विश्वनियामक सरकारच्या आज्ञेनें तयार होऊन कामधेनु - कल्पतरुत्वाचा सरकारी शिक्कामोर्तब झालेला हा ग्रंथ वेदतुल्य अथवा वेदाधिकत्वाने लोकांत मान्य झाल्यास त्यांत काय आश्चर्य आहे? आतां 'वेदाधिकत्वानें' हा प्रयोग अतिशयोक्तीचा किंवा अर्थवादाचा असें कोणास वाटेल. पण तसे बिलकुल नाहीं. प्रत्यक्ष दत्तावतारी म्हणून प्रसिद्ध असलेले परमपूज्य महानुभाव श्रीमद्वासुदेवानंद-सरस्वतीमहाराज यांनीं स्वमुखानें सांगितलेली गोष्ट त्यांच्या एका विद्वान् शिष्याकडून ऐकलेली सांगतों. ती अशी आहे कीं, एक विद्वान दशग्रंथी ब्राह्मण सर्वांगास कोड उजळल्यामुळें, औषधादि उपाय थकल्यानंतर नरसोबाच्या वाडीस येऊन दत्तसेवेस राहिला. तो दररोज प्रातःकाळीं कृष्णास्नान करून ऋग्वेदसंहितेची पोथी घेऊन देवासमोर बसे व सूर्योदयापासून माध्यान्हकालपर्यंत (पक्के दोन प्रहर) श्रद्धापूर्वक वेदपठण करी. असा त्याचा क्रम कांहीं दिवस चालला असतां, एके दिवशीं सकाळीं एक लहान मुलगा येऊन त्या ब्राह्मणास म्हणाला, "भटजी, काय वाचतां ! वेssद? गुरुचरित्र वाचा." या भटजीनें त्याजकडे पाहिलें व मनांत म्हटलें, कीं येथील मुलांना गुरुचरित्राशिवाय दुसरें कांहीं ठाऊकच नाहीं, म्हणून हा असें म्हणत असेल झालें. असें म्हणून त्यानें आपले वेदपठणच चालविलें. दुसरे दिवशीं पुनः तोच मुलगा आला व त्यानें कालचेच शब्द उच्चारले. तिसर्या दिवशींही तसेंच झाले. पण भटजींनीं त्याकडे लक्ष न देतां आपला संकल्पित क्रमच चालविला. त्या दिवशी संध्याकाळीं त्या भटजीचा गळा एकदम सुजला; तो इतका कीं संध्येच्या आचमनाचें पळीभर पाणीही गळ्यांत उतरेना. हें एक अकल्पित नवें संकट उत्पन्न झालेले पाहून तो घाबरून गेला. औषधोपचाराचे प्रयत्न केले, पण गुण कांहीं दिसेना. तेव्हां ज्या पुजार्याच्या घरांत हा ब्राह्मण उतरला होता, त्याला आकस्मिक प्रेरणा होऊन तो म्हणाला, “कीं हें कांहीं तरी देवी संकट असावें, नसल्यास एकाएकीं असें होण्याचे कारण नाहीं. तुम्हांस कांहीं स्वप्न वगैरे पडलें होतें काय ?" हे त्याचे शब्द ऐकून त्या ब्राह्मणाच्या अंत:करणांत लख्खकन् प्रकाश पडला व तो म्हणाला कीं स्वप्न वगैरे कांहीं नाहीं. पण आज तीन दिवसांसून मी वेदपारायणास बसल्या वेळीं एक मुलगा येतो व म्हणतो कीं, “भटजी, काय वाचतां ? वेssद ? गुरुचरित्र वाचा." हें ऐकून तो पुजारी-पुरोहित एकदम ओरडून म्हणाला कीं “बस्स, तो मुलगा दुसरा कोणी नसून प्रत्यक्ष दत्तानेंच त्या मुलाच्या रूपानें येऊन तुम्हांस गुरुचरित्र वाचण्याची आज्ञा केली, पण तुम्हीं ती मोडली; त्याचे हें प्रायश्चित्त असलें पाहिजे, याचें प्रत्यंतर पाहावयाचें असल्यास देवाकडे नाक घासून म्हणा कीं-हे दत्ता, पुजारी सांगतात त्याप्रमाणें मुलानें सांगितलेली आज्ञा तुमचीच असेल तर मला क्षमा करा, आज रात्रीं मी तुमचा फक्त अंगारा लावून निजतों, उद्यां सकाळीं गळा साफ बरा झाला पाहिजे; म्हणजे मी वेदपारायण सोडून श्रीगुरुचरित्राच्या पारायणास आरंभ करितों; तुमच्या कृपेनें माझें हें कुष्ट नाहींसें होऊन माझे शरीर पूर्वीसारखें चांगलें व्हावें." हे भाषण ऐकून त्या कुष्टी ब्राह्मणाने त्याप्रमाणें केलें. दुसर्या दिवशी सकाळ उठून पाहातो तों गळा साफ बरा झालेला दिसला. त्याबरोबर त्या ब्राह्मणाची खात्री झाली व त्यानें त्या दिवसापासून श्रीगुरुचरित्र पारायणास आरंभ केला. सात सप्ताहांत त्याचे कुष्ट नाहींसें होऊन, तो दिव्यशरीरी बनला. ही गोष्ट सांगून श्रीटेंबेस्वामीमहाराजांनीं त्या शिष्याला त्याच्या बायकोच्या अनिष्ट ग्रहपरिहारार्थं श्रीगुरुचरित्राचे सात सप्ताह करण्यास सांगितलें व तसें त्यानें निष्ठेने करतांच बायकोचें गंडांतर चुकलें. इत्यादि. (दुसरी एक गोष्ट--जालवणच्या शास्त्रीबुवाच्या घरची पिशाचबाधा इतर अनेक उपायांनीं न जातां गुरुचरित्राच्या सप्ताहानें दूर झाली ती 'स्त्रियांनीं गुरुचरित्र वाचावें कीं नाहीं इत्यादीबद्दल श्री टेंबेस्वामीमहाराजांचे मत' या सदराखालीं, पुढे थोरांचे ‘स्फुटविचार' या प्रकरणांत दिली आहे ती पाहावी.) वरील गोष्ट ऐकल्यापासून श्रीगुरुचरित्राबद्दल माझा आदर द्विगुणित झाला व प्रवासांत केव्हां तरी मी आळस करीत असें तो सोडून, कुठल्याही प्रवासांत नेम न चुकावा म्हणून गुरुचरित्राचे लहान पुस्तक जवळ बाळगूं लागलों. सारांश, असें हें गुरुचरित्राचे माहात्म्य आहे. पण असें हें माहात्म्य त्या ग्रंथास कसें प्राप्त झाले ? त्यांत तसें आहे तरी काय ? भाषासुद्धां धड नाहीं ! काव्यगुण तर त्यांत दिसतच नाहीं ! इत्यादि आक्षेपांचें उत्तर श्रीमद्भागवताच्या पुढील श्लोकानें सप्रमाण देतां येतें. तो श्लोक (प्र. स्कं. अ. ५।११) असा आहे -
"तद्वाग्विसर्गो जनताघविप्लवो, यस्मिन् प्रतिश्लोकमबद्धवत्यपि ।
नामान्यनन्तस्य यर्शोऽकितानि यत्, शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवः ॥"
(भावार्थ) – प्रत्येक श्लोक अशुद्ध म्हणजे अशुद्ध असला तरी, ज्यामध्ये भगवंताचीं गुणलीलावर्णनात्मक नामें भरलीं आहेत, ते काव्य, ती वाणी जडजीवांच्या पातकांचा नाश करिते व साधुलोक ती ऐकतात, गातात व प्रेमानें तिचा अनुवाद करितात.
आतां हेंही खरें असेल कीं ज्यांत परमेश्वराचे गुणगायन भरलेलें असतें, असें काव्य जीवांच्या पातकांचा नाश करील व साधुलोक त्यास मस्तकावर घेतील. परंतु अशीं काव्यें व स्तोत्रें प्राचीन व अर्वाचीन कवींनीं संस्कृत व प्राकृत भाषेंत पुष्कळ केलेलीं आहेत. ती सर्वच वाणी, गीता-भागवत अथवा गुरुचरित्र किंवा विष्णुसहस्रनाम, रामरक्षा, मारुतिस्तोत्र, हनुमानचालिसा (हिंदी) इ. विशिष्ट ग्रंथांसारखी किंवा स्तोत्रांसारखी लोकवंद्य कां झालेली दिसत नाहीं ? याचे कारण- " चित्रकारें सूर्य भिंतीं लिहिला साङ्ग । परी प्रकाशाचे अंग आणितां नये ॥(तसें) चातुर्याच्या योगें कवित्व करिती चांग । परी प्रासादिक अंग आणितां नये॥" असें होतें. 'पुण्यैयशो लभ्यते ' ह्या वचनानुसार ग्रंथकाराची पुण्याईंही त्यास असावी लागते. कर्त्यांच्या पुण्यबलानें ईशकृपेचें वरदान त्याच्या कृतीस मिळत असतें; आणि तसें वरदान मिळतें तेच ग्रंथ सुरनरवंद्य होतात. भागवत व सप्तशती या ग्रंथांत भगवंताच्या व भगवतीच्या चरित्रांवांचून दुसरें काय आहे ? पण हे ग्रंथ नुसते चरित्ररूप नसून 'मंत्रमय' आहेत, त्यांच्या योग्य अनुष्टानानें अनिष्टनिवृत्ति व इष्टप्राप्ति होत असलेली प्रत्यक्ष पाहाण्यांत येते. त्याचप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथाचे आहे. सदरहु ग्रंथ श्रीगुरुदत्तदेवाच्या आज्ञेनें निर्माण झाला आहे व म्हणून त्या ग्रंथास श्रीदत्तदेवाचे वरदान आहे. त्या ग्रंथांत साबड्या बोबड्या भाषेच्या ओंव्या आहेत, पण त्या साध्या ओंव्या नसून सर्व 'सिद्धमंत्र' आहेत; आणि म्हणूनच त्याच्या अनुष्टानानें म्हणजे विध्युक्त पारायणांनीं भक्तांची संकटें नाहींशीं होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण होतात. ही गोष्ट सर्वांच्या परिचयाची अथवा प्रत्ययाची झालेली आहे.