खेचरीचेनि लागवेगीं । उल्लंघोनि पश्चिममार्गे ।
घेतला चिन्मयाचा दुर्ग । परहोनि परता जो ॥१४॥
टीकाः
खेचरी राहिली लागोन । उर्ध्व चालिलें जीवन । उलट पश्चिममार्ग गहन । ओलांडिला ॥१॥
पहातां हा सुक्ष्म मार्ग । ऐल केले एकवीस स्वर्ग । स्वरोतोनि गमन सांग । होवोनि ठेले ॥२॥
मग चिन्मय दुर्ग अलक्ष । घेतला ज्ञानराजें प्रत्यक्ष । होवोनियां अतिदक्ष । एकसरा ॥३॥
हे तो दुर्ग अति सान पहातां दिसे अणुप्रमाण । सत्पसिंधुचें आवरण । जयावरी ॥४॥
वीर समुद्र पहातां नेत्र । सत्रावी ते क्षीरसमुद्र । नाकीं दथि खारा शरीर । रत्नाकार नाभिय ॥५॥
माथ सिंधु तो मदन । हृदयीं पहातां विस्तीर्ण मन । ऐसे दुर्ग अति कठिण । योगिया गवसे ॥६॥
दुर्ग अलक्ष परेपर । खेचरी जरी कां तत्पर । लक्ष्या लक्ष मिळतां सत्वर । प्रत्यय गोठी ॥७॥
जया गुरुकृपें ज्ञान । ऐसा योगिराज आपण । घेई दुर्ग ते कठिण । सत्य सत्य ॥८॥