भास्कर ब्राह्मणानें श्रीगुरुंना भिक्षा करण्याच्या उद्देशानें तिघांपुरत्या आणलेल्या अन्नसामुग्रींत चार हजार लोकांना श्रीगुरुनी जेवूं घातले, अशी त्यांची 'कर्तुमकर्तुमन्यथा कर्तुं शक्ति आहे, याप्रमाणें त्यांच्या सामर्थ्याच्या अशा अशा गोष्टी आपण अथवा लोकांनी पाहिल्या असें सांगतांना सिद्धांनी मागील अध्यायांतील गोष्टींच्या बरोबर पुढील अध्यायांतील कांहीं गोष्टीही लोकांच्या तोंडांत घातल्या आहेत. यावरून हा (३८ वा) अध्याय त्या पुढील अध्यायांच्या नंतरचा असावा असे कित्येकांना वाटते; पण हे बरोबर नाहीं. कारण कोणत्याही जुन्या हस्तलिखित प्रतींत असा आधार सांपडत नाहीं. दुसरें, सरस्वती – गंगाधर हा मागच्या पुढच्या गोष्टींचें बरोबर अनुसंधान राखून लिहिणारा विद्वानसा लेखकही नाहीं. तो एक साधा भोळा श्रीगुरूंचा भक्त होता. त्याच्या लेखनांत इतक्या काटेकोरपणाची अपेक्षाही आपण करतां कामा नये. त्यानें श्रीगुरूंच्या निरोपानें यथामति लिहिले व श्रीगुरूंना ते आवडलें एवढेंच आपण धरून चालले पाहिजे.
याप्रमाणे यांतील गोष्टींचा उहापोह करीत गेल्यास ग्रंथ फार वाढेल व त्याचा श्रद्धाळू लोकांना फारसा उपयोगही नाहीं. श्रीगुरूंचा कालनिर्णय करण्याचें 'कामही मी करीत नाहीं. कारण तो माझा विषय नव्हे. दुसरें, अनेक विद्वान् लोकांनीं ह्या गोष्टीवर यापूर्वी पुष्कळ चर्चा केलेली लोकांत प्रसिद्ध आहे. आपल्या आरंभींच्या पुरस्कारांत श्रीयुत 'अप्रबुद्ध' यांनींही याबद्दल थोडेंस लिहिले आहे. तसेंच श्री. पांगारकर यांनींही आपल्या 'मराठी वाङ्मयाचा इतिहास ' खंड २ रा या * पुस्तकांत याबद्दल चर्चा केलेली आहे. तिसरें, गीता किंवा गुरुचरित्रासारखे ग्रंथ ज्या उद्देशाने निर्माण झाले, तो उद्देश साधण्याकरितां त्यांत सांगितलेल्या तत्वांचानअभ्यास करणें हीच मुख्य गोष्ट आहे. (तथापि कालनिर्णयासारख्या गोष्टी अगदींच निरुपयोगी असे मी म्हणत नाहीं. तत्त्वान्यास करण्याला कालादिकाचें अज्ञान आड येत नाहीं एवढेच माझें म्हणणं आहे.) श्रीरामकृष्ण परमहंसांनी म्हटल्याप्रमाणे- आंब्याच्या झाडाला सुंदर आंबे लागलेले व ते पिकलेले दिसत आहेत, तर एकदम तोडून खाऊं लागावे. झाड कोणीं लावले असेल, कधीं लावलें असेल, खत कसलें घातले असेल, याच्या खोडाचा व्यास किती, उंची किती, वरील फांद्या किती आहेत, पानें किती आहेत, याला फुलें केव्हां आलीं, फळे किती व कधीं लागलीं वगैरेचा हिशेब करीत काळ घालवू नये. फळाला हात घालावा, त्यावर धुरळा बसलेला असेल किंवा कुठे कीड बीड दिसेल तर ती काढून टाकावी व खाण्यास आरंभ करावा. त्यानेंच पोट भरणार आहे. श्रीसिद्धारूढस्वामीही म्हणत की- ग्रंथाच्या अभ्यासापेक्षां ग्रंथांतील तत्त्वाचा अभ्यास करणेंच लाभदायक आहे. ग्रंथकालशोधन किंवा शब्दशोधन करण्यापेक्षां ग्रंथोक्त तत्वशोधन करणें व त्याचा अभ्यास करूं लागणेंच मुमुक्षूच्या हिताचे आहे. इत्यादि.
तात्पर्य, वर सांगितल्याप्रमाणें, या गुरुचरित्ररूपी 'कल्पतरू'च्या अमृतफलांवर काळाच्या ओघांत बसलेली धूळ वगैरे झाडून तीं फलें साफसूफ करून श्रीगुरूंच्या प्रियतम बालकांच्या - गुरुचरित्रवाचकांच्या हातीं देण्याचा प्रयत्न श्रीगुरूंच्या प्रेरणेवरून अथवा आज्ञेवरून मीं केलेला आहे. नव्हे, त्यांनी ज्याप्रमाणें सरस्वती-गंगाधराकडून चरित्रग्रंथ वळेंच करून घेतला, त्याप्रमाणेंच त्याच्या संशोधनाचा हा प्रयत्न मजकडून बळेंच करून घेतला आहे, एवढेच सांगून मी पुढच्या कार्यास लागतों.
आतांपर्यंत श्रीगुरुचरित्रांतील वचनें म्हणजे त्या 'अमृतकथाकल्पतरूचीं' फळें झाडून पुसून साफसूफ करण्यास कसे श्रम पडले अथवा त्या प्रभूंनी ते कसे करविले व त्यास पड्याच्या आंत राहून कशी मदत केली हे विस्ताराने सांगितलें, यानंतर तसा विस्तार न करितां पूर्वप्रकाशित ग्रंथांतील कांही शब्दांचे प्रस्तुतच्या संशोधित प्रतींत कसे अथवा किती चांगले रूपांतर त्यांनी करविलें आहे तें संक्षेपाने सांगतो. त्यानंतर सरस्वती-गंगाधराच्या भाषेचे व लेखकाच्या हस्तप्रमादाचे थोडेसे नमुने सांगून मग ज्यांच्या ज्यांच्याकडून था समुद्रमंथनास साहाय्य झालें त्यांचे नामनिर्देशपूर्वक कृतज्ञतेनें आभार मानून हा लांबलेला प्रस्तावनात्मक लेख संपवितों.
काशीयात्रेच्या अध्यायामधील काशीतील अनेक लिंगांची नावे आमच्या प्रतीत कडगंची प्रतीच्या व मूळ संस्कृत 'काशीखंडा'च्या आधारे सुधारलीं आहेत. कारण या यात्रेसंबंधाचा विचार---"विस्तार काशीखंडासी । असे ऐक ब्रह्मचारी" (पृ. ५३९, ओं ३६२) असे सरस्वती-गंगाधराने मूळ ग्रंथांतच म्हणून ठेवलें आहे. (पुढील लिंगांच्या नांवांमागील आंकडे या आमच्या प्रतींतील ४१ व्या अध्यायांतील ओंव्याचे समजावे व तसेंच जाडें अक्षर आमच्या प्रतींतील शब्दाचें बारीक अक्षर जुन्या छापी प्रतींतील शब्दाचें समजावें कियेक ठिकाणी मूळ काशीखंडामधून संस्कृत लोकांतील प्रमाणें टीपेंत दिली आहेत ती पाहावीं. म्हणजे संशय नाहीसा होऊन खात्री होईल.)
(ओ. १६३) कंबळाश्वतर—कंबळेश्वर
(" ३६८) तटाकतीर-तटाकेश्वर )
(" ") कीकलेश्वर- किंकरेश्वर
(" १७१) वीरेश्वरा - विश्वेश्वरा
(,, १७२) विद्येश्वर – विघ्नेश्वर
("१७६) ब्राह्मीश्वर-मह्येश्वर
(" १७८) लांगलीश्वर - लांगूलेश्वर
(" २३५) सतीश्वरा-सीतेश्वरा
(ओ. २४०) जैगेश्वरासी---ईशानेश्वरासी
(" २५६) पिलिपिला - कपिला०
(" २७३) मणिकर्णिकेश्वरासी-ईश्वरासी
(" २९१) समागमें भैरवीसी-संगमेश्वरा
भरवंसी
(" २९३) वीरभद्रेश्वर — विश्वेश्वर
(" २९७) द्यावाभूमी - भूमीदेवी
(ओ. २९८) नहुपेश्वर - नकुळेश्वर
(" ३००) देवसंघेश्वर — देवसिद्धेश्वर
(" ") पाशपाणी- पशुपाणि
(" ३०१) यूपसरीं- शरयूप
(" ३४९) आझीधेश - आग्निवेश
(" ३५४) मुखनिर्माळिका---मुख्य भाळ नेत्रिका
इत्यादि इत्यादि इत्यादि
पुढील अध्यायांतील शोध वाचकांनींच तेथे तेथे पाहून घ्यावे अशी मी विनंति करितों.