अवतारवाणी - भजन संग्रह १५

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


भजन संग्रह १५

एक तूं ही निरंकार (१४१)

प्रसन्न होय न अंतर्यामी उलट्या सुलट्या कर्माने ।

प्रसन्न होय न अंतर्यामी मंत्र व माळा जपण्याने ।

वश ना होई स्वामी कधीही ताल सुरावर गाण्याने ।

वश ना होई स्वामी कधीही कर्मयोग आचरणाने ।

प्रसन्न होय न अंतर्यामी जटाधारी त्या केसाने ।

प्रसन्न होय न अंतर्यामी केवळ उच्च विचाराने ।

प्रसन्न होय न अंतर्यामी भगव्या रंगी वेषाने ।

प्रसन्न होय न अंतर्यामी मधूर ऐशा वचनाने ।

प्रसन्न जर जाहला सदगुरु होईल राजी तर भगवान ।

म्हणे 'अवतार' गुरु तोषता कणही होईल गगन समान ।

*

एक तूं ही निरंकार (१४२)

वश ना होय कधी भगवंत केवळ जय जयकाराने ।

वश ना होय कधी भगवंत घंटाच्या निनादाने ।

वश ना होय कधी भगवंत चिमट्यांच्या झणकाराने ।

वश ना होय कधी भगवंत तार स्वरे आळविण्याने ।

वश ना होय कधी भगवंत धूप मंदिरी जाळीता ।

वश ना होय कधी भगवंत लाख पूले अर्पण करिता ।

वश न होय कधी भगवंत अखंड दीप जाळूनी ।

वश ना होय कधी भगवंत शक्ति आपुली खर्चूनी ।

वश करण्यासी या भगवंता मान त्यागणे लागतसे ।

म्हणे 'अवतार' गुरुच्या चरणी शीस झुकविणे भाग असे ।

*

एक तूं ही निरंकार (१४३)

निरंकार ना दृष्टी येतो अपुल्या मन चतुराईने ।

निरंकार ना दृष्टी येतो विद्या खुप मिळविल्याने ।

निरंकार ना दृष्टी येतो अनेक युक्ति यत्‍नाने ।

निरंकार ना दृष्टी येतो कर्म धर्म आचरणाने ।

निरंकार ना दृष्टी येतो नकली वेष बनविण्याने ।

निरंकार न दृष्टी येतो बांग तया ऐकाविल्याने ।

कृपा करी जर संत हरिचा कठीण काज होईल सोपे ।

प्रसन्न हो 'अवतार' गुरु जर भेट प्रभुची करू शके ।

*

एक तूं ही निरंकार (१४४)

ओळखल्यावीण प्रभु यश गाणे गगनाला धरणे आहे ।

ओळखल्यावीण प्रभु यश गाणे उलटमार्गी जाणे आहे ।

ओळखल्यावीण प्रभु यश गाणे लटीके करणे सत्याला ।

ओळखलयवीण प्रभु यश गाणे आग लाविणे पाण्याला ।

ओळखल्यावीण प्रभु यश गाणे तृषा शमविणे अग्नीने ।

ओळखल्यावीण प्रभु यश गाणे आयु यर्थची घालविणे ।

ओळखल्यावीण प्रभू यश गाणे स्तुती व्यर्थ आहे करणे ।

ओळखल्यावीण प्रभू यश गाणे चौर्‍याऐंशी चक्कर खाणे ।

निज नयनांनी पाहून गणे तीच महानता असे खरी ।

'अवतार' म्हणे जो गुरुला जाणे आले तयाला समय पुरी ।

*

एक तूं ही निरंकार (१४५)

निरंकार जाणूनी जो नर निज स्वामीचे गूण गातो ।

जन्म मरण त्या कधी ना येई मुक्ती पदाला तो मिळतो ।

निरंकार जो कोणी जाणे होईल तो भवसागर पार ।

कर्मलेख ना मागे कोणी इह परलोकी, सौख्य अपार ।

निरंकार जाणे जो मानव पावन त्याचा असे आहार ।

निरंकार जाणे जो मानव उत्तम त्याचा असे व्यवहार ।

निरंकार जाणे जो मानव कामे सर्व सफळ होती ।

निरंकार जाणे जो मानव चिंता दुःख न ये चित्ती ।

पाहिल्यावीना पूजा करिती भुलला हा सारा संसार ।

'अवतार' गुरु जर न करी कृपा अशक्य दिसणे निरंकार ।

*

एक तूं ही निरंकार (१४६)

कंटक असता सुमनासंगे ते न तयांची खंत करी ।

तैसे हरिजन जगी राहती सोडुनीया दुनियादारी ।

व्यर्थ बोल ना उच्चारिती कर्म असे बोला जैसे ।

वसती ते या जगतामाजी कमले ज्यापरी जळी असे ।

गंध न सोडी चंदन कधीही राहूनीया वेळूमाजी ।

नाम हरिचे हरिजन तैसे घेती प्रति श्‍वासामाजी ।

पाणकोंबडी जळात राहुन रहातसे निर्लेप सदा ।

'अवतार' त्यापरी भक्तजनांना माया ना भुलवील कदा ।

*

एक तूं ही निरंकार (१४७)

आचरूनी जपतप हवनाला ध्यान समाधी कितीही धरा ।

वेद स्मृती अन ग्रंथ वाचूनी समय आपुला खर्च करा ।

आचरुनी निजधर्म नित्तीला कितीही क्रिया कर्म करा ।

अथवा त्याग करुनी सारे वनात जाऊन वास करा ।

पुण्यकर्मही नाना करूनी हिरे माणके दान करा ।

श्‍वासोच्छवासी नाम जपूनी रात्रंदिनी रठन करा ।

एक एक अंगाचा हिस्सा कापून नित्य हवन करा ।

नेम व्रते आचरुनी रोजे विविध कर्मे जरी करा ।

व्यर्थ समज ही सारी कर्मे प्रभु तत्व जाणिले नसे ।

'अवतार' म्हणे नामावीण प्राण्या कर्म हे कामी येत नसे ।

*

एक तूं ही निरंकार (१४८)

आग मनाची शांत न होई लाखो वेष बनविण्याने ।

शुन्यावत ते हरिदरबारी जे करिसी चातुर्याने ।

अंतकळी ही कर्मे सारी आणिक बद्ध तुला करिती ।

नर्क स्वर्गीच्या बंदीवासी बळे तुला घेऊनी जाती ।

कर्मफळे ही भोगण्यास तू फिर फिरूनी जन्मा येशी ।

लटकुनी उलटा गर्भाशयी तू त्या अती कष्टाने रडशी ।

तिथे न कोन तुझा कैवारी अश्रु ढाळीसी नयनांनी ।

सुकर श्‍वान आश्‍वादी होऊन चौर्‍याऐंशी फिरसी योनी ।

नाम हरिचे जो नर जाणे तोची मुक्तीपदा जाई ।

म्हणे 'अवतार' की भक्त गुरुचा या प्रभुची महिमा गाई ।

*

एक तूं ही निरंकार (१४९)

तू दाता सर्वाहुनी मोठा स्तुती कोन करू शकणार ।

उत्तम तू सर्वाहुनी श्रेष्ठ नांव असे तव निरंकार ।

अनंत शक्तीचा तू स्वामी अदभुत तव लीला जगती ।

दयानिधी तू या जगताचा अनंत रूपे तव असती ।

मतीहीन मी मानव क्षुद्र विचार मी तव काय करु ।

दीन हीन मी निर्बल स्वामी अर्पण तुज मी काय करु ।

जो नर तुजला व्यापक पाहे तोच असे ब्रह्माज्ञानी ।

होईल तोची अमर आत्मा अमर ज्योत ही जो जाणी ।

'अवतार' गुरुचे पाय धरी तू केवळ मर्म तुला याचे ।

पालक जो या सकल जीवांचा यशोगान तू करी याचे ।

*

एक तूं ही निरंकार (१५०)

मृत्युमार्गी ऐक हे नरा अती घोर अंधार असे ।

ज्ञानदीप जर असेल हाती मार्गी तुला प्रकाश दिसे ।

नातेदार तुझे जे असती त्या ठायी कामी न येती ।

हरिनाम संपत्ती केवळ दुजे ना येईल संगाती ।

अंतसमयी होते कर खाली सिकंदर कारू यांचे ।

गुरुवीणा कोणी ना साथी धर्मराज मंदिराचे ।

दृष्टी गोचर सारे खोटे नाशवान सारी माया ।

होईल माती एके दिवशी मातीची ही तव काया ।

प्रसन्न ज्याने केले गुरुला आणि मानीली हरि इच्छा ।

म्हणे 'अवतार' तयाच्या पदरी खरा खजाना नामाचा ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-07-21T07:39:30.7230000