खेचरीं उंच उंच जावे । उन्मनी नयनीं स्थिरावें ।
समाधिसुख स्वभावें । दिसो लागे ॥१३॥
टीकाः
जे कां खेचरी लागली । टकीसी टक मिळाली । देहवृत्ति हारपली । आपणपें ॥१॥
उंच उंच जाय जीवन । पहाणियों मिळालें गगन । मनाचियें उन्मनपण । नयनातु स्थिरावलें ॥२॥
चंचळ जाले अचळ । उरला चिंदांशु केवळ । सर्वांग होवोनि शीतळ । काय धाले ॥३॥
मग पावली समाधिअवस्था । सहज लाधली सर्वात्माता । निजसुख स्वभावता । लाधलें की ॥४॥
आपुला भाव तो स्वभाव । म्हणोनि भावापरी देव । जे का ज्ञानस्वरुप देव । निजगुज लाधलें ॥५॥
निजगुजा गुज जोडलें । मोहनाचे मोहन मिळालें । पाहातां तटस्थचि जालें । दोनी नेत्र ॥६॥
म्हणोनि तेचि पहाणें जालें । काय पहाणें आणिक उरलें । समाधिसाधन सिद्ध जाले । येणेंपरी ॥७॥
समाधी ते समाधान । काय बोलवें येथ आन । नवल येथिचे महिमान । जाणती संत ॥८॥