अवतरतो देव म्हणे भक्तासाठीं, खरें न सर्वस्व ॥
जाणा अभक्त तोही, अवतरवी झकत भूवरी देव ॥१॥
भक्तांस देव देई मोक्ष, परी तो अभक्त घे मोक्ष ॥
जबरीनें त्यापासुनि, देई इतिहास यापरी साक्ष ॥२॥
श्रींकृष्ण म्हणें देई मोक्षासी, दुष्ट पूतनेलागीं ॥
स्तनपानमिसें आली जी, त्यासी मारण्या अती वेगीं ॥३॥
भक्ताला जें बक्षिस, तेंच अभक्तास श्रीहरी देतो ॥
भारी उदार वाटे, परि नाहीं तो असा अम्हीं म्हणतों ॥४॥
आपण कवडी देतो याचक जो त्यास, जो वळी भेटें ॥
सर्वस्व त्यास देतो, म्हणुनि औदार्य कीं असे मोठें ॥५॥
राक्षस अभक्त मोठा, गोब्राह्मणसज्जना छळी फार ॥
मोक्ष जरी नच द्यावें, पुनरपि जन्मोनि करिल संहार ॥६॥
प्रीतीनें नच प्रभु हा, भीतीनें राक्षसास दे मोक्ष ॥
मोक्षाची गरज, मिळो कैशीहि मग, तिथें न दे लक्ष ॥७॥
यास्तव पूर्ण बनावें, देवाचें भक्त वा अभक्त खरा ॥
वाइट बरवें कांहीं, पूर्ण बनावें, अपूर्ण तो न बरा ॥८॥
मागिल दारानें जा अथवा पुढल्या, दिसेच आकास ॥
पूर्णांत मोक्ष; पडतो अर्धवटाच्या गळ्यांतची पाश ॥९॥