अजपाजपांचे आसनी बैसावे । मन मुरडोनी स्वरुपीं लावावें ।
गोल्हाट मंडळ भेदोनि जावे । समाधिसुखा कारणें ॥२१॥
टीकाः
जागृत स्वप्नस्थिति मारोन । घातलें अजपाजपासन मनाचिये मुरड साधोन । स्वरुपासी लावीयले ॥१॥
अजापाचा जप गहन । सुषुप्तिया केवल स्मरण । अंतरिया सावधान । जागृतपणें ॥२॥
जरी कां ते पा सुषुप्ति । परिपुर्ण तेथ ही जागृति । योगी हे खुण जाणती । सत्यसत्य ॥३॥
अगम्य तेथिचें साधन । जेथ बुडालें गगन । नुरले देहाचे देहभान । स्मरणमात्रें ॥४॥
सुर्यचंद्राची कासया कहाणी । कईच गेले हारपोनि । काय माया लोक तीनी । हारपेल ॥५॥
स्थुल सुक्ष्म आणि कारण । देह गेला महाकारण । मायेचेंहि आडरान । मावळलें ॥६॥
जेथ हारपे निशिदिन । तेथ काय त्यंचे गमन । मन कैंचे जन्ममरण । पापपुण्य ॥७॥
जेथ पापपुण्यचि नाहीं । स्वर्गपाताळ तेथ काहीं । इडापिंगळा सुषुम्नाहि । उरेचिना ॥८॥
ऐसें चालिलें साधन । स्वरुपीआं या एकपण । गोल्हाटमंडळभेदन । मग केलें ॥९॥
सोहं अनुवृत्ति समाधि । लागवेग जेणें नादी । जाली अनुसंधानसिद्धि । येथचि पा ॥१०॥
चारसहा करिती ध्यान । ऐसी समाधि गहन । तेचि पावावया खुण । गोल्हाटमंडळ भेदियल ॥११॥