मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
मरणमांगल्य

वेदांत काव्यलहरी - मरणमांगल्य

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


जीवन वृक्षालागीं आलें अत्यंत मधुर फल मरण ॥
प्रस्थान महायात्रा निद्रा जी दीर्घ जाण तें मरण ॥१॥
विटलेल्या जीवांना विश्रांतिस्थान, तेंच कीं मरण ॥
मारुनि बुडी अनंतामाजीं येणें पुन्हां, असें मरण ॥२॥
अपराध सकलिकांचे धेई पोटांत, मायसें मरण ॥
दु:खी दीन अनाथा, आहे माहेर एकची मरण ॥३॥
सासर घरची मुलगी, माहेरीं जात तेंच कीं मरण ॥
स्मरणाचें बहु ओझें, विस्मरणें तेंच हो असे मरण ॥४॥
जीवनव्यापाराचा आढावा काढणें असे मरण ॥
दुर्लौकिकास संधी उत्तम दे जें पुन्हां, सदय मरण ॥५॥
जीवन कैसें गेलें याचें आदर्शरूप तें मरण ॥
आहे मरण परिक्षा, अधमोत्तम ठरवि शेवटीं मरण ॥६॥
अंधार कुणी म्हणती मृत्युला, तें प्रकाश परि मरण ॥
दुर्गति, पूर्ण निराशा म्हणति कुणी, प्रगतिपूर्ण परि मरण ॥७॥
पुनरपि परतुनि येणें जोमानें, प्राणरूप तें मरण ॥
नवजीवन सूर्याचा अरुणोदय, निश्चयें समज मरण ॥८॥
जन्मापोटीं मरणें, जीवन तें ठेविलें जिथें मरण ॥
मग मरण काय वाइट, जीवनदायक असोनि हे मरण ॥९॥
जीवन अनंत भरलें ॥ मरणीं, निर्वाण तेंच कीं मरण ॥
शिवरूप व्हावयासी, आदरिलें पाहिजें जिवें मरण ॥१०॥
रमणीयता तयापरि प्रेम खरें, वाढवी जगीं मरण ॥
भेसूर असतें दिसलें जग हें, नसतें जगीं जरी मरण ॥११॥
नीती, न्याय, सदयता शिकवी सद्‌गूण हें जगीं मरण ॥
टाकुनि जीर्ण वसन दे, नविन पुन्हां, यापरी असे मरण ॥१२॥
जगण्यानें जें साधत नाहीं, तें कार्य साध्य करि मरण ॥
संभाजी, खिस्ताचें उपकारक जाहलें खचित मरण ॥१३॥
कैलास गांठण्याची, शेवटची पायरी असे मरण ॥
जेथें जीव शिवाचा भेटीचा योग घडवितें मरण ॥१४॥
सिद्धांत “जगन्मिथ्या” दावी प्रत्यक्ष तो गुरु मरण ॥
“ यद्दष्टं तन्नष्टं” ठसवी वेदान्तवाक्य तें मरण ॥१५॥
देहांत असुनि योगी, अनुभवती देह-वासना मरण ॥
जीवन अमर तयाचें, ऐशांना येइना पुन्हां मरण ॥१६॥
जीवंतपणीं शिकला यापरि मरण्यास, जिंकिलें मरण ॥
तोच चिरंजीब असे, काळाचा काळ ग्रासुनी मरण ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP