मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
सप्ताह कसा करावा ?

गुरूचरित्र - सप्ताह कसा करावा ?

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


(लेखक रामचंद्र विनायक कुलकर्णी ऊर्फ आनंदघनराम, तासगांव)
गुरुचरित्र पारायण करण्यानें कार्यसिद्धि होऊन पुष्टि तुष्टि होते यांत कांहीं शंका नाहीं; परंतु केवळ या कल्पनेनेंच गुरुचरित्राचा पाठ नित्य ठेवणारे, कांहीं वर्षांनंतर आपण फार खालच्या परिस्थितींत आलों असें म्हणणारे व खरोखर खालच्या स्थितींत आलेले लोक मीं पाहिलेले आहेत ! पण ते त्या स्थितीला आपणच आपल्या कृत्यांनीं आलेले असतात ! असें असतांना आपण आपल्याच वाईट आचरणानें वाचीत होतों, आपण व्रतस्थ राहिलों नाहीं व न्यायबुद्धीला फाटा देऊन अन्यायमार्गाचें आचरण करीत राहिलों, हें मात्र ते विसरतात आणि त्या आपल्या आचरणामुळें आलेल्या परिस्थितीचें खापर गुरुचरित्रावर फोडतात !
जे न्यायमार्गानें वागून गुरुचरित्राचें नित्य वाचन करितात, त्यांना आपत्ति न येतां योग्य संधीला कार्यपूर्ति होतच असते. पण त्यापेक्षांही श्रीगुरुचरित्राचा सप्ताह' जास्त फायदेशीर होतो याचें कारण काय असावें त्याचा आतां विचार करू.

१. नुसत्या पारायणापेक्षां--
(१) सप्ताहाच्या अनुष्ठानांत कांहींतरी विशिष्ट हेतु धरीत असतात. (२) " संकल्पः कर्मनिश्चयः " याप्रमाणें कार्यपूर्तीला आपला मनोनिश्चय मदत करतो. हा इतका निश्चय नुसत्या पारायणांत असत नाहीं. (३) सप्ताहांत जो व्रतस्थपणा असतो, तो नित्याच्या पारायणांत कोणी पाळीत नसतात. व्रतस्थपणे राहिल्यानें एक प्रकारची अदृश्य शक्ति उत्पन्न होते. (४) सप्ताहांत बहुधा दिवसाचा सर्व वेळ त्यांतच खर्ची पडतो, तसा नित्याच्या पारायणांत फारच थोडा वेळ त्या कार्यात व बाकीचा आपल्या संसारांत जातो, म्हणून मन तिकडे म्हणजे श्रीदत्ताकडे व त्याच्या चरित्राकडे फारच थोडा वेळ असतें. सामान्य पारायणापेक्षां सप्ताहाच्या अनुष्ठानांत कार्यपूर्तीची शक्ति जास्त येते.
२. सप्ताहाच्या 'सात' या दिवसांत महत्त्व का आहे त्याची मीमांसा 'सात' यावरूनच करूं. वार सातच आहेत, वर्ण म्हणजे प्रकाशवर्ण (रंग) हेही सातच आहेत, व्याहृती सातच आहेत, पाताळें सात व स्वर्गही सात (७ × ३ = २१) आहेत. सात ही आकृति पाहिली तर ॐकारापैकीं (७) रेफ व शून्य यांचे एकीकरण आहे. प्रथम (ऍबसोल्यूट झीरो) शून्यास्तित्व, त्यापासून शून्य व शून्याच्या योगानें रेषा बनते व पुढें रेषेपासून पातळी व पातळीपासून घन बनून या घनाकाराने सारी विश्वोत्पत्ति झाली आहे. तसेंच सात वारांचे वर्तुळ, म्हणजेच कालाच्या दिवसाच्या वर्तुळफेर्‍याची मर्यादाही सात दिवसांत संपून आठव्या दिवशीं कालाच्या नवीन फेन्याला सुरुवात होते. हीच गोष्ट वर्णवर्तुल सिद्ध करीत आहे. याप्रमाणें सात आंकड्यास, सात संख्येस व सात दिवसास महत्त्व आलें असून सात दिवसांचा ‘सप्ताह' होतो.
३. श्रीगुरुचरित्र या ग्रंथास सिद्धमंत्ररूप येण्याचे कारण त्यांतील विवेचनपद्धतिच आहे. ती या गुरुचरित्राप्रमाणें कार्यपूर्तिकर शब्दांनी दुसर्‍या ग्रंथांत बांधली नाहीं.
"अमंत्रमक्षरं नास्ति, नास्ति मूलमनौषधम् । अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः ॥"
असें असल्यामुळे गुरुचरित्रलेखकानेंच तें पारायणास व सप्ताहास उपयोगी पडावें अशीच त्याची रचना केली आहे. शिवाय श्रीगुरूदेवाचा (दत्ताचा) त्यावर प्रसाद आहे. म्हणून एकाद्या कार्यसिद्धीसाठीं श्रीगुरुचरित्राचाच सप्ताह करावा असा परिपाठ पडलेला आहे.
४. हा सप्ताह करतांना तो कसा करावा त्याचा आपण विचार करूं---सप्ताह करण्यासाठीं जागा एकान्ताची हवी. ती अरण्यांत अथवा एकाद्या डोंगराच्या गुहेंत असलेली उत्तम. तशी नसेल तर श्रीदत्ताची मूर्ति असलेल्या मंदिरांत सप्ताह करावा. आपण श्रीदत्ताच्या संनिध उत्तरेस अगर पूर्वेस तोंड करून बसावें, त्या वेळीं दत्ताच्या मूर्तीचें तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असून ती मूर्ति आपल्या बाजूस यावी. आपण उत्तरेकडे तोंड केल्यास व तिचे तोंड पूर्वेकडे असल्यास ती आपल्या डाव्या अंगासे येईल तिचे तोंड उत्तरेस असल्यास आपणास पूर्वेकडे तोंड करून बसतां येईल हें उत्तम. मग सप्ताहास सुरुवात करावी. (१) जुळण्यास कठीण वाटेल तर आपण आपल्या देवघरांत किंवा घरांत एकान्त जागी पूर्वेस तोंड करून बसून उत्तरेस तोंड करून आपल्या उजव्या बाजूस पाठ मांडावा. त्या पाटावर श्रीदत्तात्रेयाची मूर्ति खालीं तांदूळ घालून वर ठेवावी किंवा त्या तांदुळावर सुपारी धुवून ठेवून तींत श्रीदत्ताचे आवाहन करावें. मग सप्ताहास सुरवात करावी. (२) त्या वेळीं आपण कोणत्या हेतूनें सप्ताह करीत आहोत त्याचा संकल्प करून पाणी सोडून सप्ताहास प्रारंभ करावा. (३) सप्ताह चालू असेपर्यंत ब्रह्मत्वर्य पाळावें. (४) सोवळ्याने असावें. नेसलेले वस्त्र कटिमुक्त होईतों तें सोवळेंच असतें. (५) रात्रीं निजतांना डाव्या अंगावर उजवा कान वर करून त्या आपल्या देवाजवळच पांढर्‍या घोंगड्यावर निजावें. पांढरी धावळी पांघरावी. (६) म्हणजे सात दिवसांत सूचक स्वप्न पडते किंवा दृष्टान्त होतो. अथवा उजव्या कानांत आदेशाचे शब्द ऐकूं येतात. (७) मग सप्ताह पूर्ण झाल्यावर त्या सुपारींतून श्रीदत्ताचे विसर्जन करावे व आपल्या सामर्थ्यानुरूप उज्जीवन करावें, नैवेद्य आरत्या वगैरे करून ब्राह्मणभोजन घालून सप्ताहसमाप्ति करावी.
अशा रीतीनें अनुभव पाहिला असतां श्रीगुरुचरित्राच्या वाचनाबद्दल, पारायणाबद्दल व सप्ताहाबद्दल आपली खात्री पटेल.
आनंदघनराम, तासगांव

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP