एक तूं ही निरंकार (१०१)
निरंकार प्रत्यक्ष दाखवी जाणावा तो गुरु खरा ।
नामरुपी नौके आधारे सहज करीतो भवपारा ।
सदगुरु आपुल्या भक्तजनांचे आपणची रक्षण करीतो ।
सदगुरु अपुल्या भक्तांवरती सदैव काळ कृपा करीतो ।
सदगुरु अपुल्या भक्तांचे मन आरशापरी स्वच्छ करी ।
सदगुरु निज भक्तांच्या सार्या गुण अवगुणा माफ करी ।
गुरु आपुल्या भक्तगणांना बंधनातुनी मुक्त करी ।
सदगुरु अपुल्या भक्तांचे मन विषयांपासुन दूर करी ।
सदगुरुला प्रिय भक्त तयाचे अन्य जनाहुन जगताच्या ।
सदगुरुला प्रिय भक्त तयाचे आप्त जनाहुनही अपुल्या ।
सदगुरु अपुल्या भक्त जनांना समजे धर्म आणि इमान ।
म्हणे 'अवतार' गुरु भक्तांना समजे सदैव अपुले प्राण ।
*
एक तूं ही निरंकार (१०२)
सेवक गुरुचा सदैव काळी दास बनूनी राहतसे ।
सेवक तेची करम करीतो जे जे सदगुरु सांगतसे ।
बुद्धीमान जरी असेल सेवक अल्पमती आपना समजे ।
अपार धन असताही सेवक दीन सदा आपना समजे ।
अभिमान त्यागुनी सेवक राहे लीन गुरु भजनी ।
अजाणताही चुक जाहली वाटतसे भय सदा मनी ।
सेवक गुरुचा फळ ना इच्छी सारे कर्म निष्काम ।
'अवतार' अशा भक्तांचे सदगुरु उज्ज्वल करीतो जगती नाम ।
*
एक तूं ही निरंकार (१०३)
ख्यातनाम ही प्रीती जैसी चंद्र आणि चकोराची ।
ख्यातनाम ही प्रीती जगती कुसुमाची अन भ्रमराची ।
अतूट प्रीती आहे जगती ज्योती आणि पतंगाची ।
प्रीत मानीतो सेवक तैसी गुरु चरणांच्या संगाची ।
मत्स्य ज्यापरी संग जळाचा क्षणभरही ना सोडु शके ।
तैशापरी मन सेवक अपले गुरुपासुण ना मोडू शके ।
राहे तृषेने व्याकुळ चातक स्वातीच्या थेंबासाठी ।
सेवक तैसा आतूर होतो गुरुदर्शन घेण्यासाठी ।
मेंदी ज्यापरी आयुष्यभरी सोडीना निज रंगाला ।
'अवतार' म्हणे तैसे नच सोडी सेवक सदगुरु संगाला ।
*
एक तूं ही निरंकार (१०४)
स्वामीवीण जैसे घर वाटे उदास निर्जन वस्ती स्थान ।
गुरु शिष्याची नयन ज्योती दर्शनावीण अंधार समान ।
पाण्यावाचून तृषीत जनांना पाण्यावीण प्रिय ना कांही ।
जैशापरी व्याकूळ मनाला बोल कुणाचे प्रिय नाही ।
बहारलेला बाग पाहुनी बंद कळी फूलुनी जाते ।
पत्नी ज्यापरी पाहून पतीला मनोमनी हर्षित होते ।
मेघांना पाहूनी अंबरी मोर ज्यापरी नाच करी ।
'अवतारी' त्यापरी गुरुदर्शने सेवक होती हर्षभरी ।
*
एक तूं ही निरंकार (१०५)
गुरुभक्तांच्या अधरावरती केवळ गुरुयश गान असे ।
मुखी नाम अन प्रेम मानसी हाच जीवनाधार असे ।
सदगुरुला जे मान्य असे ते पाहे आणि श्रवण करी ।
हिरे माणके वेची सेवक गुरु ज्ञानाच्या सरोवर ।
वचन गुरुचे मनी धारूनी हृदयी परउपकाराते ।
जीवनातील क्षणाक्षणाला गुरुशी जूळूनी असे नाते ।
शिष्य गुरुचा मायेमायी मन अपुले ना दंग करी ।
'अवतार' गुरुवीण गुरुचा सेवक कधी न दुजे ध्यान करी ।
*
एक तूं ही निरंकार (१०६)
ज्या सदगुरुने कॄपा केली ज्याने दिधले जीवन दान ।
ज्या सदगुरुने कृपा केली दिधले मज देवांचे ज्ञान ।
ज्या सदगुरुने अती कॄपेने रंग हरिचा जाणीयला ।
ज्या सदगुरुच्या अती कृपेने भगवंताला जाणीयला ।
ज्याने अपुले सर्व खजाने नावें तुझ्या जमा केले ।
ज्याने अपुले सर्व खजाने दानार्पण तुजला केले ।
सदा स्मरा ऐशा सदगुरुला क्षणा क्षणाला ध्यान धरा ।
ऐशा सदगुरुवरती अपुले तन मन धन बलिदान करा ।
सदगुरु ईश्वर ईश हा सदगुरु भेद यांत तिळमात्र नसे ।
श्रेष्ठ नाम सर्वाहुन आहे जगात ऐसे दान नसे ।
बुद्धीबळ ना आले कामी चतुराईचे नाही काम ।
थोर भाग्य 'अवतार' तयांचे ज्यांनी जाणीयले हे नाम ।
*
एक तूं ही निरंकार (१०७)
देह प्राण सदगुरु भक्तांचा सदैव याचे ध्यान करी ।
महानता जरी आता जगती तिळभरही ना मान करी ।
वचन गुरुचे धन हे त्याचे प्रेम गुरुचे जीवन सार ।
क्षणाक्षणाला स्मरण हरीचे हरिचरणांचा धरी आधार ।
अलीप्त राहे गुरुचा सेवक हर्ष विषाद न मनी कदा ।
मानून सारी देन गुरुची घेत असे उपभोग सदा ।
प्रेम अंतरामाजी विलसे ओठावर प्रार्थना वसे ।
म्हणे 'अवतार' अशा शिष्याच्या सदैव सदगुरु समीप असे ।
*
एक तूं ही निरंकार (१०८)
गुरुचे दर्शन फळ उत्तम हे पावन मनास बनवीते ।
गुरुचरणांची घेता धुळी शुद्ध मनाला बनवीते ।
जो सदगुरुची संगत करुनी यशोगान हरीचे गातो ।
निरंकार इश्वर प्राप्तीचा मार्ग तयाला सांपडतो ।
गुरुची मंजुळ वाणी ऐकता मिळेल श्रवणांना तृप्ती ।
जाय संपूनी भमण मनाचे मनामध्ये येईल शांती ।
गुरुमंत्र हा पूर्ण गुरुचा येत जातही कधी नसे ।
पूर्ण गुरुने दाखविले जे कधी जात वा येत नसे ।
अनंत आहे गुरुचा महिमा वर्णन कोनी करु न शके ।
म्हणे 'अवतार' गुरु इच्छेने मानव याला पाहु शके ।
*
एक तूं ही निरंकार (१०९)
एकच आहे वदनी जिव्हा गुणास याच्या अंत नसे ।
नाही जन्मला नाही घडविला या जैसा भगवंत नसे ।
अविनाशीची महिमा जगती नाशवान ना गाऊ शके ।
बुदं एक तो सागर महिमा वर्ण कधी न करू शके ।
देत असे सार्या जगताला खात पीत नसे काही ।
काळाच्या न येई हाती कायम दायम हा राही ।
संत हरीचे प्रति क्षणाला या भगवंताला भजती ।
याच्या पावन पदकमलावर मस्तक सदैव झुकवीती ।
ऐशा गुरुचे दर्शन करुनी तूंही तूंही गात रहा ।
'अवतार' करूनी गुरुची पूजा चरणावर नत मस्तक व्हा ।
*
एक तूं हि निरंकार (११०)
निरंकार आहे जगकर्ता जया घटी हा वास करी ।
पाहून चळचळ कांपे मृत्यु धर्मराज घाबरे उरी ।
विरळा ऐशा सदगुरुकडुनी हे अमृत प्राशन करीतो ।
युगे युगे तो होय चिरंजीव अमरपदी जाऊन बसतो ।
आठ प्रहर जो शुद्ध मनाने हरिनामाचे स्मरण करी ।
हरिही भक्तजनांची ऐशा सारी कामे स्वये करी ।
जगताच्या मायेचा फसूनी लालच मनी न आणि जो ।
मनात एकच आशा गुरुची हरिवर आशा ठेवी जो ।
जैसा घोर तिमीरामाजी दीपक पूर्ण प्रकाश करी ।
म्हणे 'अवतार' हा सदगुरुदाता भ्रांत मनची दूर करी ।