अक्षरगणवृत्तें
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
अक्षरगणवृतांचे तीन भेद करितात. समवृत्त, अर्धसमवृत्त, आणि विषमवृत्त. वृत्ताला प्राय: चार भाग असतात. प्रत्येक भागाला चरण किंवा पाद म्हणतात.ज्या वृत्ताचे चार्ही चरण सारखे असतात तें समवृत्त ज्याचे प्रथम व तृतीय चरण आणि व्दितीय व चतुर्थ चरण सारखे असतात तें अर्धसमवृत्त, आणि ज्याचे चारही चरण भिन्न भिन्न लक्षणांचे असतात तें विषमवृत्त. प्राकृत भाषेंत विषमवृत्त प्राय: कोठें आढळत नाहीं. अर्धसमवृत्तें तरी कचितच आहेत. समवृत्तें मात्र आहेत.
श्लोक ( अनुष्टुभ् )
वृत्ताचा जो चतुर्थाश । तयाला पाद बोलिजे ॥
पादाच्या लक्षणें सर्व - । वृत्त - लक्षण जाणिजे ॥१६॥
वृत्तें पुष्कळ आहेत. त्यांत कोणतें वृत्त कोणत्या रसाला अनुकूल, व कोणतें वृत्त कोणत्या रसाला प्रतिकूल त्याविषयींही नियम आहेत; परंतु त्यांचा विचार एथें केला नाहीं.
ह्या ग्रंथांतील विशेष संकेत
श्लोक ( अनुष्टुभ् )
पादार्थी पदही कोठें । गणार्थीं संघ घेतला ॥
अक्षरार्थी अवयव । ल ला लघु ग गा गुरु ॥१७॥
अक्षरें गणसंज्ञेचीं । जरी आहेत र्हस्व तीं ।
छंदाच्या अनुरोधानें । कोठें दीर्घहि घातलीं ॥१८॥
गीति.
ज्या वृत्ताचें लक्षण । तें त्या वृत्तींच कथिन मी स्पष्ट ॥
यास्तव होइल कोठें । क्लिष्ट, परी साहतील तें शिष्ट ॥१९॥
श्लोक ( अनुष्टुभ् )
वृत्त संज्ञा आद्यपादीं । व्दितीयांत गणक्रम ॥
अक्षरें तिसर्या पादीं । उदाहरण शेवटीं ॥२०॥
एथें लक्षणश्लोकाचा चतुथ चरण जरी उदाहरणार्थ आहे, तरी लक्षण पूर्णपणें समजण्यासाठीं प्रत्येक वृत्तास अन्य ग्रंथांतील एकेक आणखी उदाहरण दिलें आहे. कचित् अन्य कवीचें उदाहरण न मिळालें तेथें स्वकृत उदाहरण दिलें आहे.
वृत्तामध्यें यति म्हणजे अवसान कोणत्या अक्षरववर असावें हें समजण्याकरितां त्या त्या वृत्ताच्या नांवापुढें अंक घातले आहेत आणि ज्याला पादांतीं यति आहे त्यापुढें य० पा० असें घातलें आहे.
लक्षणश्लोकाच्या चतुर्थ चरणांत र्हस्व व दीर्घ अक्षरांच्या अनुक्रमें अशा खुणा व यति समजण्याकरितां ‘॥’ अशी खूण अक्षरांच्या माथ्यावर केली आहे.
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP