मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
अपूर्व वैशिष्ट्य

गुरूचरित्र - अपूर्व वैशिष्ट्य

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


( लेखक - ह. भ. प. दिगंबरदास कामत, माशैल - गोवा )

(१) "अचिन्त्याः खलु ये भावा न तांस्तर्केण योजयेत् । " (म्हणजे अगाध पण प्राकृत बुद्धीपलीकडील गोष्टींची सूक्ष्म चिकित्सा तर्ककर्कश दृष्टीनें करूं नये. कारण त्यायोगें समाधान होऊं शकत नाहीं.) वरील शीर्षकाचा विषय योग्य अशा विस्तारानेच अधिक अधिकारी व्यक्तीनें लिहिला पाहिजे होता, पण प्रकाशकांनीं कां कोण जाणे, ती जबाबदारी मजवरच सोंपविल्यामुळे दिलेल्या ठरीव पृष्ठांच्या मर्यादेतच हात आखडून कां होईना पण मनापासून प्रेमानें लिहीत आहे. ("यदत्रासौष्टवं किंचित् तन्ममैव गुरोर्न हि ।")
(२) परमात्म्याचे अनंत गुण, अनंत शक्ति, त्याचप्रमाणे अवतारही अनंत आहेत. ह्या अवतारांत अंशावतार, कलावतार, आवेशावतार, आविर्भावावतार, स्फूर्तिअवतार व पूर्णावतार, इत्यादि भेद गर्गसंहितादि ग्रंथांत सांगितले आहेत. यांतही पुन्हा 'शक्तिरूप' अवतार व 'व्यक्तिरूप' अवतार असे दोन भेद आहेत. श्रीराम-कृष्णादि अवतार आतां शक्तिरूपानें आहेत व कूर्म-वराह-परशराम-दत्त हे व्यक्तिरूपानें आहेत. अर्थात् कौसल्या - देवकी प्रभृति मातांच्या उदरीं जन्मलेल्या किंवा तसें म्हणण्यापेक्षां त्यांच्या मांडीवर खेळलेल्या अथवा रावण-कुंभकर्ण-कंस-शिशुपालादिकांचा स्वहस्ते संहार करणार्‍या भगवदवतारांचे ते दिव्य श्री लीलाविग्रह (शरीरें) आतां जगावर प्रत्यक्ष नाहींत. पण व्यक्तिरूप अवतारांमधील (श्रीरामावताराच्याही पूर्वी म्ह. आद्य कृतयुगांत अनिअनसूयाश्रमांत त्या दांपत्याच्या बहुकालीन तपश्चर्येमुळे प्रादुर्भूत झालेला) श्रीदत्तावतार मात्र त्याच दिव्य शरीरानें आज हयात आहे व तो कल्पांतापर्यंत असाच राहाणार. म्हणून यास 'अविनाश- अवतार' अशीही संज्ञा आहे. श्रीराम दण्डकारण्यास गेल्या वेळीं अत्रिआश्रमांत श्रीदत्तात्रेयांची व त्यांची भेट झाली. त्या वेळचें वर्णन श्रीधरस्वामींनीं आपल्या रामविजय ग्रंथांत तेराव्या अध्यायांत मोठ्या बहारीनें केलेलें आहे. त्यांत ते श्रीदत्तावताराविषयीं म्हणतात -

अवतारही उदंड होती । सवेंचि मागुती विलया जाती । तैशी नव्हे श्रीदत्तात्रेयमूर्ति । नाश कल्पान्तीं असेना । पूर्ण ब्रह्म मुसावलें । तें हें दत्तात्रेयरूप ओतिलें । ज्याचे विलोकनमात्रै तरले । जीव अपार त्रिभुवनीं ॥" इ०.

श्रीगुलाबरावमहाराज आपल्या 'प्रियलीलामहोत्सव' ग्रंथांत श्रीमद्भागवतोक्त २४ अवतारांविषयीं सांगतांना म्हणतात--- (अभंग)
सहावा सुंदर सर्व विश्वा गुरु | अत्रीचा कुमरु दत्तात्रेय ॥८॥
अनसूयातर्फे जाहला जो प्राप्त । जीवा उद्धरीत एकसरां ॥९॥
न होय जयाचें मोघ दरुशन | कृपावंत पूर्ण दीनानाथु ॥१०॥
नाना अवतार होउनियां गेले । दत्तत्व संचलें जैसें तैसें ॥१२॥
अनंत कालाचा अनंत भावाचा । अनंत जीवाचा कनवाळु ॥१३॥
अलर्कराजाला दिलें आत्मज्ञान । प्रल्हादहि जाण शिष्य ज्याचा ॥१४॥
यदु, हयहय, मत्स्येंद्र, गोरख, । संप्रदाय साक्ष जेथूनिया ॥१५॥
महाराज तोचि सहावा अवतार | कार्तवीर्यां वर ज्याचा होता ॥१६॥
इत्यादि. अशा या अवतार-विग्रहाची उपासना गुरुभावनेनें केल्यास कलियुगांत त्वरित फलद्रूप होते. स्वप्नांत व प्रत्यक्षही दर्शने पुष्कळांस होतात.
----
मदालसेचा पुत्र अलर्क, तसेच प्रल्हाद, यदु (श्रीकृष्णाचा पूर्वज) व हयहय म्ह. सहस्रार्जुन हे श्रीदत्ताचे पूर्वयुगांतील शिष्य होत.
----
(३) परमात्मा हा अनंतशक्तिमान् एकमेवाद्वितीयच आहे. पण निरनिराळ्या वेळीं निरनिराळ्या कार्याच्या संकल्पानें निरनिराळ्या शक्ति घेऊन निरनिराळ्या रुपानें तो प्रगट होत असतो. आपल्या अत्युच्च श्रेष्ठ व सूक्ष्म अशा महेश्वरभावांतून जगत्कारणाकरितां स्थूल अशा मानुषादि भावाचा तो आश्रय करितो, तेव्हां व्यास' 'अवतरण' (खालीं उतरणें) म्हणतात. व्यावहारिक दृष्टीनें स्थूल व कनिष्ठ भावाचा त्याने आश्रय केलेला दिसला तरी त्याचा मूळचा 'श्रेष्ट महेश्वरभाव' नाहींसा होत नाहीं, पण मूढ लोक हें जाणत नाहींत. राजा किंवा गव्हर्नर आपल्या सिंहासनावरून उतरून किंवा राजधानीच्या बाहेर पडून प्रजेचीं गाऱ्हाणीं ऐकून घेण्याकरितां एकाद्या खेड्यांत येऊन खेडवळ लोकांत उभा राहिला, त्यानें आपला राजेशाही पोषाख टाकून लोकांसारखा साधा पोषाखही केला, तरी त्याची योग्यता जशी कमी होत नाहीं, तशीच परमात्मा स्थूल सृष्टींत सगुणरूपानें आला तरी त्याची योग्यता कमी होत नाहीं. हें तत्त्व जे लोक जाणतात, ते परमात्मा कोणत्याही रूपाने अवतरला, तरी तात्कालिक रूपभेदामुळे त्याच्या मूळच्या श्रेष्ठ स्वरूपांत भेद पाहात नाहींत. ते कोणत्याही अवताररूपाला सारख्याच प्रेमानें भजतात. पण हें तत्त्व न जाणणारे लोक अज्ञानानें भिन्न उपासनेच्या लोकांबरोबर भांडतात. इतकेंच नव्हे, तर स्वोपास्यभिन्न अवताराचाही केव्हां केव्हां तिरस्कार अथवा अवहेलना करतांना दृष्टीस पडतात ! अशा वर्तनानें आपण खुद्द परमात्म्याचाच द्वेष व तिरस्कार करितों हें त्यांच्या लक्षांत येत नाहीं. उत्तर हिंदुस्थानांत रामोपासक व कृष्णोपासक यांच्यामध्ये डोकेंफोडीपर्यंत तंटे होत असल्याचे समजतें, श्रीकबीरदासांचें या तंट्यावर एक विनोदपर पदही प्रसिद्ध आहे. श्रीरामकृष्ण- परमहंसांनी याच गोष्टीस अनुलक्षून दिलेला एक दृष्टान्त चिंतनीय आहे. ते म्हणतात, कुत्रा हें जनावर आपल्या धन्याला पाहिजे त्या पोषाखांत पाहिजे तेव्हां ओळखूं शकते व त्याच्याजवळ जाऊन त्याचे पाय चाटते, परंतु मनुष्य असून आपल्याहून भिन्न उपासनेच्या परमेश्वरस्वरूपाला मानण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास तयार असत नाहीं ! इत्यादि. तात्पर्य, उपासनादार्ढ्याकरितां कोणताही एक अवतारविग्रह स्वीकारला तरी, परमात्म्याचे सर्व अवतार सर्व भक्तांना सारखे वंद्य असतात. हें श्रीज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास या साधुवर्यांनीं सर्व अवतारस्वरूपांना उद्देशून आपल्या कवितेंत अत्यंत पूज्यतेचे उद्गार काढले आहेत, यावरून समजून येते.
(४) पण कोणी कितीही ज्ञानी अथवा साधु झाला तरी त्याच्यावर सर्वांची सारखी निष्ठा बसत नाहीं, ही सर्वांच्या अनुभवाची गोष्ट आहे; आणि म्हणूनच अनेक साधूंची भिन्न संप्रदायी लोकांकडून निंदा होत असते आणि त्यामुळे सामान्य भाविक लोकांच्या श्रद्धेची बठक बसण्यास मोठा प्रतिबंध होतो. असें होऊन ज्यांचा कोणाही मनुष्य-गुरूवर विश्वास बसत नसेल व स्वोद्धाराकरितां गुरूची गरज भासत असेल, त्यांनीं मागें सांगितल्याप्रमाणे परमात्म्याच्या या 'दत्त' स्वरूपाची भक्ति करावी, म्हणजे त्यांचे मनोरथ लवकरच पूर्ण होतील. "सद्गुरु व्हावा तुज रे। श्रीदत्तासी भज रे॥” असे एका भक्ताचे अनुभवाचे उद्गार आहेत. श्रीदत्त हा परमात्म्याचा 'गुरु' -अवतार होय. परमात्म्याचे इतर अवतार हे इतर कार्यांच्या संकल्पानें झाले आहेत, तसा श्रीदत्तावतार हा गुरुकार्याच्या संकल्पाने झालेला आहे. म्हणून त्याचें नांव घेतांना 'श्रीगुरुदेव' असें प्रथम म्हणून नंतर 'दत्त' असें म्हणत असतात, ही गोष्ट लक्षांत ठेवण्यासारखी आहे. 'दत्त' नांवाच्या मार्गे 'श्रीगुरुदेव' असे विशेषण असतें. पण अतिपरिचयामुळे हे बहुधा कुणाच्या लक्षांत येत नाहीं. आतां हिरण्याक्ष-हिरण्यकश्यपु, रावण- कुंभकर्ण किंवा शिशुपाल वक्रदंत यांचा नाश हें मुख्य प्रयोजन धरून, इतर दैत्यांचा नाश व भक्तजनांचा उद्धार हीं इतर कार्येही त्या त्या अवतारांनी केली आहेत; त्याप्रमाणें 'अज्ञानाचा नाश करून ज्ञान देणें' हें श्रीगुरुदेवांचे मुख्य प्रयोजन असून भक्तांच्या इतर कामना पूर्ण करणें हेंही त्यांचे अन्य कार्य आहे. श्रीरामकृष्णादि
----
अवजानान्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् । परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥" - (म.बी., अ. ९1११)
----
अवतारांचें कार्य मर्यादित कालाचें होते आणि म्हणून ते कार्य संपतांच ते ते अवतार निजधामास गेले, पण श्रीगुरुदेवाचे कार्य मर्यादित कालाचे नाही. रावण-कुंभकर्णादि असुर हे एका जन्मांतच लोकांना छळणारे होते, पण कामक्रोधादि असुर हे जन्मोजन्मीं छळणारे आहेत ; आणि सृष्टि अनंतकाळ राहाणारी असल्यामुळें अनंत जीवराशीमध्यें अनंत मुमुक्षु उत्पन्न होणारे असतात, तेव्हां त्यांचा अविद्या-अंधकार नाहींसा करून त्यांचा उद्धार करण्याचे कार्य अनंतकाल चालावयाचे. यासाठीं, याच 'मूळ' संकल्पानें श्रीदत्त अवतरले असल्यामुळे ते त्याच 'दिव्य' देहानें आज वावरत आहेत. त्यामुळे 'कलियुगांत दत्त हाचि देव राहिला' असें भक्तजन त्यांना गातात. याचा अर्थ कलियुगांत इतर अवतारांची मातब्बरी नाहीं असा घ्यावयाचा नाहीं. सर्व अवतार सारख्याच योग्यतेचे व तत्तदुपासकांस तेवढ्याच महत्त्वाचे आहेत; पण वरील वचनांत ' राहिला' हा शब्दच चिंतनीय आहे. (याचा अर्थ वर आलाच आहे.) इतर अवतारोपासक भाविकांसच काय, पण दत्तोपासकांपैकी कित्येक विद्वान् बुद्धिमंतांच्याही हें रहस्य लक्षांत येत नाहीं, असा अनुभव अनेक ठिकाणीं अनेकदां आम्हांस आलेला आहे हें येथें कष्टानें पण मुद्दाम नमूद करून ठेवावेसें वाटतें. अस्तु.
(५) श्रीदत्तगुरूंचें मुख्य कार्य जीवांचा 'अविद्यानाश करून ज्ञानदानानें उद्धार करण्याचें' असले तरी, मार्गे सांगितल्याप्रमाणे भक्तांच्या कामनेनुसार प्रापंचिक सुख देणें हेंही त्यांचे कार्य आहे. 'अनसूयागर्भरत्नं भोग-मोक्षसुखप्रदः' असें त्यांच्या सहस्रनामांत आहे. यावरून वरील सिद्धान्त अधिक स्पष्ट होतो. श्रीदत्त हे आपल्या भक्तांना भोग व मोक्ष दोन्ही देतात. परंतु कांहीं अज्ञानी लोक दत्त म्हणजे संन्यासी आहे असें समजून त्याची उपासना केल्यास आपल्या प्रपंचाचा नाश होईल असे मानून दत्ताचें नांवही घेण्यास भीत असतात ! या त्यांच्या अज्ञानाची कींव करावी तेवढी थोडी वाटते. संन्यासी होते ते श्रीदत्तावतारी श्रीनृसिंहसरस्वती स्वामी. हा अवतार या कलियुगांत चारपांचशे वर्षांपूर्वी होऊन गेला. यांचेच चरित्र 'श्रीगुरुचरित्र' ग्रंथांत वर्णिले आहे. ते संन्यासी होते, तथापि श्रीदत्ताच्या म्हणजे परमात्म्याच्या त्या संन्यासी रूपाची भक्ति केली म्हणून तो भक्त प्रपंचशून्य असा संन्यासी होईल असें कां मानावें बरें ? संन्याशाची भक्ति केली म्हणजे जर संन्यासी होतो, तर त्याच परमात्म्याच्या रामरूपाची भक्ति केली असतां रामाच्या पत्नीप्रमाणे या रामभक्ताचीही पत्नी कोणी दुष्ट हरण करील व रामाप्रमाणे यालाही चौदा वर्षे वनवास प्राप्त होईल म्हणून, आणि कृष्णाची भक्ति केली असतां कृष्णाच्या कुलाप्रमाणें या कृष्णभक्ताच्या कुळाचाही नाश होईल म्हणून श्रीरामाची व कृष्णाची उपासना करूं नये असें ठरेल ! केवढे अज्ञान हें ! श्रीरामानें बिभीषणाला लंकेचें राज्य व सुग्रीवाला किष्किंधेचें राज्य दिलें, तसेंच कृष्णानें दरिद्री सुदाम भक्ताला सुवर्णनगरी दिली, हीं उदाहरणें कां बरें घेऊं नयेत ? त्याचप्रमाणे, श्रीआत्रेय-दत्ताचें मूळ अद्भुत व मंगळ चरित्र एका बाजूस राहूं द्या (कारण पुष्कळांना तें माहीतही नाहीं); पण श्रीगुरुचरित्रामधील दत्तावतारी श्रीपादवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांनीं एका रजकाला राजा बनविलें, एका गरीब ब्राह्मणास त्याच्या अंगणांतील घेवढ्याचा वेल उपटून टाकून त्याच्या मूळांत असलेला सोन्याच्या मोहरांचा कुंभ दिला, तसेंच एका साध्वीचा मृत पति जिवंत करून तिला सौभाग्य दिलें, एका साठ वर्षांच्या वांझेस कन्या-पुत्र दिले, हीं उदाहरणें कां बरें घेऊं नयेत ? तात्पर्य, परमात्म्याचे सर्व अवतारविग्रह कामधेनु–कल्पतरूप्रमाणें निजभक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असतात. हे सामर्थ्य इतर देवतांच्या ठिकाणीं नसतें. म्हणून सुजाण भक्तांनीं केव्हांही 'थोरल्या देवाला' च भजले पाहिजे. आतां सकाम भजनापेक्षां निष्काम भजन म्हणजे उपासना अत्यंत श्रेष्ठ आहे खरी, तथापि हें सामर्थ्यं सगळ्यांचे नसतें. पण सकाम उपासना झाली तरी थोरल्या देवाची म्हणजे भगवंताचीच केली पाहिजे. कारण त्याच्या ठिकाणीं काम पुरवून मोक्ष देण्याचीही शक्ति असते. भगवान् भागवतांत म्हणतात---
" धर्म-अर्थ-कामवासना । असोनि लागल्या मद्भजना । तरी तेही पुरवूनियां जाणा । सायुज्यसदना मी आणी ॥
काम पुरवूनि द्यावया मुक्ति । काय माझे गांठीं नाहीं शक्ति । मी भक्तकैवारी श्रीपती । त्यासी अधोगति कदा न घडे ॥" (ए. भा., अ. २९)
(६) श्रीदत्तपरमात्मा हे अनसूयेच्या पातिव्रत्य प्रभावानें तिच्या घरीं प्रगट झाले, याची तात्कालिक निमित्तें निरनिराळी ऐकूं येतात. (दत्तजन्माच्या कथा निरनिराळ्या पुराणांत निरनिराळ्या आढळतात). 'कल्पभेदात्कथाभेदः ' असें त्याचें समाधान मानतात, पण तीन्ही देव ( ब्रह्मा-विष्णु-महेश्वर) अविआश्रमामध्ये अंशरूपाने अवतरले, ही गोष्ट निरनिराळ्या सर्व कथांमध्यें समानपणें दृष्टोत्पत्तीस येते, त्यांपैकी ब्रह्मदेवाचा अंश सोम (चंद्र), विष्णूचा अंश दत्त व शंकराचा अंश दूर्वास होय. याप्रमाणें ह्या तीन मूर्ति अत्रिपुत्र म्हणून 'आत्रेय' होत. दशरथाचा पुत्र दाशरथी किंवा वसुदेवाचा वासुदेव, अथवा कुंतीचा पुत्र कांतेय, याप्रमाणें अत्रीचा पुत्र 'आत्रेय' होय. हे आत्रेय तीन झाले. सोमात्रेय, दत्तात्रेय व दुर्वासात्रेय. ('आत्रेय' शब्दाची व्युत्पत्ति न कळल्यामुळें अनेक सुविद्य लोकही 'दत्तात्रेय' म्हणण्याऐवजी 'दत्तात्रय' असें म्हणतात व लिहितात, ही चूक आहे.) पैकीं दत्तात्रेय हा खरोखरी विष्णूचाच अवतार होय. श्रीमद्भागवतांत महाविष्णूच्या चोवीस अवतारांचें वर्णन आहे त्यावरूनही हें स्पष्ट होतें. तथापि, तीन्ही देव वर लिहिल्याप्रमाणें अत्रिआश्रमांत प्रगट झाल्यानंतर व्रतबंध झाल्यावर कांहीं दिवसांनीं चंद्र व दूर्वास यांनीं अनसूयामातेचा निरोप घेऊन प्रयाण केलें. त्यांना निरोप देतांना अनसूया मातेच्या चित्तास फारच व्यथा झाली, त्या वेळीं उभयतांनींही आम्ही दत्ताच्या स्वरूपांत अंशरूपानें राहातों असे सांगून व तिची खात्री करून देऊन निरोप घेतला. तेव्हां दत्ताच्या रूपांत तीन्ही देवांचे अंश आहेत व त्याकरितांच त्यांना त्रैमूर्ति-अवतार' असें म्हणण्याचा परिपाठ पडला आहे; पण ह्या त्रैमूर्तित्वाकरितां म्हणून त्यांना 'दत्तात्रय' म्हणणं हें शुद्ध अज्ञानाचें आहे हें लक्षांत ठेवावें व 'दत्तात्रेय' असे म्हणत व लिहीत जावें. श्रीदत्तात्रेयामध्यें तीन्ही देवांचे अंश असल्याचें त्यांच्या खालील ध्यानश्लोकांत वर्णन आहे---
“मालाकमंडलुरधः करपद्मयुग्मे, मध्यस्थपाणियुगले डमरुत्रिशूले ।
यस्य स्त उर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे, वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कक्तम् ॥”
याचा अर्थ "माला व कमंडलु ज्याच्या 'खालच्या' दोन हातांत आहेत, डमरू व त्रिशूल हीं ज्याच्या 'मधल्या' दोन हातांत आहेत, आणि शंख व चक हीं ज्याच्या अगदी 'वरच्या' हातांत आहेत अशा त्या अत्रिवरद (अत्रिमुनीला वर देणाऱ्या) षड्भुज मूर्तीला मी वंदन करितों" असा आहे. ह्या श्लोकांतील ध्यानाप्रमाणे आयुधांचा विचार केला असतां खालच्या हातांतील 'माला' व 'कमंडलु' हीं ब्रह्मदेवाचीं चिन्हें, मधलीं 'डमरू' व 'त्रिशूल' हीं शंकराचीं, आणि वरचीं 'शंख' व 'चक्र' हीं विष्णूचीं आहेत हें स्पष्ट होतें. श्रीदत्ताच्या ध्यानाचे श्लोक अनेकविध मिळतात, तेही चांगलेच आहेत; पण रूपध्यानाचा वरील श्र्लोकच सर्वसंमत व शास्त्रोक्त आहे असें समजावें. अनेक प्रख्यात चित्रकारांनीं दत्ताचीं सुंदर सुंदर चित्रें काढलीं आहेत, परंतु तीं वर लिहिल्याप्रमाणे शास्त्रोक्त ध्यानानुसार नसून हातांतील आयुधें चुकलेलीं अशीं आहेत. 1
श्रीक्षेत्र काशी येथे वरील ध्यानाच्या, पण एकमुखी सहा हातांच्या मूर्ति असलेलीं प्राचीन व अर्वाचीन देवालयें आहेत. त्या मूर्तीच्या पायांकडे तिघांची तीन वाहनें हंस, गरुड व नंदी अशींही दाखविली आहेत. श्रीक्षेत्र पंढरपूर येथेही एखमुखी सहा हाती दत्ताची मूर्ति असलेलें देवालय आहे. हात व आयुधें यांचा क्रम तोच; पण कित्येकांना एकमुखी दत्ताचें ध्यान आवडते तर कित्येकांना त्रिमुखी ध्यान आवडतें, दोन्हीही शास्त्रोक्तच आहेत. (परमपूज्य श्रीमद्वासुदेवानंद महाराज व श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री यांना एकमुखी सहा हाती ध्यानच आवडत होतें असें सांगतात.)
----
श्रीक्षेत्रकाशी येथील प्रसिद्ध सत्पुरुष परमपूज्य श्रीब्रह्मानंद सरस्वतीस्वामींनी मुद्दाम सूचना देऊन काढविलेलें श्रीदत्ताचें अतीव सुंदर रंगीत चित्र घाटकूपर येथील रविउदय व विजय प्रेसनें छापलेलें आहे. त्याच प्रख्यात वि. सी. गुर्जर या श्रीदत्तभक्त चित्रकाराकडून या यु. च. प्रतीमधील पहिल्या अध्यायांतील प्रारंभीचें रंगीत चित्र काढून घेतले आहे.
----
(७) याप्रमाणें श्रीदत्तदेवांत तीन्ही देवांचें अधिष्ठान नांदत असल्यामुळें हा अवतार शैव व वैष्णव इ. कोणाही सांप्रदायिकास सारखाच प्रेमास्पद वाटतो. ब्रह्मा-विष्णु-महेश्वर हे रज-सत्व-तमप्रधान देव होत. ह्यांच्यांतील सत्त्व हें 'शुद्ध सत्त्व' नसून 'मिश्र-सत्व' आहे. पण श्रीदत्तावतार हा 'शुद्धसत्वमय' व 'अविनाशी' आणि 'सद्गुरु-स्थानापन्न' असल्यामुळें सर्व सिद्ध-मुनि-साधुसंतमहात्म्यांना एक प्रकारचा विशेष आदरणीय वाटतो. श्रीदत्तात्रेयाचा अवतार आद्य कृतयुगांत झालेला असून त्याच देहानें ते पृथ्वीतलावर आज सवराभरित नांदत असल्यामुळें सर्व युगांतील - युगचौकड्यांतील महात्म्यांना त्यांचे पुण्यदर्शन झालेले आहे. चालू म्हणजे (श्वेतवराह- कल्पांतील) २८ व्या कलियुगांत श्रीएकनाथमहाराजांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी, श्रीदासोपंत, श्रीरमावल्लभदास व त्यांचे प्रशिष्य श्रीराघवदास, श्रीनारायणमहाराज जालवणकर इत्यादि अनेक साधुसंतांना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन झालेलें आहे. श्रीगोरख-मच्छिंद्रनाथ इ० प्रसिद्ध नवनाथांना तर श्रीदत्तात्रेयाचें दर्शन होऊन अनुग्रह अथवा योगदीक्षाही मिळालेली आहे. त्याचें वर्णन श्रीदत्तप्रबोध, नाथलीलामृत, नवनाथभक्तिसार, इत्यादि ग्रंथांत आहे. श्रीरामदासस्वामींना तर 'समर्थ' ही पदवी श्रीदत्तात्रेयाकडून मिळाल्याबद्दल त्यांच्या चरित्रांत प्रसिद्ध आहे. श्रीएकनाथमहाराज यांना त्यांचे गुरु श्रीजनार्दनस्वामी यांनीं श्रीदत्ताचें दर्शन मुद्दाम करविलें होतें. त्या गुरुभक्तशिरोमणीच्या घरीं श्रीकृष्ण हे शागीर्दाचें, त्याचप्रमाणें श्रीदत्त हे द्वारपालक अथवा चोपदाराचे काम करीत असलेले, दत्ताचे प्रत्यक्ष शिष्य दासोपंत यांच्या निदर्शनास आलेलें आहे. एकनाथमहाराज हे जनार्दनस्वामीचे शिष्य, पण कृष्णोपासक होते; श्रीसमर्थ रामदासस्वामी हे रामोपासक व श्रीतुकाराम हे पांडुरंगोपासक होते. तरी ह्या सर्व साधुसंतांनीं श्रीदत्तावर जी कविता केलेली आहे, त्यावरून सर्व संतजनांचा श्रीदत्तावतारमूर्तीविषयीं किती प्रेमादर वसत होता श्री हें दिसून येतें, कोणत्याही देवाची अथवा अवतारविभूतीची आवड लागते ती पूर्वजन्माभ्यासानुसार लागते. कांहीं उच्च अधिकारी दिव्य दृष्टीचे गुरु असतात ते शिष्याच्या मागच्या जन्माचा उपासनासंस्कार ओळखून ती ती उपासना व ते ते मंत्र देतात, उदाहरणार्थ, श्रीजनार्दनस्वामींचे उपास्य दैवत श्रीदत्त हें होतें, तथापि आपल्या एकनाथ-शिष्याला त्यांनीं श्रीकृष्णोपासना लाविली व कृष्णजयंतीव्रतोत्सव करण्यास सांगितलें. असे दिव्य दृष्टीनें शिष्यांचा पुनर्जन्म ओळखून पूर्व उपासनेनें ऋणी झालेल्या देवतेचीच उपासना या जन्मीं लावणारे व त्याच उपासनेचा मंत्र देणारे गुरु क्वचित् दृष्टीं पडतात. परमपूज्य श्रीमद्वासुदेवानंद-सरस्वती, श्रीब्रह्मानंद-सरस्वती व श्रीसिद्धारूढस्वामी यांच्या पुष्कळ अनुयायी मंडळीकडून त्यांची तशी कीर्ति ऐकू येते. यावरून, इतर प्रसिद्ध असलेले सत्पुरुष कमी योग्यतेचे लेखतों असें मात्र कोणी समजूं नये. प्रत्येक जण आपापल्या स्थानी पूर्णच आहेत, ते आपल्या सर्व शिष्यांना एकच मंत्र देतात व एकच उपासना लावतात असें म्हणण्यापेक्षां, त्या उपासनासंस्काराचेच शिष्यलोक त्या त्या गुरूकडे सहज आकर्षिले जातात व त्यांच्या अनुग्रहानें कृतार्थ होतात असें समजावें. प्रसिद्ध वारकरी संप्रदायाचें उपास्य दैवत श्रीविठ्ठल व त्याचा मंत्र 'रामकृष्णहरि' हा प्रसिद्ध असला तरी, त्या संप्रदायांतील कित्येक थोर महंत पुरुष श्रीदत्ताचेही अंतरंग-उपासक असलेले या लेखकाच्या चांगल्या परिचयाचे आहेत. वारकऱ्यांचे अत्यंत पूज्य व गुरुस्थानीं असलेले श्रीनाथमहाराज यांनीं आपल्या भागवतांत श्रीदत्ताला आपले 'परमगुरु' (गुरूचे गुरु म्हणून अत्यंत आदरानें वंदन केलेले प्रसिद्धच आहे. मग त्या संप्रदायांतील इतर व्यक्तींनीं श्रीदत्ताचे ठिकाणीं तसा पूज्य भाव ठेवल्यास कोठें बिघडलें ? दुसरें असें की कुलपरंपरेच्या दैवतावांचून अन्य दैवताची उपासना करूं नये, अशी कित्येक संतांची व शास्त्राचीही सूचना आहे व त्याचप्रमाणें वागणें कल्याणप्रदच होय; तथापि उत्कट प्रेम उत्पन्न न झालेल्या कमी चित्तशुद्धीच्या माणसांपुरतीच ती आहे. पूर्ण चित्तशुद्धि व निःशंक आणि प्रेमभरित अंतःकरण जेव्हां होतें, तेव्हां कुलदेव, इष्टदेव, आराध्यदेव हे त्यांना एकरूप दिसतात व सर्वांविषयीं सारखा प्रेमादर वाटून केवळ लीलेसाठीं, लोकदीक्षेसाठीं किंवा गुरुपरंपरेच्या वहिवाटीसाठी ते कांहीं विशिष्ट नियमित उपासना चालवितात, हे वर लिहिल्याप्रमाणे श्रीज्ञानदेव-तुकाराम प्रभृति संतमहंतांच्या चरित्रांवरून व त्यांच्या कवितेवरून स्पष्ट दिसून येते. असो.
(८) असा हा विशुद्ध-सत्त्वात्मक दिव्य दत्तावतार आज मूळ रूपांत भूतलावर आहे, असे म्हटल्यानंतर त्या प्रभूचें तें दिव्य शरीर असतें तरी कुठे, करितें काय, त्याची दिनचर्या कशी असते, वगैरे प्रश्न जिज्ञासूच्या मनांत उत्पन्न होणें साहजिक आहे. आतां देव अथवा परमेश्वर - परमात्मा म्हटला की, "स्थिरचर व्यापुनि" अवघा, तो जगदात्मा दशांगुले उरला’’ हीच सर्वसामान्य समजूत डोळ्यांपुढे येते; पण हें सर्वव्यापक तत्व म्हणजे परमात्म्याचे निर्गुण निराकार स्वरूप होय. ह्या निर्गुणनिराकार स्वरूपाला धर्म-अधर्म, पुण्य-पाप, ज्ञान-अज्ञान, साधु-असाधु, मित्र-शत्रु, भक्त व अभक्त सर्व सारखेच. या सर्व द्वंद्वांना तें अधिष्ठानरूप असतें. भक्ताचें वात्सल्य, कारुण्य, इत्यादि गुण त्या स्वरूपांत नसतात. या स्वरूपाकडून 'साधूंचें परित्राण', 'दुष्टांचा नाश' व 'धर्मांची संस्थापना' हीं कार्यें होत नाहींत. त्याला भगवद्गीतेंतील--- “अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानाम् ईश्वरोऽपि सन् । प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया” या वचनानुसार आपल्या दिव्य मायेचा आश्रय करूनच भूतलावर यावें लागतें. यालाच भगवंताचा 'सगुण अवतार' म्हणतात. (याबद्दल मागेंही थोडीशी चर्चा झालेली आहेच.) या सगुण अवताराकडूनच दुष्टनाश, शिष्टपरिपालन व धर्मसंस्थापना, इत्यादि कार्ये घडत असतात. सृष्टीच्या 'मागणी आणि पुरवठा' (Demand and Supply) या नियमास अनुसरून, त्या त्या कालची सृष्टीची गरज ओळखून ती पुरी करण्याकरितां, ज्या तऱ्हेच्या सगुणरूपाची व ज्या शक्तींची गरज असेल त्या तऱ्हेचें रूप व त्या जातींच्या शक्ति घेऊन तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान् परमात्मा अवतरत असतो. मत्स्य- कूर्म-वराह-नृसिंह, इत्यादि अवतारांच्या वेळेच्या सृष्टीच्या परिस्थितीचें निरीक्षण केलें म्हणजे हें म्हणणें लक्षांत येते. सृष्टींत त्या त्या वेळीं ते ते अवतार झाले व गेले; सृष्टींत अनेक प्रकारच्या परिस्थिति उत्पन्न होतात व जातात; मागच्या परिस्थितीशीं आजच्या परिस्थितीचा संबंधही असत नाहीं; परंतु ह्या सर्व बाह्य परिस्थिति होत. मानवी जीवांची आंतरिक अशी एक विलक्षण परिस्थिति आहे कीं, ती कोणत्याही युगांत श्री कोणत्याही काळीं अगदीं सारख्या स्वरूपांत अखंड राहाणारी असते व दैवीसंपत्तिमान् जीवांना आपल्या सामर्थ्यांनें तिला तोंड देतां येणें शक्य नसतें. अशा अधिकारी जीवांना श्रीदत्त हे नाना रूपानें व नाना तऱ्हेनें गुप्त व क्वचित् प्रगटरूपानें साहाय्य करीत असतात. ह्यासंबंधाची चर्चा मागेंही थोडी झालीच आहे. आतां अवतार) म्हटलें कीं सगुणरूप ; आणि सगुणरूप म्हटलें कीं देशकालादि उपाधि त्याला लागलीच. ह्या उपाधींचें ज्ञान करून घेऊन जे भक्त त्याची उपासना करितात, त्यांना उपासनेच्या नियमानुसार फलप्राप्ति 'लवकर' होते. श्रीदत्ताच्या दिनचर्येतील स्थल व काल भिन्न भिन्न पुराणांत भिन्न भिन्न आढळतात, तथापि श्रीरामविजयांतील पुढील वर्णन प्रमाणभूत धरून चालण्यास हरकत नाहीं---
" सकळ सिद्ध ऋषि-निर्जर। विधि-वाचस्पति-शचिवर । दत्तात्रेयदर्शना सादर । त्रिकाळ येती निजभावें ॥२२॥
'अद्यापि सह्याद्रि पर्वतीं । देवांचे भार उभे रहाती । सर्व ब्रह्मांडाचीं दैवतें धांवतीं । अवधूतमूर्ति पहावया ॥२३॥
घेतां दत्तात्रेयदर्शन । देवांसी चढे सामर्थ्य पूर्ण । मग ते इतरां होती प्रसन्न । वरदान द्यावयातें ॥२४॥
ज्यासी प्रयागीं प्रातः स्नान। पांचाळेश्वरीं अनुष्ठान। करवीरपुरांत येऊन । भिक्षाटण माध्यान्हीं ॥२५॥
अस्ता जातां वासरमणि । सह्याद्रीस जाय परतोनि। तों देवांचे भार कर जोडूनि । वाट पहाती अगोदर ॥२६॥
दृष्टीं देखतां दिगंबर । एकाचे होय जयजयकार । असंख्य वाद्यांचे गजर । 'अद्यापि भक्त ऐकती ॥२७॥
दत्तात्रेयभक्त देखतां दृष्टीं । सकळ दैवतें जीं जीं सृष्टीं । तीं तीं घालितीं पायीं मिठी । पुढे ठाकतीं कर जोडोनि ॥२८॥
करितां दत्तात्रेयस्मरण ! भूतें प्रेते पळतीं उठोन । मग उपासकांसी विघ्न । कवण करूं शकेल ॥२९॥
असो ऐसा स्वामी 'अवधूत'। जो अत्रीचा महापुण्यपर्वत । तयास वंदोनि रघुनाथ । अत्रिदर्शन घेतसे ॥३०॥" इ०.
--(श्रीरामविजय, अ. १३)
त्यांची रात्रीची निद्रा माहुरगडावर असते हें वरील वर्णनांत आलें नाहीं, पण तें प्रसिद्ध आहे. याप्रमाणे त्यांची दिनचर्या मोठी आश्चर्यकारक व चिंतनीय आहे. उत्कट प्रेमी, सगुणदर्शनेच्छु, पारमार्थिक हितैषी व निष्टावंत उपासकांनीं दररोज त्या त्या वेळीं त्या त्या स्थळीं वसत असणार्‍या ह्या 'त्रैलोक्यमंगल' प्रभूकडे आपली संवेदना सूक्ष्मबुद्धीनें शांतपणाने नेऊन उपासना करण्याचा क्रम व्यवस्थेशीर ठेवला असतां, त्या प्रभूचा प्रसाद लवकर होऊन इष्ट हेतु सफळ होण्यास फार मदत होत असते. अशा उपासनेनें त्या प्रभूच्या लीलादेहांतून अप्राकृत असा तेजःप्रवाह आपल्या लिंगदेहांत आणतां येऊन भगवत्सांनिध्याची किती मोठी धन्यता अनुभवितां येते, हें ‘जावें त्याच्या वंशा तेव्हा कळे,’ तें सुख शब्दांनी वर्णन करिता येण्यासारखे नाहीं.
(९) असें हें दत्ताचें - अनसूयात्रिपुत्राचें – दिव्य चरित्र श्रीवेदव्यासांनीं ब्रह्माण्डपुराणांत विशेषेकरून वर्णिलेले आहे. (याचे प्राकृत ओवीबद्ध रूपांतर पूज्यपाद श्रीटेंभेस्वामीमहाराजांनीं फारच सुंदर केलेलें आहे.) नारद व मार्कंडेय इत्यादि इतर पुराणांतही श्रीदत्तचरित्राचा उल्लेख आलेला आहे; परंतु ह्रीं सर्व पुराणें संस्कृतांत असल्यामुळे ती भाषा न जाणणार्‍या प्राकृतबुद्धीच्या लोकांना त्यांचा उपयोग होत नाहीं. श्रीरामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, भावार्थरामायण, इत्यादि ग्रंथ प्राकृतांत झाले नसते, तर आज रामायण--भारत--भागवतादि संस्कृत पुराणेतिहास ग्रंथांचा सर्वसाधारण महाराष्ट्रजनता जो आस्वाद घेत आहे, तो घेता आला नसता. खेड्यापाड्यांत - जिकडे हरिदासपुराणिक पिढ्यानपिढ्या पोचत नाहींत तिकडे--अशिक्षित स्त्रीशृद्वादि लोकही दुष्टनिकृंतनपूर्वक साधुसंरक्षण व स्वधर्मस्थापनकर्त्यां भगवदवतारचरित्राचा व पुण्यश्लोक अशा भगवद्भक्तांच्या चारित्र्याचा जो आनंद घोटत आहेत व त्यायोगें सहज स्वधर्माभिमुख राहात आहेत, तसे राहातां आलें नसतें.. हजारों विद्वानांच्या लेखांनीं व व्याख्यानांनीं जें कार्य होणें अशक्य, तें कार्य वरील ग्रंथ न कळत लीलेनें करीत राहिले आहेत, हें सूक्ष्म दृष्टीने पाहाणार्‍यांच्या लक्षांत आल्यावांचून राहाणार नाहीं. जातां जातां असेंही म्हणावेंसें वाटतें कीं, परमपूज्य श्रीशिवाजीमहाराजांच्या स्वधर्मरक्षणयुक्त स्वराज्यसंपादनकर्त्या भवानी 'तरवारी'च्या जोडीला, महाराष्ट्रजनतेची वरील अंत:करणभूमिका हीच बळकट 'ढाल' होती; नव्हे, त्या ढालीशिवाय ती तरवार कदाचित् दुर्बळही झाली असती असे म्हणणे अयथार्थ होणार नाहीं. 'अतिपरिचयादवज्ञा' अशी म्हण आहे. या म्हणीप्रमाणे या प्राकृत ग्रंथांचे तितकेंसें महत्त्व पुष्कळांना वाटणार नाहीं, परंतु वर म्हटल्याप्रमाणे सूक्ष्म दृष्टीने विचार करणारांस त्या ग्रंथकारांचे जनतेवर अनंत उपकार आहेत असे वाटल्यावांचून कदापि राहाणार नाहीं. सांगण्याचे तात्पर्य हें कीं, परमपूज्य श्रीमद्वासुदेवानंद० महाराजांनी 'प्राकृत श्रीदत्तमहात्म्य' हा अपूर्व ग्रंथ निर्माण करून जनतेवर असेच उपकार करून ठेवले आहेत. यांत अनसूयात्रिकुमार श्रीदत्तात्रेय देवांचें अद्भुत चरित्र वर्णन केलेले आहे. यांत श्रीदत्ताचे पूर्वयुगांतील शिष्य कार्तवीर्य (सहस्रार्जुन) यदु, प्रल्हाद, अलर्क व नहुष इत्यादिकांचीं सुंदर आख्याने, त्यांना केलेला योगाचा व ज्ञानाचा उपदेश इत्यादि फारच महत्त्वाचे विषय असून इतर अनेक सुंदर कथानकें आहेत. हा ग्रंथ प्रत्येक दत्तभक्तानें, इतकेंच नव्हे, तर प्रत्येक वेदान्त-जिज्ञासूनें अवश्य वाचावा, अशी शिफारस करणें माझें पवित्र कर्तव्य असें मी समजतों.* त्याचप्रमाणे कुलाबा जिल्ह्यांतील पनवेल गांवचे सुप्रसिद्ध विद्वान् पुरुष श्री. सदाशिव कृष्ण फडके, वकील यांनी केलेलें 'श्रीदत्त भक्त-रहस्य' हे पुस्तक ज्यांत श्रीदत्त, श्रीदत्तविभूति व श्रीदत्तभक्त यांचे चारित्र्य व शिकवण ही सरळ गोष्टींच्या रूपानें उत्तम रीतीने वर्णिलेलीं आहेत, तेही -- प्रत्येक दत्तभक्तानें अवश्य वाचावे अशी शिफारस केल्यावांचून राहावत नाहीं. यांत श्रीदत्त उपासनेचें व अवताराचे रहस्य आधुनिक चिकित्सादृष्टीलाही पटेल अशा रीतीनें देण्याचा प्रयत्न केला असून, श्रीदत्तलहरी, दत्तात्रेयस्तोत्र, दत्तात्रेयवज्रकवच, दत्तात्रेयोपनिषत्, अवधूतगीता, इ० इ० श्रीदत्तभक्तांना जरूर अशा उत्तमोत्तम खाद्यांचा भरपूर सांठा आहे. तसाच अनंतकविकृत 'श्रीदत्तप्रबोध' ग्रंथही श्रीदत्तचरित्रानें भरलेला आहे. अशा या ग्रंथकारांना माझे शतशः प्रणाम असोत.
----
'सदरहू ग्रंथ श्री. वामन दत्तात्रेय गुळवणी, २० नारायणपेठ, पुणे २ यांजकडे मिळतो. किं. ५ रु. हें पुस्तक पनवेल येथें खुद्द कर्त्याकडे मिळतें. (किं. ३ रु.)
हा ग्रंथ हल्लीं दुर्मिळ झाला आहे. कोणी पुण्यवान छापतील तर दत्तभक्तांवर मोठे उपकार होतील.

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP