पैल तुर्येचे मेरे । नयनांतुनि नयन हेरे ।
सर्व साक्षी समरे । परब्रह्म ॥१॥
टीकाः
ज्ञानदेवा तूं माऊली । योगी जनांची साऊली । तुवां निगमसावल्ली । प्रकट केली ॥१॥
तूं तो अमरचि या भुगोली । व्यापक झालासी नभोमंडळीं । तुझी मूर्ति प्रकाशली । श्रीहरी ऐसी ॥२॥
भक्तजनासी पावली । ऐसे संइत बोलिती बोली । म्हणोनी विनति चरणकमळी । दर्शन कीजे या भक्ता ॥३॥
सर्वा ठायीं तूंचि ज्ञान । तुज जाणतां समाधान । म्हणोनि होईजे प्रसन्न । श्रवणपुटाबोधोनि ॥४॥
माझें कर्णीं सांगिजे गुज । तव अंतरीचें जें निज । अंतरीचें काज । जाणोनिया ॥५॥
धन्य सदगुरु हनुमंत । जेणें बोधिला परमार्थं । तेचि राहो जागृत ज्योत । अखंड स्नेहें ॥६॥
तृप्त करी माझी तान्हुली । मी आलोसे तुजजवळीं । नुरवी अज्ञानकाजळी । सानुलियाची ॥७॥
तेहत्तिस ओवियांचा बोध । करोनि सांगिजे विशद । अंतरीचा अंतरीं नाद । घुमवोनि ॥८॥
तूंचि कैवल्यांचा पुतळा । भक्तिज्ञानाचा उमाळा । म्हणोनि तोचि स्फूर्तिजिव्हाळा । प्रगट करी ॥९॥
तूं योगियांची समाधी । तोडिली सर्वही उपाधी । तुझोनि कृपे चित्त्तशुद्धी परिपुर्ण ॥१०॥
अंतः करणें हांक दिली । ते अंतः करणा मिळाली । समाधान वृत्ति केली । ज्ञानाईनें ॥११॥
ज्ञानाई प्रकट झाली । म्हणोनियां मिठीच दिली । दोनी भुजांनी कवळी । ज्ञानेश्वर ॥१२॥
जरी कां असली पामर । ज्ञान राजाचे डिंगर । पाठीराखा सर्वेश्वर । ज्ञानदेव ॥१३॥
पुसे ज्ञानाई माऊली । काय इच्छा अंतरी धरली । अंतर्वृति ओळखिली । तत क्षणी ॥१४॥
दिले पूर्ण आशिवचन । होवोनियां सुप्रसन्न । तेणें मना समाधान । नवल झालें ॥१५॥
अक्षर निराकारीं वहिले । अर्थरुपें प्रगट झाले । म्हणोनियां मीया नमिले । आदिबीज ॥१६॥
तेचि सांगती ज्ञानेश्वर आपण । निर्गुणाचे जाले सगुण । नयनातुंनि हेरे नयन डोळियांनें ॥१७॥
पैल तुर्येचे मेरे । नयनातुनी नयन हेरे । जेथ आपणया विसरे । आपणपे ॥१८॥
तरी ते तुरिया कवण । ज्ञानराजे द्यावे सांगुन । जया परौते पाहणे आपण । आपणिया ॥१९॥
उपाधिभुत जे जीवन । त्याचे करितां पृथःकरण । स्थूल सूक्ष्म आणि कारण । वेगळे होती ॥२०॥
त्रिकुटाचे करोनी भेदन । जागृति स्वप्न सुषुप्ती शुन्य । उलंघोनि वरुतेपण कृपेजाले ॥।२१॥
तेथ उरला निःशेष शब्द । जो आटता उन्मनी अमेद । श्वेत साक्षात्कार सिद्ध । जया पैल ॥२२॥
तया उन्गनीचिये ताटीं । प्रस्फुटगगनाचिये दिठी । हंकार जीवित्वाची गोठी । चैतन्यीं सरलीं ॥२३॥
उन्मनीची जेका पहा । उन्मन दावीं जेवा अहा । केवलाकाशाची जे रहा । जीवनाची ॥२४॥
ऐसी तुरिया प्रकर्षे चावळली । तरी वृत्ति स्थिरता पावली । वृत्ति वृत्तिच सरली । साम्यशब्दे ॥२५॥
वृत्ति आत्मते रिघाली । उर्ध्वमुखी अखंड धाली । ओटपीठाची साउली । पडली जेथ ॥२६॥
तया तुरिये वरुतिये स्थिती । ज्ञानराजे कथिली निगुती । जेथ समाधान चित्तीं चित्ताचिये ॥२७॥
तुरीयेपैल नयनीं नयन । तेथें साक्षी भगवान जेथ विश्वात्मा दर्पण । होवोनी ठेला ॥२८॥
सहज चतुर्विध वक्त्री । बाह्म चक्षुंचिया नेत्रीं । साधक रिघती अहोरात्रीं । तुरीयेपैल कैसेनि ॥२९॥
पहांता तुरियेचे उपरी । ऐसी ही दृष्टी फिरे माघारी । बाह्म दृष्टीते अंतरी । रिघो न शके ॥३०॥
जेथ अलक्ष दुर्गाची पहाणी । परतली भृकुटीपासोनी । तेथ लक्ष लक्षेल कोठुनी । बाह्म दृष्टी ॥३१॥
म्हणोनि डोळा तो गगन । नाद तोचि झाला कान । यथा शब्दांचें स्फुरण । जिव्हारुप ॥३२॥
तरी हें गगन कैसें । पहांताचि अनारिसे । समाधान ओपे सौरसे । विश्रांतीचे ॥३३॥
दशविध नादाते गिळोन । जो कां शब्द राहिला आपण । पाहतां तेचि ये गगन । देखे स्वये ॥३४॥
चिणिति चिण चिणिति घंटानाद । शंख तंत्री ताल छंद । वेणु भृदंग भेरी प्रसिद्ध । मेघनाद अगाधाचि ॥३५॥
हे दशनाद विरत । तेथ साधकु तो मत्त । आकाशाचा चढोनि प्रांत । चित्त लावी गगनाचे ॥३६॥
नादरहित जें स्फुरण । तेचि शब्दस्वरुप गगन । पाहातां नादांचे अधिष्ठान । वायुचि हा ॥३७॥
वारियांने नादछंद । वारियानें सारा प्रबंध । विश्व पहातां अगाध ।निर्माण केले ॥३८॥
पहण्यापासोनि जाला डोळा । जो निज तेजाचा उमाळा । शब्दरुपाचा प्रगट झेला । स्फुरण गुणे ॥३९॥
याचे परते आकाश । जें चंचळ परि निराभास । तेचि चक्षुरुप लक्ष । पाहो लागे ॥४०॥
पहाण्यापासोनि जाला डोळा । डॊळा पाहाणेपणा आला । तोचि डोळा स्थिरावला । पाहाणियातु ॥४१॥
पहाणेपण ते दृश्य । ऐसे जाणिनि सुरस । पहातां या विश्र्वास । आपणांचि पाहणें ॥४२॥
मंग सहजचि फिरणें । लक्ष्मीं लक्ष्य स्थिरावणें । आप आपणां पाहणें । समाधान ॥४३॥
पहाणेची जालें पाहाणेंपण । याचें कारण चंचळगुण पहातां एकत्व अभिन्न । काय वानु ॥४४॥
डोळिया डोळा मिळाला । आरशापुढें । आरसा ठेविला । लोलकासी देखणें । अलक्ष्य आत्म्यांचे पहाणें ॥४५॥
म्हणोनि आकाशदृष्टीचें देखणें । अलक्ष्य आम्त्यांचें पहाणें । मिळोनि गेले एकपणे । एक सरा ॥४६॥
पहाणिया देखणें भेटलें । तेणें आत्मचक्षुसि हेरलें । जें कां शुन्य उगवलें । राविबिबाविणें ॥४७॥
म्हणोनि ते शुन्य दृष्टी । देवल पहाणें ज्यांची दिठी । जेणें आत्मयाची भेटी । सहज होय ॥४८॥
नयनातोनि नयन हरेला । जेथ लाधली जीवनकळा । नयन लाथला आगळा । शुन्याहोनि ॥४९॥
दोन शुन्याचें देखणें । जेथ राहिलें आत्मपणें । म्हणोनियां सर्वात्मपणें । समचि साक्षी ॥५०।\