एक तूं ही निरंकार (३०१)
मर्म न जाणे जग भक्तीचे ईश्वर प्राप्ती खरी भक्ती ।
त्यागुन भ्रम शंका सदगुरुला प्रसन्न करणे खरी भक्ती ।
पाहुन एका मानुन त्याला करणे ध्यान खरी भक्ती ।
बाकी सारी त्यागुनी कर्में गुरुमार्गी जाणे भक्ती ।
आहे निगुण देव निरंजन पुराण वेदांनी कथिले ।
'अवतार' म्हणे ऐसी या देवा अंगसंग मी देखियले ।
*
एक तूं ही निरंकार (३०२)
गुरु आज्ञेचे पालन करूनी करी सेवा तो शिष्य खरा ।
मिळेल तेची सेवन करूनी सुख मानी तो शिष्य खरा ।
सुख दुह्ख हे श्राहरी इच्छा मानी तोची शिष्य खरा ।
ठेविल त्यातची सुख मानूनी प्रेमे राही शिष्य खरा ।
एक प्रभुविण अन्य कुणाचा धरी ना जो विश्वास मनी ।
'अवतार' ऐशीया गुरु भक्ताला कधी कशाची नाही कगी ।
*
एक तूं ही निरंकार (३०३)
कोणाच्याही देहावरती वर्ण जातीचे चिह्न नसे ।
उच्च नीच बनवूनी कोना प्रभुने धाडीले नसे ।
प्रभुच्या दृष्टीमाजी जनही निर्धन कोणी नसे धनवान ।
राजा अथवा असो भिकारी प्रभुद्वारी तो एक समान ।
लटकी सर्व जगाची प्रीती एक प्रभुची प्रीत खरी ।
म्हणे 'अवतार' शीस झुकविणे ही गुरुदरची रीत खरी ।
*
एक तूं ही निरंकार (३०४)
स्वार्थीचे संबंधी सारे कोणी नसे बंधु भगीनी ।
दुःखदायी ही दुनिया सारी प्रेम खरे गेले निघूनी ।
मेंढरापरी चाल जगाची देव कुणा कळला नाही ।
प्रभु काय अन कुठे राहतो सनज कुणा याची नाही ।
प्रेम नम्रतेने भरलेले नगर गुरुने वसविले ।
'अवतार' म्हणे की पूर्ण गुरुने बेगमपुरा दाखविले ।
*
एक तूं ही निरंकार (३०५)
सदगुरु माझा पारस आहे तया कसोटी ग्रंथ पुराण ।
सदगुरु माझी ज्ञानदेवता केवळ ग्रंथामाजी लिखाण ।
भक्तजनांची पूंजी आहे ग्रंथातील पावन वाणी ।
स्वाद अलौकिक आहे याचा सेवन करी तोची जाणी ।
चरणधुळ भांडार सेवका बाकी सर्व असे माती ।
'अवतार' गुरुने अज्ञानाची केली दूर नयन पट्टी ।
*
एक तूं ही निरंकार (३०६)
मंदिर मशिदी काबा काशी फिरून हरि मिळणे नाही ।
योग तपस्या आणि समाधी यातुन हरि मिळणे नाही ।
कथा किर्तनी अन जागरणी प्रभु कुणा मिळणे नाही ।
मूर्ती पुढती शीस झुकवीता प्रभु कधी मिळणे नाही ।
जनही प्रभु तयांना मिळतो गुरु लाभला ज्यास पूरा ।
म्हणे 'अवतार' गुरुकृपेने मानव तो होईल पूरा ।
*
एक तूं ही निरंकार (३०७)
सर्व ठायी हा ईश्वर माझा ठाव रिता कोठे नाही ।
पान फूल अन डहाळीमाजी सर्व असा व्यापूनी राही ।
इकडून तिकडे काढून लावी ऐसा हा अदभुत माळी ।
नवी नवी हा रुपे सजवी सर्वाना चढवी लाली ।
रंग रूप अन रेखातीत हा लीला याची असे न्यारी ।
'अवतार' म्हणे केला हरि बोध जाऊ तयाला बलिहारी ।
*
एक तूं ही निरंकार (३०८)
सर्व व्यापूनी आहे ईश्वरी रानी वनी तू कां जाशी ।
सदगुरुविना प्रभु न गवस उगाच धक्के कां खाशी ।
उपवासे जागरणे करूनी नाना दुःखे भोगीसी ।
भटकूनी वन पर्वत गुंफा वृथा जन्म तू घालविसी ।
उंच चढूनी उच्च स्वराने नित्य वांग तूं कां देशी ।
'अवतार' म्हणे हा दिसेल नयनी जव येशी सदगुरुपाशी ।
*
एक तूं ही निरंकार (३०९)
सर्व प्रथमता असे तयाची ज्याने अनादी ओळखिला ।
या एकाच्या मिळून संगे रंग प्रभुचा जाणीयला ।
जाणून एका या कर्त्याला आणि कुणाला भजत नसे ।
मंदिरी मशिदी जाऊन कधीही नतमस्तक तो होत नसे ।
अंगसंग जाणुनी एकाला याचे दर्शन सदा करी ।
'अवतार' सदा आनंदी राहे रोज दिवाळी तया घरी ।
*
एक तूं ही निरंकार (३१०)
द्वैत भावना मनी न येई जो प्रभुवर विश्वास करी ।
ऐशा प्रभुला जीवन अर्पूनी त्याची एकच आस धरी ।
परमात्म्याचे रूप जाणुनी सर्वासंगे प्रेम करी ।
चराचरातील कणा कणातुन दर्शन भगवंताचे करी ।
ज्यावर हात असे या प्रभुचा करील काय त्याचे संसार ।
मृत्यु जीवन हाती याच्या होईल जे इच्छील निरंकार ।
जिज्ञासू वृत्तीने मानव येईल जो सदगुरु चरणी ।
'अवतार' ऐसी या गुरुभक्तांच्या दुजा भाव ना राहे मनी ।