त्रिकुट महाशिखरीं । भ्रमरगुंफेंच्या भीतरीं ।
गगनगुंफेचिया वरि । वतु कोंदाटली असें ॥२९॥
टीकाः
त्रिकुटगिरीचें महाशिखर । औटपीठाकाश अपार । तया गगनगुंफेचे वर । भ्रमरगुंफा ॥१॥
भ्रमरगुंफेचिया पैल । एक वस्तुचि केवळ । अरुप अनाम तेजाळ । अद्वय जे ॥२॥
जेथ कल्पना हे सरे । शद्बपण हे नुरे । जेथ अःशब्दचि उरे । चिन्मात्र ते ॥३॥
तेचि वस्तु कोंदांटली । खेळी विश्वाचिये खेळी । जेथ श्रुति मौनावली । सहजपणें ॥४॥
जे अंगसआंगे खेळे । परि इया अंगा न मिळे । जीवनकळियां आडळे । गुरुकृपें ॥५॥
आकाश जेंवि सर्वव्याप्त । असोनियां सर्वीं अलिप्त । तैसी वस्तु सदोदित सर्वत्र आहे ॥६॥