अभंग छंद
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
अभंग मुख्यत्वें दोन प्रकारचे आहेत. एक मोठा अभंग आणि एक लहान अभंग. त्यांत मोठया अभंगाचे प्रकार दोन, आणि लहान अभंगाचे प्रकार तीन, असे सर्व मिळून अभंगाचे पांच प्रकार होतात. ते क्रमानें सांगतों.
मोठा अभंग.
मोठया अभंगास चार चरण असतात, त्यांत पहिल्या तीन चरणांस प्रत्येकीं सहा सहा अक्षरें आणि चौथ्या चरणास चार अक्षरें असतात.
मोठया अभंगाचा पहिला प्रकार: - दुसर्या आणि तिसर्या चरणांच्या शेवटीं यमक ( म्हणजे प्रास ) असतें.
उदाहरण. अभंग तुकारामाचे.
काय वानूं आतां । न पुरे ही वाणी ॥ मस्तक चरणीं । ठेवियेलें ॥१॥
थोरींव सांडिली । आपुली परीसें ॥ धान्य केलें कैसें । लोखंडासी ॥२।
जगाच्या कल्याणव । संतांच्या विभूति ॥ देह कष्टविती । उपकारें ॥३॥
भूतांची दया हें । भांडवल संतां ॥ आपुल्या ममता । देहीं नाहीं ॥४॥
तुका म्हणें सुख । पराचिया सुखें । अमृत हें मुखें । स्रवतसे ॥५॥
मोठया अभंगाचा दुसरा प्रकार: - पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या चरणांत यमक असतें.
उदाहरण अभंग तुकारामाचे.
पंढरीस जावें । जीवन्मुक्त व्हावें ॥ केशवा भेटावें । जीवलगा ॥१॥
जन हे सुखाचे । दिल्या घेतल्याचे ॥ बा अंतकाळींचें । नाहीं कोणी ॥२॥
लहान अभंगाचा पहिला प्रकार: -
लहान अभंग.
लहान अभंगास दोन चरण असतात.
लहान अभंगाचा पहिला प्रकार: - ह्यांत प्रत्येक चरणास आठ आठ अक्षरें असतात. कचित् पहिल्या चरणास सहा अक्षरें असतात. दोन्ही चरणांस यमक असतें.
उदाहरण - अभंग तुकाराम
जरी व्हावा तुज देव । तरी सुलभ उपाव ॥१॥
करीं मस्तक ठेंगणा । लागें संताच्या चरणा ॥२॥
भावें गावें गीत । शुध्द करोनियां चित्त ॥३॥
तुका म्हणे फार । थोडा करीं उपकार ॥४॥
लहान अभंगाचा दुसरा प्रकार: - ह्याच्या दुसर्या चरणाचीं सात अक्षरेम असून चौथें यमकाक्षर असतें.
उदाहरण. अभंग तुकाराम.
पुढें आतां कैचा जन्म ॥ ऐसा श्रम वारेसा ॥१॥
पांडुरंगा ऐसी नाव ॥ तारि भाव असतां ॥२॥
लहान अभंगाचा तिसरा प्रकार: - ह्याला आठ आठ अक्षरांचे चार चार चरण असतात. आणि पहिल्या तीन चरणांच्या शेवटीं यमक असतें.
उदाहरण. अभंग तुकाराम.
देवा पायीं नाहीं भाव ॥ भक्ति वरी वरी वाव ॥
समर्पिला नाहीं जीव ॥ जाणावा हा व्यभिचार ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP