मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती|
जांवईशोधाचा दाखला

गुरूचरित्र - जांवईशोधाचा दाखला

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.
Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi.


वरील चुका ह्या अज्ञानजन्य मानतां येतील. पण जांवईशोध हे तसे नसून विज्ञान ( म्ह. विपरीतज्ञान--) जन्य असल्यामुळे ते दिसले म्हणजे वाईट वाटतें. ओंवी १५७---“अनुवाक आठ अशीति दशक” असे जुन्या प्रतींत आहे; छापींत 'अनुवाक अष्टादशक' आहे ! ('अशीति' म्हणजे ८० हे न समजल्यामुळे कित्येक प्रतींत 'अशीती' च्या ऐवजीं 'असती' असें केलें आहे !! ) प्रत्येक अष्टकाच्या दरेक अध्यायाचे दशक व अनुवाक यांची संख्या निरनिराळी सांगून, शेवटीं त्या अष्टकाचे एकंदर दशक व अनुवाक यांची वट्ट बेरीज सांगण्याचा क्रम ग्रंथकाराने धरला आहे. त्याप्रमाणें दुसर्‍या अष्टकाच्या एकंदर दशकांची बेरीज सांगतेवेळीं १६३ व्या ओंवींत “पांच शताउपरी । एकउणे चत्वारी" (म्हणजे ५३९) अशी ओंवी जुन्या प्रतींत आहे. ही संख्या जुळत नाहीं म्हणून बदलून, आपण वर गहाळ केलेले दशक वजा करून “चारशताउपरी । तीन उणे सप्तति निर्धारी" असें शुद्ध करून ठेवलें आहे ! अशी पुष्कळ उलथापालथ या अध्यायांत झालेली आहे. ही सद्धेतूनेंच केलेली असेल ; पण झालेली आहे खरी! त्या दुरुस्तीचे सर्व वर्णन विस्तारभयास्तव देतां येत नाहीं. विद्वानांनीं मुळांत म्हणजे या आमच्या पुस्तकाच्या त्या अध्यायांतच पाहून घ्यावें व यांतही कांहीं अपूर्ण राहिले असल्यास कृपेने कळवावे अशी सप्रेम नमस्कारपूर्वक विनंति करतो.
गु. च. ग्रंथकार यजुर्वेदी असल्यामुळे त्यानें त्यांत यजुर्वेदाचेंच वर्णन फार विस्तारानें केलेलें आहे आणि आमचे शास्त्रीबुवा ऋग्वेदी आहेत व त्या वेदाचें त्यांचें अध्ययन भाष्यसहित आहे. अन्य वेदांचेंही त्यांचें अवलोकन आहेच. तथापि चित्तशाठ्य न करितां प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळें यजुर्वेद-प्रकरणांत त्यांना कांहीं संशय आले; त्यांचा त्यांनीं आपले यजुर्वेदवेत्ते मित्र वे. शा. सं. पुरुषोत्तम महादेवभट्ट आपटे, मु. म्हापसें (गोवा) यांच्याकडे जाऊन खुलासा करून आणला. त्यांपैकीं ओं. ९४ (पृ. २५३) “नाम प्रजापति-गुहान" हा आपटे यांजकडून लाख रुपयांचा शोध मिळाला असें शास्त्रीबुवांनीं मला मोठ्या प्रेमानें सांगितले. पूर्वीच्या प्रतींत 'नाम प्रजापति गहन' असें आहे यांत अशुद्धाचा संशय देखील कोणास येण्यासारखा नाहीं. ६ व्या अध्यायांत 'गणऋषेश्वरयुक्त' या चरणांत अशुद्धाचा संशय जर मोठमोठ्या विद्वानांसही आला नाहीं व त्यापुढील ओव्यांत असलेला खुलासा गण-रस-स्वर हा जर नजरेंत गेला नाहीं, तर केवळ वैदिकांस, त्यांतही यजुर्वेदप्रवीण वैदिकांसच माहीत असलेला 'गुहन' नामक प्रजापति कसा समजेल ? (त्या शब्दावर तेथें दिलेली टीप वाचून पाहावी म्हणजे खुलासा कळून आनंद होईल.) तात्पर्य, ज्या विषयाचा जो तज्ज्ञ म्ह० प्रवीण असेल, त्यालाच त्या विषयावर मत देण्याचा अधिकार असतो. श्रीगुरुदेवाच्या कृपेनें तसे तसे लोक मला मिळत गेले व हें मारुतीच्या समुद्रोल्लंघनासारखें अथवा देवदैत्यांच्या समुद्रमंथनासारखें अत्यंत दुष्कर कार्य मला अत्यंत सुकर झालें. 'योगक्षेमं वहाम्यहं' ह्या वचनाचा हा प्रत्ययच आहे. ह्याबद्दल मी थोडेसें पुढेही सांगणार आहे.
अध्याय २७ मधील (ओं. ४२) 'जो कां शुक्लनारायण' यावरील टीपही वाचून पाहिल्यास विद्वान वाचकांस तसाच आनंद होईल.

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP