अलक्षमुद्रेचे लागतां ध्यान । हारपेलें देहाचे देहभान ।
योगी स्वरुपीं मिळोन । स्वरुपचि होती ॥३०॥
टीकाः
सहजाचें सहज ध्यान । घालिता सहज सहजा सन । तेणें सहज समाधान । सहजचि लाभे ॥१॥
ऐसे लागतां अलक्ष ध्यान । लक्षालक्षांचे मीलन । जीव शिव एकात्मपण । कोना कोण पहालें ॥२॥
म्हणोनि पहाणेंचि दर्शन । केवल पहाणें आत्म पण । जयांचें पहातां अधिष्ठान । आत्माचि उरे ॥३॥
जेथ जाले एकात्मपण । जैसे सागरीं लवण । किंवा इंधनी सर्पण । तैसे जाले ॥४॥
येथें नासिली त्रिपुटी । आत्मापणें आत्मया भेटी । तेथ द्वैतचिये गोष्टी । बोलोचि नये ॥५॥
स्वयें आत्माराम जाला । देहभाव सर्व निमाला । अवघा परिपुर्ण जाला । विश्वाकार ॥६॥
स्वरुपीं स्वरुपाचि जाला । ऐसा योग पहातां आगळा । तोचि ज्ञानराजें साधिलां । गुरुकृपें ॥७॥
काळ ग्रासोनि अग्निसीं मिळे । तेथ शुद्ध सत्व राहिलें । तेणें आत्मया व्यापिलें । सहस्त्रदळीं ॥८॥
प्रेमसुत्र येथ ओविलें । पंचप्राण नामी कोंडिलें । जीवनाचिये जीवन मेळे । शिवाचे जाले जीवपण ॥९॥
मग तें उरलें निरंजन । आत्मा राम स्वानंदघन । ज्ञानराज जाले आपण । सहजेचि ॥१०॥