मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह १६

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (१५१)

एक ज्योत निर्मित हे सारे सर्व पसारा त्याचा हा ।

एकाने या सर्व व्यापिले परि तयाहुन म्यारा हा ।

अंगसंग सर्वाच्या हाची अन सर्वाचा हा वाली ।

या एकाच्या भवती पाहे जग सारे घिरट्या घाली ।

या सृष्टीतील कणा कणांचा बनून आहे जो आधार ।

हेच गुन्ह आहे या प्रभुचे ज्याचा शोध करी संसार ।

जरी जाणणे रहस्य याचे शरण जाय तू सदगुरुला ।

त्याची चरळधुळी घेऊनी सोडी तू अभिमानाला ।

अलख निरजन अंतर्यामी यास जाणता पुर्ण गुरु ।

म्हणे 'अवतार' पूर्ण गुरुवीण अशक्य जाणे पैल तीरू ।

*

एक तूं ही निरंकार (१५२)

असे महल बाळूच्या वरती राहतोस तु ज्यामाजी ।

खेळ हा सारा एक थेंबाचा समजतोस तू काया जी ।

असे खेळणे ते मातीचे समजतोस चंद्रासम तू ।

मूर्ख मानवा राख घेऊनी सोडून दिधले सुवर्ण तू ।

नकोस गर्व करू तू याचा सुंदर मोहक रुपाचा ।

त्यांत प्रभुचा अंश विराजे आवडता जो सकलांचा ।

रुप तुझे आणिक जवानी सर्वच ही आहे माया ।

होऊ नको तू मगरुर यांनी आहे ही ढळती छाया ।

प्राप्त करुनी गुरुकृपा जो मान आपुला मिटवीतो ।

म्हणे 'अवतार' अती पावन तो अभिमानाला घालवीतो ।

*

एक तू ही निरंकार (१५३)

अती श्रेष्ठ तो आहे जगती आणिक तया मिळे सन्मान ।

संत जनांची सेवा करुनी जाय मिटूनी ज्याचा मान ।

जो नर जगती सर्वापुढती विनम्र होऊनी चालतसे ।

उच्च तोच सर्वाहुनी जाणा अती उत्तम अती श्रेष्ठ असे ।

पायधुळीं या संतजनांची लावील जो मस्तकावरी ।

पुज्य होय तो जगतामाजी मूल्य तया प्रभु दरबारी ।

जो नर त्यागी दुर्गुण सारे धारण करील पावनता ।

जात पातीचे सोडून झगडे मातीला तो एक मानवता ।

बुद्धीमान तो सेवक जाणा समान सुख दुःखी राहे ।

'अवतार' समर्पण होऊन त्याला प्रभु मर्जीने जो राहे ।

*

एक तूं ही निरंकार (१५४)

सन्मुख सदा हरिला पाहे याहुन उत्तम धर्म नसे ।

साधुजनांची सेवा करणे याहुन उत्तम कर्म नसे ।

जो संतांच्या सेवेसाठी अर्पण धन संपती करी ।

समजावा तो निजमनीचा मळ धुऊनी साफ करी ।

सदगुरुच्या उपदेशाहुनी नाही थोर दुजी वाणी ।

अर्पण करने मनास आपुल्या बलिदान ना याहुनी ।

विसर प्रभुचा होय न जेधे पवित्र स्थळ ते थोर जगी ।

थोर असे ती भक्ती जगती मान्य असे जी गुरुलागी ।

जीवनात आचरुनी अपुल्या त्यानंतर जो करी प्रचार ।

तन मन धन मी ऐशा भक्तां अर्पण करीन म्हणे 'अवतार' ।

*

एक तूं ही निरंकार (१५५)

स्वामी जो सर्‍या जगताचा जो आहे रक्षण कर्ता ।

त्यावर प्रेम जयाचे नाही शुन्य तयाचे बुद्धीमत्ता ।

रिद्धी सिद्धी अन वन निधी सेवेन ज्याच्या मिळती ।

भूलुन मायेमाजी प्राणी त्या हरिला विसरुनी जाती ।

घटघटवासी हाची स्वामी सदैव समीप जो आहे ।

सारे जग हे तया विसरले जो याचा जनीता आहे ।

कृपाप्रसादे आम्हा ज्याच्या मान मिळे ठायी ठायी ।

अंतकाळी जो राहील संगे मिळेल मान हरि द्वारी ।

जगवासी विसरूनी याला व्यर्थची समया दवडीती ।

'अवतारी' गुरु जर करील कृपा राहील तरीच हरि चित्ती ।

*

एक तूं ही निरंकार (१५६)

