अशा जुन्या ग्रंथांचे संशोधन करतांना बुद्धिशक्ति खर्च करावी लागतेच, पण त्याबरोबर इतर अनेक जुन्या प्रतिही मिळवाव्या लागतात. कारण प्रत्येक प्रतीत लेखकाचे हस्तप्रमाद झालेले असतातच, 'मूळ ग्रंथकाराचा शब्द कोणता व लेखकाचा हस्तप्रमाद कोणता' हें शोधून काढण्यास अशा अनेक प्रतींचें साहाय्य होत असतें. एकींतील चूक दुसरींत मिळते व दुसरींतील तिसरींत सांपडते. चूक दिसेल तिकडे आपल्या मतानें कांहीं तरी घुसडून द्यावयाचें, असें ज्याला करावयाचे नसेल त्यालाच हा खटाटोप करावासा वाटतो व तो आम्हीं प्रेमपुरःसर केला आहे आणि त्यांत श्रीगुरुदेवांनीं साहाय्य दिले असून यशही दिले आहे. असो. अशा निरनिराळ्या प्रति मिळाल्या व त्यांत निरनिराळे पाठभेद दिसले, तर त्यांतून कोणता ग्राह्य व कोणता अग्राह्य ठरवावयाचा याबद्दलही बारीक विचार करावा लागतो. नुसत्या बहुमताच्या (Majority) प्रमाणालाही मान देतां येत नाहीं. असे अनेक विलक्षण प्रसंग अनुभविण्यांत आले; त्यांतील थोडेसे तरी सांगणे आवश्यक वाटतें. कारण त्यायोगें 'संशोधन' म्हणजे काय हे चांगले समजेल व त्याची किंमतही कळेल आणि ही 'सत्यकथा' रसिक विद्वानांना मनोरंजक व उद्बोधकही वाटेल. तो एक प्रसंग असा - अध्याय ६ मधील रावणाच्या अद्भुत गायनसेवेनें भगवान् शंकर प्रसन्न होऊन त्याला वर माग म्हणाले, तेव्हां त्यानें 'लक्ष्मी माझे घरची दासी। अष्टै निधी माझे द्वारीं ” इत्यादि स्वतःच्या ऐश्वर्याविषयीं बढाई मारतांना आपल्या आयुष्याचीही प्रौढी बोलून दाखविली. तो पाठ सर्व छापी पुस्तकांत "सहस्र कोटि आयुष्य मज" असा आहे. पुढे ३२ व्या अध्यायांतही (ओ. ७९) “सहस्र कोटि वरुषें ज्यासी । आयुष्य असे रावणासी" असा पाठ आहे. या ठिकाणीं 'सहस्र कोटीच्या' ऐवजी 'सहा कोटी' असा पाठ 'कडगंची' व दुसर्या एका प्रतींत मिळाला. बाकीच्या १०।१५ हस्तलिखित प्रतीतसुद्धां 'सहस्रकोटि' असाच पाठ आढळला ! आतां याचा निर्णय कसा करावयाचा? कडगंची प्रत जरी मी अधिकांशानें प्रमाणार्थ धरलेली आहे तरी तिच्यावरही मी सर्वस्वीं अवलंबून राहिलेलों नाहीं, नव्हे राहवलेंच नाहीं ; कारण तींत देखील लेखकाचे हस्तप्रमाद म्हणून झालेले आहेतच ! सारांश, 'सहस्र कोटि' पाठ बहुत प्रतींत आहे म्हणून घेववेना, आणि 'सहा कोटि' पाठ एकदोन प्रतींतच आहे म्हणून सोडवेना, अशी स्थिति झाली. असें कांहीं होऊन बुद्धीचा निर्णय होईनासा झाला म्हणजे मी डोळे झांकून स्वस्थ बसतों व 'धियो यो नः प्रचोदयात्' म्हणून हृदयस्थाची प्रार्थना करितों. अशा स्थितींत कांहीं तरी दिव्य प्रेरणा मिळून कोडीं सुटतात. केव्हां केव्हां तर आकाशवाणीसारखे शब्दही ऐकूं येतात. असे पुष्कळ वेळां प्रत्यय आले आहेत. हे माझे अनुभव मी चार वर्षांपूर्वी छापलेल्या माझ्या 'नामचिंतामणि ग्रंथांतही दिलेले आहेत. तात्पर्य, सहस्र व सहा याचा निर्णय होण्यासाठीं वर सांगितल्याप्रमाणें डोळे झांकून मन बुद्धिसाक्षीकडे नेऊन मी स्वस्थ बसलो. थोड्याच वेळांत 'रावणाचें चौदा चौकडी राज्य' या वचनाची एकदम आठवण झाली. लगेच