सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १४०१ ते १४५०
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
ज्याच्या भयें सूर्य चंद्र चालती । ज्याच्या भयें वायुप्राण वाहती ।
ज्याच्या भयें अग्नीसी ज्योति । मृत्यु धांवे ज्याच्या भयें ॥१॥
भूमीतें धारण द्रवत्व आपीं । काळही युगादि क्षण मापी ।
ब्रह्मा विष्णु शिव प्रतापी । जयाच्या भयें ॥२॥
ऐसा अंतर्यामीं एकला । अंतरीं नियामकत्वें राहिला ।
सर्व नियंतियां करूं लागला । नियंतृत्व ॥३॥
सर्वांचें ज्या ज्या रीतीं होणार । त्या त्याचा प्रेरक निर्धार ।
त्यावाचून तृणही साचार । पडिलें न हाले ॥४॥
ऐसा नियंता सर्वांमाजी । अलिप्तत्वें राहून सहजीं ।
प्रेरणा करी होणार जी जी । ब्रह्मादि कीटकांत ॥५॥
स्फूर्ति विद्याविद्या ज्ञानाज्ञान । मन बुद्धि इंद्रियें प्राण ।
हें ब्रह्मादि कीटकांत देहीं समान । असे जयापरी ॥६॥
तैसेंचि बुद्धींत प्रतिबिंब जयाचें । तो जीव जीवन करी जडाचें ।
वृत्तींत भासकत्व तया ईशाचें । नाम ईशान शक्तीस्तव ईशन म्हणजे प्रेरणा करावी ।
होणारा ऐसा बुद्धी योजावी ।
त्या रीतीं जीवें सुखदुःखें भोगावीं । पराधीनत्वें ॥८॥
स्वतंत्रपणें प्रेरणा करी । परी कर्तृत्वाचा अभिमान न धरी ।
म्हणून अलिप्त निरहंकारी । बंधन न पावे ॥९॥
जीवें तरी कांही न करितां । मीच होय या कर्माचा कर्ता ।
वळें मस्तकीं घेऊन अहंता । बंधनीं पडे ॥१४१०॥
ईश विद्यागुणें सर्वज्ञ जाहला । जीव अविद्यागुणें किंचिज्ज्ञत्व पावला ।
ईश प्रवर्तवीतसे गुणाला । जीव जाहला गुणाधीन ॥११॥
ईश आवरणी विक्षेप शक्तीतें । स्वाधीन ठेऊन वर्तवी सर्वांतें ।
जीव आवरणविक्षेपें गुंते । भ्रांत होउनी ॥१२॥
तिहीं अवस्थांत भ्रमे जीव । तें तें तादात्म्य घेऊन सर्व ।
ईश त्यागून तो तो भाव । अवस्थातीत असे ॥१३॥
बुद्धिपासून जीव विषयांत । साभिमान घेऊन विहरत ।
नुसधी वृत्ति जे निर्विकल्प स्फुरत । त्यांत वसे संचाराविण ईशें प्रेरणा मात्र करावी ।
जीवें ते ते मस्तकीं घ्यावी । यया उभयानें सृष्टि
आघवी । व्यापिली असे ॥१५॥
प्रतिबिंबा तरी एकरूपता । परी कर्म भिन्न भिन्न तत्त्वतां ।
येक भोक्ता येक नियंता । यास्तव भेद जाहला ॥१६॥
असो हे दोन्ही सर्वां शरीरीं । असती ब्रह्मादि पिपीलिकांवरी ।
जीव बद्धता अभिमानें वरी । ईश मूक्तत्वें वसे ॥१७॥
उभय सर्वों म्हणतां वस्ती । येथें कोणी कल्पना करिती ।
कीं निरहंकारी ईश स्वयंज्योति । देहावेगळा राहे ॥१८॥
तरी देहावेगळी स्फूर्ति असेना । प्रतिबिंब तो वृत्तीवीण पडेना ।
तस्मात् देहावीण जे करणें कल्पना । ते न संभवे सहसा आणिक
शंका कीं वृत्तींत बिंबलें । वृत्तीवीण स्थळ रितें पडलें । ईश तो सर्वव्यापी शास्त्र बोले ।
या विरोधा उत्तर देऊं ईशसत्ता सर्वत्रीं असे । परी स्वतां ईश वृत्तींत वसे ।
जेवीं सार्वभौम राजधानी राहत असे । आज्ञा सर्व जगती ॥२१॥
मागुती म्हणतील येकत्र असतां । अन्य स्थळीं उगीच चाले सत्ता ।
तरी एकचि राजधानी साकारता । विष्णूची कां न म्हणावी ॥२२॥
कीटकांत अन्य देहीं जीव । राहे परी ईशाचा अभाव ।
विष्णूचे साकारीं ईश स्वयमेव । असे अभाव जीवाचा ॥२३॥
तरी पहा कीटका माझारीं । वृत्तीची स्फू र्ति नसे निर्धारी ।
वृत्ति असतां प्रतिबिंबता खरी । कैशी न ये बिंबा ॥२४॥
विष्णूचे अंतरीं काय बुद्धि नसे । म्हणून जीवाचें प्रतिबिंब न दिसे ।
बुद्धीच नसतां व्यापारही कैसे । होतील देहाचे ॥२५॥
बुद्धि तेथें जीवाचें प्रतिबिंब । वृत्ति तेथें ईशाचें डिंब ।
जडीं मात्र नसती आदिस्तंब । वृत्ति बुद्धि अभावी ॥२६॥
तस्मात् साकार तितुका जडाविण । उत्तमाधम सप्राण ।
तयामाजीं वृत्ति बुद्धि दोन । असती निश्चयें ॥२७॥
मग असो साकार शिवादिकांचा । अथवा देह कीटकाचा ।
वृत्ति या उद्भव दोहींचा । तेथें जीवेश असती ॥२८॥
जैसें सूर्याचे तळवटीं । जळ भरोन ठेविलें घटीं । त्यांत प्रतिबिंब
पडेलच उठाउठी । मग सान थोर कीं बहुत ॥२९॥
तैसें ब्रह्मादि कीटकांत जितुकें । साकार सुबुद्धि वृत्ति तितुकें ।
त्यामाजीं जीवेश हे निके । आभासरूप भासती ॥३०॥
येथेंही म्हणतील कोणी । कीं घटीं येक प्रतिबिंबा उभवणी ।
येथें प्रतिंपिडीं आभासती दोन्ही । कैसें तें अवधारा उथळ जळीं स्पष्ट दिसतें ।
सखोल जळींचें दिसेना तें । आंतचे आंतचि झळफळितें । सूक्ष्म दृष्टीनें दिसे ॥३२॥
तैसें बुद्धिचें रूप उथळ । तेथें जीवत्व दिसे टळटळ ।
वृत्तीचें रूप सूक्ष्म केवळ । म्हणून प्रतिबिंब अस्पष्ट ॥३३॥
तेंही सूक्ष्म दृष्टीनें दिसे । कार्यावरून अनुमाना येतसे ।
बुद्धि विकल्पाहून जीवाचें जैसें । तैसें प्रेर्य प्रेरक समजावें ॥३४॥
प्रेर्य तो हा जीव वावरे । तेव्हां प्रेरिला असे ईश्र्वरें ।
यया जीवत्वाचेनि अनुकारें । ईशही असे ऐसा ॥३५॥
ती वृत्ति अनुभवावी बुद्धीवीण । त्यांस ईश होय भासमान ।
बुद्धीच्या योगें वृत्तीचें अभान । मा ईश कळे कैसा ॥३६॥
प्रेरक सामर्थ्याहून पहावा । बोलता शंका वाटेल जीवा ।
कीं विष्णु सामर्थ्यवान स्वभावा । तेथें ईशत्व प्रत्यया ये ॥३७॥
तैसे सामर्थ्य कीटकांत नसे । तरी ईशत्व तेथें कैसें असे ।
या आक्षेपीं बोलिजे अल्पसें । अवधारावें ॥३८॥
विष्णूचें सामर्थ्य जें दिसतें । तें तें जीवाचें जाणावें समस्तें ।
ईश सामर्थ्य न दिसे आहे तें । प्रेरणात्मक ॥३९॥
सिंहामाजीं हत्ती विदारी । मांजर होऊन उंदीर मारी ।
हे उपाधीस्तव उंच नीच परी । परंतु जीवधर्म ॥१४४०॥
तैसे विष्णूच्या देही सामर्थ्य मोठें । कीटका तृण उचलितां नुठे ।
परी तें जीवाचें कर्म गोमटें । दोहीं ठायीं ॥४१॥
ईशाची कर्मचि असेना । उगीच जीवाची करी प्रेरणा ।
म्हणून ईश्र्वर स्थूल दृष्टी दिसेना । जीवत्व दिसे ॥४२॥
तस्मात् ब्रह्मादि कीटकांत देहीं । जीवेश असती निःसंदेही ।
येक दिसे येक न दिसे पाही । स्पष्टास्पष्ट म्हणोनी ॥४३॥
हीं वचनें मानिती अप्रमाण । तरी या अर्था बहुत प्रमाण ।
गीतेमाजीं भगवान । अर्जुना सांगे ॥४४॥
ईश्र्वर हा यंत्रारूढ होऊन । हृदयीं सर्वां स्वतां राहून ।
सर्व भूतांतें स्वमायेकडून । प्रेरणा करी ॥४५॥
ऐसेंचि वृत्तींत शिव असे यासी । श्रुति प्रमाण निश्चयेंसी ।
माया आणि अविद्या ऐशी । आपुल्या आभासीं निर्मी दोघां माया म्हणजे विद्यात्मकवृत्ति ।
अविद्या तेचि नेणीव स्फूर्ति ।
हे दोन्ही येकरूप असती बुद्धि उद्भवेना तंव ॥४७॥
बुद्धि उद्भवतां बुद्धींत । जीवत्व प्रवृत्तीकडे येत ।
म्हणून स्पष्टत्वें दिसूं लागत । ईश नोव्हे तैसा ॥४८॥
विद्यास्फूर्तींत ईश्र्वर । ये बुद्धीसी विक्षेप करणार ।
बुद्धींत न येती निमित्तमात्र । असती म्हणोनी ॥४९॥
अविद्यात्मक जीव उपादान । विद्यात्मक ईश निमित्तकारण ।
जैसें कुल्लाळ मृत्तिका दोन । घटकार्या असती ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2010
TOP