परेचिया उपरि । उर्ध्वगगनीं लागली खेचरी ।
नाटोपती आनंद्लहरी । समाधिसुखाचिया ॥९॥
टीकाः
आकाशाचें पैल जावोन । देखियेंले ऊर्ध्वगगन । जें कां गगनाहोनि आन । शब्दस्फुरण न राहे ॥१॥
जेथ उरलेसे अगुण । पहातां कांहींच नाहीं गुण । गुणांसवें जावोन । मिळालोसे ॥२॥
तव जालो गुणातीत । जया संत म्हणती अव्यक्त । नामरुप हें प्रकृत । उरलेना ॥३॥
अनंतांचे अनंत नाम । ते तो बोलिले सर्वोत्तम । प्रकृत नामरुपाहोनि परम । शब्दगळे ॥४॥
गुणा आगले नामरुप । म्हणोनि अनंत नामे अरुप । एक तत्वाचि अपाप । हातीं आलें ॥५॥
शब्दगुणाचें परावर्तणें । जेथ एकचि पहाणें देखणें । लक्श भेदोनि अलक्ष्यपणें । अंग पहालें ॥६॥
आत्मयाचें अंग । पारदर्शक जैसे भिग । एक वस्तुंचि अनंग । उरलीसे ॥७॥
प्रकृत जीवनोहोनि अगळा । चंचळु हे दावी डोळा । तोचि होवोनियां ठेला । आत्मपणें ॥८॥
एवं पावोनि अगुण । ऊर्ध्व लक्षिलें गगन । जयालागी बोलती शुन्य । अःशब्दहि गिळिलासे ॥९॥
तेथ तंद्री राहोनि गेली । प्रस्फुट वाचाही खादली । शीतळ वाणीही लोपली । स्फुरणापैल जे होती ॥१०॥
नाम सारजिव्हा जैं खादली । जीवन ओतिलें जीवनकळीं । प्रस्फुटगगन दिठीं कमळीं । ऊर्ध्व जाले ॥११॥
तेथोनि जीवन ऊर्ध्व चाली । गति अकुंठित जाली । म्हणोनि खेचरी लागली । पाहातां पाहतं ॥१२॥
खेचरी मुद्रेची आनंद । कारण ते दृष्टी अभेद । जरी कां जाला सुक्ष्मभेद । चित्काळें आला ॥१३॥
परी ते चित्कळा न जाणली । तरी वृत्ति भ्रमित जाली । सुखादुःखीं हे पडली । गुंती कैसी ॥१४॥
अभेदासी आनंदलहरी । उसळती जीवनाभीतरी । समाधिसुखाची कुसरी । वानावें काय ॥१५॥
हें सुख सर्वागळें । अभेदवाचोनि न मेळे । गुरुशिष्यहि ये वेळे । अभेद होती ॥१६॥