मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह ६

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकाअ ( ५१)

रंग बेरंग माया जगती तुझ्या मना जी भुलविते ।

गोष्ट समज तु पक्की माझी ही येते आणि जाते ।

साऊली परी सुखावरी या जर तू आकर्षित होशी ।

होईल जेव्हा दूर साऊली टाहो फोडुन मग रडशी ।

जे काही या नयनी दिसते नाशिवंत आहे सारे ।

बुद्धी हीन हा मानव प्राणी त्यावर करीतो प्रेम खरे ।

नश्‍वरासवे करून प्रीती रडणे लागे तुज अंती ।

पदरी हाती पडे न कांही जाईल सर्वही संपत्ती ।

संतजनांवर प्रेम करी जो होई तयाला सुख प्राप्ती ।

'अवतार' दया संतांची सारी अपुल्या संगे मिळ्वीती ।

*

एक तूं ही निरंकार (५२)

तन मन धन अन् कुटुंब कबीला नश्‍वर हे असती सारे ।

मान बढाईचे अती लोभी नश्‍वर हे असती सारे।

रथ घोडे पोशाख व हत्ती नश्‍वर हे असती सारे ।

प्रेम जगाचे मित्रही सारे नश्‍वर हे असती सारे ।

यौवन शासन अन संपत्ती नश्‍वर हे असती सारे ।

थाट अमीरी आणि करामत नश्‍वर हे असती सारे ।

प्रभु जाणी जो साधुकरवी अमर तोच राहे जगती ।

'अवतार' म्हणे की हरिभक्तांची मरणोत्तर राहील किर्ती ।

*

एक तूं ही निरंकर (५३)

मानीना जो निर्गुण देवा म्हणुनी नास्तिक लोक तया ।

पाषाणावत उगाच त्याचा भार असे धरतीवर या ।

हरिनाम ज्यापाशी नाही तो नर आहे मंदमती ।

तया कारणे जागोजागी फांसे मृत्युचे पडती ।

अती निरर्धक जन्म तयाचा प्रभुचे नाम नसे चित्ती ।

ईश कृपा, वर्षाव न होता सुकेल ती जीवन शेती ।

टाका जाळुन सर्वही धंदे ज्यामाजी नाही हरिनाम ।

जाळुन टाका धन कृपणाचे ज्यायोगे नाही आराम ।

मनी जयाच्या राम विराजे महिमा त्याची अपरंपार ।

ओवाळीन तन मन धन सारे अर्पिन प्राण म्हणे 'अवतार' ।

*

एक तूं ही निरंकार (५४)

असेल काम कुणा दुसर्‍याचे अन्य कुणी ते काम करी ।

मना अंतरी नसता प्रीती भाव दाखवी बरी-बरी ।

अंतर्यामी दाता पूढती विद्वान असो कोणी गाढा ।

चतुराई ना येई कामी होय भेद त्याचा उघडा ।

कर्म दुज्याला सांगे करण्या आपण स्वयं न आचरितो ।

चौर्‍याऐंशीच्या फेर्‍यामाजी जन्म मरण चक्री फसतो ।

मनी जयाच्या बसे मुरारी स्वयं होय तो निरंकार ।

वचन तयाचे जो मानी तो होईल सहजपणे भवपार ।

जाणुनी घेईल जो नर तुजला आणि तुझ्यावर प्रेम करी ।

'अवतार' चरणरत घेतां त्याचे जीवन नौका पार करी ।

*

एक तूं ही निरंकार (५५)

सेवक मी ऐशा स्वामीचा सर्व जयाला ज्ञात असे ।

धरती अंबर सर्व दिशातुन व्यापक जो सर्वत्र असे ।

कर्ता जो या सकल जगाचा निज भक्तांचा संग वसे ।

दूर कुणाला नाही दिसला कुणा कुणाला जवळ दिसे ।

गंगेहुनही असे पवित्र न्यारी त्याची चाल रीती ।

असे जाणीला ज्याने याला त्याचे उच्च विचार अती ।

चरण धरा ऐशा भक्ताचे जो अती प्रिय असे याला ।

मिळवी केवळ संगे तोची स्वये जो आपण समावला ।

हरिरंगी रंगवील तोची रंगला असे जो स्वतः ।

'अवतार' सदगुरु हरिचा ज्ञाता सकल जगाचा तो दाता ।

*

एक तूं ही निरंकार (५६)

साधु संगत करी नरा तू प्रसन्नता राहील वदनी ।

साधु संगत करी नरा तू मलीनता येई न मनी ।

साधु संगत करी नरा तु कष्ट गरीबी होई दुर ।

साधु संगत करी नरा तू अभिमानही जाईल दूर ।

साधु संगत करी नरा तू निरंकार भेटेल तुला ।

साधु संगत करी नरा तू बहर येईल जीवनाला ।

साधु संगत करी नरा तू अमृत रस प्राशन करीसी ।

साधु संगत करी नरा तू पांचानाही वश करीसी ।

साधु संगत करी नरा तू पवित्र मन राहील सदा ।

'अवतार' मिळे जर साधु पूरा मन एकाग्र होय सदा ।

*

एक तूं ही निरंकार (५७)

साधुची जर संगत केली मन भ्रांती संपुन जाई ।

साधुची जर संगत केली आनंदी तव मन राही ।

साधुची जर संगत केली हरिची होईल तुज भेटी ।

साधुची जर संगत केली हरि सवे होईल प्रीती ।

साधुची जर संगत केली गीत प्रभुचे गाशील तू ।

साधुची जर संगत केली घरात अपुल्या राहशी तू ।

साधु संगत करी जो कोणी आनंदी राहील सदा ।

'अवतार' मिळे जर साधु पुरा निजघर त्याचे जवळ सदा ।

*

एक तूं ही निरंकार (५८)

संगत मिळेल जर साधुची कलंक सारे होती दुर ।

संगत मिळेल जर सांधुची मन आनंदे होईल चूर ।

साधु जर का असेल सत्य त्रिगुणा पासून मुक्तं करी ।

साधु जर का असेल सत्य मन आनंदे सदा भरी ।

साधु आहे अथांग सागर ज्याला नाही आर व पार ।

महानता साधुची इतुकी ज्याला काहीं नाहीं सुमार ।

महिम साधु जनांची भारी सदैव ऐकवीती भक्त ।

'अवतार' म्हणे हरि संतामाजी तीळ भरही नाही द्वैत ।

*

एक तूं ही निरंकार (५९)

निरंकार ज्या मनी विराजे जग ना खोटा म्हणू शके ।

कमळ पुष्प हे जळात राहुन स्पर्श जळा ना करु शके ।

मनात ज्याच्या ज्योत उजळती निर्मलता ज्या मनी वसे ।

सर्व सुखे भोगून जगाची जगताशी सलग्न नसे ।

मनी जयाच्या एक बैसला पाहे सकळां एक समान ।

पावन संत चरणरज घेता रंक सुद्धां होई धनवान ।

निरंकार ज्या घटी बैसला चंचलता ना राहे मनी ।

रात्रंदिन, 'अवतार' ते प्राणी धन्य धन्य वदती वदनी ।

*

एक तूं ही निरंकार (६०)

गुरु जयाच्या मनी बैसला सर्व रंगी एक रंग असे ।

हरिच्या संगे सदा राहतो हरि तयाच्या संग असे ।

मनी जयाच्या राम विराजे नाम तयाचा प्राणाधार ।

नाम सेवीतो नामे सजतो नाम असे त्याचा परिवार ।

सावधान मायेतुन राहे ज्ञान गुरुचे जया मनी ।

ज्या भक्तांनी राम जाणीला रक्षण करी हा क्षणोक्षणी ।

जया मनी सदगुरु विराजे संग तयाचा लावील पार ।

'अवतार' गुरुचे जो यश गाईल त्याचे यश गाईल संसार ।

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP