बुद्धीपर परमात्मा, स्वानंदाचें असे स्वसुख चोख ॥
ज्यासी निजसुख व्हावें, बुद्धीचें जलद टाकणें वीख ॥१॥
बुद्धींत द्वैत आहे, द्वैत तिथें दु:ख ठेविलें विविध ॥
ती बुद्धी द्वैतजनक, हरिचरणीं वाहिले खरे बुद्ध ॥२॥
हरिचरणीं निजबुद्धी अर्पुनि घेतात भक्त सुख शुद्ध ॥
बुद्धीवार करोणी मानिति आनंद, ते खरे बद्ध ॥३॥
उज्ज्वल प्रकाश व्हावा, जागृत व्यवहार जोंवरी चाले ॥
येतां समय निजेचा, मंद प्रकाशासि पाहिजे केलें ॥४॥
बुद्धीची गरज तशी, आत्म्याचें ज्ञान व्हावयास जरी ॥
ही बुद्धी मावळल्यावांचुन, स्वानंद भोग नाहि परी ॥५॥
स्थिति ऐसी भक्तांची, मावळती जेथ ज्ञान अज्ञान ॥
परिपाक हाच आहे ज्ञानाचा, यांस म्हणति विज्ञान ॥६॥
बुद्धींत ज्ञान तेथें, मीपण असणेंच प्राप्त कीं आहे ॥
अंत:करणांत परी भक्तीचा उदय, तो सहज पाहे ॥७॥
भक्तीचें सुख व्हावें, त्यानें बुद्धींत सांपडूच नये ॥
अंत:करणाचा जो कौल पडे, त्यास मानणेंच स्वयें ॥८॥
भक्तीचा प्रांत तिथें, केवल श्रद्धाच पाहिजे परम ॥
तर्क वितर्त मनाचे, बुद्धीचे टाकुनी सकल ते धर्म ॥९॥
टाकुनि धर्म सकलही, एक मला शरण ये वदे देव ॥
मी सर्व पाप नाशुनि मोक्षा देईन खात्रि ही ठेव ॥१०॥
तनमन बुद्धि प्राणा, सर्वस्वी अर्पूनी हरीचरणीं ॥
परमानंदामाजी, बुडल्या गोपीच पूर्ण विज्ञानी ॥११॥
भोळ्यास चतुर करणे सोपें परि चतुर होइना भोळा ॥
म्हणुनी तयांत भांडण, बुद्धीचें मूळ, ताळ ना मेळा ॥१२॥
बुद्धि न चाले, भांडण द्वैताच माजलें, अशा वेळीं ॥
अंतरि शरण रिघावे मानावी अंतरांतली बोली. ॥१३॥
ज्ञानी श्रीराम, परी बुद्धीबाहेर तो कधीं न पडे ॥
लोकेषणा न सुटली, सीतेचा त्याग त्यामुळेंच घडे ॥१४॥
श्रीकृष्ण पूर्ण ज्ञानी, ज्यानें लोकेषणा न बाळगिली ॥
वेदांत आचरोनी दाखविला, बुद्धिरांड राबविली ॥१५॥
शुभ, अशुभ, नीति अनीति धर्माधर्मादि द्वेत हें सगळें ॥
मायेच्या बाजारी, एक्या भावांत सर्वही विकलें ॥१६॥
शुभ अशुभ एक मानी, हीही भक्ती, विशेष हें ज्ञान ॥
ब्रह्मचि कर्म, असा हा बुद्धीचा बोध, तेंचि विज्ञान ॥१७॥
स्त्रीच्या अंत:करणा, गोपाचें साध्य सहजविज्ञान ॥
विज्ञान श्रीहरिचें, पुरुषी बुद्धीस सुलभ तें जाण ॥१८॥
परि पाहिजे पुरुष तो वीर अती धीर, तोच विज्ञान ॥
श्रीकृष्णाचें पचविल; बोले तैसा करील आचरण ॥१९॥
श्रीरामासम झालें, होतिल, आहेत या जगीं ज्ञानी ॥
विज्ञानी कृष्णासम जगतीं विरळाच एक तो कोणी ॥२०॥