्र कृष्ण कामत, चंदगडकर