मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
सुलभ पासष्टी

वेदांत काव्यलहरी - सुलभ पासष्टी

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


(ज्ञानदेव)
लपुनि, जगदाभासू; जी प्रगटुनि भास ग्रासिते पूर्ण ॥
ती श्रीवटेशनामें, केवल सत्ताच नांदते जाण ॥१॥
प्रगटे तंव तंव न दिसे भास, लपे तोच भासवी जगत ॥
परि लपला न प्रगटला, केव्हांहीनच उणा अधिक होत ॥२॥
नानात्व नामरूपें पावुनि, कांहींच जाहला नाहीं ॥
कांहिं नसोनी, अवघें ब्रह्मच जग द्दश्य सकळ हें पाहीं ॥३॥
सोनें बनलें लेणें, नसुनी सोनेपणांत लेश उणें ॥
कमिअधिक मुळि न होता, वस्तूमाजीं तसें जगत होणें ॥४॥
उघडे उदक दिसतसे, कल्होळासी न सारितां दूर ॥
नच सारिता जगतही, केवळ सत्ता दिसे उघड फार ॥५॥
परमाणूंच्या योगें, पृथ्वीसी झांकिता नये जैसें ॥
त्याचपरि परमात्म्या, झांकावें विश्वस्फूर्तीनें कैसें ॥६॥
अंगावरि पांघरुनी आत्मकला चंद्र हारपे काय ॥
वन्ही दीपापासुनि दीपपणें काय भिन्न पडुं जाय ॥७॥

द्दश्य द्दष्टत्व यांचें स्वयंसिद्धत्व ---

म्हणती, ‘अज्ञानानें द्रष्टा द्दश्यत्व;’ मी परी नेणें ॥
द्दष्ट द्दश्यत्वानें, वस्तूचें आयतें सहज असणें ॥८॥
उघडें सूत असोनी, लुगडें हें नाम मात्र वस्तूला ॥
घट रांजण मातीचे केवळ मातीच, भिन्न नाम तिला ॥९॥
द्रष्टा द्दश्य दशेच्या अतित असे वस्तु शुद्ध द्दङमात्र ॥
द्रष्टा द्दश्य मिषानें, केवळ ती एक वस्तु सर्वत्र ॥१०॥
विविधालंकारमिषें, निखिल जसें एक हेमची असणें ॥
अवयव अनेक संभ्रम, एक अवयवीविना दुजें नसणें ॥११॥

संविस्त्वरूप ---

पृथ्वी द्दश्यापासुनि, शिव द्रष्टा या पदार्थपर्यंत ॥
संवित त्यांत प्रकाशे, दिसतें तें सर्व एक संवीत ॥१२॥
भलभलतीं चित्रें जरि भींतीवरिं दिसति, एक परि भिंव ॥
जगदाकारें झाली, एकपरीं ती प्रतीत संवीत ॥१३॥
ढेप गुळाची, त्यांतिल गोडीसी काय तोच आकार ॥
सर्वत्र जगीं सम ती संवित, घेवोनि विविध आकार ॥१४॥
भिन्न घडया परि जैसें आकारें वस्त्र एकची प्रतित ॥
विश्वाच्या स्फुरणानें परमात्म्याचेंच स्फुरण तें होत ॥१५॥

जगदाभासनिमित्तानें परमात्मावस्तुवर्णन ---

स्फुरणाच्या आकारें, क्षणभरि स्वरुपांत क्षोम होवोनी ॥
सन्मुख आपण अपणा, सुखदु:खीं अल्पही न लिपोनी ॥१६॥
यापरि सन्मुख होणें म्हणजें, द्दश्यत्व वस्तुला येणें ॥
द्दश्य तिथें द्रष्टा ये, प्रतिबिंबानेंच बिंब जैं होणें ॥१७॥
अपुल्या पोटीं वस्तू, स्फूर्ति द्दश्यास दाखवोन उठी ॥
द्रष्टा, द्दश्य, तसें तें दर्शन, सहजीच थाटली त्रिपुटी ॥१८॥
गुंडी एक सुताची, त्याच्याबाहेर आंत सूत असे ॥
त्रिपुटी तीनपणेंविण, त्यांमाजी वस्तुवीण कांहि नसे ॥१९॥
दर्पणि अन्य दिसेना अपणां, परी आपुलाच मुखभास ॥
मग देखणें नसे कां यापरिचें द्दश्य, व्यर्थ सायास ॥२०॥
त्रिपुटींत तसा नाहिंच भेद, त्रिधा एक संविती आहे ॥
स्वगत अशा त्रिपुटीचें, ऐसें हें मूळ स्पष्टची पाहे ॥२१॥
द्रष्टाच द्दश्यरूपें, स्फूर्ती संसार हा उभारीला ॥
उभयांत भेद पाहूं जातां, पंगुत्व येइ द्दष्टीला ॥२२॥
द्दश्य नसे हें जेव्हां, द्दष्टयाचा काय होय उपयोग ॥
द्दश्यावांचुन द्रष्टा नाहि, म्हणुनि नित्य उभय संयोग ॥२३॥
यास्तव द्दश्यासाठीं, द्दष्टी द्रष्टाच उपजती दोन ॥
द्दश्यच विरल्यानंतर, द्दष्टी द्रष्टाहि ना उरे जाण ॥२४॥
एकापाठीं येती दोन, मिळुनि तीन, यापरी त्रिपुटी ॥
जातां त्रिपुटीभ्रांती, एकपणें साच वस्तुची भेटी ॥२५॥
मुखा आरशांत बघण्या आधीं, नंतर, तयास अस्तित्व ॥
मग काय आन झालें, पाहुनि प्रतिबिंब दर्पणाआंत ॥२६॥
प्रतिबिंब द्दश्य पाहुनि आपण द्रष्टा, असें उगी वाटे ॥
हें द्दष्टीस चकविणें, दर्शन वा द्दश्य हें असे खोटें ॥२७॥
द्दश्यसमयिं वस्तूसी आलें द्रष्टत्व, एक परि दोन ॥
वस्तूच, द्दश्य द्रष्याविरहित अपणास पाहतों अपण ॥२८॥
वाद्यांत ध्वानि, काष्ठीं वन्हीं, सहजींच प्रगटण्यापूर्वीं ॥
सामान्यत्वें वस्तुच, द्रष्टा द्दश्यत्व ग्रासुनी तेवीं ॥२९॥

दर्शनत्रिपुटी ---

अमुक न ये म्हणतां ही वस्तू, कैसी न येइं जाणाया ॥
असतचि असे, जयासी असणें-सन्मात्र हेंच रूप जया ॥३०॥
डोळा सर्व पदार्था पाही, परि आपणांस पाहीना ॥
ज्ञान प्रकाशीं सर्वां, परि अपुलें ज्ञान नाहिं ज्ञानघना ॥३१॥
जाणपणेंच असे जो ठायींचा, नेणणें तया नाहीं ॥
परि भाव जाणण्याचा, ज्ञानामाजी नसेच केव्हांही ॥३२॥
जैसा तसाच राहुनि, जों-झाला सकल, मौन त्याविषयीं ॥
कांहींच नव्हे, ऐसा नाहीं; म्हणुनीच प्राप्त निजठायीं ॥३३॥
नाना जल कल्होळीं, पाण्याचें साच जैं अधिष्टान ॥
बहुविध तैं ज्ञानाला, ज्ञानानें एक, येइ साचपण ॥३४॥
जो एक देखतेंपण, देखिजतेवीण एकला सिद्ध ॥
जो आपणांसि आपण, त्रिपुटींतिल तीन, आपणचि शुद्ध ॥३५॥
च्याचें असणें, दिसणें, भोग निरालंब सच्चिदानंद ॥
सापेक्ष नसे, केवल तो परमात्मा असे स्वयंसिद्ध ॥३६॥

जीवस्वरूप -

तूं शिव-वटेश गुरुचा अससी जिवरूप चांगया मुलगा ॥
जैं कापुरकण, तुज मजमाजीं संवाद होउ देईना ॥३७॥

चांगदेवांशीं संवाद ---

ज्यापरि तळहातानें तळहातासीच कीं मिठी देणें ॥
तैसेंच चांगदेवा, तुज माझा बोल ज्ञानदेव म्हणे ॥३८॥
शब्देंच शब्द स्रविजें, स्वादें स्वादूच चाखिजे जेंवी ॥
पाहि उजेड तैसा त्याच उजेडास, बोल हें तेवी ॥३९॥
सोनें जैं घासावें सोन्याच्या कसवटीवरी जेंवी ॥
जैं मुख मुखासि दर्पण मजतुज संवाद चांगया तेवी ॥४०॥
आम्हा उभयांत असे आवड प्रेमैक्य ज्यापरी गोडी ॥
मूर्तीमती बनोनी घेतां गोडी, न माय कां तोंडी ॥४१॥
सखया तुज भेटावें, उत्कंठा मम मनीं असें मोठी ॥
परि मज भीती वाटे, भेट स्वयंभूच होय कीं खोटी ॥४२॥
दर्शन घेऊं पाहे तंव, स्वरुपाकार हे मनचि होई ॥
भिन्नपणें तव दर्शन घेण्याची लालसा फुकट जाई ॥४३॥
करूं, बोलूं, कल्पूं, वा न करूं, बोलूं न, कल्पूं नच कांहीं ॥
भाव अभावात्मक ही वृत्ती, स्वरूपी तुझ्या उठत नाहीं ॥४४॥
कर नकर तुझ्याविषयीं, नचहो व्यवहार चांगया ताता ॥
हें कायसें ! मला मज मीपणही येईना मुळीं धरितां ॥४५॥
थांग जलाचा घ्याया, शिरलें पाण्यांत सत्वरी लवण ॥
आपण स्वत: विरोनी गेले, जलथांग त्यास कोठोन ॥४६॥
तैसे तुज आत्म्यातें जातां बघण्यास, हारपे मीच ॥
मग तूं कसा किती, हें कल्पाया शक्य काय अगदींच ॥४७॥
जागेपणीं दिसेना नीद, पहाणार द्दष्टिलाच मुके ॥
द्दश्यत्वें तुज पाहों जातां, द्रष्टा असा न राहुं शके ॥४८॥
सूर्यप्रकाश नसतां, पडला अंधार नच दिसे कांहीं ॥
परि ‘मी आहे’ याचे भानें नसे हें कधीं घडत नाहीं ॥४९॥
तैसें स्वरूपभूता, तुज स्वरूपीं भेटतांच, तूंपणही ॥
मीपण सहित विरोनी, भेटीचें ऐक्य राहतें पाही ॥५०॥
डोळ्यावर डोळ्याचें चित्र उमटतांच पाहणें त्याला ॥
नि:संकोच, अशानें डोळा अपुलान पाहतो डोळा ॥५१॥
संवादनिमित्तानें, जैसें द्दष्टीत फूट नच पडतां ॥
मी-तूंविण तुजमाझी भेट तशी आत्मरूप हे ताता ॥५२॥
मी द्दष्टा, द्दश्य मला तूं, या ग्रासोनिया उपाधीला ॥
चिन्मात्र भेट केवल उरलें, भोगीत घोळुनी त्याला ॥५३॥
भोजन करणार मिषें, रुचि घे रस स्वाद आपला अपण ॥
देखे स्वतांस आपण, दर्पण मिष करुनि ज्यापरी जाण ॥५४॥
दुर्ज्ञेय आत्मतत्वा रचुनी नाना प्रमेय वर्णियले ॥
भेटी ऐक्यसुखाच्या गोष्टीची अक्षरेंहि मौन भले ॥५५॥
भेटीचा केलसे जो मी अनुवाद त्या निमित्तानें ॥
समजुनि घे निजरूपा, दीप जसा आपणास दीपपणें ॥५६॥
या गोष्टीच्या श्रवणें मननें उघडेल ज्ञानद्दष्टीतें ॥
अपणामाजी अपुली भेट, सख्या सहज आपणा होते ॥५७॥
अपरंपार जलाचा सागर, प्रलयांत उगम निज ग्रासी ॥
तैसा तूं समरस हो स्वरूपीं, टाकोनि आदि अंतासी ॥५८॥
विरहीत नामरूपें असणें तव साच ज्ञानदेव म्हणे ॥
स्वानंद जीवनानें, प्रिय चांगा तूं सदा सुखी होणें ॥५९॥
अभ्यास पुढतपुढती केल्यानें, प्राप्त ज्ञान संपत्ती ॥
वेत्ता वेद्य विरोनी, ब्रह्मपदीं तव स्थिरेल सहजगती ॥६०॥
तव भेटिच्या निषानें, मोठया प्रेमें निवृत्ति गुरुराजें ॥
तुजला रसाळ दिधलें चांगा रे घेइ स्वानुभव खाजें ॥६१॥
दोन्ही डोळस अरिसे, मुकती भदास एकमेकांला ॥
पाहुनि, अभेद अनुभव त्यापरि ये ज्ञानदेव चांगला ॥६२॥
करुनी जो या काव्या दर्पण, प्रतिबिब त्यांत पाहील ॥
आत्माच तो सुखाचा कंद प्रतिती तयास येईल ॥६३॥
काय असें, जें नाहीं, दिसतें तें कायसें, न मी जाणें ॥
आपैसेंच असे जें, तें कैसें होइजे, वदूं नेणें ॥६४॥
निद्रेपरती निद्रा, जागृति गिळुनी जशी असे जाग ॥
श्रीज्ञानदेव म्हणती रचिला हा ग्रंथ त्यापरी सांग ॥६५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP