खोलोनि दशमद्वारीच्या छिद्रा । जातां भेटी रामचंद्रा ।
योगिया लागली योगमुद्रा । चहूंकडे ॥१०॥
टीका
खोलतां दशमद्वार छिद्र । आंत भेटे श्रीरामचंद्र । आरुढ जे कां हंसावर । तेजोरुप ॥१॥
अर्धमात्रेचिया अरुती । पंचमातृकेपरती । कमलमुखी हंसगती । गगनाच्या ॥२॥
सोहं सोहं अनुवृत्ति । जेथ पंचप्राण विचरती । तयावती पां निगुती । रामरुप ॥३॥
सुर्यचंद्र कळा सरली । जे गगनापाशीच थकली । बैल अनुवृत्ती जाली । रामरुप ॥४॥
पीत स्वरुपाची कळा । जेथ लागला गगन डोळा । तयेवरी पा नटला । रामचंद्र ॥५॥
अर्धमात्रेचिया पोटीं । पंचमातृकेचे पाठी । प्राणपैल हंसा मिठी । रामचंद्र ॥६॥
नवल तयांचा प्रकाश । दिसे झांकिलिया दृष्टीस । जो न ये उदयास्तास । कदाकाळीं ॥७॥
जो काळा ना सावळा । ढवळा ना पिवळा । जेणें जीवाची जीवनकळा । उजाळली ॥।८॥
ऐसा ज्याचा प्रकाश । पहातां जो अविनाश । पहाणें पाहाणेपणास । जेणें आलें ॥९॥
हंसावरी श्रीराम दिसत । सांगती सदगुरु हनुमंत । तेथ दृष्टी जडली निभ्रंत । सत्य सत्य त्रिवाचा ॥१०॥
हंसावरी हे जीवन । हंसावरी तगला प्राण । प्रत्यक्ष रामराय आपण । हंसावरी ॥११॥
तेथ जे लागली मुद्रा । तेचि योग्याची योगमुद्रा । चहुकडे रामचंद्र । भेटी जाली ॥१२॥