सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या ८५१ ते ९००
श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.
एकेकाहून दशगुणें वाड । सप्तावरणात्मक हें ब्रह्मांड ।
येवढें विस्तीर्ण तें असे झाड । या मायाबीजाचें ॥५१॥
येवढी विस्तीर्ण जे पृथ्वी । उदकाचे एकदेशीं जाणावी ।
तिच्याही दशगुणें वोळखावी । ब्रह्मांडरचना ॥५२॥
त्यामाजीं स्वर्ग मृत्यु पातळ । वसिन्नले हे सकळ ।
अवघा मिळून हा भुगोळ । सप्तद्वीप असे ॥५३॥
त्या द्वीपामाजीं जंबुद्वीप । त्यांत नवखंडें अल्प अल्प ।
त्यांत भरतखंडामाजीं जल्प । नाना ग्रामें पुरें ॥५४॥
त्यांत एका ग्रामा एक घर । त्या घरायेवढेंही नाहीं शरीर ।
तया शरीरीं उमटला प्रकार । स्फूर्तिविकाराचा ॥५५॥
हें असो देह मानवाचा । परी अत्यंत सान जो कीटकाचा ।
त्यांतही विकार या वृत्तीचा । उमटे इतुकाची ॥५६॥
एवं स्फूर्ती ब्रह्मादिकांपासून । कीटकांत विभागली संपूर्ण ।
तितुक्याचि देहासी मी म्हणून । बैसली असे ॥५७॥
एवं स्फूर्तिचा सानपणा ऐसा । स्वरूपाचे एकेदेशीं अल्पसा ।
तेथेंचि ज्ञानाज्ञानाचा ठसा । उमटला असे ॥५८॥
ब्रह्मात्मयाचें स्वरूप केव्हढें । की जयाच्या एकेदशीं ब्रह्मांडें ।
आकाशही जेथें बापुडें । समुद्रीं राई ॥५९॥
जयाचा अंतचि न लगे किती । शेवटचे नाहीं जयाप्रति ।
परि समजावया दृष्टांतीं । कांहींसें आकाश ॥८६०॥
आकाशाचाही अंत न लगे । तैसाचि ब्रह्मात्मा निजांगें ।
गगनावीण नसती रिते जागे । तेवीं आत्मा सघन ॥६१॥
परी आत्मा असे ज्ञानघन । आकाश शब्दगुणीं अज्ञान ।
म्हणोनि भेद हा भिन्नभिन्न । स्वरूप गगनाचा ॥६२॥
आकाशीं पोकळपणा वसे । स्वरूप सघन भरलें असे ।
आकश आवकाशरूप भासे । निराभास ब्रह्म ॥६३॥
परी आकाशाचा पोकळपणा । वाउगी करीतसे कल्पना ।
दृष्टीसी बैसले पदार्थ नाना । ते ते घन वाटती ॥६४॥
इकडे तिकडे पदार्थ असे । मध्यें भावी कांही नसे ।
उगाची पोकळपणा दिसे । परी ते पोकळ न म्हणावें ॥६५॥
आकाश जरी कोठें नसावें । तरी पोकळ ऐसें म्हणों यावें ।
सर्वध्यापक असतां स्वभावें । आकाश कैंचा ॥६६॥
तस्मात् आकाशही व्यापक पूर्ण । तैसाची ब्रहात्मा सधन ।
दोहींचा अंत पाहणें । कवणा न घडे ॥६७॥
आकाशी गड एक निर्मिला । त्यांतही अवकाश सांठवला ।
बाहेरी तो किती अंत लागला । न वचे कवणा ॥६८॥
तसाची ब्रह्मात्मा परिपूर्ण । त्यामाजीं ब्रह्मांड झालें निर्माण ।
त्या ब्रह्मांडी आत्मा हा सघन । बाह्य तो अमर्याद ॥६९॥
मठपाधीमुळें गगना । आंत बाहेरी जाहली कल्पना ।
गगनामाजीं गडाची रचना । तया मठीं आकाश ॥८७०॥
तैशीच ब्रह्मांड उपाधि जाहली । त्यास्तव अंतबाह्य कल्पना केली ।
ब्रह्मीं ब्रह्मांडरचना उद्भवली । ब्रह्मांडीं ब्रह्म ॥७१॥
मठामाजीं घट भिन्न भिन्न । त्या घटा आंत बाहेर गगन ।
आकाशीमाजीं घट तोही पूर्ण । गगनें भरिला ॥७२॥
तैसें ब्रह्मांडी नाना पिंड । त्या आंत बाहेरी आत्मा वाड ।
आत्मयामाजीं देहाचा पवाड । कीं देहीं आत्मा ॥७३॥
जो ब्रह्मांडीं तोचि पिंडीं असे । एकाचि घटीं मठींही आकाश जैसें ।
राईसमस्थळ रितें नसे । आत्मया गगनावीण ॥७४॥
पाहें पाहें रविदत्ता येवढा । आत्मा सघन पूर्ण उघडा ।
त्यांत देहाचा साकार बापुडा । त्यामाजीं ते स्फूर्ति ॥७५॥
इतुकी सानसी हे वृत्ति । सर्व जगातें जाली कल्पिती ।
म्हणोनि हेंच कारण सर्वांप्रती । इसीच माया हें नाम ॥७६॥
इचा सानपणा तरी येवढा । परी उठतांं गवसणी घाली ब्रह्मांडा ।
परंतु ब्रह्मात्मा जो किती उघडा । इसी जाणवेना ॥७७॥
तो जाणे यया स्फुरणासी । परी हे न जाणे बापुडी तयासी ।
इचिया आद्यमध्यअवसानासी । स्वप्रकाशें जाणे ॥७८॥
जेधवां हे उत्पन्न नव्हती । तेधवां स्वप्रकाश चिन्मूर्ति ।
ज्ञान कीं अज्ञान नसतां चित्तीं । स्वसंवेद्य असे ॥७९॥
तोचि अविनाश ज्ञानघन । अनंद अनंत परीपूर्ण ।
तयाचें यथार्थ केलें निरूपण । तुज यथामति मागां ॥८८०॥
तो आत्माचि असे अज्ञान । मानीत असती मूर्ख जन ।
तयाचें व्हावया निरसन । बोलणें लागे ॥८१॥
ब्रम्हात्मा कैसा किती केवढा । तयाचा साकल्य जाला निवडा ।
वृत्त्यादि देहांत हा बापुडा । उद्भवही कळला ॥८२॥
आतां ज्ञान अज्ञान हें कवणासी । आहे निश्चयेसी ।
जे कां मायास्फुरण एकदेशी तेथेंचि हे दोन्ही ॥८३॥
स्फुरण होतांचि हें सहजीं । ब्रह्मात्मा व्यापून आला त्यामाजीं ।
तोचि जाणता आणि हे दुजी । स्फूर्ति चंचळ ॥८४॥
सर्वांग जो असे देखणा । तो जाणोचि उठतां स्फुरणां ।
परी त्या जाणणिया आणि चळणा । उत्पत्ति नाश आहे ॥८५॥
म्हणोनि तें शबलब्रह्म म्हणावें । प्रकृति पुरुष हीं याचीं नांवें ।
चंचलत्व तें प्रकृतिरूप जाणावें । जाणणें तो पुरुष ॥८६॥
हेचि शिवशक्ति सविशेष । अर्धनारीनटेश्र्वर विशेष ।
या उभयांचा परस्परें संतोष । आणि साह्य एकमेकां ॥८७॥
ऐशी द्विविध रूपें एक स्फूर्ति । ज्ञान अज्ञान आलें तिजप्रति ।
इकडे स्फुरणा जाणें सहजगति । हेंचि ज्ञान ॥८८॥
स्फुरणा इतुकेंचि जाणणें उठिलें । तयासीच ज्ञान ऐसें बोलिलें ।
याविरहित जें पूर्ण संचलें । तें जाणिलें नाहीं ॥८९॥
तया न जाणणिया नांव अज्ञान । स्फुरण जाणिलें तेचि ज्ञानाजोंवरी हे दोन्ही न होती उत्पन्न ।
तों काल ज्ञाता ना अज्ञाता इकडे कळणें उद्भवतां स्फुरणाचें । तिकडे न कळणें होय स्वस्वरूपाचें ।
तस्मात् एका स्फूर्तीमुळें उभयांचे । विकार जाहले तेथून जें जें उत्पन्न जालें ।
तें तें जड चंचल नाथिलें । स्फुरणा अधिष्ठान जें संचलें ।
तें सत्य निर्विकारी ॥९२॥
या उभयांसी ज्ञान ना अज्ञान । तस्मात् मध्यें स्फूर्तीसी हे दोन ।
तेंचि या सर्व जगासी कारण । सत्य सत्य त्रिवाचा ॥९३॥
ज्ञान हा विकार वृत्तीचा । तैसा उद्भव हा न कळणियाचा ।
स्वरूपीं विकाराचि नसतां ज्ञानाचा । मा अज्ञान कासया ॥९४॥
आत्मत्वीं अज्ञानाचि असतें । तरी सुप्तींत नेणीव केवीं प्रकाशितें ।
लय साक्षित्वें अनुभवितें । हें निरोपिलें मागां ॥९५॥
तस्मात् आत्मा जाणता ना नेणता । ज्ञानघन उभयांपरता ।
ज्ञातता आणि दुजी अज्ञातता । एका वृत्तीसी दोन्ही ॥९६॥
असो स्फूर्तीचें जें जाणणें । तेंचि ज्ञानविद्या ही म्हणणें ।
तेचि विक्षेपशक्तीचीं लक्षणें । निमित्ताकरण तेंचि ॥९७॥
तयेमध्यें शुद्ध जाणणें आलें । तेंचि प्रतिबिंबरूपें कल्पिलें ।
तयासी ईश नाम ठेविलें । नियंतृत्व सर्वांचें ॥९८॥
स्फुरणामाजीं जें नेणीव । न कळे स्वस्वरूप स्वयमेव ।
तेचि अविद्या अज्ञानही नांव । आणि आवरणशक्ति ॥९९॥
तयामाजीं जाणणें आलें । त्या प्रतिबिंबा जीव नांव ठेविलें ।
तेंचि सुखदुःखा भोगूं लागलें । तेव्हां जन्मे मरे ॥९००॥
N/A
References : N/A
Last Updated : October 19, 2010
TOP