शुध्दकामदा. य० ६,५.
म्हणति तीस बा शुध्दकामदा ॥ न र र ला ग हे येति ज्या पदा ॥
चरणिं येति एकादशाक्षरें ॥ नृपतिमस्तकीं छत्रचामरें ॥
चरणांत अक्षरें ११. गण - न, र, र, ल, ग.
उदाहरण * वामन.
प्रगटलासि तूं नंदगोकुळीं ॥ म्हणुनि इंदिरावास या स्थळीं ॥
सकळही सुखी य व्रजीं हरी ॥ विरहदु: खिता गोपसुंदरी ॥१॥
कामदा वृत्तांतील प्रथम दीर्घाक्षराचे ऐवजीं दोन लघु अक्षरें घातलीं कीं, हें शुध्दकामदा वृत्त होतें. त्याचप्रमाणें कामदा वृत्तांतीलच सहाव्या गुरु अक्षराऐवजीं दोन लघु, अक्षरें घातलीं कीं, पुढील ललित वृत्त होतें.
ललित. य० ५, ६.
त्यास हो कवी ललित बोलती ॥ रा ज सा ल गा चरणिं दीसती ॥
पांच आणि सा असति अक्षरें ॥ साधु बोलती वचन तें खरें ॥
चरणांत अक्षरें ११. गण - र, ज, स, ल, ग.
उदाहरण, स्वकृत.
संपदा असे बहुत ज्या घरीं ॥ खावया तिथें मिळति सोयरीं ॥
द्रव्य संपतां पळति तेथुनी ॥ कोणि पाहिना जवळ येउनी ॥१॥
इंद्रवज्रा. य० पा०
ती इंद्रवज्रा म्हणिजे कवीनें ॥ येती त ता जा ग ग हे क्रमानें ॥
या अक्षरें येतिल पादिं अक्रा ॥ मारी अरी जो धरि शंखचक्रा ॥
चरणांत अक्षरें ११. गण - त, त, ज, ग, ग.
उदाहरण. * वेणीसंहार नाटक.
कां टाकिलें शस्त्र रणांत तेणें ॥ साक्षी पृथासूनुच एक जाणे ॥
हें कर्म झालें समरांत जेव्हां ॥ होतासि कोठें रणभीरु तेव्हां ॥१॥
इंद्रवज्रा - वृत्तांतील प्रथम दीर्घाक्षराचे ऐवजीं लघु अक्षर घातलें कीं, पुढील उपेंद्रवज्रा वृत्त होतें.