वेदविहित कर्माला धर्म असें नांव, सर्व शास्त्रांत ॥
वेदविहित म्हणजेची ज्ञानानें युक्त, स्पष्ट हा अर्थ ॥१॥
मग घटका दो घटका, संध्यास्नानादि कर्म तितुकाच ॥
“धर्म”; अशी आकुंचित संज्ञा म्हणतां नये कधीं साच ॥२॥
वेदविहित जें तेंची, ज्ञानसहित कर्म बुद्धि-पूर्वक जें ॥
पूर्ण विचाराअंतीं घडलें, तो धर्म म्हणुनिया साजे ॥३॥
दिनरात्र धर्म चाले, ज्ञान्याच्या सहज सर्व कर्मांत ॥
मग तो असो कुठेंहीं, कांहिं करो कर्म, धर्म ये त्यांत ॥४॥
ईश्वरपूजन, म्हणजे, ज्ञानाची ती उपासना शुद्ध ॥
कारण ईश्वरस्वरूपा, “प्रज्ञानं ब्रह्म” बोलती बुद्ध ॥५॥
ज्ञान्याचे आचरणी, धर्म असे सहज ईश्वरी पूजा ॥
अज्ञान्याचा धर्महि, ज्ञानावांचुनि अधर्मची समजा ॥६॥
कृत्रिम आंबा वाटे साचापरि, जों असेल अज्ञान ॥
आंबा म्हणतांहि स्फुरे लांकुड, त्याचें यथार्थ जों ज्ञान ॥७॥
ज्ञानोत्तर जग दिसतें, म्हणतो तैसें, परी प्रतित आत्मा ॥
मी जीव म्हणत असतां, ब्रह्मचि तो सर्वकाळ परमात्मा ॥८॥
आंबा लांकुड; तैसा जीवचि तो ब्रह्म; ज्ञान-अज्ञानीं ॥
वस्त् कळो तुम्हासी न कळो, जैसें तसेंच पूर्णपणीं ॥९॥
कांहीं म्हणो, करो वा कर्मे, ज्ञान्यास ज्ञानची स्फुरतें ॥
म्हणणें, करणें दिसणें, सर्वहि आकार ज्ञानची धरितें ॥१०॥
ऐसें यथार्थ ज्याचें ज्ञान, खरा वेद-पुरुष तो जाणा ॥
सकलहि त्याचीं कर्में वेदविहित, निश्चयें खुशाल म्हणा ॥११॥