स्वरुपीं भेदिलें सारे गगन । ब्रह्मी तटस्थ दोनी नयन ।
अखंड समाधि समान । भोगिती योगी ॥१७॥
टीकाः
सुक्ष्माहोनी सुक्ष्मपण । अणुपरमाणु गेले भरोन । तया गगनीं राहिलें शिरोन । स्वरुप हें ॥१॥
आत्मरुपीं चचलपण । तेणेंचि झालें पोकळपण । दृश्यांचे जें अधिष्ठान । पहाणें जालें ॥२॥
पहाणेंचि जालें पहाणेपण । पाहातां ते वस्तुचि आपण । तयाचिये अधिष्ठान । स्वरुपाचि ॥३॥
पहातां इये सर्वाठायीं ।स्वरुपा वाचोनि कांहींच नाहीं । गगनीं तरी भरले कायीं । तयाविण ॥४॥
गगनाचे गगनपण । कोठें आहे तयांवाचुनि । तरंगाचे तंरंगपण । पाणीच जेंवि ॥५॥
म्हणोनि स्वरुपीं भेदिलें गगन । तेचि राहिलें लोचनीं भरुन । म्हणोनि तटस्थ नयन । दोनी जाले ॥६॥
दोनी तटस्थ जाले नयन । गेले दृष्टीचें द्वैतपण । आतवरि एकचि पुर्ग । आत्मरुप ॥७॥
म्हणोनियां समसमान । जाला श्रीहरी आपण । समाधि भोगिती गहन अखंड योगी ॥८॥