पंचांग काढलें. चारी युगांच्या वर्षसंख्येची बेरीज केली. ती ४३,२०००० भरली. या संख्येस १४ नीं गुणलें, गुणाकार ६,०४,८०००० आला. तेव्हां 'सहा कोटि ' हाच पाठ युक्त आहे असा बुद्धीचा निश्चय झाला व तो पाठ पुस्तकांत मीं लिहून सोडला. यानंतर सांगण्याची एक आनंदाची गोष्ट ही कीं मुंबईत ग्रंथ छापण्यास सुरुवात झाल्यानंतर ६ महिन्यांनीं (गेल्या अधिक श्रावणांत) श्रीसिद्धारूढस्वामींचे प्रसिद्ध लिंगायत शिष्य गु. भ. प. अक्कलकोट शरणाप्पा नांवाचे, श्रीसमर्थसदनांत कसलेसें पुस्तक घेण्याकरितां येऊन बसलेले मला दिसले. पुष्कळ वर्षांनी भेट झाल्यामुळे आम्हां परस्परांस फार आनंद वाटला. नमस्कार चमत्कार झाल्यानंतर मी मुंबईस येण्याचे कारण त्यांनीं विचारलें. तेव्हां श्रीगुरुकृपेनें आज १८ वर्षांपासून चालविलेलें गु. च. चे संशोधन संपूर्ण होऊन तें छापण्याचे काम चालू झाले आहे आणि त्याकरितांच मी येथे येऊन राहिलों आहें असें सांगितले. त्यावर त्यांनी संशोधन म्हणजे काय असा सहज प्रश्न केला. त्याची कल्पना त्यांना आणून देण्याकरितां, सुलभपणें त्यांना समजेल अशीं कांहीं पूर्वप्रकाशित पुस्तकांतील अशुद्धें दाखवून त्यांचे जुन्या ग्रंथाधारें शुद्धीकरण कसें केलें तें दाखविलें. त्यांत रावणाचे आयुष्य सहस्रकोटि नसून सहाकोटि असल्याचा लागलेला शोध ओघानुसार वर लिहिल्याप्रमाणे गणित वगैरे करून समजावून देण्यांत आला. तो ऐकून त्यांनीं मोठ्या आवेशानें म्हटलें-रावणाच्या आयुष्याबद्दल कल्याण-बसवेश्वराचें असेंच वचन आहे. त्यांनीं तें त्या वेळीं म्हणूनही दाखविलें व तत्काळ मी लिहूनही घेतले. ते कानडी वचन असें--
"वेदप्रियनु नम्म शिवनु अंदरे, वेदप्रियनु अल्ल । नादप्रियनु नम्म शिवनु अंदरे, नादप्रियनु अल्ल । वेद ओदिद ब्रह्मन शिरवु हरिदु होइतु व्याके ? | नाद माडिद रावणन 'आरुकोटि ' आयुष्य होगि, 'अरकोटि' आइत व्याके ? ॥ वेदप्रियनु अल्ल, नादप्रियनु अल्ल, भक्तिप्रिय नम्म कूडलसंगम देव ॥" इत्यादि.
(अर्थ)---आमचा शिव वेदप्रिय म्हणावा, तर वेदप्रिय नाहीं ; आमचा शिव नाद म्ह. गानप्रिय म्हणावा, तर गानप्रियही नाहीं. (हे कशावरून ? तर पाहा कीं)--जर तो वेदप्रिय असता, तर वेद म्हणणार्या (सर्व वेद ज्याच्या मुखोद्गत अशा) ब्रह्मदेवाचें पांचवें शिर तुटून गेलें तें कां ? गायन करणार्या रावणाचें, 'आरुकोटि' म्हणजे सहाकोटि आयुष्य जाऊन तें 'अरकोटि' म्ह. अर्ध कोटि झाले तें कां? (यावरून हेंच सिद्ध होतें की)--भगवान शंकर वेदप्रियही नाहीं गानप्रियही नाहीं, तर तो भक्तिप्रिय आहे. इत्यादि.* भिन्न प्रांतांतील भिन्नभाषेच्या एका धर्म संस्थापक थोर पुरुषाचें वचनही आपण शुद्ध केलेल्या पाठास अनुसरून असल्याचें मिळाल्यामुळे मला फार आनंद झाला आणि वरील आमचे मित्र श्रीशरणाप्पा स्वामी यांनाही मी सहाकोटीची उपपत्ति (वरीलप्रमाणे गणित करून) लावून दिलेली पाहून फार आनंद वाटला. त्यानंतर एक महिन्यानें 'दड्डी' प्रत आली. तींतही काढून पाहातां 'सहाकोटि' पाठच आढळला व माझा आनंद दुणावला. असो.
याप्रमाणें संशोधनाच्या या कामांत बहुमत प्रमाण धरून चालतां येत नाहीं हें सांगण्याकरितां वरील गोष्ट सांगितली. तशीच एक, पण त्यापेक्षांही भयंकर म्हणजे 'अर्थाचा अनर्थ' करणारी दुसरी एक गोष्ट सांगतों. अध्याय २८ मध्ये ७६ ओव्यांपर्यंत बहुतेक कर्मविपाक सांगितला आहे. त्यांत हीन जातींत जन्म होण्याची कारणें सांगितल्यानंतर अमुक वस्तूच्या चोरीपासून अमुक रोग होतो हें सांगतांना - "वस्त्र चोरी करी जरी । स्वस्त्री रोगी होय निर्धारी" असें एका नामांकित छापखान्याच्या प्रतींत आहे व हीच प्रत हल्लीं बहुतेक लोकांच्या वाचनांत असते. दुसर्या एक दोन प्रसिद्ध छापखान्यांच्या प्रतींत वस्त्रचोरी करी जरी । रोगी होय निर्धारी" असा पाठ आहे. इतर प्रत्येक चोरीला जर रोगाचें फळ सांगितलें आहे तर ह्या एकाच चोरीला तें कां सांगितलेलें असूं नये ? पण फक्त ‘रोगी’ असें म्हटलें कीं तंटाच मिटला ! कडगंची प्रतींत या ठिकाणीं 'स्वित्री रोगी' असें मिळालें. पण त्याचा अर्थ समजेना. तेव्हां इतर जुन्या लेखी पुस्तकांत ती ओंवी पाहूं लागलों. तों त्यांच्यांत ‘चित्ररोगी, नेत्ररोगी, स्छित्री रोगी, इत्यादि चमत्कारिक पाठ मिळूं लागले ! एकाचा मेळ एकास नाहीं. डोकें भणाणून गेलें. तेव्हां जवळच असलेल्या समश्र्लोकींत पाहिलें, तींत ‘वस्त्रापर्हता पतित: श्वित्ररोगार्दितो भवेत्’ असें मिळालें. पण श्वित्ररोग म्हणजे काय समजेना ; तेव्हां संस्कृत कोश काढून पाहिला. त्यांत श्वित्र म्ह. पांढरें कोढ (श्वेत कुष्ट) असा अर्थ मिळाला व मनाचें समाधान झालें. तात्पर्य, एकाद्याच प्रतींत एकादा पाठ मिळाला म्हणून तो उपेक्षणीय होत नाहीं. पण वरील ‘सहस्त्रकोटीच्या’ ऐवजीं ‘सहाकोटि’ व ‘स्वस्त्री’ च्या ऐवजीं ‘स्वित्री’ (हें लोकांना सांगतांना मी आतां एकेका मिनिटांत सांगूं शकतों, परंतु) हे पाठ ठरवितांना आमचा एकेक तास मोडला आहे ! २६।३६।३७ यांतील कित्येक ओंव्यांनीं तर आमचे दोन दोन तीन तीन तास खाल्ले आहेत ! हें दु:ख कोणाला सांगावें? ज्यांनी मजबरोबर बसून निरनिराळ्या प्रति पाहाण्याचे प्रेमानें कष्ट सोसले आहेत, व त्या वेळीं कुतूहलार्थ जवळ बसून ज्यांनी पाहिलें आहे, त्यांना हें माहीत आहे.
वर लिहिलेले अध्याय २६।३६।३७ यांच्या शुद्धिकरणास तर पारावारच नाहीं. हे अध्याय बहुतेक वेदऋचांनीं भरलेले असल्यामुळें त्यांत अज्ञान लेखकांकडून झालेला 'हस्तदोष' व व्याच्या भरतीला अर्धवट विद्वानांनी घातलेले 'जांवई शोध' काढून टाकतां टाकतां पुरेवाट झाली. हे तीन अध्याय माझ्या बुद्धीच्या टप्प्यांतले नव्हते व जुनीं लेखी पुस्तकें १०० मिळविलीं, तरी त्यांवरूनही हे अध्याय शुद्ध करणे अशक्यच होतें. त्यास चांगल्या वैदिक ब्राह्मणाचेंच साहाय्य पाहिजे होते. पण नुसता वैदिक किंवा नुसता शास्त्रीही या कामास अपुराच वाटू लागला. वेदपारंगत व शास्त्रपारंगत असाच कोणी तरी पाहिजे होता. तोही गुरुदेवांनी
----
* यावरून ही एक गोष्ट सिद्ध होते की रावण महान तपस्वी व शिवभक्तही होता. पण परस्त्री-अभिलाषानें त्याचं आयुष्य क्षीण झाले. मनुष्य कितीही धार्मिक अथवा देवभक्त असला तरी तो जर असत्याचरणी असेल, अनीतीनें द्रव्य अथवा इतर विषय मिळवील, तर सृष्टीच्या कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहात नाहीं हें कल्याणेच्छूनी पक्के ध्यानांत ठेवले पाहिजे.
----
मिळवून दिला. गोमांतकांतील प्रसिद्ध पंडित म. अनंत यज्ञेश्वर शास्त्री धुपकर हे तशा योग्यतेचे असल्यामुळें त्यांची मदत घेण्याचें मी ठरविले व त्यांनींही कृपा करून ती दिली. पांच सात वर्षांपूर्वी त्यांच्याकडून मीं २६ वा अध्याय दोन महिने लागून अर्धा तपासून घेतला होता. त्यानंतर त्यांना कांहीं दुसरीं कामें आलीं व मीही ‘नामचिंतामणी' च्या लेखनकार्यांस लागलों व गु. च. चें काम तसेंच राहून गेले. पण फावल्या वेळेस बाकीचे अध्याय मी हळूहळू पाहात होतोंच. प्रभुकृपेनें 'नामचिंतामणि' ग्रंथ शके १८५७ सालीं छापून पूर्ण झाला. त्यानंतर जिवावरचें एक मोठें दुखणेंही आलें, पण गु. च. चें काम माझ्याच हातून पुरें करून घेण्याचा श्रीगुरुदेवांचा ‘सत्यसंकल्प' होता. त्या सत्यसंकल्प-शक्तीस प्रतिबंध करण्याची काळाचीही शक्ति नसल्यामुळे मी त्या दुखण्यांतून पार पडलों आणि गु. च. च्या कामास यथाशक्ति सुरवात केली. बाकीचे अध्याय संपत आले. तेव्हां पूर्वी अर्धांमुर्धा तयार करून ठेवलेला २६ वा अध्याय शोधून काढून पाहातों, तर वाळवीनें ते सर्व कागद खाऊन सोडलेले दिसले! प्रत्येक छापी व लेखी पुस्तकांतील तेवढाच अध्याय वेगळा काढून ते सर्व एका निराळ्या दप्तरांत बांधून ठेवलेले होते. छापी पुस्तकांतील ते अध्याय खाऊन टाकल्याबद्दल फारसें वाईट वाटलें नाहीं, परंतु जुन्या लेखी पुस्तकांतील ते अध्याय खाऊन टाकल्याचे पाहून फारच वाईट वाटले. शिवाय या कागदांबरोबर, पूर्वी आम्हीं त्या अध्यायावर केलेले दोन महिन्याचे श्रमही फुकट गेले ! पण त्यास उपाय नव्हता. म. धुपकर शास्त्री यांच्याकडे पुनः गेलों. पण त्या वेळीं ते गुजरात प्रिंटिंग प्रेसच्या एकादशटीकासमेत भ. गीता या महत्तर संस्कृत ग्रंथाचे काम करण्यांत गुंतले होते. तो ग्रंथ तपासून त्यावर टिप्पण्या देण्याचें अप्रतिम काम त्यांनी चालविलें होतें (व अद्यापही तें चाललेंच आहे.) आसेतुहिमाचल-हिंदुस्थानांतील सर्व विद्वान त्याबद्दल त्यांची स्तुति करीत आहेत. औंधचे ‘पुरुषार्थ’कार पं. सातवळेकर यांनीं चालविलेलें वेदग्रंथप्रकाशनाचे काम सर्व आर्यावर्तातच नव्हे तर पाश्चात्य देशांतही प्रसिद्ध आहे. ते ग्रंथ तपासणार्या अनेक विद्वानांत आमचे मित्र पं. धुपकर शास्त्री हे अग्रेसर आहेत, परंतु ह्या कामामुळे आमच्या गु. च. चें काम करण्यास त्यांना वेळ मिळेना. याकरितां मी महाराष्ट्रांत इतर कोणी विद्वान मिळतो काय म्हणून तपास करूं लागलों. मध्यंतरीं श्रीक्षेत्र काशीस जाण्याचाही योग आला. काशी म्हणजे विद्येचें व पंडितांचे माहेरघर. चारी वेदांचे तेथे आहेत. तेथेंही २६ वा अध्याय तपासून मिळविण्याचा प्रयत्न केला, पण तो सिद्धीस गेला नाहीं. कारण चांगले वेदज्ञ व शास्त्रज्ञ झाले तरी संशोधनाची दृष्टि म्हणून निराळी असते, ती असावी लागते. शिवाय सोशिकपणा व चिकाटी (Patience and Perseverance) ही पाहिजे असते. मोठे विद्वान झाले तरी हे गुण त्यांच्या अंर्गी क्वचित् असतात. विद्वत्ता, शोधक दृष्टि व चिकाटी हे गुण असले तरी नियमितपणा व व्यवस्थितपणा हेही गुण असले पाहिजेत. हे गुण असल्या शिवाय मात्र ग्रंथसंशोधनच नव्हे, तर जगाला चमकविणारें असें कसलेच चांगलें काम त्यांच्याकडून होणें शक्य नसतें. तात्पर्य, एकांत एक गुण, तर दुसर्यांत तिसराच दोष, असा अनुभव सर्वत्र आला व मी निराश होत चाललों. सुदैवानें महान् वेदभक्त पं. सातवळेकर यांच्या भेटीचा योग आला. त्यांना मी गु. च. संशोधनाचा सर्व इतिहास सांगून २६ वा अध्याय तेवढा शुद्ध करून देण्याबद्दल विनंति केली. धुळ्याच्या शंकरराव देवाप्रमाणेच ग्रंथसंशोधनाची किंमत जाणणारे सातवळेकरही आहेत. त्यांनी या कार्याचा मोठा गौरव करून तो अध्याय आपल्याकडे औंधला पाठविण्यास आज्ञा केली. त्याप्रमाणें तो पाठविलाही. त्यांनीं तो एकदोन महिने ठेवून घेऊन योग्य त्या सूचना करून परत पाठविला. त्यांत शेवटची सूचना ही होती कीं पंडित धुपकर यांचाच निर्णय अखेरचा समजून त्यांजकडून हें काम करून घ्यावें. इत्यादि. गुरुचरित्र हा वेदगर्भ ग्रंथ आणि त्यांतील वेदऋचांचे हे २|३ अध्याय पूर्वस्थितींतच ठेवून छापणें मनाला योग्य वाटेना. माझ्या मनाची स्थिति जाणणार्या कांहीं मित्रांनीं सूचना केल्या कीं तुम्ही केलें हें पुष्कळ केलें आहे, हे एक दोन अध्याय थोडेसे अशुद्ध राहिले तर राहूं द्या, पुस्तक छापण्याच्या तयारीस लागा. इ०. हे ऐकून तसें करावें असें मनाला थोडे वाटूंही लागलें, पण असें करण्यास बुद्धि मनाला परवानगी देईना. शेवटीं, अनन्यगतीनें धुपकरनांच विनंति करावी लागली व कार्यांचें महत्त्व ओळखून ती त्यांनीं मान्यही केली. या कामास लागणारे सर्व ग्रंथ म्हणजे चारी वेदांच्या संहिता, ब्राह्मण, आरण्यकें, उपनिषदें, अष्टाविंशति स्मृति वगैरेंचा संग्रह (छापी व लेखी) त्यांच्या पुस्तकालयांत विपुल आहे. या पुस्तकांतील बाह्य ज्ञानापेक्षां त्यांच्या मेंदूंत जे ज्ञान परमेश्वरानें ठेवलें आहे ते अदृष्टपूर्व आहे. त्यांनी ह्या कामी जे श्रम घेतले आहेत ते माझ्यानें वर्णन करवत नाहींत. या अध्यायांचें राजांगण साफ करतांना जे खांचखळगे व खड्डे लागले, ते भरून काढण्यास त्यांना जे श्रम पडले त्याची यथार्थ कल्पना करून देण्यास त्यांच्याशिवाय दुसरा कोणी समर्थ नाहीं. हे जाणून या अध्यायासंबंधीं आलेले संशोधनाचे अनुभव थोडेसे लिहून देण्याबद्दल मी त्यांना विनंति केली, पण विनयामुळे म्हणा अथवा सवड नसल्यामुळे म्हणा त्यांनीं ती मान्य केली नाहीं. त्यास उपाय नाहीं. पण मला जेवढे सांगतां येईल तेवढे मी थोडक्यांत म्ह. ह्या शोधांतून थोडींशीं स्थळे दाखवून सांगण्याचा प्रयत्न करितों. स्थालीपुलाक न्यायाने तेवढ्यावरून विद्वान् लोकांना बाकीची कल्पना येईल अशी मला आशा आहे.
या (२६ व्या अध्यायांत ओं. ३४) 'पार-क्रम दोन्ही शाखा' असें आहे. पण सर्व छापी पुस्तकांत 'पराक्रमी' असेंच छापले आहे. येथें 'पार-क्रम' याचें 'पराक्रमी ' झालें आहे ! ही दुरुस्ती कोणत्या पराक्रमी पुरुषानें केली हें देवासच ठाऊक ! क्रम व पार हीं त्या शाखांचीं नांवें आहेत. हीं वेदांचे अध्ययन न केलेल्या नुसत्या शाख्याला माहीत असणें शक्य नाहीं. पुढें याच अध्यायांत (ओं. ६५) वेदाचीं 'षडंगें' सांगून झाल्यानंतर ६६ व्या ओंवींत 'उपांगे ' सांगण्यास आरंभ केला आहे. हीं उपांगें ८ आहेत. "प्रतिपद अनुपद देख । छंदस तिसरा परियेसा ॥६६॥" (यानंतर पुढील पांच अंगें पुढील ओंवींत श्री सांगितलीं आहेत तीं)---"भाषा, धर्म पंचम । मीमांसा, न्याय सप्तम । 'कर्मसंहिता' अष्टम । उपांगें हीं जाणावीं॥” (असें एकंदर छापी प्रतींत आहे.) यांत शेवटचें उपांग 'कर्मसंहिता' म्हणून आहे. या ठिकाणी कडगंची व इतर १|२ प्रतींत " तर्कसहित अष्टम । उपांगें असतीं परियेसा॥" असा पाठ मिळाला व हाच बरोबर आहे असे शास्त्रीबुवांचें मत पडलें. इतर प्रतींत 'तर्क' चे 'कर्म' झालें, आणि ' सहित' चें 'संहिता' रूप बनले ! अशा तऱ्हेचे लेखकाचे हस्तप्रमाद झालेले हुडकून ते बुद्धिसर्वस्व वेचून निश्चित करणें याचेच नांव 'संशोधन' नहून संशोधन म्हणजे नुसतें Proof-correction नव्हे. मागील छापी पुस्तकांत हें सुद्धां बरोबर झालेलें नाहीं ! ' Printer's Devils' म्हणजे मुद्राराक्षस यांचा नाच आमच्या हिंदी छापखान्यांत ठेवलेलाच आहे. कुठे नंगा नाच, तर कुठे थोडेसें अवयव झांकून ! पण नाच हा आहेच ! 'तर्कसहित' शब्द कुठे व 'कर्मसंहिता' शब्द कुठे ? समश्लोकींत या ओंव्याबद्दल "प्रतिपदं चानुपदं, छन्दःसंज्ञं ततः परम् । भाषा धर्मस्तदनु च, मीमांसा न्याय एव च । तर्क इत्यष्टकं ज्ञेयं उपांगानां क्रमेण हि" असे श्लोक आहेत.
याचे पुढील ओंवींत "परिशिष्टें अष्टाविंश असतीं ऐका विशेष" असें आहे. "परिशिष्टें अष्टादश" असेंच पाहिजे. सर्व छापी पुस्तकांत 'अष्टाविंश' किंवा 'अठ्ठावीस' असें आहे. लेखीप्रतींमध्यें 'अष्टादश' आहे. समश्लोकींतही “अष्टादश तथोक्तानि, परिशिष्टानि तानि च" असें म्हटलें आहे. हा शोध किती महत्त्वाचा आहे तो पाहा. ह्या परिशिष्टांचीं नांवें पुढील ओव्यांत ग्रंथकाराने दिलीं नाहींत. करितां तोही संशय राहूं नये म्हणून 'चरणव्यूह' ग्रंथामधून तीं नांवें शोधून काढून टीपेंत दिलीं आहेत. नसलेस 'अष्टादश' हाच पाठ कां चुकून पडूं नये असेंही वाटण्याचा संभव !