मानव काया असे परंतु कर्म करितो पशु समान ।

छल कपटातच गढुन गेला रात्रंदिन जसे सैतान ।

उज्वल वसने अंगावरती मैल साचला असे मनी ।

परि ढोंगे हे लपणे नाही यत्‍न जरी केले कोणी ।

वरुन त्यागी आतुर भोगी वेष असा धारण केला ।

भवसागर हा तरेल कैसा गळ्यात धोंडा अडकविला ।

काम श्‍वान त्य अमनी बैसला भुके अन ललकार करी ।

मुखी नाम परी कुटील मानसी सैतानापरी काम करी ।

स्वतः हरिने येऊन ज्याच्या केला वास मनामाजी ।

'अवतार' म्हणे की मानव तोची एकरूप झाला सहजी ।

*

एक तूं ही निरंकार (१५७)

मिथ्या सृष्टी मिथ्या नगरी मिथ्या राजा अन संसार ।

मिथ्या सारे संग सोयरे मिथ्या सर्व असे परिवार ।

मिथ्या सारे खाणे पिणे मिथ्या आहे ऐष आराम ।

मिथ्यामाजी गुंतुन जग हे मिथ्या करिती सारे काम ।

मिथ्या सोने मिथ्य चांदी मिथ्या आशा अहंकार ।

मिथ्या माय मिथ्या छाय मिथ्या हा सारा संसार ।

मिथ्या श्‍वासाचा घट आहे ज्यावर करिशी प्रीत अपार ।

कारभार तव खोटा सारा मिथ्या सारे तव भंडार ।

मिथ्या सारे महाल माड्या ज्यावर करिसी तू अभिमान ।

'अवतार' हे सारे आहे मिथ्या ठेवीशील तु ज्यावर ध्यान ।

*

एक तूं ही निरंकार (१५८)

सत्य एकची जाणावे जे गुरुदर्शन आहे सत्य ।

महिमा गाणे एक प्रभुची चिंतन करणे हे सत्य ।

सत्य प्रभुची रचना सत्य निरंकार स्वयं सत्य ।

प्रेम गुरुशी करणे सत्य सदगुरु हा आहे सत्य ।

संगती सत्य पूर्ण गुरुची सत्य असे याचा दरबार ।

स्वामी सकळजनांचा सत्य सत्य एक आहे करतार ।

सत्य गुरुमंदिर जगी या सत्य गुरुपुजा सत्कार ।

ज्याने या सत्यास जाणीले सत्य असे त्याच व्यवहार ।

या सत्याला जाणिले सत्य असे त्याचा व्यवहार ।

या सत्याला प्राप्त करी तो असत्य जवळी न ये कदा ।

म्हणे 'अवतार' पुर्ण गुरुवीण कुणा न गवसे सत्य कदा ।

*

एक तूं ही निरंकार (१५९)

रूखी सुखी कच्ची पक्की मिळेल ते सेवन करीतो ।

पावन त्याचे खाणे पिणे नाम जो या प्रभुने घेतो ।

जुनी फाटकी वसने घाली चालतसे उघड्या पायी ।

शुभी खाणे पोषाख तयाचा श्रीहरीचे जो गुण गाई ।

धनी व मानी असून जगती सेवन उत्तम अन्न करी ।

स्मरण परी ना करी प्रभुचे जीवन त्याचे पशु परी ।

स्मरण परी ना करी प्रभुचे जीवन करी पेय्यें नाना ।

व्यर्थ तयाचे खाणे पिणे जो नर रीता नामावीना ।

समक्ष हरिला पाहून ज्याने क्षणभर याला आठविला ।

'अवतार' म्हणे ऐका संतानो काळावे भय ना त्याला ।

*

एक तूं ही निरंकार (१६०)

अविचारे कटुवचन बोलसी मधुर कधी ना येती बोल ।

हिर्‍यासारखा जन्म तुझा हा कां करिसी तू मातीमोल ।

राम उभा असता सामोरी परी नेत्र ना उघडीशी ।

खोटी असे तव सारी करणी खोट्याचा सौदा करिशी ।

दुसर्‍याला तू तुच्छ मानीशी कळे न काही तुझे तुला ।

मना अंतरी नसतां प्रीती राम भेटणे नाही तुला ।

ओळखल्यावीण निरंकार हा यम फांसी चुकणे नाही ।

निजधामी ना मिळे ठिकाणा ज्ञान तयाचे जर नाही ।

काय सांगशी यम दरबारी वही तुझी आहे कोरी ।

म्हणे 'अवतार' ऐक मानवा व्यर्थ भार वाहशी शिरी ।

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP