मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|अवतार वाणी|

अवतारवाणी - भजन संग्रह ३०

संपूर्ण अवतारवाणी या पवित्र काव्यात्मक ग्रंथरूपी भजनांची रचना शेहनशाह सत्गुरू बाबा अवतारसिंहजी महाराजांच्या मुखारविंदातून पंजाबी भाषेत झाली. या दैवी ग्रंथाला अलौकीक लोकप्रियता लाभली.


एक तूं ही निरंकार (२९१)

गुरु शिष्याची हीच निशाणी पालन गुरु आज्ञा करीतो ।

हरि इच्छा मानून खुशीने हुकुम कधी ना टाळीतो ।

पारब्रह्म शिष्यासी मिळाले सदैव ते सांभाळीतो ।

अंतर्बाह्य एक राहूनी द्वैत भाव संव्हारिती ।

सदा पाळीती वचन आपुले स्वयें मुखाने जे वदती ।

म्हणे 'अवतार' गुरु इच्छेने जीवन गुरु सेवक जगती ।

*

एक तूं ही निरंकार (२९२)

मृतक असे तो प्राणी ज्याच्या मनी वसे ना निरंकार ।

धृग धृग त्याचे आहे जीणे ज्यापाशी ना नाम आधार ।

जो मायेचा अधीन होतो रात्रंदिन तो रडत असे ।

स्थैर्य नसे त्याच्या जीवनाला झुरती जळात लवन जसे ।

वंचित जो नामावीन त्याच्या सदा अंतरी दृष्ट विचार ।

अटळ सत्य हे बोल कुणीही टाळू शकेना म्हणे 'अवतार' ।

*

एक तूं ही निरंकार (२९३)

गुरु सेवक आणि मनमांर्गी अशक्य होणे यांचा मेळ ।

मार्ग भिन्न असती दोघांचे एक पाणी तर दुजे तेल ।

एक तारितो दुजा मरी ऐसी तव लीला भगवान ।

एक कुपुत्र दुजा सुपुत्र असुन एकाची सन्तान ।

गुरु सेवक सदगुरुच्या चरणी आनंदाने मौज करी ।

'अवतार' म्हणे की मनमार्गीला अती जाच यमराज करी ।

*

एक तूं ही निरंकार (२९४)

जप तपाने देव ना मिळे आणि कधी नाही मिळणार ।

हृदय कमल सदगुरुवाचूनी ना फूललं नाही फुलणार ।

नाविकाविना सागरी नौका ना तरली नाही तरणार ।

सुईवाचुनी जीर्ण वसन ते कुणी न शिवले ना शिवणार ।

मिळू शकतो हा प्रभु मिळाला गुरुच्या एक ईशार्‍याने ।

'अवतार' एका क्षणात मिळतो कृपा करिता सदगुरुने ।

*

एक तूं ही निरंकार (२९५)

नसे जयाचा कोणी सहारा ज्याला कोणी ओळखिना ।

जीणे त्याचे तृणवत जगती कोणी तयाला मानीना ।

ना संपत्ती नाही किंमत कोन तयाला जाणीना ।

घर नाही राहाण्या तयाला राहे भोजन वस्त्र विना ।

लिहिली भाग्यमाजी गरीबी नशीबही काही न करी ।

'अवतार' म्हणे हा सदगुरु पूरा क्षणी तया धनवंत करी ।

*

एक तूं ही निरंकार (२९६)

नाती गोती अन श्रीमंती ही सारी मिथ्या माया ।

यौवन रूपही मिथ्या जाणा सदैव ही ढळती छाया ।

दृष्यमान हे सर्वही माती मानव देह असे माती ।

जाणे सर्वांना एक दिवशी जे जे आले या जगती ।

लाखांचा तु असुन मालक संगे कावडी जात नसे ।

'अवतार' तुझे ना कोनी जगती गुरु कर कर मस्तकी नसे ।

*

एक तूं ही निरंकार (२९७)

रामनाम जप करीत होतो राम दाविला सदगुरुने ।

जगती कैसे जीवन जगणे हे शिकविणे सदगुरुने ।

पिवून प्याला अमर जाहलो पाजियला जो सदगुरुने ।

उकीरड्यावरी पडलो असतां उठवियले मजला गुरुने ।

विसरूनी जाणे शक्य नसे मज गुरुने जे केले उपकार ।

जन्मो जन्मी फेड ऋणाची होने अशक्य म्हणे 'अवतार' ।

*

एक तूं ही निरंकार (२९८)

ज्ञानी अन अज्ञानी दोन्ही पहाता दिसती एक समान ।

ओळखिना अज्ञानी प्रभुला ज्ञानी जाणीतसे भगवान ।

ओळखिले जाती त्या समयी बोल बोलती जव दोन्ही ।

दिसून येईल अंतर त्यातील हंस कोण बगळा कोंणी ।

एक प्रभुला जाणत नाही एक करी प्रभुमाजी वास ।

म्हणे 'अवतार' मी होईल अर्पण जो आहे मम प्रभुचा दास ।

*

एक तूं ही निरंकार (२९९)

भेटवील जो प्रभुच्या संगे पुर्ण सदगुरु तोच खरा ।

देईल सुख शांती जो जीवनी पूर्ण सदगुरु तोच खरा ।

घरात जो अपुले घर दावी पुर्ण सदगुरु तोच खरा ।

जो आत्म्याला पती भेटवी पुर्ण सदगुरु तोच खरा ।

हीच खूण सदगुरुची आहे शरणांगत करी भव पार ।

ब्रह्मा दाखवी सदगुरु तोची ब्रह्मज्ञानी म्हणे 'अवतार' ।

*

एक तूं ही निरंकार (३००)

प्रभुच्या ठायी ठाव मिळाला जन्म मरण संपून गेले ।

ज्या समयी हरि दर्शन झाले कर्म कांड संपून गेले ।

समाधान आनंद मिळाला सर्व दुःख संपुन गेले ।

प्रसन्न झाला सहज प्रभु हा पूजा पाठ संपून गेले ।

'बुटा' गुरुची कृपा ही सारी वृक्ष जयाने लावियला ।

कल्पतरु 'अवतार' गुरु हा दिले मनोवांछित मला ।

N/A

References : N/A
Last Updated : July 22, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP