मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
भयंकर चूक

गुरूचरित्र - भयंकर चूक

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


पुढील अध्यायांतील प्रमाद इतर छापी व लेखी पुस्तकांप्रमाणें कमजास्त आहेत. ते दाखवून भागणार नाहीं व दाखविण्याची इच्छा नाहीं. परंतु ४२ व्या अध्यायांतील फार मोठा प्रमाद वाचकांच्या नजरेस आणणें (अर्थात् सद्धेतूनेंच) अवश्य आहे. या अध्यायांतील आरंभ पुढे लिहिल्याप्रमाणें पुरातन प्रती आहे-
“नामधारक शिष्यराणा ॥ लागे सिद्धाचिया चरणा ॥ विनवीतसे करजोडूनिया ॥ भक्तिभावेंकरूनिया ॥१॥
मागें कथानक निरोपिलें ॥ मधील एक सायंदेव म्हणिजे शिष्य भले ॥ श्रीगुरूंनीं त्यातें निरोपिलें ॥ कलत्रपुत्र आणी म्हणत ॥२॥
पुढें तथा काय झालें०" इत्यादि ९ भयंकर चूक ओंव्या असून त्यांत सायंदेव घरीं जाऊन त्यानें बायकामुलांस गुरूकडे आणलें आणि स्तुति केली असा कथाभाग आहे ;
व पुढें
‘‘श्र्लोक-आदौ ब्रह्मत्वमेव सर्वजगतां०" ॥१०॥
ऐशी स्तुति करोनि ॥ लागता झाला श्रीगुरुचरणीं ॥
राहिली कथा ही ऐकावी मनीं ॥ म्हणोनी विनवी वारंवार ॥११॥
श्रीगुरु म्हणती तये वेळां ॥ सावध होई ऐक बाळा ॥
प्रसन्न होऊनी स्वामी भोळा ॥ यात्रा सोहाळा दावीतसे ॥१२॥’’
असें म्हटलें आहे आणि त्यानंतर ॥
"संकल्प करोनियां मनीं ॥ जावें स्वर्गद्वाराभुवनीं ॥"
इ० मागील ४१ व्या अध्यायांतील काशीयात्रेचें वर्णन सुरू झाले आहे !! याबद्दल केलेली विस्तृत चर्चा पुढे दिलेल्या 'हस्तलिखित प्रतींच्या यादी’ मध्ये अनुक्रमांक ६ च्या प्रतींत वाचावी. म्हणजे जुन्या प्रतींत हा केवढा ‘पर्वतप्राय घोटाळा' झालेला आहे हे समजून येईल. शके १७९१ या वर्षी (म्हणजे खांडेकराच्या पूर्वी एक वर्ष) चिंचवड येथे छापलेल्या प्रतींतही हाच घोटाळा ४२ व्या अध्यायांत झालेला आहे. ही प्रत मला पाहाण्यास मिळाली नाहीं. पण आमचे पुरस्कारलेखक विद्वान मित्र श्री. 'अप्रबुद्ध' यांना ती मिळाली असून या घोटाळ्याचा उल्लेख त्यांनीं आपल्या पुरस्कारांत (पृ. ८ वर) केलेला आहे. हा घोटाळा मला मिळालेल्या गाणगापूर, कुरवपुर, चिकोडी, दड्डी वगैरे सर्व जुन्या हस्तलिखित प्रतींत आहेच ! फक्त 'कडगंची' प्रतींत मात्र नाहीं. यावरून ही प्रत इतर प्रतींपेक्षां किती अविकृत व विश्वसनीय आहे याची कल्पना करतां येते. या प्रतींत काशीयात्रेचे सर्व वर्णन ४१ व्या अध्यायांतच संपविलें आहे. हिच्यांत सायंदेवानें श्रीगुरूकडून सर्व काशीयात्रा ऐकल्यानंतर, (असें म्हणण्यापेक्षां श्रीगुरूंनीं योगसामर्थ्याने त्याला ती प्रत्यक्ष दाखविल्यानंतर असें म्हणणें बरें व खरें) त्यानें "आदौ ब्रह्म त्वमेक०" या संस्कृत श्लोकाष्टकानें स्तुति केली व त्यानंतर श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार घरीं जाऊन आपल्या स्त्रीपुत्रांस श्रीगुरूंच्या चरणांजवळ आणलें व श्रीगुरूंची कानडी पदांनीं स्तुति केली, असें आहे. यावरून असें अनुमान काढण्यास हरकत नाहीं की कडगंची प्रतींतील पुढील श्रीगुरुगीतेचा संस्कृत अध्याय वाचण्यास कठिण म्हणून कोणी तरी काढून टाकून काशीयात्रेच्या एका अध्यायाचे दोन अध्याय (४१ व ४२) बनविले असावे आणि गुरुचरित्राच्या त्या वेळीं सर्वश्रुत असलेल्या ५१ अध्यायांची भरती करून ठेवली असावी. प्रचलित सर्व छापी प्रतींमधील बावन्नावा अध्याय तर एकावन्नाव्या अध्यायाची पुनरुक्ति आहे. शिवाय त्यांत निर्याणकालाचा जो तपशील आहे तो ५१ व्या अध्यायाच्या तपशीलाशीं सर्वांशाने जुळत नाहीं. हा त्यांत मोठाच दोष आहे. श्री. अप्रबुद्ध यांनीं हा दोष आपल्या पुरस्कारांत स्पष्ट दाखविला आहे. (५ वा परिच्छेद वाचून पहावा.) त्रेपन्नावा अध्याय अवतरणिकेचा म्हणून आहे, तो कोणीतरी मागाहून रचलेला आहे असें पुष्कळ विद्वानांचे मत आहे आणि तो कुठल्याही गांवच्या कोणत्याही जुन्या हस्तलिखित प्रतींत नाहीं, यावरूनसुद्धां हीच गोष्ट सिद्ध होते. पण त्यांत सर्व अध्यायांचा सारांश सुंदर रीतीनें सांगितला असल्यामुळे वाचकांस उपकारकच होतो म्हणून आम्ही या प्रतीस जोडला आहे. आतां त्यांतील सप्ताहाचा अध्यायक्रम मात्र कडगंची व टेंभेस्वामींच्या प्रतीशीं जुळत नाहीं. तरी त्यांत सांगिल्याप्रमाणेच केले पाहिजे असा कांहीं कोणाचा जुलूम नाहीं. आपण आपल्या विश्वासाप्रमाणे श्री. टेंभेस्वामींच्या व कडगंची प्रतीच्या मतास अनुसरून वागले म्हणजे झाले. असो. वरील स. वा. खांडेकर यांची १७९२ शकांतील पोथी छापतेवेळीं तपासणारा कोणी चांगला संस्कृतज्ञ शास्त्री नसावा असें वाटतें. कारण संस्कृतज्ञ शास्त्री असता तर त्याच्याकडून 'आठै गण' च्या ऐवजी 'औठ गण' व 'मगण ब्राह्मण' च्या ऐवजी 'मग ब्राह्मण' अशा चुका राहिल्या नसत्या असे मला वाटतें. बेचाळिसाव्या अध्यायांतील वर उल्लेखिलेली 'हिमालयन्' चूक त्या काळीं ५|६ वर्षांत छापलेल्या निरनिराळ्या छापी प्रतींत आहेच ! (शके १७९५ त छापलेल्या 'धारवाढ' प्रतींत अगदीं याच चुका आहेत !) त्यानंतर कोणाच्या तरी लक्षांत ही चूक आली असावी, पण केव्हांच्या व कुठल्या छापी प्रतींत ती आधी सुधारली गेली हें मात्र समजणे शक्य नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : June 20, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP