गुरूचरित्र - एक मोठाच गमतीचा प्रसंग
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.
(ओंवी ७६) "मद्यपान नरा घरीं । याचनें उदरपूर्ति करी । वेश्या असे जे नारीं । दान विप्रें न घ्यावें ॥असा पाठ कांहीं छापी प्रतींत ; व रोगी सेवकाचे घरीं । मद्यपान करी त्या नरा घरीं । वेश्या असे जया नारी । दान विप्रें न घ्यावें॥" असा पाठ कांहीं छापी प्रतींत आहे. पैकीं ' रोगी सेवकाचे घरीं' हा पाठ कुठल्याच लेखी प्रतींत नाहीं. ओंबीचा पहिला चरण 'मद्य करी त्या नरा घरीं ' असाच अधिकशा लेखी प्रतींत आहे व तोच स्मृतिचंद्रिकेच्या वचनाशीं जुळणारा असल्यामुळें ठेवून सोडला. त्याबद्दल विशेष चर्चा नको. 'याचूनियां उदरपूर्ति करी' असा पाठ कांहीं लेखी प्रतींत आहे व 'याचूनियां संचित करी' असा पाठ कांहीं लेखी प्रतींत आहे, यावर मीं शास्त्रीबुवांना म्हटलें “भिक्षाहारी निराहारी भिक्षा नैव प्रतिग्रहः’’ असे सांगून
----
* १ अपवित्र-वाईट मनुष्याकडील अन्न : २ व्यालेल्या गाईचे दहा दिवसांतील दूध वगैरे : ३ शुद्ध असले तरी आपणांस दिसतांना वाईट दिसणारे; ४ मद्यमांस, कांदा, लसूण वगैरे; ५ ज्या पदार्थावर अमंगल शब्दाचा संस्कार घडतो ते (उदाहरणार्थ- 'हे आंबे म्हणजे अगदी मांसाचे गोळेच आहेत' इत्यादि शब्द ज्या पदार्थासंबंधानें बोलले गेले ते ); ६ केश, कीड वगैरे पडलेले अन्न. ( असा यांचा अर्थ आहे. )
----
समर्थांनी भिक्षेचं पावित्र्य प्रतिपादन केलें आहे आणि इकडे भिक्षेविषयीं निषेध कसा दर्शविला ? शास्त्रीबुवा म्हणाले भिक्षेचे अन्न ज्याचें त्यानें खाणें योग्य आहे, पण दुसर्याने खाणें योग्य नाहीं; अपवित्र म्हणून नव्हे, तर गरिबाला तोटा येऊं नये म्हणून. दुसरें---'याचकवृत्तीं उदर भरी’ हें वर ६८ व्या ओंवींत आल्या कारणाने 'याचूनियां संचित करी’ हाच पाठ येथें योग्य आहे; कारण भिक्षा मागणें हा ब्राह्मणाचा धर्मच असला तरी अधिक भिक्षा मागून 'संग्रह' करणें योग्य नाहीं हें या ओंवींत दर्शविलें आहे, असें त्यांनी सांगून हाच पाठ निश्चित केला. (तात्पर्य, अशी चर्चा हरएक पाठ निश्चित करतांना आमची होत असे व नंतरच पाठ निश्चित केला जाई हें दर्शविण्याकरितां ही गोष्ट येथे दिली आहे.) आतां मुख्यतः येथे सांगण्याचे आहे ते तिसर्या चरणाबद्दलच. (चौथा चरण सर्व प्रतींत सारखाच आहे.) तिसर्या चरणाचे पाठ सर्व छापी प्रतींत साधारणतः सारखेच आहेत. पण लेखी प्रतींत डोकं उठविणारे भिन्न भिन्न पाठ आढळले. त्यांतील नमुन्याकरितां थोडेसे देतों. (कौंसांतील अक्षर प्रतीचें नांव दर्शविणारे आहे. त्याचा खुलासा पुढें जुन्या लेखी प्रतींची यादी दिली आहे तिच्या अखेरीस दिला आहे तो पाहावा.) ते पाठ असे—'वेश्य असे जे नारी'- (आं.); 'अवंशीक असे जरी नारी'- (-क); 'वेश्या असे जाची नारी'--(विं.); 'वेशी असे जे नारी '--(प.); 'वेश्य होते जाणा नारी - (कें.); 'वेश्या असे राजनारी '- (पे.); 'वेश्या असे जाण नारी'--(कु.); 'वेश्यी असे जारी नारी’-- : (कुं.); इत्यादि. यांतील शेवटचा पाठ 'वेश्यी' पाहून त्या ठिकाणी 'वेश्मीं' असावें अशी एकदम कल्पना शास्त्रीबुवांच्या कल्पक डोक्यांत आली (वेश्म म्ह० घर) आणि त्यांनीं स्मृतिचंद्रिका काढून पाहिली. तींत त्या ठिकाणी "सहोपपतिवेश्मनाम् - स्वभार्यांजारसहित गृहः" असें स्पष्ट मिळालें व किती आनंद झाला म्हणून सांगावें. मग तो चरण 'वेश्मीं असे सहजार नारी' (उपपति म्ह. जार, सहउपपति म्ह. सहजार) असा (इतर कोणत्याही प्रतींत न मिळालेला पाठ) शुद्ध करून घातला. सर्व छापी पुस्तकें, सर्व लेखी पोथ्या व स्मृतिचंद्रिका इत्यादि पाहून बुद्धीचा निश्चय करून मग हा पाठ घातला. या एका ओंवीस आमचा दीड तास मोडला. प्रथमच स्मृतिचंद्रिका कां नाहीं पाहिली असेंही वाटले. याप्रमाणे समजत नाहीं म्हणून आळस न करितां, किंवा स्वतःचें कांहीं न घालतां प्रामाणिकपणे आहे त्यांतच बुडी मारून शोध लावावयाचा हे काम किती कठीण, याची कल्पनाही दुसर्यास येणें अथवा आणून देणें मुष्किल आहे. या दुरुस्तीबद्दल ग्रंथकार श्रीसरस्वती-गंगाधर व सुज्ञ वाचकवर्ग आमच्यावर न रागावतां संतोषपूर्वक आम्हांला आशीर्वादच देतील असा मला पूर्ण भरंवसा आहे.
पुढच्या एक दोन ओव्यांचा प्रसंग असाच आहे. (ओंवी ९०)--– “विवाह झाला असतां आपण पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण । स्थालीपाक निवृत्ति नव जाणे । न जेवावें तया घरी ॥" असा सर्व छापी प्रतींतील पाठ आहे. यांतील पहिला, दुसरा व चौथा चरण सर्व लेखी प्रतींतही सारखेच आहेत. तिसर्या चरणाचा पाठ मात्र भिन्न आहे...' परपाकनिवृत्ति जाय जाण' - (आं.); 'परपाक करितां नव जाण'---( कुं.); ' परिपाकनिवृत्ति नव जाण’---(प.); 'पाक अनिष्कृति जेवीं जाण'---(स.); 'परपाक निपजवी जाण’–--(पे.); 'परपाक निष्कृति करी जाण - (द.); 'परपाक निवृत्ति नावें जाणे'- (के.); 'परपाकनिवृत्ति नाम जाण’---(क.); इत्यादि. यांतील एकंदर पाठ चुकीचे आहेत ! शेवटच्या क. म्ह. कडगंची प्रतींत 'परपाकनिवृत्ति' आहे तेथे 'परपाकनिवृत्त' पाहिजे असे पुढील प्रमाणावरून ठरलें---"गृहीत्वाऽग्निं समारोप्य पंचयज्ञान्ननिर्वपेत् । 'परपाकनिवृत्तो' ऽ सौ मुनिभिः परिकीर्तितः ॥(पर उत्कृष्टः वैश्वदेवाद्यर्थं गृह्याग्नौ क्रियमाणः पाकः 'परपाक: तस्मान्निवृत्तः परपाकनिवृत्तः"---पराशरस्मृति, विद्वन्मनोहरा टीका ११।४७). ही टीप त्या ठिकाणी (पृ. ४०८ वर) दिली आहे. पुढील ओंवी---“पंचमहायज्ञ करी आपण । जेवी आणिकाचे घरीं अन्न । परपाक करी तया नाम जाण । तया घरीं जेवू नये' अशी सर्व छापी प्रतींत आहे. लेखी पोथ्यांमध्ये ओंवीचा पहिला, दुसरा व चौथा चरण हे (किंचितशा फरकानें) छापीप्रमाणेंच आहेत. तंटा येतो तो वरच्या ओवीप्रमाणें तिसर्या चरणाचाच. लेखींतील पाठभेद पुढीलप्रमाणे आहेत---'परपाककर्ता होय जाण’---(आं.); 'परपाककर्ते होय जाणे’---(कें.) ; परपाक करितां न वचे जाणें’--- ( कुं.); 'परिपाक न करी कवण'---(प.); 'परपाक करतया नाम जाण'---(स.); 'परपाकवर्ता नांव खूण'---(कु.); 'परपाकनिरत नाव जाण'---(द.); 'परपाकरत नाम जाण’--- (पे.); 'परपाकरत नरु नाम जाण'---(क.) इत्यादि. पैकीं शेवटचे दोन पाठ शास्त्रोक्त आहेत. कारण 'परपाकनिवृत्त, परपाकरत व अपच' हे धर्मशास्त्रांतील पारिभाषिक शब्द आहेत. "परपाकनिवृत्तस्य परपाकरतस्य च । अपचस्य च भुक्त्वान्नं द्विचांद्रायणं चरेत् " असें पराशरस्मृतीचें वचन आहे. यांतील (पुढच्याच म्ह. ९२ व्या ओंवींत ' अपच'च्या ऐवजी सर्व छापी प्रतींत श्वपच' छापलें आहे !!!) या तीन्ही पारिभाषिक शब्दांची व्याख्या खालीं टीपेंत दिली आहे. ती पाहून सर्व वाचक आम्हांला प्रेमानें आशीर्वादच देतील अशी आशा आहे.
अशा महत्त्वाच्या व उपयुक्त टीपा ग्रंथांत ठिकठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांतील थोडयाशांचा उल्लेख श्री. अप्रबुद्ध यांनीं आपल्या पुरस्कारांत (पृ. १४) वर केलेला आहे तो हवातर पुनः नजरेंत आणावा. अ० २६, ३६, ३७ मधील वेदमंत्रांचीं प्रतीकें वगैरे जवळपासच्या शब्दांहून निराळीं एकदम लक्षांत येण्याकरितां ' ' अशा अवतरण चिन्हांत दिलीं आहेत. संध्येतील आचमनाचा, प्राणायामाचा व अर्घ्यदानाचा विधि इत्यादिकांवर दिलेल्या समजुतीच्या टीपा जिज्ञासु पुरुषाला आनंद दिल्यावांचून राहाणार नाहींत.
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2023
TOP